सोमवार, २३ जानेवारी, २०१७

"भारतीय जगज्जेते "

// श्री स्वामी समर्थ //
" जगज्जेते भारतीय "

२७ डिसेंबर २०१६ या दिवशी पुण्यातील १८२ जणांनी थायलंड मधील कोह तावो येथे समुद्राच्या तळाशी " पाण्याच्या खाली जगातील सर्वात मोठ्ठी मानवी साखळी तयार केली "आणि १७३ इटालियन मंडळींनी केलेले रेकाॕर्ड संपुष्टात आणले. भारताच्या शिरपेचात जगज्जेते पदाचा मानाचा तुरा खोवला.
CEF INDIA चे अध्यक्ष आणि अत्यंत तेजस्वी विचारवंत डाॕ.मनिष गुप्ता यांनी "पाण्याच्या खाली जगातील सर्वात मोठी मानवी साखळी भारतीय लोकांनी तयार करावी " हा विचार जून २०१६ मध्ये  सर्वांच्या समोर मांडला आणि या मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सप्टेंबर मध्ये या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय विजय बढे आणि त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा निरंजन यांनी घेतला.
पाण्याच्या खाली साधारणपणे एक तास रहावे लागणार असल्यामुळे येरवडा येथे स्कुबा डायव्हिंग या विषयावरील प्राथमिक ट्रेनिंग झाले.
पुण्याहून सलग छत्तीस तास प्रवास करुन देशप्रेमाने भारलेली आणि कोणत्याही परिस्थितीत ही मानवी साखळी तयार करायचीच या निश्चयाने प्रेरित  २०३  जणांची टीम थायलंडला पोचली. या ठिकाणी प्रत्येक ८ जणांना १ असे मार्गदर्शक नेमलेले होते.त्यांनी पाण्याच्या खालील  जगाबद्दल सर्वांना माहिती  दिली.हे सर्व मार्गदर्शक या इव्हेंटच्या वेळी आपआपल्या टीमच्या मागे उपस्थित राहणार होते.
२६ डिसेंबर या दिवशी सर्व जण सराव करण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचे कीट परिधान करुन समुद्रात उतरले या वेळी मात्र समुद्राच्या तळाशी असलेले वातावरण किंवा तेथील कमी दृश्यमानता असलेल्या जागी बऱ्याच मंडळींचा आत्मविश्वास डळमळीत झाला. सर्वांच्या मध्ये  योग्य असा ताळमेळ न साधता आल्यामूळे अपेक्षित रिझल्ट न मिळता सर्वजण बाहेर आले. २०३ मधील एकाही  जणाने चूक केली तर सर्वांनी मिळून केलेल्या कष्टांवरती पाणी पडणार याची वस्तूनिष्ठ जाणीव होवून प्रत्येक जण गंभीर झाला होता.त्या रात्री डाॕ.मनिष यांनी सरावाच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होवू नये या विषयी सुस्पष्ट असे मार्गदर्शन केले.याचवेळी २०३ जणांच्या टीममधील २१ जणांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
२७ डिसेंबर २०१६ या दिवशी सर्वजण म्हणजेच १८२ जणांची ध्येयप्रेरीत भारतीय टीम समुद्राच्या किनाऱ्यापाशी पोचली. गिनीज बुक आॕफ रेकाॕर्डसची मंडळी सुध्दा तेथे उपस्थित होती. "गणपती बाप्पा मोरया "किंवा  "जय शिवाजी जय भवानी "वगैरे घोषणा झाल्या. "भारत माता की जय " या मंत्राचा उदघोष आणि त्या नंतर सामुदायिक रीत्या राष्ट्रगीत म्हणण्यात आले . या नंतर सर्व  जण एंट्री पाॕईंट कडे रवाना झाले. या ठिकाणा पासूनच रेकाॕर्डिंग चालू झाले. त्या दिवशीच्या प्लॕन प्रमाणे ठरलेल्या ठिकाणाच्या ५० मीटर अलिकडेच समुद्राच्या तळाशी साखळी तयार केली.या नंतर एकमेकांचे हात न सोडता रांगत पुढील प्रवास केला.या ठिकाणी एक लांब दोरी बांधली होती.प्रत्येकाने गुडघ्या वरती बसून एका हाताने दोरी धरायची आणि दुसरा हात शेजारील व्यक्तीच्या दोरी पकडलेल्या हातावर ठेवायचा या प्रमाणे साखळी तयार करायचा प्रयत्न चालू झाला. विजयच्या आठ जणांची टीम चुकून  एकत्र गोळा झाली होती त्यामुळे सिलेंडर एकमेकांना आपटत होते.त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांना एकमेकांच्या पासून दूर व्यवस्थित लाईन मध्ये उभे केले. या सर्व प्रसंगांचे ड्रोन कॕमेरातून निरीक्षण चालू होते. पाण्याच्या आत शिरुन साधारणपणे २०-२५ मिनिटे झाली होती.विजयच्या दोन्ही बाजूना पोहायला न येणाऱ्या परंतु अत्यंत जिद्दी अशा दोन धैर्यवान महिला होत्या.सर्व जण कोणत्याही परिस्थितीत ध्येयापासून दूर जायचेच नाही अथवा जिंकू किंवा मरु या तयारीनेच पाण्यात उतरले होते.काही वेळाने सर्वांना तयार राहण्याची सूचना मिळाली.थोड्याच वेळात व्यावसायिक कॕमेरामन समुद्राच्या  तळापाशी आले. या वेळी साखळी मध्ये उभे असलेल्या प्रत्येक माणसाच्या दोन्हीही हातांच्या पोझिशन्स् आणि छातीवर लावलेला बिल्ला यांचे ओळीने शुटींग सुरु झाले . स्कुबा डायव्हिंग या प्रकारात श्वास घेणे आणि सोडणे दोन्हीही तोंडाने करावे लागते.या वेळी मात्र सर्वांनी मन शांत ठेवायचा सराव वापरात आणला. प्रत्येक मिनीट हा वर्षाच्या कालावधी सारखा मोठा वाटत होता.समुद्राच्या तळाशी तयार केलेल्या या मानवी साखळीचे दोनदा अत्यंत तपशीलवार शुटींग करण्यात आले.बरोबर ७ मिनिटांनी टास्क संपल्याची सूचना मिळाली.सर्व जण तरंगत समुद्राच्या पृष्ठभागावर आले.गिनीज बुकच्या मंडळींचे रेकाॕर्डींग चेक होईपर्यंत  म्हणजेच साधारणपणे तासभर त्यांना समुद्राच्या आतच थांबावे लागले. बरोबर सव्वा तासाने रिझल्ट कळाला. पुण्यातून गेलेल्या १८२ शिलेदारांनी समुद्राच्या तळाशी मानवी साखळी तयार करुन भारताच्या नावाने विश्वविक्रम नोंदविला होता. या नंतर मात्र जबरदस्त घोषणाबाजी आणि जल्लोषात सर्व मंडळी किनाऱ्यावर आली.
थोड्या वेळाने सर्वांनी गांधी टोप्या वगैरे भारतीय पोषाख धारण करुन राष्ट्रध्वजाला अभिवादन करुन अत्यंत स्फूर्तीदायक असे राष्ट्रगीत म्हणायला सुरवात केली.थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर "भारत माता की जय" या जयघोषाच्या एकामागून एक अशा लाटा वाहू लागल्या. देशप्रेमाने भारलेल्या या घोषणांच्या सुनामीपुढे भरतीचा समुद्र सुध्दा स्तब्ध होवून बघत राहिला .
विजय बढे या जिगरबाज वडिलांनी  आपल्या दहावीत शिकणाऱ्या निरंजनला या धाडसी उपक्रमात बरोबरीने घेतले आणि अर्थातच जगज्जेते पदानंतर दोघांनी मिळून राष्ट्रगीत म्हणायचा असामान्य आणि अविस्मरणीय अनुभव घेतला!!!
विनायक जोशी (vp)
23 January 2017
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

