मंगळवार, २८ जून, २०१६

रेडिओ

// श्री स्वामी समर्थ  //
     " रेडिओ "
एका छानशा आयताकृती लाकडी बाॕक्स वरती पुढील बाजूला दोन मोठ्या आकाराची गोलाकार फिरणारी दणकट बटणे.एका बटणाने स्टेशनचा काटा फिरवायचा आणि दुसऱ्याने आवाज कमी जास्त करता येत असे. स्टेशनचा काटा  कोणत्या स्टेशन वरती आहे ते कळावे म्हणून आतून एक बल्ब लावलेला असे.या रेडिओचा आवाज अत्यंत सुस्पष्ट आणि दणदणीत असायचा.रेडिओ मेकॕनिक ने कधीतरी हा रेडीओ आपल्या  समोर दुरूस्ती साठी उघडला तर मागच्या बाजूने या रेडियो मधील प्रकाशमान असलेली वेगवेगळ्या आकाराची व्हाॕल्व नावाची "प्रकाशीत झुंबरे " बघायचा योग यायचा.रेडिओ वरती सकाळी प्रभात वंदन ऐकणे आणि मॕच असेल तेंव्हा क्रिकेटची काॕमेंट्री ऐकणे आणि नंतर त्यावर चर्चा हा आयुष्यातील अविभाज्य भाग होता. गीत रामायण वगैरे कार्यक्रम आकाशवाणी वरुन प्रसारीत व्हायचे त्या काळात या रेडिओची भक्ती भावाने पूजा व्हायची आणि त्या नंतरच सुधीर फडकेंच्या सुस्पष्ट आणि मधुर आवाजातील गीत रामायण ऐकायला मिळायचे.दुपारी दीड आणि संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता प्रचंड होती. १९७० च्या दशकात सेमी कंडक्टर च्या रुपातील  छोट्याशा ट्राँझीस्टरने प्रवेश केला आणि या आपल्या मोकळ्या ढाकळ्या रेडिओची कुचंबणा चालू झाली. बॕटरी वरती वापरता येणारे ,कोठेही घेऊन फिरता येणारे असे ट्राँझीस्टर  बाजारात आले आणि या आटोपशीर रेडिओंची संख्या सुध्दा खूप वाढली. घरातील प्रत्येक वयोगटातील मेंबर्स आपल्याला आवडेल तो कार्यक्रम लहान आवाज ठेवून ऐकू लागले.याच काळात रेडिओ सिलोन वरुन "अमिन सयानींचा "हुकमी आवाज आणि "बिनाका "ही गीतमाला तरुण मंडळींच्या मधे अतिशय लोकप्रिय झाली. काळानुरुप रेडिओचा आकार छोटा होत गेला.एफ् एम स्टेशन किंवा रेडिओ जाॕकी वगैरे प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी अनपेक्षित अशी  एकामागून एक सुरेल गाणी ऐकवण्याची शक्ती फक्त आणि फक्त रेडिओ मध्येच आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 june 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, २० जून, २०१६

मिंग्लिश ( मि आणि इंग्लिश )

