// श्री स्वामी समर्थ //
" नादखुळे कोल्हापूर "
साधारणपणे १९८१ पासून अतिशय सुंदर अशा या गावाबरोबर माझे ऋणानुबंध दृढ होत गेला. मेनन पिस्टन किंवा वर्तमानपत्र तयार करायची वेगवान आणि अत्याधुनिक मशिन्स तयार करणारी "मनुग्राफ " कंपनी दिसली कि आपण कोल्हापूरच्या हद्दीत शिरलो असे समजायचे. अत्यंत सुबक आणि स्वागतोत्सुक अशा कमानीपासून या निसर्ग संपन्न आणि खानदानी गावातील अनेक आठवणी आहेत. करविरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीचा या गावावरती सुबत्तेचा कृपाशिर्वाद आहे. येथे गंगावेस तालमीत लाल मातीच्या आखाड्यात अंगमेहनत करणारे अनेक पैलवान आहेत , रस्त्यावर उभे राहून धारोष्ण दूध देणाऱ्या म्हशी आहेत , सुंदर असा रंकाळा तलाव आहे , वेगवेगळ्या सिनेमांचे शुटींग झालेला शालिनी पॕलेस आहे . येथे कोल्हापूरी झणझणीत मिसळ आहे , खासबाग मैदानात फुटबाॕलचे सामने आहेत , येथे ताराबाईंचे सुरेख शिल्प आहे , याच भागात किंवा टाकाळा येथे जाताना सुरेख असे असंख्य बंगले आहेत , स्वयंसिध्दा सारख्या संस्था आहेत , बाईचा पुतळा आहे , चंद्रकांत मांढरे यांची आर्ट गॕलरी आहे , राजारामपूरी मध्ये सर्व बॕंका आणि आधुनिक अशी बाजारपेठ आहे , गोकूळ सारखी आठवणीत राहणारी जूनी हाॕटेल्स आहेत , सेंट झेवियर सारख्या असंख्य शाळा आहेत , विवेकानंद काॕलेज आहे , अतिशय भव्य असे शिवाजी विद्यापीठ आहे , अत्यंत सुरेख किंवा जिवंत वाटावेत अशा असंख्य शिल्पांनी समृद्ध असा कण्हेरी मठ जवळ आहे . जोतिबांचे वसतिस्थान जवळच्या डोंगरावर आहे , राजांचा " पन्हाळा " आहे , तीनशे मीटर उंचीवर फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज आहे , त्याच्या जवळच " विश्वास नांगरे पाटील " यांचा बंगला आहे .........अशा असंख्य आनंददायी आठवणी म्हणजे कोल्हापूर आहे .
कोल्हापूरातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे केदार आणि मंदार या अत्यंत चलाख अशा भाच्यां बरोबर आनंदात घालवलेल्या वीस बावीस वर्षांच्या असंख्य आठवणी ....!
विनायक जोशी (vp )
9423005702
electronchikatha.blogspot.com
बुधवार, ३१ मे, २०१७
" नादखुळे कोल्हापूर "
रविवार, २८ मे, २०१७
किल्ले पन्हाळा
// श्री स्वामी समर्थ //
" पन्हाळा "
नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांचे शांतपणे दर्शन घेऊन आणि कुरुंदवाड येथील कर्मयोगी बाबा फाटकांची भेट घेऊन कोल्हापूर येथील अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजेच माळी काॕलनी मधील वसंत व्हिला येथे बहिणीच्या घरी पोचलो.सुरेश रावांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच जोतीबा आणि पन्हाळा असा कार्यक्रम आखला होता. सकाळी भुरभुरणाऱ्या पावसात डोंगरीच्या जोतीबांच्या दर्शनाला पोचलो. संपूर्ण मंदिराचा परिसर गुलालमय झालेला होता. मंदिराच्या सुरवातीलाच दोन भव्य नंदी एकाच ठिकाणी स्थानापन्न होते त्यांचे दर्शन घेऊन नंतरच मुख्य देवांचे दर्शन घेतले.जोतीबाचे चांगभले म्हणत पन्हाळ गडाकडे जाण्यास निघालो. कोणत्याही जोडून सुट्या नसल्यामुळे गडावरती अतिशय कमी गर्दी होती. अत्यंत त्वेषाने लढत असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा बघितला आणि घोडखिंडीच्या लढाईची दृष्ये दिसू लागली..
पन्हाळा या ऐतिहासिक गडाला सिद्दीजौहरने घातलेला मजबूत वेढा आणि त्यामुळे गडावर अडकून पडलेले शिवाजी राजे. गडावरील अंधार बावडी मध्ये असलेल्या पाण्याचा मर्यादित साठा किंवा सोळाफुट रुंदीच्या भिंती असलेल्या अन्नधान्याच्या कोठारातून भात , नाचणी वगैरे गोष्टींचा असलेला साठा यांचा आढावा घेण्यात आला.गडावरील एकमेकाला दिसतील अशा चाळीस बुरुजांवरची सुरक्षा व्यवस्था आणि इंग्रजी तोफांना समर्थ पणे तोंड देणाऱ्या तीन दरवाजा या प्रवेशद्वाराची सुरक्षितता अनेकदा आणि अचानक पणे तपासली जात होती. तिन मजली उंच अशा सज्जा कोठी शेजारील खलबत खान्यात राजांच्या सुखरुप सुटके बद्दल वेगवेगळ्या पर्यायांचा विचार चालू होता. राजे शरण येणार ह्या बातमीने सैल पडलेला वेढा. मानाच्या पालखीतून राजे म्हणून जौहरला भेटायला गेलेला शिवा काशिद किंवा याच वेळेला सात टेकड्या आणि पठार असा प्रदेश पार करुन राजांच्या पालखीला घेऊन विशाळगडा कडे निघालेले बाजीप्रभू देशपांडे आणि मावळे यांची प्रचंड आणि सावधपणे चाललेली धावपळ डोळ्या समोर तरळत होती. राजे गडावरुन निघून गेले हे कळल्यावर संतप्त झालेल्या आणि पाठलाग करत बाहेर पडलेल्या सिद्दी जोहरच्या फौजेला घोडखिंडीतच जखडून ठेवणारे आणि हातात दांडपट्टा घेवून उभे असलेले बाजी प्रभू किंवा राजांची पालखी घेऊन छाती फुटेपर्यंत पळणारे भोई या सर्वांच्या आठवणीने अभिमानाने उर भरुन आला . गडावरुन परत येताना मोरोपंतांच्या नावाने चालू असलेल्या ग्रंथालयात जाऊन आलो. सध्या या गडावर उत्तम रस्ते आहेत . सुबक अशी नगरपरिषदेची इमारत आहे. गडावरुन उतरताना अत्यंत राकट आणि तेजस्वी अशा बाजीप्रभूंच्या पुतळ्याला मनःपूर्वक नमस्कार केला.
पन्हाळा या ऐतिहासिक गडाला भेट द्यायची असेल तर
शिवा काशिद , बाजीप्रभू देशपांडे , घोडखिंड किंवा बाजींच्या बलिदानाने पावन झालेली पावन खिंड याच बरोबर सिद्दी जौहरचा कडवेपणा किंवा किल्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्त वाटा , खंदक , तोफा , प्रचंड असे दिंडीदरवाजे वगैरे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. लहानपणीच " श्रीमानयोगी " ची पारायणे केलेली असल्यामुळे त्या ऐतिहासिक रात्री घडलेल्या सर्व घडामोडी जवळून अनुभवता आल्या .....! गडावरती अत्यंत कमी गर्दी असल्यामुळे पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला त्याच्या मुळ रुपात बघता आला .
विनायक जोशी (vp )
9423005702
electronchikatha.blogspot.com