शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

// श्री स्वामी समर्थ //
      " ब्रह्मचैतन्य "
"श्रीराम जय राम जय जय राम "
सातारा जिल्ह्यातील गोंदावले या गावाचे रहिवासी म्हणजे गोंदवलेकर महाराज.त्यांचे अध्यात्मिक गुरु तुकामाई यांनी त्यांना दिलेले नाव म्हणजे " ब्रह्मचैतन्य ". गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सोपा असा तेरा अक्षरी मंत्र सर्व सामान्यांसाठी दिला आहे. "श्रीराम जय राम जय जय राम" हा अत्यंत तेजस्वी असा तेरा अक्षरी मंत्र आहे.या मंत्राचे किंवा नामाचे महत्त्व विषद करणारी त्यांची ३६५ दिवसांची प्रवचने आहेत.नाम स्मरण हे आपण सहजपणे घेत असलेल्या श्वासा सारखे व्हावे या साठी विवीध प्रकारच्या उपाययोजना त्यांनी या प्रवचनातून सांगितल्या आहेत. आमच्या घरी सुध्दा महाराजांची ३६५ दिवसांची प्रवचने असलेले पुस्तक आहे.माझे वडील दररोज त्या दिवशीचे प्रवचन वाचत असत.पहाटे साडेतीन वाजता ब्राह्म्य मुहूर्तावर नामस्मरण करणे हा त्यांचा शेवटच्या दिवसा पर्यंत चालू राहिलेला कार्यक्रम होता. १९ सप्टेंबर २००४ या दिवशी दुपारी दोन ते तीन या वेळात अत्यंत आनंदात महाराजांनी ठरवून दिलेला तेरा अक्षरी मंत्र म्हणत होते. साधारणपणे ३.३० वाजता अंगात स्वच्छ कपडे घालून आणि कपाळाला व्यवस्थित गंध लावून ,डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या अवस्थेत कोणताही आजार नसलेल्या वडीलांनी या जगाचा निरोप घेतला घेतला ......!
पंधरा दिवसांनी सहज म्हणून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनांचे पुस्तक हातात घेतले. १९ सप्टेंबर या दिवशीच्या प्रवचनात महाराजांनी सांगितलेले आहे की शेवटच्या श्वासा नंतरच्या काळात गुरु तुमच्या नामस्मरणाची काळजी घेतील !
विनायक जोशी ( vp )
28 April 2016
electronchikatha.blogspot.com

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

कपिल आणि प्राज @स्वीडन

// श्री स्वामी समर्थ //
     " कपिल आणि प्राजक्ता "
हे दोन्ही मुक्त पक्षी सध्या स्वीडन मध्ये  निसर्गाच्या सानिध्यात अत्यंत प्रेमाने रहात आहेत.दोघांचेही शिक्षण वाशी येथील माॕडर्न शाळेत झालेले आहे.प्राजक्ताने रुईया काॕलेज मधून शिक्षण पूर्ण केले आणि त्या नंतर डाॕ.वाटवे यांच्या बरोबरीने पुण्यात काही दिवस काम केले. त्या नंतर मात्र डेन्मार्क मधील कोपनहेगन  येथून डाॕक्टरेट पूर्ण केली. कपिलने एंजल काॕलेज मधून इंजिनियरींग पूर्ण केले .त्या नंतर  IIM अहमदाबाद मधून MBA. तो उत्तम दर्जाचा Biker आहे.होंडाच्या आवडत्या गाडीवरुन प्राज ला घेऊल बंगलोर - उटी - मुन्नार असे दौरे केलेले आहेत.आदित्य बिर्ला पासून सुरवात करुन सध्या तो एरीकसन या कंपनी मध्ये स्टाॕकहोम नावाच्या  "नोबेल" सीटी मध्ये  नोकरी करत आहे. प्राजक्ताने सुध्दा 'माल्मो' येथे पोस्ट डाॕक्टरेट केले आहे. मुंबई मध्ये आयुष्य गेलेले असून सुध्दा स्वीडन येथील अत्यंत देखण्या अशा निसर्गाच्या कॕनव्हास वरती अत्यंत आनंदाने ते दोघे विहार करत आहे.फोटोग्राफीचे सखोल ज्ञान असणाऱ्या आणि कोणत्याही गाण्याची 'धून' अचूक पकडणाऱ्या  कपिलने अचूक वेळी म्हणजेच १९ डिसेंबर २०१३ या दिवशी प्राजक्ताचा हात हातात घेतला आहे. 