// श्री स्वामी समर्थ  //
     " मिंग्लीश "
     " माझे - इंग्लिश "
शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय शिकण्याची सुरुवात पाचवी मध्ये झाली. माझी आई त्या काळातील मॕट्रीक झालेली होती आणि वडील बीए .दोघांचेही इंग्रजीचे ज्ञान उत्तम होते.घरामध्ये "रेन आणि मार्टीन"चे ग्रामरचे पुस्तक होते.त्यांच्या सोबतीला तर्खडकरांची तीन भागातील व्याकरण माला . आम्हाला शाळेमध्ये इयत्ता आठवी पासून सेमी इंग्लिश होते.या सर्व गोष्टी सहजतेने झाल्या . अकरावी आणि बारावीला मात्र भाषेकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ नसताना" हायर इंग्लिश "नावाचा अवघड प्रकार वाट्याला आला. याच कालखंडात आपल्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ५० ते ६० इंग्रजी सिनेमे बघितले. त्या नंतर मात्र "नायक्रोम" नावाच्या विद्यापीठात नोकरी लागल्यावर  इंग्रजी भाषेचा वापर नगण्य झाला. या ठिकाणी जपानी  आणि जर्मन तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव होता कि इंग्लिशचा पूर्ण विसर पडला. फर्ग्युसन काॕलेज रोड वरती असलेल्या ब्रिटिश लायब्ररीत जाणे सुध्दा संपुष्टात आले. नोकरीची हि वीस वर्षे मी अत्यंत खोल अशी वैचारिक बैठक असलेल्या आणि अत्यंत हुशार अशा मराठी मंडळींच्या मध्ये  घालवली. या वीस वर्षात मी  "डियर सर , थॕक्स ,  साॕरी ,रीगार्डस "वगैरे प्रकारच्या औपचारिक पणापासून आणि या प्रकारच्या मंडळींच्या पासून शेकडो योजने लांब होतो . या कालखंडात बऱ्याच "बाप" मंडळींच्या बरोबरीने काम करता आले. कोणत्याही संकल्पना समजून घेताना मराठी या मातृभाषेमुळे सोपे गेले ,  परंतु त्या मुळेच  " इंग्लिश " नावाच्या या विदेशी मावशी पासून म्हणजेच इंग्लिश पासून मात्र दूर राहीलो ....!  आमच्या क्लास मध्ये कल्याणी मुलांना  " डॕफोडील्स " ही कविता उत्तम पणे शिकवतेच आणि त्या नंतर मात्र लगेचच अभ्यासक्रमात नसलेली परंतू आपलीशी वाटणारी " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...!एका पाठोपाठ येणाऱ्या आनंदाच्या या "सरी वर सरी "मुलांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि सपक गोऱ्या अशा विदेशी मावशीच्या मागे उभी असलेली अत्यंत तेजस्वी अशी
" माय " मराठी दिसू लागते !!!
विनायक जोशी ( vp )
२०/०६/२०१६
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, १७ जून, २०१६

" मायकेल ग्रोझांबिक ते मायकेल शुमाकर

// श्री स्वामी समर्थ //
   " मायकेल्सच्या जगात "
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर
" मायकेल " नावाच्या असामान्य व्यक्तींचा आविष्कार बघायला मिळाला. अगदी पहिल्यांदा व्यंकटेश माडगूळकरांच्या " सिंहांच्या देशात " या अनुवादीत पुस्तकातून मायकेल ग्रोझांबीक नावाच्या जर्मन मायकेलची भेट झाली. प्राण्यांच्या भवितव्यासाठी लढणारा हा मायकेल कायमचा मनात घर करुन राहीला. या नंतर आपल्या शरीरावर असंख्य शस्त्रक्रिया करुन घेऊन गोरा झालेला परंतु  विचित्र दिसणारा आणि ब्रेक डान्स वगैरे प्रकारात माईल स्टोन ठरलेल्या स्टेप्सचा बादशहा म्हणजेच " मायकेल जॕक्सन " या अमेरिकन मायकेलचा दणदणाट बघता आला. या नंतर मात्र बास्केट बाॕल हा खेळ ज्याच्या मुळे प्रेक्षणीय  वाटू लागला अशा
" मायकेल जाॕर्डन "या अमेरिकन  परफेक्शनिस्टची कमांड बघायला मिळाली. या नंतरचा नंबर म्हणजे  फाॕर्म्युला वनचा सातवेळेचा विजेता म्हणजेच " मायकेल शुमाकर" ने बरीच वर्षे अधिराज्य गाजवले. आदल्या दिवशी पोल पोझीशनसाठी होणारी रेस आणि दुसऱ्या दिवशीची गाड्यांची रेस बघणे हा कमालीचा थरारक किंवा श्वास रोखून धरायला लावणारा प्रसंग  असे . अत्यंत जलदगती ने कराव्या लागणाऱ्या कौशल्य पूर्ण हालचाली आणि एखादी छोटीशी चूक म्हणजे गंभीर दुखापत किंवा मृत्यू हे माहित असूनही हसतमुखाने आणि धाडसाने तोंड देणारा हा जर्मन मायकेल मात्र कायमचा हीरो राहीला. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या या सर्व मायकेल्सनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने कायम लक्षात राहतील असे असंख्य अनमोल क्षण दिले. मायकेल ग्रोझांबीक सोडून इतर तिघांचा परफाॕर्मन्स याच देही याच डोळा बघता आला .आयुष्य समृद्ध करणाऱ्या "मायकेल पर्वाच्या "
  या काही मोजक्या आठवणी !!!
विनायक जोशी ( vp)
17 June 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, १४ जून, २०१६