Way To Heaven " सुंदर सोलापूर "

// श्री स्वामी समर्थ //
       "सुंदर सोलापूर"
अतिशय कमी सामान आणि कमालीच्या असंख्य सुंदर आठवणींचे गाठोडे घेऊन माहेरी म्हणजेच सोलापूरला जायला निघालो.लाल गाडीतून प्रवास असल्यामुळे प्रवास उत्तम होणार याची खात्री होती.गाडीच्या खिडक्यांचे आवाज , इंजिनचा आवाज ,पाट्याचे आवाज ,आपत्कालीन स्थितीत बाहेर पडायला उपयोगी अशा दरवाज्याचा आवाज ,समोरील बाजूस गावाचे नाव लिहलेले असते त्या बोर्डाच्या पत्र्याचा आवाज अशा वेगवेगळ्या नादस्वरांचा आनंद घेत प्रवास  सुरु झाला.
कॕम्प मध्ये मेन आणि ईस्ट स्ट्रीटला झोकदार हुलकावणी देऊन पुलगेट कडे दुर्लक्ष करुन गाडी निघाली. थोड्याच वेळात सकाळच्या सत्रात सराव करणारे घोडे रेसकोर्स वरती दिसू लागले.या नंतर वानवडी,फातिमा नगर वगैरे करत आणि किर्लोस्करांच्या कारखान्याचे किंवा गीटस् गुलाबजाम या कंपनीचे दर्शन घेत हडपसर गाठले. या नंतर मात्र १५ नंबर आकाशवाणी केंद्र किंवा मांजरी स्टड फार्म येथील घोड्यांची गडबड बघत निघालो.पूर्वीची राजकपूरची बाग किंवा सध्याचे MIT चे गुरुकुल आणि HP च्या अवाढव्य टाक्या बघत लोणी येथे प्रवेश केला. येथून पुढे प्रयागधाम किंवा उरळीचे निसर्गोपचार केंद्र यांना मागे टाकून थेऊरच्या फाट्या वरुनच पेशव्यांच्या गणेशाला वंदन केले.थोड्याच वेळात वेगवेगळ्या केमिकल्स च्या वासाने पाटस- कुरकुंभ कारखान्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला याची जाणीव झाली. कुरकुंभच्या फिरंगाई देवीचे स्मरण करत आणि हेमंत शितोळेंच्या शेताच्या कडे बघत बघतच भिगवणला पोचलो.या नंतर मात्र बॕक वाॕटरचा प्रचंड जलसाठा आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे  थवे दिसू लागले.पळसदेव येथील पाण्याच्या खाली जाणाऱ्या देवळाची स्थिती पहात इंदापूरला पोचलो.येथून पुढे बरोबर दहा किलोमीटर वरती अवाढव्य असे उजनी धरण आणि छोटासा जलविद्युत प्रकल्प यांना मागे टाकून टेंभूर्णीला पोचलो.या ठिकाणाहून भारताच्या उत्तरेला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे लांब आकाराच्या ट्रेलर्सची वर्दळ चालू झाली.उजनी धरणापासून रस्त्याच्या डाव्या हाताला सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी आणि सुमारे शे- सव्वाशे किलोमीटर लांब असलेली पाण्याची पाईप लाईन आपल्या बरोबरीने धावताना दिसते.मोडनिंब आणि मोहोळ यांना मागे टाकून वडवळच्या नागनाथ महाराजांना नमस्कार करुन बाळ्याच्या खंडोबा पाशी पोचलो.थोड्याच वेळात सोलापूरच्या प्रवेश द्वारावर स्वागता साठी सिध्द असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि हूरहूर संपून आपल्या गावात प्रवेश केला. शिवाजी पुतळा ,भागवत टाॕकीज ,प्रभात टाॕकीज वरुन डफरीनला वळसा घातला.नुकतीच वयाची शंभरी पार करत असलेल्या  आणि कमालीची सुंदर दगडी इमारत असलेल्या हरीभाई देवकरण या शि.प्र.मंडळींच्या प्रशालेला मानाचा मुजरा केला . शिवाजी रंगभुवन येथून पुढे सोलापूर मधील पहिल्या सोसायटीत म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला."गुरुप्रसाद "च्या बरोबर समोर रिक्षा थांबली. म्हातारे झालेले परंतू अत्यंत कणखर असे दोन औदुंबर , हिरवागार कडुनिंब, पानगळती झालेला बेल , थंडीने गारठलेला अशोक , लाल फळे अंगावर पांघरुन बसलेला बदाम , मोहरलेली आंब्याची झाडे ,स्वतःच्या भाराने वाकलेली करंजी आणि असंख्य पक्षी स्वागतोत्सुक होते. कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे आवाज येत नसलेल्या या अत्यंत शांत अशा वातावरणात एखाद्या ध्यान मंदिरा सारखे प्रसन्न वाटत होते. नारळाच्या झावळ्यां पासून बनविलेला घरगुती खराटा हातात घेतला आणि घरासमोरचे अंगण स्वच्छ झाडून काढले.सुर्यास्ताची वेळ होती. घरट्यात परतलेल्या पक्ष्यांची  धावपळ चालू होती. पन्नास शंभर फूट उंच पसरलेल्या औदुंबराच्या फांद्यातून असंख्य आठवणींची इंद्रधनुष्यी किरणे आवेगाने माझ्या अंगावर झेपावत होती.
विनायक जोशी (vp)
८ जानेवारी २०१७
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

राष्ट्रीय खेळाडू " कल्याणी जोशी "

// श्री स्वामी समर्थ //
   " मैत्र जीवाचे "
"  National Player "
"स्मॕशर शैला फाटक-कल्याणी जोशी"  
कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात म्हणजेच कुरुंदवाड येथिल ही व्हाॕलिबाॕल मधील  राष्ट्रीय खेळाडू . शाळेत शिकत असतानाच 'पोहणे 'या प्रकाराने खेळाडू म्हणून सुरवात केली आणि थोड्याच दिवसात जिल्हा पातळीवरील खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला.या नंतर मात्र अचानक पणे शारीरिक शिक्षणाच्या सरांच्या सांगण्यावरुन व्हाॕलिबाॕल खेळायला सुरवात केली.कुरुंदवाड मधे उत्तम प्रकारचे मार्गदर्शन मिळू लागले.दररोज काही तास सराव आणि त्याला अनुसरुन सर्व प्रकारचे अत्यंत कडक व्यायाम वगैरे रुटीन चालू झाले.थोड्याच दिवसात जिल्हा पातळी , त्या नंतर विद्यापीठात खेळाडू , त्या नंतर कप्तान , मग महाराष्ट्राची खेळाडू असा आलेख चालू झाला. अभ्यासात हूशार असून सुध्दा खेळासाठी वेळ मिळावा म्हणून काॕमर्स साईड घेतली आणि एम् काॕम झाली.याच वेळी महाराष्ट्रा तर्फे नॕशनलच्या सिलेक्शन साठी कटक ला गेली.त्या ठीकाणी वेगवेगळ्या राज्यातील उत्तमोत्तम खेळाडू आणि त्यांचे द्रोणाचार्यां सारखे प्रशिक्षक जवळून अनुभवता आले. छोटया गावापासून सुरु झालेला हा खेळाचा प्रवास  पुढील प्रत्येक पातळीवर गुणात्मक उंची वाढविण्यासाठी उपयोगी ठरत होता.घरच्या मंडळींना तिच्या  व्हाॕलिबाॕल मधील प्रगतीचा आलेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यां मधून वाचायला मिळत होता. ती उत्तम दर्जाची
" स्मॕशर " होती. मॕचेस नसताना गावाकडे आली की शाळेच्या मैदानात सराव करायची . संध्याकाळच्या वेळी एका भिंंतीसमोर नेट बांधलेले असे ४-५ बाॕल्स , दोन सहकारी आणि गावातील अनुभवी कोच बरोबर असत .कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता " मार्गदर्शक " सांगतील तितक्या वेळेला हवेत उंच  ऊडी मारुन योग्य जागी आणि अत्यंत वेगाने" स्मॕश "मारत रहायचे, सलग ५०-६० वेळेला ! तुम्हाला कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रचंड कष्ट करायची तयारी , उत्तम दर्जाचे मार्गदर्शक , चांगले नशिब  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खिलाडू वृत्ती पाहीजे ....................! खेळाडू हा रोल संपल्यावर ती बँकेत कामाला लागली आणि थोड्या दिवसांनी  शैला फाटक ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजेच सौ.कल्याणी विनायक जोशी झाली. तिच्या मुळे राष्ट्रीय खेळाडू बनण्यासाठी लागणारे अथक प्रयत्न किंवा खेळाडूंच्या दृष्टीने असाधारण महत्त्वाचे असलेले राष्ट्रगीत यांची जवळून अनुभुती घेता आली .
विनायक जोशी (vp)
18 January 2017
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

