मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

प्राध्यापक सौ.मंगल जोशी साने

" श्री स्वामी समर्थ "
*प्रा.सौ.मंगल जोशी-साने*

आज १३ सप्टेंबर २०१७ या दिवशी अत्यंत यशस्वी आणि आनंदी आयुष्याची पन्नाशी मंगलने पूर्ण केली आहे. कऱ्हाड येथे भारती विद्यापीठात मनमिळावू प्राध्यापक  म्हणून अत्यंत आवडीने आणि उमेदीने कार्यरत आहे.कमालीच्या जिद्दीने आणि सहजतेने नोकरी करत करत पाच - सहा शैक्षणिक पदव्या तिने पटकावल्या आहेत. आमच्या घरातील या शेंडेफळाच्या पाठीशी आई - दादांचा प्रेमळ  आशिर्वाद आहे. संत गजानन महाराजां सारखे  त्रिकालज्ञानी गुरू तिला लाभले आहेत. आमच्या भाच्चे कंपनीची ती अत्यंत लाडकी मनमावशी आहे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे मन मनापासून जपणाऱ्या " मनला " आमच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा . 💐💐🎂🎂💐💐
*विनायक आणि कल्याणी*
9423005702
*electronchikatha.blogspot.co*

सोमवार, १९ जून, २०१७

सिध्दिविनायक मंदिर प्रतिष्ठापना ,कोलकाता दानकुनी अल्ट्राटेक सिमेंट

// श्री स्वामी समर्थ //
   " सिध्दिविनायक मंदिर "
कोलकाता येथील "अल्ट्राटेक सिमेंट दानकुनी "या कारखान्यात या युनिटचे प्रमुख नारायण जोशी यांच्या हस्ते "गणेश मंदिराची " प्रतिष्ठापना झाली. पुण्यातील शंकराचार्य मठात कार्यरत असणारे घनपाठी गुरुजी "अमित जोशी "यांच्या व्यक्तीगत मार्गदर्शना खाली होमहवन आणि प्रतिष्ठापनेचा सोहळा यथासांग पार पडला. सर्व संकल्प सिध्दिला नेणाऱ्या अशा या गजाननाच्या किंवा  सिध्दिविनायकाच्या आशिर्वादामुळेच अतिशय प्रसन्न अशा मंदिराची स्थापना झाली. श्री गणेशाची मुर्ती गुरुजींनी शास्रोक्त पध्दतीने बनवून घेतली आहे . कोट्यावधी सूर्यांचे तेज असलेल्या आणि सर्व कामे निर्विघ्नपणाने करुन घेणाऱ्या या बुध्दीच्या देवतेला मनःपूर्वक साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
विनायक आणि कल्याणी जोशी
9423005702
19 June 2017
electrochikatha.blogspot.com

शनिवार, १७ जून, २०१७

" दादा " Fathers Day

// श्री स्वामी समर्थ //
       " दादा "
   " प्रभाकर गणेश जोशी "
गणेश आणि सरस्वती जोशी या लोणावळा येथे राहणाऱ्या दांम्पत्याला २२ फेब्रुवारी १९३० या दिवशी पहिला मुलगा झाला तो म्हणजे आमचे 'दादा'.आई -वडील आणि धाकटा भाऊ पद्माकर यांच्या बरोबर अतिशय आनंदात बालपण गेले. आजोबांची सोलापूर येथे बदली झाल्यामुळे दादांचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उत्तम शिक्षक असलेल्या दर्जेदार विद्यालयात झाले.मॕट्रीकची परीक्षा उत्तम रितीने पास झाल्यानंतर दयानंद काॕलेज मधून BA पूर्ण केले. याच कालखंडात रेल्वे मध्ये नोकरी लागली आणि मंगळवेढा येथील रावसाहेब मायदेव यांच्या मुली बरोबर म्हणजेच यमु मायदेव हिच्या बरोबर विवाह बध्द झाले. अतिशय उत्तम पणाने आणि निष्ठेने कोणतेही काम करायचे या त्यांच्या सहजवृत्तीमुळे अल्पावधीतच नोकरी मध्ये प्रमोशन्स मिळत गेली. १९५९ साली म्हणजेच वयाच्या २९ व्या वर्षीच आजोबांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर येथील आदर्शनगर मध्ये स्वतंत्र घर बांधून "गुरुप्रसाद" या वास्तूत प्रवेश केला.अक्कलकोट येथील देवअण्णा जोशी यांच्या कडून वयाच्या ३५व्या वर्षी पारमार्थिक अनुग्रह मिळाल्यामुळे अतिशय समाधानी आणि संयमित आयुष्याची वाटचाल झाली.कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट कारभार न करता किंवा तत्त्वांशी अजिबात तडजोड न करता ३६ वर्षे सरकारी नोकरीत काम केले. आम्ही पाच भावंडे आणि आजी आजोबा अशा ९ जणांची कोणत्याही प्रकारची हेळसांड न करता आदर्शवत संसार केला.बालगंधर्वांपासून ते  सोलापूरच्या फैय्याज पर्यंत सर्वांची संगीत  नाटके त्यांनी आनंदाने बघितली होती , पतौडीच्या फिल्डींग पासून ते सेहवागच्या बॕटींग पर्यंत आवडणारे अनेक विषय त्यांच्या खात्यात होते , रामदास स्वामींच्या करुणाष्टका पासून ते लाॕर्ड टेनिसनच्या कवितां पर्यंत अनेक गोष्टी त्यांना मुखोद्गत  होत्या. रिटायरमेंट नंतर मात्र नातवंडांच्या बरोबरीने खेळत खेळत त्यांच्या स्वतःच्या  अत्यंत आवडत्या क्षेत्राचा म्हणजे परमार्थाचा खोलवर अभ्यास त्यांनी केला. समर्थांच्या शिवथरघळीत राहून दासबोधाचा अभ्यास केला.सखोल दासबोध किंवा गीता दर्शन यांच्या अभ्यासाने   स्वतःची पारमार्थिक उन्नती करुन घेतली. पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करणाऱ्या आणि काया - वाचा - मनाने अतिशय निर्मळ व्यवहार करणाऱ्या दादांची आठवण येत नाही असा आमचा एकही दिवस जात नाही .......!
विनायक जोशी (VP)
9423005702
electronchikatha.blogspot.com
प्रभाकर गणेश जोशी
(१९३०-२००४)
९५२ , "गुरुप्रसाद "
आदर्शनगर ,
सोलापूर
४१३००३

बुधवार, ३१ मे, २०१७

" नादखुळे कोल्हापूर "

// श्री स्वामी समर्थ //
  " नादखुळे कोल्हापूर "
साधारणपणे १९८१ पासून  अतिशय सुंदर अशा या गावाबरोबर माझे ऋणानुबंध दृढ होत गेला. मेनन पिस्टन किंवा  वर्तमानपत्र तयार करायची वेगवान आणि अत्याधुनिक मशिन्स तयार करणारी "मनुग्राफ " कंपनी दिसली कि आपण कोल्हापूरच्या हद्दीत शिरलो असे समजायचे. अत्यंत सुबक आणि स्वागतोत्सुक अशा कमानीपासून या निसर्ग संपन्न आणि खानदानी गावातील अनेक आठवणी आहेत. करविरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीचा या गावावरती सुबत्तेचा कृपाशिर्वाद आहे. येथे गंगावेस तालमीत लाल मातीच्या आखाड्यात अंगमेहनत करणारे अनेक पैलवान आहेत , रस्त्यावर उभे राहून धारोष्ण दूध देणाऱ्या म्हशी आहेत , सुंदर असा रंकाळा तलाव आहे , वेगवेगळ्या सिनेमांचे शुटींग झालेला शालिनी पॕलेस आहे . येथे कोल्हापूरी झणझणीत मिसळ आहे , खासबाग मैदानात फुटबाॕलचे सामने आहेत , येथे ताराबाईंचे सुरेख शिल्प आहे , याच भागात किंवा टाकाळा येथे जाताना सुरेख असे असंख्य बंगले आहेत , स्वयंसिध्दा सारख्या संस्था आहेत ,  बाईचा पुतळा आहे , चंद्रकांत मांढरे यांची आर्ट गॕलरी आहे , राजारामपूरी मध्ये सर्व बॕंका आणि आधुनिक अशी बाजारपेठ आहे , गोकूळ सारखी आठवणीत राहणारी जूनी हाॕटेल्स आहेत , सेंट झेवियर सारख्या असंख्य शाळा आहेत , विवेकानंद काॕलेज आहे , अतिशय भव्य असे शिवाजी विद्यापीठ आहे , अत्यंत सुरेख किंवा जिवंत वाटावेत अशा असंख्य शिल्पांनी समृद्ध असा कण्हेरी मठ जवळ आहे . जोतिबांचे वसतिस्थान जवळच्या डोंगरावर आहे , राजांचा " पन्हाळा " आहे , तीनशे मीटर उंचीवर फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज आहे , त्याच्या जवळच  " विश्वास नांगरे पाटील " यांचा बंगला आहे .........अशा असंख्य आनंददायी आठवणी म्हणजे कोल्हापूर आहे .
कोल्हापूरातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे केदार आणि मंदार या अत्यंत चलाख अशा भाच्यां बरोबर आनंदात घालवलेल्या वीस बावीस वर्षांच्या असंख्य आठवणी  ....!
विनायक जोशी (vp )
9423005702
electronchikatha.blogspot.com

रविवार, २८ मे, २०१७

किल्ले पन्हाळा

// श्री स्वामी समर्थ //
         " पन्हाळा "
नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांचे शांतपणे दर्शन घेऊन आणि कुरुंदवाड येथील कर्मयोगी बाबा फाटकांची भेट घेऊन कोल्हापूर येथील अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजेच माळी काॕलनी मधील वसंत व्हिला येथे बहिणीच्या घरी पोचलो.सुरेश रावांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच जोतीबा आणि पन्हाळा असा कार्यक्रम आखला होता. सकाळी भुरभुरणाऱ्या पावसात डोंगरीच्या जोतीबांच्या दर्शनाला पोचलो. संपूर्ण मंदिराचा परिसर गुलालमय झालेला होता. मंदिराच्या सुरवातीलाच दोन  भव्य नंदी एकाच ठिकाणी स्थानापन्न होते त्यांचे दर्शन घेऊन नंतरच मुख्य देवांचे दर्शन घेतले.जोतीबाचे चांगभले म्हणत पन्हाळ गडाकडे जाण्यास निघालो. कोणत्याही जोडून सुट्या नसल्यामुळे गडावरती अतिशय कमी गर्दी होती. अत्यंत त्वेषाने लढत असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा बघितला आणि घोडखिंडीच्या लढाईची दृष्ये दिसू लागली..
पन्हाळा या ऐतिहासिक गडाला सिद्दीजौहरने घातलेला मजबूत वेढा आणि  त्यामुळे गडावर अडकून पडलेले शिवाजी राजे. गडावरील अंधार बावडी मध्ये असलेल्या पाण्याचा मर्यादित साठा किंवा सोळाफुट रुंदीच्या भिंती असलेल्या अन्नधान्याच्या कोठारातून भात , नाचणी वगैरे गोष्टींचा असलेला  साठा यांचा आढावा घेण्यात आला.गडावरील एकमेकाला दिसतील अशा चाळीस बुरुजांवरची सुरक्षा व्यवस्था आणि  इंग्रजी तोफांना समर्थ पणे तोंड देणाऱ्या तीन दरवाजा या प्रवेशद्वाराची सुरक्षितता अनेकदा आणि अचानक पणे तपासली जात होती. तिन मजली उंच अशा सज्जा कोठी शेजारील खलबत खान्यात राजांच्या सुखरुप सुटके बद्दल वेगवेगळ्या पर्यायांचा विचार चालू होता. राजे शरण येणार ह्या बातमीने सैल पडलेला वेढा. मानाच्या पालखीतून राजे म्हणून जौहरला भेटायला गेलेला शिवा काशिद किंवा याच वेळेला सात टेकड्या आणि पठार असा प्रदेश पार करुन राजांच्या पालखीला घेऊन विशाळगडा कडे निघालेले बाजीप्रभू देशपांडे आणि मावळे यांची प्रचंड आणि सावधपणे चाललेली धावपळ डोळ्या समोर तरळत होती. राजे गडावरुन निघून गेले हे कळल्यावर संतप्त झालेल्या आणि पाठलाग करत बाहेर पडलेल्या सिद्दी जोहरच्या फौजेला घोडखिंडीतच जखडून ठेवणारे आणि  हातात दांडपट्टा घेवून उभे असलेले बाजी प्रभू किंवा राजांची पालखी घेऊन छाती फुटेपर्यंत पळणारे भोई या सर्वांच्या आठवणीने अभिमानाने उर भरुन आला . गडावरुन परत येताना मोरोपंतांच्या नावाने चालू असलेल्या ग्रंथालयात जाऊन आलो. सध्या या गडावर उत्तम रस्ते आहेत . सुबक अशी नगरपरिषदेची इमारत आहे. गडावरुन उतरताना अत्यंत राकट आणि तेजस्वी अशा बाजीप्रभूंच्या पुतळ्याला मनःपूर्वक नमस्कार केला.
पन्हाळा या ऐतिहासिक गडाला भेट द्यायची असेल तर
शिवा काशिद , बाजीप्रभू देशपांडे , घोडखिंड किंवा बाजींच्या बलिदानाने पावन झालेली पावन खिंड याच बरोबर  सिद्दी जौहरचा कडवेपणा किंवा  किल्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्त वाटा , खंदक , तोफा , प्रचंड असे दिंडीदरवाजे वगैरे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. लहानपणीच " श्रीमानयोगी " ची पारायणे केलेली असल्यामुळे त्या ऐतिहासिक रात्री घडलेल्या सर्व घडामोडी जवळून अनुभवता आल्या .....! गडावरती अत्यंत कमी गर्दी असल्यामुळे पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला त्याच्या मुळ रुपात बघता आला .
विनायक जोशी (vp )
9423005702
electronchikatha.blogspot.com