अपघातांची बेटे

" श्री स्वामी समर्थ "
       " अपघातांची बेटे "
पुण्यातील  प्रचंड अशा प्रदूषणाला कमी करणारा पाऊस अजूनही सुरू झाला नाही.आज पासून शाळांची सुरवात असल्यामुळे असंख्य वाहनांची वेळेत पोचण्यासाठीची गडबड चालू होणार आहे. पुण्याचा म्हणून आब राखून असलेला भुरभुरणारा पाऊस अधूनमधून पडत आहे.या शहरा मध्ये प्रत्येक पंधरा किलोमीटर वरती या पावसाचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो.या सर्व गडबडीत सर्वांनी प्रत्येक चौकात पसरलेल्या तेलकट आणि निसरड्या भागाकडे लक्ष ठेवले पाहीजे. आपण दररोज ज्या रस्यावरुन प्रवास करतो त्या रस्त्याचे बारीक बारीक पावसामुळे आॕइलच्या  ट्रॕक मध्ये रुपांतर होते.कितीही चांगली गाडी किंवा ब्रेक असले तरी प्रत्येक चौकात बारीक पावसामुळे तयार होणाऱ्या या धोक्यांची नोंद ठेवून सिग्नल्सच्या दोन्ही बाजूस शंभर फुटां पर्यंत अतिशय हळूहळू गाडी चालवणे. गेली दोन वर्षे रस्त्यावर ओला कचरा आणि त्यांच्या पिशव्या  फेकलेल्या आढळतात.या आॕइल व वंगण किंवा ओला कचरा पडलेल्या रस्त्यांवरून पडल्यामुळे बरीच मंडळी दरवर्षी जायबंदी होत आहेत.कोणत्याही प्रकारे गर्दी नसलेल्या रस्यांवर नेहमीच्या सवयीने वेगाने जाणाऱ्यांचे अपघात जास्त होत आहेत. अतिशय सुंदर अशा भुरभुर पडणाऱ्या पावसाळ्यात  सर्वांनी प्रत्येक चौकात किंवा सिग्नल्सच्या ठिकाणी सावधानता बाळगून ही मानव निर्मित अपघाताची बेटे पार करायची आहेत. हे दिव्य पूर्ण वर्षात फक्त ८ते१० दिवस पार पाडावे लागते.असंख्य झाडांना  नव संजीवनी देणारा किंवा पूर्ण शहराचे प्रदूषण कमी करणारा अशा ह्या नितांत सुंदर अशा पावसाचे आपण आनंदाने आणि सुरक्षितता पाळून स्वागत करु या !!
विनायक जोशी (vp )
15 June 2016
electronchikatha.blogspot.com

रविवार, १२ जून, २०१६

"सुप्रिमो" विवेक जोशी

" श्री स्वामी समर्थ "
" सुप्रिमो विवेक "
"सुप्रिमो" हि कॕनडा मधील विवेक जोशी नावाच्या दिलदार आणि आनंदी माणसाची कंपनी आहे.या कंपनीची आॕस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सुध्दा आॕफिसेस आहेत.मुंबई मध्ये किंग जाॕर्ज , रुपारेल वगैरे शिक्षण संस्थाना स्पर्श करुन त्या नंतर इंजिनियरींग मात्र पुण्यातून केले .बिनधास्त रहायचे आणि कायम नविन गोष्टी शिकायची अत्यंत आवड. "ब्लॅक अँड डेकर" या कंपनीत दुबई मध्ये काम केले. त्या नंतर वास्तव्य " कॕनडा " येथेच. शास्त्रीय गायनाची समज आणि आवड असलेल्या आणि "रेकी" या विषयात खोल ज्ञान असलेल्या सुरेखा वहिनींच्या बरोबर सुरेख  संसार चालू आहे. घरामध्ये दोन चैतन्य मुर्ती आहेत .मोठी मोनिका न्युयार्क मधील मासिका मध्ये लेखन करते .प्रियांका शालेय शिक्षण घेत आहे त्या बरोबरच तिने  "कराटे " मध्ये प्राविण्य मिळवले आहे.या सर्वाच्या पलिकडे म्हणजे विवेकची आई .ती या वयात सुध्दा आर्ट आणि क्राफ्ट मध्ये अतिशय उत्साहाने काम करत आहे. पी.जे. इलेक्ट्रॉनीक्स या कंपनीत नोकरी करत इंजिनियरींग करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या देशात कामाच्या निमित्ताने  अखंड हिंडणारा , पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला श्रध्देने नमस्कार करणारा , कॕनडा येथे नोकरी करत करत व्यवसायाचे बस्तान व्यवस्थित बसवणाऱ्या या उत्साही आणि उमद्या  व्यक्तीची म्हणजेच "विवेक जोशींची " ही  छोटीशी आठवण !!!!
विनायक जोशी ( vp )
11 June 2016
electronchikatha.blogspot.com

