रविवार, ३ मे, २०२०

Reset उन्हाळा २०२० ----विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
  *उन्हाळा २०२०*
      ☀️☀️☀️

Reset किंवा शुन्यातून सुरुवात करायला लावणारा असा हा असामान्य  उन्हाळा आहे . तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तयार झालेल्या अतिआत्मविश्वास नावाच्या फुग्यातील हवा काही वेळासाठी काढून घेणारा हा उन्हाळा आहे . पृथ्वीच्या दृष्टीने मुंगी , डास , मांजर , कुत्रा , माकड अशा लाखो सजीवां सारखाच माणूस आहे याची जाणीव करुन देणारा हा उन्हाळा आहे . जगभरातल्या सर्वांनी मिळून स्वयं शिस्त पाळून पुढे जायचे आहे हे मनावर बिंबवणारा हा उन्हाळा आहे . या उन्हाळ्याच्या आधीचे माझ्या आयुष्यातील छप्पन उन्हाळे कसे होते याचा संक्षिप्त आढावा घ्यायचा प्रयत्न खाली केला आहे

विनायक जोशी (vP)
💬9423005702
 📱9834660237


 *आठवणीतील उन्हाळे*
☀️☀️☀️

      *विनायक जोशी (vp)*
             *मार्च २०१८*
सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे प्रखर अशा उन्हाळ्याच्या बद्दल आणि सूर्यदेवांच्या  कृपादृष्टी बद्दलचे व्याख्यान ऐकून उन्हाळ्याला वातानुकूलित यंत्राशिवाय आनंदाने सामोरे जायचे ठरविले.

  वेळणेश्वर येथील समुद्राच्या सुखद लाटा अंगावर घेत असताना भूतकाळातील अनेक उन्हाळ्यांच्या आठवणींच्या लाटा एका मागोमाग येऊन आदळू लागल्या.

सोलापूर ही माझी जन्मभूमी असल्यामुळे उन्हाळा या विषयावरील प्रॕक्टिकल शिक्षण लहानपणीच झाले होते.भर उन्हात अनवाणी पायाने हिंडणे किंवा दुपारच्या उन्हात चांदण्यात फिरायला बाहेर पडावे तसे हिंडणे. कडूनिंबाच्या सावलीत बसून गप्पागोष्टी करणे वगैरे नित्यक्रम होता.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईची वारी असायची .त्यामुळे रत्नागिरीच्या हापूस आंब्यांच्या बरोबरच उकाडा आणि घामाच्या धारा यांचा अनुभव मिळायचा.पुण्यात आल्यावर मात्र उन्हाळा अगदी मेंगळट वाटू लागला . पुढे कामाच्या निमित्ताने विदर्भातील उन्हाळा किंवा तेथील डेझर्ट कुलर यांचा अनुभव घेतला.कुलरच्या पाण्यात मुक्कामाला येणारे साप हा आवारपूर स्पेशल उन्हाळा असे.

 माउंट अबूला वळसा घालून पालनपूर या गावचा उन्हाळा .तेथेच नॕशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या डेयरी मध्ये तयार होणारे अमुल बटर आणि अतीउष्णते मुळे रस्त्याच्या कडेला गलितगात्र होऊन पडलेले मोर भेटले.

या नंतर डायरेक्ट सिमला कुलू मनाली. या येथे बाजपेयींचे उन्हाळ्यातील विश्रामधाम आणि उन्हाळ्याच्या मुळे वितळलेल्या बर्फाच्या मधून जाणाऱ्या रस्त्याने जाऊन रोहतांग पास बघता आले.

तेथून दक्षिणेकडील खास उन्हाळा .नंदी हिल्सवरती अवाढव्य अशा नंदीच्या पायापाशी बसून अनुभवला. तुतिकोरीन या अत्यंत रुक्ष प्रदेशातील चटके अनुभवले. त्रिचूर वगैरे गावातील मेणचट उन्हाळ्याची झलक अनुभवता आली. तिरुपती येथील गदगदणारा उकाडा अनुभवावा लागला.आंध्र प्रदेशा मधील जंगलातील म्हणजेच मिरियलगौडा, कलवाकुरती,अचलपेठ येथील नक्षलग्रस्त भागातील भयभीत करणारा उन्हाळा बघीतला.

या सर्व प्रकारात वैशाखा मध्ये पेटणारे वणवे बघता आले.हे सर्व मनमोकळेपणाने जसे आहे तसे बघता आले . मोबाईल फोन्स अथवा टुरिस्टचे लोंढे यांच्या अनुपस्थितीमुळे ही सर्व ठिकाणे कायमची लक्षात राहिली . सिमेंटच्या जंगलात बसून वाढलेल्या उन्हाळ्याची चर्चा करताना एखादी गार झुळूक यावी , तशी मागील उन्हाळ्यांच्या काही आठवणींची ही  सुखद झुळूक ........!!!

*विनायक जोशी (vp )*
 💬9423005702
  📱9834660237
 मंगलधाम , हिंगणे खुर्द  लेन नंबर ४ ,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा