// श्री स्वामी समर्थ //
" कॕलिंक "
सिंहगड रोडवरती हिंगण्याच्या चौकात डावीकडे वळायचे आणि साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर याचे दर्शन होते.कॕनाॕलच्या दोन्ही बाजूंना जोडणारी लिंक म्हणून या राजबिंड्या पुलाला "कॕलिंक" अशा नावाने ओळखले जाते.या पुलावरुन डावीकडे गेल्यास अत्यंत निसर्गसंपन्न अशा तळजाईच्या जंगलाकडे जाता
येते आणि उजवीकडे वळल्यास सिंहगड काॕलेज कडे. या पुलाला लागूनच अतिशय सुंदर असा फक्त चालणाऱ्यांसाठी असलेला तीन किलोमीटरचा सरळ ट्रॕक आहे.या पुलाच्या खालून अखंड आणि स्वच्छ असा कॕनाॕल मधील पाण्याचा शांत प्रवाह आहे. शेकडो पक्षांची येथे वस्ती आहे . पहाटे पासून ते रात्री पर्यंत वेगवेगळ्या वेळी हा "कॕलिंक " पाण्यात पडणाऱ्या आपल्या प्रतिबिंबा कडे औत्सुक्याने पहात असतो. विश्रांती नगर पासून ते वडगाव पर्यंत याची चार भावंडे आहेत. वयाने आणि अनुभवाने हा ज्येष्ठ आहे.आधुनिकतेची आवड असल्यामुळे आणि सौंदर्याचा उपासक असल्यामुळे मागच्याच महिन्यात त्याने स्वतःला वायर रोपचे तुरे लावून घेतले आहेत. याराना मधील बच्चन सारखेच याने एलईडी बल्बचे कपडे परिधान केले आहेत. संध्याकाळी तो वेगवेगळ्या प्रकारची मनमोहक अशी रंगांची उधळण विद्युत रोषणाईच्या सहाय्याने करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. रात्री १० नंतर मात्र रस्त्याने जाणारी गर्दी संपल्यानंतर अत्यंत शांत अशा वातावरणात आपल्या अंगातून बाहेर पडणारे बहूरंगी तेजाचे प्रतिबिंब कॕनाॕल मधील पाण्यात बघत बसण्याचा त्याला छंद जडला आहे.पहाटेच्या वेळेला असंख्य पक्षांच्या आनंदात सहभागी होणारा , सकाळच्या कोवळ्या उन्हातील व्हिटॕमीन "डी" ने शुचिर्भूत होणारा , शेकडो बालगोपाळांना आणि चाकरमान्यांना ईप्सित स्थळी सुरक्षितपणे नेणारा , नित्यनेमाने चालायला म्हणून येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना भक्कम असा आधार देणाऱ्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नवीन गोष्टींचे उमदेपणाने स्वागत करणारा.... अशा या आमच्या जुन्याजाणत्या आणि तेजःपूंज पुलाला किंवा कॕनाॕलच्या दोन्ही बाजूना बळकटपणे जोडणाऱ्या लिंक ला म्हणजेच " कॕलिंक" ला मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी (vp )
4 March 2017
electronchikatha.blogspot.com
शनिवार, ४ मार्च, २०१७
" कॕलिंक " कॕनाॕलच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याना जोडणारी लिंक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)