पु.ल.देशपांडे (१२ जून )

" श्री स्वामी समर्थ "
              " पुल "
" पुल "प्रयाग हाॕस्पिटल मध्ये अॕडमिट झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. दोन दिवसांच्या नंतर पहिल्यांदा लक्षात आले कि हा शेवटचा प्रवास होता. सुनिताबाई नावाच्या अत्यंत जबरदस्त आणि कणखर जोडीदाराने आपल्या असामान्य प्रतिभा असलेल्या
" भाईंचा " हा प्रवास शांत पणे व्हावा या साठी डाॕ.प्रयाग यांच्या बरोबर चर्चा केली.जगातील सर्वोत्तम डाॕक्टर्स या वेळी त्यांच्या संपर्कात होते.प्रत्येक दिवस हा काळजीचे ढग गडद करत होता. दवाखान्याच्या समोर गर्दी होवू नये म्हणून दवाखान्या तर्फे ठराविक वेळेला त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली जात होती. पुलना देवदूत वगैरे संकल्पना मान्य नसल्यामुळे वैकुंठा वरुन त्यांना नेण्यासाठी निघालेल्या विमाना मध्ये अंतू बर्वा , हरीतात्या वगैरे मंडळी होती . सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडायला पाहिजेत या साठी स्वर्गातून दस्तूरखुद्द रावसाहेब आले होते .या सर्वांना बघून अत्यंत आनंदी मनाने " पुल " त्यांच्या बरोबर गेले तो दिवस होता १२ जून  !!!
विनायक जोशी (vp )
12 June 2016
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, ९ जून, २०१६

नानांचा धायरी हापूस !

" श्री स्वामी समर्थ "
       " पोकळेंचे आंबे "
धायरी ग्राम पंचायत आॕफीसच्या बरोबर समोर पदमावती देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे.या मंदिराच्या उजव्या हाताला एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बरोबर मागे " नाना पोकळे " यांचा सुरेख दगडी वाडा आहे. नाना स्वतः R & D दिघी येथे नोकरीस होते.१९८१ च्या आसपास त्यांनी बलसाड येथून आंब्याची रोपे आणून धायरी येथील शेतात लावलेली आहेत.त्या काळात शेतावर पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे नानांनी आणि काकूंनी लांब अंतरावरुन कळशीने पाणी नेऊन ही झाडे वाढवली आहेत.मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस हा स्पेशल धायरी हापूस तयार होतो.या वेळी पहिल्यांदाच  कोकणातील सराईत मंडळींच्या कडून आंबा ऊतरवून घेतला आहे.या धायरी हापूस बरोबरच रसाळ आणि गोड असा पायरी सुध्दा आहे. कोणत्याही प्रकारे केमीकल्सचा भडीमार न करता पारंपारिक पद्धतीने आंब्याची आढी लावलेली आहे. अतिशय योग्य दरात अत्यंत दर्जेदार असा आंबा यांच्या कडे उपलब्ध आहे. अतिशय रसाळ आणि गोड असलेल्या या आंब्याच्या बरोबरच कर्तृत्ववान व पारमार्थिक बैठक असलेल्या आणि मोठ्या वाड्याला योग्य अशा मोठ्या मनाच्या नानांचे आणि काकूंचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आणि कल्याणी अत्यंत आनंदाने येथे जाऊन आलो. गेली पस्तीस वर्षे पोकळेंच्या शेतात रमलेल्या या धायरी हापूस ची गोडी काही औरच आहे !!!
विनायक जोशी ( vp )
9 june 2016
electronchikatha.blogspot.com