"ती सध्या काय करते " विनायक जोशी

//श्री स्वामी समर्थ //

  " ती सध्या काय करते "

  प्रिय ....,

          "ती सध्या काय करते" या नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुझी प्रकर्षाने आठवण झाली.

९ आॕक्टोबर १९८३ या दिवशी मुळा मुठेचा संगम होतो त्या संगम ब्रीज जवळ आपली पहिली ओळख झाली.तुझ्या अवतीभोवती २०-२५ जणांचा घोळका होता आणि तुझ्या बरोबरीने सर्व जण अत्यंत आपुलकीने वावरत होते. पहिले सहा महिने मी अत्यंत बावरलेल्या अवस्थेत होतो त्या वेळी वेगवेगळ्या मंडळींना जाणीवपूर्वक माझ्या बरोबर ठेवून माझी कामा विषयी आवड कशी निर्माण होईल या बद्दल तुझे अखंड प्रयत्न चालू असत. हळूहळू दिवसातले १३ तास आपण एकत्र घालवू लागलो. म्हणता म्हणता दोन वर्षे कशी गेली कळली नाही आणि एके दिवशी मी तुझ्याच बरोबर रहायचा निर्णय घेतला. संशोधन आणि विकास या खात्यात मी तुझ्या आग्रहा मुळेच आलो आणि अवर्णनीय अशा आनंदी आणि समाधानी जगात मला वावरता आले.लाचारी मुक्त किंवा आत्यंतिक निर्भय पणे काम करायची ताकद तुझ्या मुळेच मला मिळाली. प्रत्येक माणसाकडे स्वतःचा असा आतला आवाज असतो किंवा आपले हात ,डोळे ,कान ,आवाज आणि मेंदू यांचा वापर करुन आपण लाॕजिकची कडी बांधू शकतो किंवा  अशा असंख्य कड्यांना एकत्र गुंफुन आपण उत्तम दर्जाचे काम करु शकतो, याचा तू करुन घेतलेला सराव मला फारच उपयोगी पडत असे .

एक  - दोन असे करत तब्बल वीस वर्षे आपण आत्यंतिक आनंदाने घालवली  .आपल्या क्षेत्रातील पंढरपूर म्हणजेच जर्मनीतील "हॕनोव्हर" या तीर्थक्षेत्राचा तू करुन दिलेला परिचय कायम लक्षात राहिला आहे.या ७००० दिवसातील एकही दिवस कंटाळवाणा गेलेला मला आठवत नाही.

माझ्या ४१ व्या वर्षी आई -वडिलांना पूर्ण  वेळ देण्यासाठी तुझा निरोप घ्यायचे  मी ठरविले . या माझ्या निर्णयाला अत्यंत प्रगल्भ पणे तु दिलेला प्रतिसाद एकदम हटके होता.