विनायक जोशी (vp)
  19 December 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

" श्री नृसिंह सरस्वती "

// श्री स्वामी समर्थ //
      "श्री नृसिंह सरस्वती "
          " कन्यागत "
"वाट वळणाची जीवालागे ओढी ,
  दिसते समोर नरसोबाची वाडी " या ओळींची आवर्तने करत करत नृसिंह सरस्वतींच्या वाडीला पोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील कमी पाऊस पडणारा हा प्रदेश असुन सुध्दा कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमामुळे समृद्ध आणि पावन झालेला आहे.
नृसिंह सरस्वती यांनी या अत्यंत निसर्गरम्य प्रदेशात बारा वर्षे तपश्चर्या केली आहे. हा प्रदेश म्हणजे त्यांचा अध्यात्मिक राज दरबार आहे. प्रत्येक बारा वर्षांनी "गुरुचा" कन्या राशीत होणारा प्रवेश .बरोबर याच काळात येथे प्रगट होणारी गंगा .नरसोबाच्या वाडी मध्ये शुक्लतीर्थ येथील तीचे अस्तित्व वगैरे अनेक गोष्टी कानावर येत होत्या. शनिवारी दक्षिणद्वार होऊन गेले होते.या वेळी पुराचे पाणी" दत्त महाराजांच्या" पादुकां वरुन वाहत येऊन मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडते . रविवारी दुपारी गर्दी असून सुध्दा शांतपणे दर्शन झाले. सोमवारी भल्या पहाटे उठून नदीत स्नान केले. टेंबे स्वामींनी आखून दिल्या प्रमाणे दररोज पहाटे साडे तीन पासून रात्रीच्या शेजारती पर्यंत सर्व कार्यक्रम हे अतिशय समाधानकारक पणाने पार पडतात. कमालीची Positive vibrations या पूर्ण भागात आढळतात. दोन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे सोलापूरला जायचे ठरवले होते परंतु अचानक पणे नृसिंहवाडीला गेलो. नृसिंहवाडी येथिल पुराचे पाणी ओसरल्यामुळे सर्व गोष्टी उत्तम पणाने दत्त महाराजांनी करवून घेतल्या .
अत्यंत समाधानाने परतीच्या गाडीत बसलो . आता मात्र " आम्ही भाग्यवान आनंद निधान " या ओळींची आवर्तने चालू झालेली होती !!!!
  विनायक जोशी ( vp)
13 डिसेंबर  2016
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

आनंदयात्री " संदीप कुलकर्णी "

// श्री स्वामी समर्थ //
    " आनंदयात्री "
  " संदीप कुलकर्णी "
  अत्यंत उत्तम आणि उमदे व्यक्तिमत्त्व असलेल्या या मुलाने "ट्रेनी इंजिनियर ते बिझनेस हेड" अशी प्रगतीची वाट अत्यंत आनंदाने व अविरत कष्टाने पार केली आहे. आहे.नाशिक येथे वडिलांची नोकरी असल्यामुळे बालपण व शिक्षण येथेच पूर्ण केले. पहिली नोकरी " बुस्ट " या कंपनीत केली.या नंतरच्या  कारकिर्दीची सुरुवातच माणसांची
उत्तम पारख असणाऱ्या उदय जाधव आणि ललित सहानी यांच्या पुण्यातील "UL" कंपनी मध्ये झाली. अत्यंत आक्रमक मार्केटिंग आणि त्याला योग्य  असा उत्पादन विभाग यामुळे" संदीप कुलकर्णी "या नावाला असंख्य देशी आणि विदेशी कंपन्यामध्ये   कमालीची विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.
कोणत्याही कामाला अथवा माणसाला कमी न लेखणे ,काळानुरुप नवीन नवीन  गोष्टी शिकणे , आपल्या बरोबरीने काम करणाऱ्या माणसांना उत्तम दर्जाचे काम आनंदाने करण्यासाठी कायम प्रेरित  करणे ,कामाचे श्रेय कायमच आपल्या सहकार्यांना देणे ही त्याची सहज प्रवृत्ती आहे.
योगासने या विषयात विशेष गती असलेली "भाग्यश्री " त्याला उत्तम अशी जीवनसाथी म्हणून लाभली आहे. सायली आणि सार्थक या दोन मुलांनी त्याला कायम उत्साहाने रहायला प्रेरित केले आहे. सलमानचा तो फॕन असल्यामुळे व्यायामाची त्याला आवड आहे, असंख्य गाणी त्याला तोंडपाठ आहेत , तो उत्तम प्रकारचा गायक सुध्दा आहे. प्रशांत  सारख्या  जिवलग मित्राची आणि सचिन या धाकट्या भावाची त्याला उत्तम साथ आहे.
त्र्यंबकेश्वरा पासून ते पांडव लेण्यां पर्यंत अध्यात्मिक समृद्धीने समृद्ध असे नाशिक हे मुळ गाव असलेल्या आणि शेगावच्या संत गजानन महाराजांच्या  "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राचा आशिर्वाद लाभलेल्या या आमच्या  साथीदाराची भावी वाटचाल सुध्दा असंख्य लोकांना आनंद देणारी आणि यशोदायी ठरो !!!
विनायक जोशी (vp )
१० डिसेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

शर्वरी आणि अविनाश

// श्री स्वामी समर्थ //
  " शर्वरी अविनाश "
डहाणूकर काॕलनीच्या अलिकडे मिर्च मसाला हाॕटेलच्या शेजारी एक छोटासा चढ आहे.याच ठिकाणी " सिल्व्हर लाईन " अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर " शर्वरी आणि अविनाश" यांचे सुगरण पक्षाने बांधावे असे सुंदर आणि सर्वांना हवेहवेसे वाटेल असे उबदार घरटे आहे.या घरट्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला नातेवाईक वगैरे गेट पासची अजिबात जरुरी नाही. पहाटे पासून रात्री पर्यंत अथक परिश्रम अत्यंत आनंदाने करणाऱ्या जोडीचे हे घरटे आहे.कोणत्याही वेळी आणि कितीही दिवसांनी तुम्ही येथे गेलात तरी कमालीच्या आपुलकीने येथे स्वागत होते.आपापल्या क्षेत्रात अथवा मित्र मंडळींच्या मध्ये वावरायची स्पेस दोघांनी एकमेकांना उत्तमपणे दिली आहे.आपल्या अत्यंत प्रेमळ ,हळव्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या नवऱ्याला शर्वरी छान साथ देतआहे आणि शर्वरीने केलेल्या प्रत्येक  गोष्टींला अविनाश रसिकतेने दाद देत आहे .याच संस्कारात दोन पिल्ले सुध्दा मोठ्ठी झाली आहेत.परमेश्वराने तो अत्यंत आनंदात असताना सिलेक्ट केलेल्या या आनंदी जोडीला म्हणजेच शर्वरी सारख्या अंतर्बाह्य आनंदी व सुंदर आणि सुगरण मुलीला आणि अवि सारख्या दिलदार मुलाला आजच्या दिवशी आमच्या दोघांच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा !!!
विनायक आणि कल्याणी
६ डिसेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

आनंद यात्री "हेमंत शितोळे "

// श्री स्वामी समर्थ //
   " आनंद यात्री "
    ' हेमंत शितोळे '
पाटस सहकारी कारखान्याचे माजी प्रमुख कै.रामभाऊ शितोळे यांचा हा दोन नंबरचा मुलगा.सातारच्या काॕलेज मधून BE झाल्यानंतर तीन महिने इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीमधे कामाचा अनुभव घेऊन त्या नंतर स्वतःची कंपनी काढायची असे ठरवून आमच्या कंपनीमधे आला. पुढील सात वर्षे आमच्या कंपनीमधे अत्यंत आनंदाने राहिला. या नंतर सहा महिने प्रभात रोड गल्ली नंबर सात येथे 'संजय मोहिले 'यांच्या कडे काम केले.ही नोकरी करत असतानाच "टोफेल" वगैरे परिक्षा पास झाला. १९९३ साली अमेरिकन दुतावासाने त्याला तेथील  शिक्षणा साठी  व्हिसा द्यायला नकार दिला .या प्रसंगा नंतर स्वतःची कंपनी काढायचा निर्णय पक्का केला.
अत्यंत पारदर्शक असा स्वभाव , उत्तम अशी विनोदाची जाण , स्वतःवर सुध्दा विनोद करायची विनोदबुध्दी , इंग्रजी वरती जबरदस्त कमांड , Documentation मधील मास्टर . विनोदी स्वभावाला अनुसरून खोल निरीक्षण शक्ती हे त्याचे सहजगुण आहेत.
सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहजपणे आपलेसे करून घेणे ही त्याची खासियत आहे.
"संजीवनी" ही त्याची अत्यंत आनंदी आणि सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळणारी जोडीदारीण त्याच्या बरोबरीने आहे. एकुलता एक मुलगा "सौरभ" काॕलेजचे शिक्षण आणि गिटार वादन उत्तम पणे करत आहे.
"हेमंत शितोळे" या विनोदाची उत्तम जाण असलेल्या उमद्या स्वभावाच्या जगत् मित्राचे पुढील आयुष्य सुध्दा  अत्यंत आनंदाचे आणि समाधानाचे जावो !!
     विनायक जोशी (vp)
        ६ डिसेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

अलौकिक " मित्र फाउंडेशन "

// श्री स्वामी समर्थ //
    " अलौकिक मित्र फाउंडेशन "
   पंडित भिमसेन जोशी यांच्या बरोबरीने साधारणपणे वीस वर्षे "सवाई गंधर्व महोत्सव" आयोजनात महत्त्वाचा सहभाग असणारे सुप्रसिद्ध डाॕ.गोखले आणि त्यांचे चिरंजीव डाॕ.धनंजय गोखले यांची संस्था म्हणजे "मित्र फाउंडेशन ".
दिनांक २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पंडित शिवकुमार शर्मा ,कैवल्यकुमार गुरव ,शुजात खान आणि कौशिकी चक्रवर्ती अशा दिग्गजांचा कार्यक्रम पंडित फार्म्स या ठिकाणी संध्याकाळी  ६ ते १० या वेळात होता. अत्यंत स्वच्छ आणि प्रशस्त बैठक व्यवस्था होती.उत्तम दर्जाची ध्वनी व्यवस्था होती. कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच साउंड सिस्टीम अॕरेंजर बरोबरीने कलाकारांचा सराव चालू होता.कार्यक्रमाची सुरुवात डाॕ.गोखले आणि पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांनी दीप प्रज्वलन करुन केली.या नंतर मात्र पंडित शिवकुमार शर्मा  यांनी अवर्णनीय अशा प्रकारे संतूरवादन केले.सलग सव्वा तास वादन केल्यानंतर दोन मिनीटांचा ब्रेक आणि त्या नंतर साथीदारांच्या बरोबरीने दुसऱ्या रागाच्या तयारीसाठी १० मिनीटे ट्युनिंग. हि १२ मिनीटे चाललेली तयारी पाच हजार रसिक कोणत्याही प्रकारची चुळबुळ न करता अनुभवत होते .ऐंशी वर्षांच्या या कलाकाराने आपल्या वादनाने आणि विनम्र भाषेने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. यांच्या नंतर  कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण वातावरण भारावून टाकले .अत्यंत बारीकसारीक गोष्टी अचूक पणे टिपून मनमोकळेपणाने दाद देणारा रसिक प्रेक्षक असल्यामुळे कलावंत मंडळी सुध्दा वेगवेगळ्या हरकती सादर करत होते.अर्थातच वेळेचे बंधन असल्यामुळे भैरवीने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.दुसऱ्या दिवशी शुजात खान यांचे सतार वादन आणि दोन तबल्यावरील साथीदारांना त्यांनी दिलेली स्पेस अत्यंत लक्षणीय होती .शुजात खान यांच्या अत्यंत वेगवान आणि एकदम हळूवार अशा प्रकारच्या वादनाने संपूर्ण सभागृहात निःशब्द अशी शांतता होती.या  कार्यक्रमाचा उत्तरार्ध " कौशिकी चक्रवर्ती " यांच्या गायनाने झाला.पंडित ह्दयनाथ मंगेशकरांच्या समोर पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करत असल्यामुळे कौशिकी यांनी सर्वोत्तम ते सादर केले . कार्यक्रमात  लोकांच्या आग्रहास्तव " सुंदर ते ध्यान " हे ह्दयनाथांनी संगीतबद्ध केलेले भजन त्यांच्याच परवानगीने सादर केले. या दोन दिवसात रघुनंदन पणशीकर किंवा विभावरी आपटे , राघवेंन्द्र जोशी वगैरे या क्षेत्रातील मंडळी सुध्दा रसिकांच्या रोल मध्ये दिसली.
पंडित फार्म येथील प्रशस्त पार्किंग व्यवस्था , स्वच्छ टाॕयलेटस् , उत्तम दर्जाची आसन व्यवस्था , अत्यंत उत्तम अशी ध्वनी व्यवस्था , या कार्यक्रमात उपस्थित दर्दी रसिक व अनपेक्षित पणे दर्शन झालेले पंडित ह्दयनाथ मंगेशकर आणि तंतूवाद्य किंवा व्होकल काॕर्डसचा वापर हुकूमीपणे वापरणारे विनम्र कलाकार यांच्या मुळे  कमालीचे समाधान मिळाले. पंडित शिवकुमार शर्मा किंवा शुजात खान यांच्या वादना नंतर या असामान्य कलावंतांचे आपण पुलंच्या "रावसाहेबांसारखे कौतुक" करु शकत नाही याची परत एकदा जाणीव झाली.
अत्यंत निरपेक्षपणे या ठिकाणी गेलो होतो आणि कमालीच्या समाधानाने व तृप्त होऊन परतलो.
विनायक जोशी (vp )
2 december 2016
electronchikatha.blogspot.com

आनंदयात्री " नंदू देशपांडे "

// श्री स्वामी समर्थ //
   " आनंद यात्री "
      " नंदू देशपांडे "
२ डिसेंबर १९६५ या दिवशी सोलापूर मधील ९५१ आदर्शनगर या पत्यावर परमेश्वराने एका कमालीच्या आनंदी आणि समाधानी मुलाला प्रवेश दिला. परसा मध्ये असलेला विशालकाय औदुंबर , घरातील ह.भ.प आजोबा , पाच बहीणी , आई - वडील आणि शेजारच्या घरातील १ महिन्याच्या नारायणने प्रचंड आनंदोत्सव साजरा केला. एकुलता एक मुलगा असल्यामुळे बालपण अतिशय लाडाकोडात गेले . शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाले मध्ये पूर्ण केले आणि  त्या नंतर तंत्र विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेतले.पुण्यात काही काळ नोकरी केली .आईच्या नैसर्गिक जबरदस्त प्रेमामुळे पुढील आयुष्य सोलापूर मध्ये व्यतित केले.लहानपणी सुरेल स्वरात रडणारा , दिवाळी मध्ये भरपूर फटाके उडवणारा , हाॕकी सारख्या खेळात विशेष प्राविण्य मिळवलेला , नारायणचा जिवलग मित्र ,भविष्याची अनाठायी काळजी न करणारा ,किर्ती सारखा आनंदी जोडीदार लाभलेला, अत्यंत सुंदर आणि हूशार अशा दोन मुलींचा पिता आणि जवळचा मित्र , वृध्दावस्थेतील आई वडिलांची श्रावण बाळासारखी नेटाने सेवा करणारा , आमच्या आईचा मानस पुत्र असलेल्या या सरळमार्गी अशा नंदूला आज वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण जोशी परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी परिवार
२ डिसेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com