शनिवार, ४ मार्च, २०१७

" कॕलिंक " कॕनाॕलच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याना जोडणारी लिंक

// श्री स्वामी समर्थ //
     " कॕलिंक "
सिंहगड रोडवरती हिंगण्याच्या चौकात डावीकडे वळायचे आणि साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर याचे दर्शन होते.कॕनाॕलच्या दोन्ही बाजूंना जोडणारी लिंक म्हणून या राजबिंड्या पुलाला "कॕलिंक" अशा नावाने ओळखले जाते.या पुलावरुन डावीकडे गेल्यास अत्यंत निसर्गसंपन्न अशा तळजाईच्या जंगलाकडे जाता
येते आणि उजवीकडे वळल्यास सिंहगड काॕलेज कडे. या पुलाला लागूनच अतिशय सुंदर असा फक्त चालणाऱ्यांसाठी असलेला तीन किलोमीटरचा सरळ ट्रॕक आहे.या पुलाच्या खालून अखंड आणि स्वच्छ असा कॕनाॕल मधील पाण्याचा शांत प्रवाह आहे. शेकडो पक्षांची येथे वस्ती आहे . पहाटे पासून ते रात्री पर्यंत वेगवेगळ्या वेळी हा "कॕलिंक " पाण्यात पडणाऱ्या आपल्या प्रतिबिंबा कडे औत्सुक्याने पहात असतो. विश्रांती नगर पासून ते वडगाव पर्यंत याची चार भावंडे आहेत. वयाने आणि अनुभवाने हा ज्येष्ठ आहे.आधुनिकतेची आवड असल्यामुळे आणि सौंदर्याचा उपासक असल्यामुळे  मागच्याच महिन्यात त्याने स्वतःला वायर रोपचे तुरे लावून घेतले आहेत. याराना मधील बच्चन सारखेच याने एलईडी बल्बचे कपडे परिधान केले आहेत.  संध्याकाळी तो वेगवेगळ्या प्रकारची मनमोहक अशी रंगांची उधळण विद्युत रोषणाईच्या सहाय्याने  करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. रात्री १० नंतर मात्र रस्त्याने जाणारी गर्दी संपल्यानंतर अत्यंत शांत अशा वातावरणात आपल्या अंगातून बाहेर पडणारे बहूरंगी तेजाचे प्रतिबिंब कॕनाॕल मधील पाण्यात बघत बसण्याचा त्याला छंद जडला आहे.पहाटेच्या वेळेला असंख्य पक्षांच्या आनंदात सहभागी होणारा , सकाळच्या कोवळ्या उन्हातील व्हिटॕमीन "डी" ने शुचिर्भूत होणारा , शेकडो बालगोपाळांना आणि चाकरमान्यांना ईप्सित स्थळी सुरक्षितपणे नेणारा , नित्यनेमाने चालायला म्हणून येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना भक्कम असा आधार देणाऱ्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नवीन गोष्टींचे उमदेपणाने स्वागत करणारा.... अशा या आमच्या जुन्याजाणत्या आणि तेजःपूंज पुलाला किंवा कॕनाॕलच्या दोन्ही बाजूना बळकटपणे जोडणाऱ्या लिंक ला म्हणजेच " कॕलिंक" ला मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी (vp )
4 March 2017
electronchikatha.blogspot.com

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

"वारी कोल्हापूरची" हेमंत खोले

// श्री स्वामी समर्थ //
      "हेमंत खोले "
"तळजाई ते करवीर निवासिनी"