तुझ्याच मुळे असंख्य माणसां बरोबर माझा जनसंपर्क प्रचंड वाढला.तुझ्या मिडास टच मुळे किंवा परिस स्पर्शाने अनेक जणांचे उजळलेले कर्तृत्व  जवळून बघता आले.तुझी खासियत म्हणजे तुझ्या सहवासात येणारा कोणीही तुला कधीही विसरु शकत नाही. शंतनूराव किर्लोस्कर आपल्या कारखान्यात आले किंवा निळ्या डोळ्यांचा राज कपूर ने आपल्या येथे केलेले सिनेमाचे शुटिंग वगैरे असंख्य गोष्टींची आठवण येते.

कधीतरी आपल्या टीम मधील माणसे भेटतात, आपण सर्वांनी केलेल्या धमाल गोष्टींची उजळणी होते आणि एकमेकांना "ती सध्या काय करते " याची विचारपूस होते.

वारंवार माझ्या तोंडून तुझे कौतुक ऐकल्यावर माझ्या एका तरुण मित्राने मला तुझे नाव विचारले .

एका स्वच्छ पेपरवरती झोकदार अक्षरात आणि आनंदाने तुझे नाव लिहिले ........" पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स " .

विनायक जोशी (vp)

पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स १९८३ ते २००३

electronchikatha.blogspot.com

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

अण्णा इडली गृह सोलापूर

// श्री स्वामी समर्थ //
   " अण्णा इडली गृह"
आदर्शनगर या सोलापूर मधील सुंदर काॕलनी पासून जवळ "गरुड" बंगल्याच्या ठिकाणी "अण्णा " इडली गृह दिमाखात उभे आहे. दरवाजा पासून ते भटारखान्या पर्यंत अतिशय स्वच्छ अशा वातावरणात  प्रत्येक गोष्टीची मांडणी योग्य पध्दतीने केली आहे.सेल्फ सर्व्हिस मुळे कोणत्याही प्रकारची गडबड येथे नाही. शुध्द आणि थंड पाण्याची स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे तहान असेल तेव्हढेच पाणी ग्लास मधे घेतले जाते आणि अतिरिक्त पाण्याचा अपव्यय होत नाही. चटणी आणि सांबार यांच्या छोटया बादल्या टेबलावर बघून मजेशीर आणि आनंददायक अशा सोलापूर स्पेशल इडलीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.येथे प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता आहे.या दुकानाच्या काउंटर वरती अत्यंत विनम्र आणि हसतमुखाने वावरणारा व सध्याच्या पिढीचे प्रतिनीधीत्व करणारी अशी  उत्सवमुर्ती आनंदाने स्वागताला सिध्द आहे. शिवाजी रंगभुवन ते संगमेश्वर काॕलेज रोड वरती पूर्वीच्या गरुड बंगल्याच्या येथे असलेले हे "अण्णाचे इडली गृह " समाधानी आणि तृप्त गिऱ्हाईकांचे आशिर्वाद घेत उभे आहे !!!
विनायक जोशी (vp)
११ जानेवारी २०१७
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

राजा माणूस

// श्री स्वामी समर्थ //
   " राजा माणूस देवधर "
आंदळगावचे वतनदार असलेल्या डाॕक्टर देवधरांचा हा मोठा मुलगा.नावा प्रमाणेच अत्यंत मोकळ्या मनाचा किंवा दिलदार.कोणत्याही कामात स्वतःला पूर्णपणे  झोकून देणारा . व्यावहारिक धूर्तपणा किंवा चतूरपणा नसलेला . आखाती देशांपासून ते अमेरिके पर्यंत सहजपणे वावरणारा. कंपनीमधे कोणत्याही डिपार्टमेंट मधे मेकॕनिकल पासून इलेक्ट्रॉनिक पर्यंत सर्व कामे स्वतः करणारा. R & D department ला प्रचंड मोकळेपणानं काम करु देणारा . नवनवीन आणि महागड्या गोष्टी वेगाने आणून देणारा ......वगैरे ! आज १० जानेवारीला त्याचा वाढदिवस आहे ! सध्या तो स्वतःच्या आवडीप्रमाणे आणि मशीन्सना उपयोगी पडणारे काही महत्त्वाचे पार्टस बनवून ते विकतो आहे.  सायली आणि चेतन यांची प्रगती कडे चालू असलेली घोडदौड बघत शांतपणे आपली नैमित्तिक कामे करत आहे . त्याचे खरे नाव प्रसन्न देवधर आहे परंतु त्याच्या दिलदार स्वभावामुळे सहवासात येणाऱ्या लोकांच्या साठी तो " राजा " आहे !
    विनायक जोशी ( vp )
10 January 2017
electronchikatha.blogspot.com

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

सुजय मिलिंद भावे

// श्री स्वामी समर्थ //
  " डाॕ.सुजय मिलींद भावे"
प्रिय मन्या ,
आज तुझा "नीट"चा रिझल्ट कळाला. आॕल इंडिया लेव्हलला तुला ३४ वी रँक मिळाली हे बघून आनंद झाला.या मुळे MD करण्यासाठी तुला योग्य ते काॕलेज मिळेल असे वाटते. साधारणपणे दीड वर्षापूर्वी म्हणजेच
१५ आॕगस्ट २०१५ या दिवशी अतिशय उत्तम मार्क पडून तू डाॕक्टर झालास. या बद्दल असेच एक अनौपचारिक कौतुकाचे पत्र तुला लिहिले होते.  तुझ्या बारावीच्या परिक्षेच्या वेळी 'बीजे' मेडीकल मध्ये  शिकत असलेल्या अशोक केरकरांच्या मुलीने तुला उत्तम मार्गदर्शन केले आणि  त्यामुळे  अतिशय आत्मविश्वासाने आणि सहजतेने  डाॕक्टर होण्याच्या दिशेने तुझा प्रवास चालू झाला. मुक्तांगण या घराच्या जवळच असलेल्या शाळेत शिक्षण पूर्ण केलेस. बॕडमिंटन आणि चित्रकला यांची आवड उत्तम जोपासलीस. डाॕ.नितू मांडके हे सुध्दा उत्तम चित्रकार होते.आॕपरेशन थिएटर मधून बाहेर पडले की त्याच्या संबंधित अशी स्केचेस सुध्दा ते काढून ठेवत असत. पुढील तीन वर्षे  MD चा अभ्यास म्हणजे दिवसातून १२ ते १४ तास एकदम बिझी जाणार.  तुझे प्राणी प्रेम जगजाहीर आहे. अत्यंत आनंदी  "बाबा" हे तुझे वडील नसून उत्तम मित्र आहेत.  आईनेही उत्तम प्रकारे तुला अभ्यासात मदत केली आहे.
तू बोलायला लागल्या नंतर पहिल्यांदा  "गंपती काका " अशी  मला हाक मारल्या पासून आज पर्यंतचा आनंददायी प्रवास डोळ्या समोरुन तरळून गेला. 
अतिशय उत्तम यश मिळवून तू क्वालिफाय झाल्या बद्दल आमच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा !
तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेतच .
विनायक आणि कल्याणी मामी
विनायक जोशी (vp)
7 January 2017
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