मेकॕनिकल इंजिनियरींगच्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे काम करणारे , दररोज तळजाईच्या पठारावर हजेरी लावणारे , सूर्यनमस्कारांची अनेक आवर्तने करणारे, गुरु चरित्राची पारायणे करणारे , खगोल शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राचा खोलवर अभ्यास करणारे , कोल्हापूरच्या महालक्ष्मीची निःसीम भक्ती करणारे "हेमंत खोले " यांनी पुणे ते कोल्हापूर एकट्याने पदयात्रा करण्याचा संकल्प केला.
आई भवानीचा आशिर्वाद ,घरच्यांचा पाठिंबा , कामात मिळालेली रजा यामुळे कोणताही गाजावाजा न करता प्रस्थान केले . अर्थातच सुरुवात सर्व कार्ये निर्विघ्न पणे पार पाडणाऱ्या "गणपतीला" पहिला नमस्कार करुन झाली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता टी शर्ट , बर्म्युडा , पाठीवर सॕक , मोबाईल वगैरे माफक सामान घेऊन नवीन कात्रज बोगद्या मधून मजल दरमजल करत संध्याकाळी  शिरवळ हा पहिला टप्पा  गाठला. रात्री पायांना कसेबसे तेल मालीश करुन ताणून दिली. दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्या दिशेने प्रवास चालू केला.रस्त्याने जाताना उजव्या बाजूने चालत असल्यामुळे फक्त समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवत खंबाटकीचा बोगदा पार करुन पारगाव खंडाळ्याच्या येथे विश्रांती घेतली . कोणत्याही वारीला निघालेल्या वारकऱ्या प्रमाणे नामस्मरण किंवा स्तोत्रे म्हणत वाटचाल चालू होती. रात्री साताऱ्यात मुक्काम केला.  या वेळी पहिल्यांदा पायाला आलेले "पोके" किंवा फोडांचे दर्शन झाले. तिसऱ्या दिवशी अत्यंत निसर्ग संपन्न असा सातारा - कराड हा टप्पा  पार केला. या ठिकाणी मुक्कामाला गेल्यावर लक्षात आले की पुढच्या प्रवासात पायात  बुट घालणेच शक्य नव्हते , अशी पायांची अवस्था झाली होती.कऱ्हाड मध्ये नवीन सँडल घेतले आणि सोमवारी सकाळी कोल्हापूर कडे निघाले. सँडल नवीन  असल्यामुळे त्यांचा उपद्रव सुरु झाला. सँडलला बुटांसारखी पकड नसल्यामुळे चालण्याचा वेगही मंदावला. या थोड्याशा निराशाजनक अवस्थेत असताना रस्त्यावर एक वेडसर माणूस भर दुपारच्या उन्हात अनवाणी चालताना दिसला आणि परमेश्वराने आपल्याला सहजपणाने दिलेल्या असंख्य गोष्टींची जाणीव झाली. रात्री नऊ वाजता कोल्हापूरच्या प्रवेशद्वारा पाशी ! या येथून महालक्ष्मी मंदिरा पर्यंचे साधारणपणे १० किलोमीटरचे अंतर मुंगीच्या पावलांनी पार केले . सोमवारी रात्री बरोबर १० वाजता महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. थकलेले शरीर आणि लागलेली प्रचंड भूक यांचा पूर्णपणे विसर पडला. कोणत्याही प्रकारची गर्दी नसल्यामुळे अत्यंत मनोभावे आणि शांतपणाने " श्री महालक्ष्मीचे " दर्शन घेता आले. याच आवारात असलेल्या  "दत्त महाराजांनी" आपल्या या भक्ताला प्रसाद म्हणून "गोड शिरा " दिला. प्रचंड थकलेले शरीर , कमालीची लागलेली भूक आणि ही वारी पूर्ण करुन घेणाऱ्या महालक्ष्मीच्या आशिर्वादा मुळे लाभलेले समाधान अशा मिश्र भावनात्मक अवस्थेत प्रसाद म्हणून मिळालेला शिरा खाताना " अन्न हे पूर्णब्रह्म" या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. या रात्री कोल्हापूरात मुक्काम तावडेंच्या घरी केला . दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळीच मंदिरात हजेरी लावली . सर्व गोष्टी ठरविणाऱ्या , पार पाडणाऱ्या आणि शिवाय मनःपूर्वक "तथास्तु" अशा आशिर्वाद देणाऱ्या अशा कुलस्वामिनी चे म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन " हेमंत खोले " हे कृतार्तथेने परत कर्मभूमी कडे म्हणजेच पुण्याला नवीन उमेदीने आणि आनंदाने परत निघाले  .......🙏🙏🙏
विनायक जोशी (vp)
26 February 2017
electronchikatha.blogspot.com

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

यशाच्या दिशेने चालणारे " मैत्र "