"अॕटोमिक इंजिनियर्स " प्रशांत पाटसकर

// श्री स्वामी समर्थ //
  " अॕटोमिक इंजिनियर्स "
  " प्रशांत पाटसकर "
१९९४ च्या सुमारास प्रशांत "पीजे इलेक्ट्रॉनिक्स" मध्ये कामाला लागला.बरोबर दोन वर्षे या कंपनीत काम करुन त्याने अॕटोमॕटीक पॕकेजींग या क्षेत्रात उपयोगी पडणारे मुलभूत आणि व्यावहारिक ज्ञान मिळवले.
या नंतर थोडे दिवस फिलीप्स, क्वालिट्राॕनिक्स वगैरे ठिकाणी काम केले.२००२ च्या सुमारास "प्रिसकाॕन" या नावाने पॕकेजींग मशिनला लागणारे कंट्रोलर तयार करायची कंपनी चालू केली.याच सुमारास " हिरे " या मेकॕनिकल क्षेत्रांत अनुभवी मित्राची गाठ पडली आणि दोघांनी मिळून स्वतःची मशिन्स तयार करायचे ठरवले.नविन तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्तम दर्जा या मुळे अतिशय उत्तम असा व्यवसाय सध्या चालू आहे. आत्ता पर्यंत चारशे पेक्षा जास्त मशिन्स त्यांनी तयार केली आहेत. अमुल ,पराग ,राजहंस वगैरे नावाजलेल्या ब्रॕडसना ते आपली मशिन्स देत आहेत.भारताच्या बाहेरील छोट्या देशातून सुध्दा त्यांच्या मशिन्सना उत्तम मागणी आहे.
आई , वडील आणि बायको अशी सर्व मंडळी शैक्षणिक क्षेत्रात असून सुध्दा प्रशांतच्या या नाविन्यपूर्ण धडपडीला त्यांनी कायम खंबीरपणे पाठिंबा दिला आहे.पार्थ आणि रेवती यांची प्रगती बघत अत्यंत व्यस्त असा दिनक्रम चालू आहे.पुण्याच्या जवळ औद्योगिक वसाहतीत कंपनीची स्वतःची वास्तू दिमाखात उभी आहे.अॕटोमॕटीक पॕकेजींग क्षेत्रात लागणारी वेगवेगळ्या प्रकारची मशिन्स तयार करत प्रशांत आणि हिरे यांच्या  " अॕटोमिक इंजिनियर्स " ची प्रगतीच्या दिशेने घोडदौड चालू आहे !!!
विनायक जोशी (vp)
6 JAnuary 2017
electronchikatha.blogspot.com

सोमवार, २ जानेवारी, २०१७

तत्वनिष्ठ "मनिषा जोशी"

// श्री स्वामी समर्थ //
     " तत्वनिष्ठ "
    " मनिषा जोशी "
२ जानेवारी १९७० या दिवशी अतिशय संयमित अशा "तूळ" राशीला बरोबरीने घेऊन ताम्हणकरांच्या या सुरेख नातीने भिडेंच्या घरात जन्म घेतला. हिचे आजोळ म्हणजे संत दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यातील ताम्हणकर. स्वतःच्या हुशारीवर RBI मध्ये उच्चपदावर काम करणाऱ्या व अतिशय साधेपणाने राहणाऱ्या आई वडिलांकडून तिला उत्तमतेचे संस्कार लाभले. वडिलांच्या नोकरी मुळे लग्नाच्या आधीचे आयुष्य मोठ्या  शहरां मध्ये गेले. "स्टेला मॕरीस" मद्रास येथे तिचे काॕलेज शिक्षण झाले.  विदर्भातील आवारपूर या ठिकाणी " लार्सन आणि टुब्रो "या कंपनीत  इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या सोलापूरच्या नारायण जोशी याच्या बरोबर १ मे १९९३ या दिवशी विवाह झाला. लहानपणापासून काॕलनी लाइफची सवय असल्यामुळे नारायणला तिने उत्तम साथ दिली. १९९७ मध्ये देवाने या दोघांना "मनाली" नावाची सर्वोत्तम भेट दिली.या नंतर गुजरात मधील जाफराबाद येथे बदली झाली. या ठिकाणी आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल मध्ये विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून मनापासून काम केले . मनालीचा सर्वांगीण आणि सर्वोत्तम  विकास व्हावा म्हणून या जोडीने अथक प्रयत्न केले आहेत . नारायण जोशी या आपल्या जोडीदाराला त्याची दैदिप्यमान कारकीर्द साकारताना कमालीची संयमीत अशी साथ मनिषाने दिली आहे. सध्या आपल्या पंखातील ताकद अजमावण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मनाली या अत्यंत सुरक्षित अशा घरट्यातून बाहेर पडली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तबगार स्त्री असते  हि गोष्ट सहजपणे करुन दाखविलेल्या "मनिषा नारायण जोशी" हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
विनायक आणि कल्याणी जोशी
२ जानेवारी २०१७
electronchikatha.blogspot.com