// श्री स्वामी समर्थ //
        " मैत्र "
या  वर्षीच्या बारावीच्या परीक्षा थोड्याच दिवसांनी सुरु होणार आहेत.या निमित्ताने अठरा वर्षापूर्वी बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन मित्रांची आठवण आली.या दोघांच्या मधे साधारणपणे २६ वर्षांचे अंतर होते.दहावी पर्यंतचे शिक्षण काॕन्व्हेंट मधे घेतलेला मुलगा आणि त्याला सर्व बाबतीत मदत करायला तयार असणारा मित्र यांनी मुलाच्या बारावीची तयारी चालू केली.केमिस्ट्री या विषयासाठी उत्तम क्लास मिळाला होता.बाकीचे विषय मात्र काॕलेज,क्लास  आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून होते.दररोज चा अभ्यास दररोज अत्यंत एकाग्रता पूर्वक करायचा आणि त्या नंतर खेळायचे हे रुटीन परीक्षेच्या दिवसा पर्यंत चालू होते. रात्री अभ्यासासाठी जागणे किंवा भल्या पहाटे उठणे हे दोघांनाही आवडत नसे. या मुलाचा अभ्यास चालू असताना त्याचा मित्र त्या खोलीत पेपर वाचन किंवा त्याचे आॕफिसचे काम करत बसलेला असे. शेवटचे दोन महिने मात्र या मुलाने सोडवलेले पेपर दुसऱ्या गावातील किंवा काॕलेज मधील प्रोफेसर मंडळींना दाखवून त्यांची मते जाणून घेणे वगैरे कामे हा मित्र कामावरती सुट्टी घेऊन करत असे. घड्याळ लावून वेळेच्या आत पेपर सोडवून व्हावा या साठी दोघे मिळून चर्चा करत असत.पेपर चांगले गेले तर सांगलीच्या वालचंद काॕलेज मधे मेकॕनिकल साईड ला ॲडमिशन घ्यायची हे ठरलेले होते.परीक्षेच्या काळात मात्र एकदम रिलॕक्स शेड्यूल होते.पेपर सोडवून आल्यावर चूक काय झाली यावर फक्त दोन चार मिनीटे चर्चा .त्यानंतर अर्धा तास मित्रांच्या बरोबर गप्पा आणि त्या नंतर दोन तास दुसऱ्या दिवसाचा अभ्यास.या काळात मित्राने मात्र कामावरती सुट्टी घेतली होती.परीक्षेच्या काळात मुलाच्या आईला काळजी पासून दूर ठेवायचे काम सुध्दा हा मित्र उत्तम प्रकारे पार पाडत होता. परीक्षा झाल्यानंतर मात्र हा मुलगा दोन महीने आजोळी आजी आजोबांकडे सोलापूरला गेला. साधारणपणे जूलै महिन्यात रिझल्ट होता.रिझल्टच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वाजता बातमी आली त्या प्रमाणे हा मुलगा बोर्डात आलेला होता. संध्याकाळ पर्यंत वेगवेगळे वर्तमानपत्र वाले ,मित्राच्या आॕफिस मधील मंडळी  , शेजारील माणसे, नातेवाईक,मुलाचे असंख्य मित्र वगैरे प्रचंड वर्दळ चालू झाली. दुसऱ्या दिवशी काॕलेज मधे बोर्डात आलेल्या सर्व मुलांचे वेगवेगळ्या मंडळींच्या बरोबर फोटो सेशन झाले.मार्कशीट वरील मार्क बघितल्या वर त्याच्या मामाने कळवले त्या प्रमाणे  त्या वेळचे पुण्यातील काॕम्प्युटरचे उत्तम काॕलेज 'PICT'येथे अॕडमिशन घ्यायचे ठरले. अगदी लहानपणापासून प्रत्येक बारीकसारीक शंकांचे निरसन करणारा ,  क्रिकेट पासून ते WWF पर्यंत सर्व खेळ मुलांच्या बरोबर  खेळणारा ,काॕमन सेन्सचा असामान्य वापर करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असलेल्या  मित्राचे नाव 'सुरेश सोवनी' आहे आणि बारावीला बोर्डात आलेला त्यांचा मित्र आणि मुलगा 'केदार सोवनी 'यांची ही छोटी गोष्ट आहे. एकमेकांशी मित्रा सारखे राहून सहजपणे यश मिळवणाऱ्या एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची हि साधी सरळ गोष्ट !
विनायक जोशी (vp )
22 February 2016
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

"गण गण गणात बोते"

// श्री स्वामी समर्थ //
      " जय गजानन "
  " गण गण गणात बोते "
कोणत्याही कामाची सुरवात "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राने केली कि अत्यंत अवघड वाटणारे काम सुद्धा  निर्विघ्न पणे पार पडते याचा अनुभव माझ्या आईच्या मुळे मी असंख्य वेळेला घेतला आहे. सलग २६ वर्षे सोलापूर मध्ये आमच्या घरात
'पाडवा ते राम नवमी' असे दहा दिवस चालणारा राम नवमीचा उत्सव हा त्यांच्याच कृपेने व्यवस्थित पार पडत असे.या काळात खुपशा अनोळखी मंडळींचा घरभर वावर असे.ह्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साधारणपणे दोन महिने आधीपासून आई करत असे.अत्यंत अनपेक्षित पणे कोणीतरी सांगितले म्हणून यावे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील  पाहिजे असलेली नामवंत मंडळी अचानक येत असत.
" जय गजानन" या नामा बद्दल थोडाफार जरी अनुभव घ्यायचा असेल तर दासगणू रचित 'गजानन विजय' या पोथीचे वाचन अत्यंत श्रद्धेने करणे .
२००६ साली आई सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यत अंथरूणावर खिळली होती.साधारणपणे जानेवारी मध्ये
" रामनवमी" या उत्सवा बद्दल घरात चर्चा चालू झाली.थोड्याच दिवसात गजानन महाराजांच्या कृपेने आणि योग्य ते औषधोपचार घेतल्याने ती खडखडीत बरी होऊन सोलापूरला उत्सवाला जाण्यासाठी तयार झाली. अर्थातच "अपर्णा रामतिर्थकर "वगैरे मंडळींनी स्वतः होऊन भेटून  उत्तम अशी प्रवचने त्या वर्षी  सादर केली.
आज गजानन महाराज प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांचे श्रद्धा
पूर्वक स्मरण करून अतिशय आनंदाने आणि समाधान पूर्वक आपले काम करत रहायचे!
विनायक जोशी (vp )
18 February 2017
electronchikatha.blogspot.com

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

"कर्मयोगी " प्रभाकर फाटक

// श्री स्वामी समर्थ //
      " कर्मयोगी "
    " श्री. प्रभाकर फाटक "
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेले आणि कृष्णा व पंचगंगेच्या संगमामुळे पावन झालेले गाव म्हणजे कुरुंदवाड.या गावात दर्ग्या मध्ये शिवजयंतीला शिवचरित्रा  वरती किर्तन ठेवणारा किंवा पेशंटला औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत म्हणून नदीच्या पुरातून पोहून पलीकडे जाणारा असा एक धैर्यवान माणूस रहात होता.या अत्यंत दिलदार माणसाचा पंचक्रोशी मध्ये " राजा फाटक " म्हणून दबदबा होता.
या राजा फाटकांचा मोठा मुलगा  म्हणजे प्रभाकर फाटक.
१९४८ च्या जळीतात सर्वस्व गमावल्या नंतर हताश किंवा निराश न होता फिनीक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी अविरत आणि कल्पक कष्टाने व्यवसायाची वृध्दी केली.गेली पन्नास वर्षे सकाळच्या वेळी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंहवाडीच्या नदीत पोहणे आणि त्यानंतर दत्त महाराजांना मनोभावे नमस्कार करुन दुकाने उघडणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.या सकाळच्या कार्यक्रमात शरद उपाध्यें पासून आमिरखान पर्यंत  असंख्य लोकांशी त्यांची मुलाखत झाली आहे.कायम सकारात्मक विचार करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आहे. ट्रॕव्हल कंपनीच्या बसमधून चारधाम यात्रा असो किंवा नेपाळ अथवा वैष्णोदेवी वगैरे प्रवास कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता "एकदम बेस्ट "असे म्हणत त्यांनी पार पाडला आहे. लहान दोन भाऊ आणि चार बहिणींना कायम मोठ्या भावाला साजेसा आधार दिला आहे.अतिशय समाधानी आणि हुशार अशा सहचारिणी मुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अनेक अवघड संकल्प सिध्दीस नेलेले आहेत . आज सहस्त्रचंद्र दर्शनासाठी म्हणजेच ऐक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी हा मनाने तरुण असलेला कर्मयोगी आनंदाने तयार आहे.देश विदेशात सुध्दा असंख्य लोकांशी जनसंपर्क असलेला , नातवंडात रमणारा , आजही दिवसातले किमान नऊ तास काम करणारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ फार्मासीस्ट अशी ख्याती असलेला, स्वतः विषयी  फारच कमी बोलणाऱ्या या कर्मयोग्याच्या शतायुषा कडील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
विनायक जोशी (vp )
16 February 2017
electronchikatha.blogspot.com