शनिवार, २२ जून, २०१९

नाना पोकळेंचा धायरी हापूस

" श्री स्वामी समर्थ "
    "आठवणी २०१७"
  *नाना पोकळेंचा*
    *धायरी हापूस*

धायरी ग्राम पंचायत आॕफीसच्या बरोबर समोर पदमावती देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे.या मंदिराच्या उजव्या हाताला एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बरोबर मागे " नाना पोकळे " यांचा सुरेख दगडी वाडा आहे. नाना स्वतः R & D दिघी येथे नोकरीस होते.१९८१ च्या आसपास त्यांनी बलसाड येथून आंब्याची रोपे आणून धायरी येथील स्वतःच्या शेतात लावलेली आहेत.त्या काळात शेतावर पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे नानांनी आणि काकूंनी लांब अंतरावरुन कळशी किंवा हंड्याने पाणी नेऊन ही झाडे वाढवली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस हा स्पेशल धायरी हापूस तयार होतो.मागच्या वर्षी पहिल्यांदाच  कोकणातील सराईत मंडळींच्या कडून आंबा ऊतरवून घेतला .या धायरी हापूस बरोबरच रसाळ आणि गोड असा पायरी सुध्दा आहे . कोणत्याही प्रकारे केमीकल्सचा भडीमार न करता पारंपारिक पद्धतीने आंब्याची आढी लावायची  पध्दत आहे . अतिशय योग्य दरात अत्यंत दर्जेदार असा आंबा यांच्या कडे उपलब्ध असतो. अतिशय रसाळ आणि गोड असलेल्या या आंब्याच्या बरोबरच कर्तृत्ववान व पारमार्थिक बैठक असलेल्या आणि मोठ्या वाड्याला योग्य अशा मोठ्या मनाच्या नानांचे आणि काकूंचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आणि कल्याणी अत्यंत आनंदाने येथे जाऊन आलो . गेली पस्तीस वर्षे पोकळेंच्या शेतात रमलेल्या आणि मे महिन्याच्या अखेरीस तयार होणाऱ्या या धायरी हापूस ची गोडी एकदम खास आहे ...!
🍋🍋🍋

*विनायक जोशी ( vp )*
9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

पु.ल.देशपांडे नावाचा संस्कार

// श्री स्वामी समर्थ //
  *पु .ल .देशपांडे नावाचा संस्कार*
              विनायक जोशी (vp)
📱9423005702

 सोलापूर मध्ये आमच्या घरात जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या समोर पदमाकर काकाने " वाऱ्यावरची वरात " हा पुलंचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आणि माझ्या वरती पहिला आनंददायी आणि विलक्षण असा "पुल" नावाचा संस्कार झाला. पुढील आयुष्यात त्यांनी लिहिलेली ओळन् ओळ " सखाराम गटणे " स्टाईल ने वाचून काढली.
नोकरी मध्ये असताना कोलकता येथे जाण्याचा योग आला त्या वेळी पुलंच्या लेखातून भेटलेल्या शांतिनिकेतन , रविंन्द्रनाथ टागोर,शर्वरीबाबू ,गौरीशंकर घोष ,रामकिंकरदा वगैरे जग प्रसिद्ध व्यक्तींचे कोलकता नजरेसमोर होते.
लेह-लडाख चा विषय निघाला की १९६७ साली लडाख मधील वातावरणात  लढणारे आपले सैनिक , त्या काळातील असुविधा ,सरकारी कारभार  किंवा ग.दि.माडगूळकरांना त्या भूमीवरती स्फुरलेले शौर्य गीत या सर्वांचा उल्लेख असलेला "शूरा मी वंदिले "हा लेख आठवतो.
असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या माणसाने स्वाभिमानी आयुष्याबरोबर,
संगीत,चित्रकला,शिल्पकला,नाटक,
सिनेमा ,भाषाशास्त्र ,कविता वाचन या पासून ते वेगवेगळ्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या कडे  निकोप आणि निरोगी पणाने बघायची दृष्टी दिली.
मुंबई वरुन येताना "मेणाच्या पुतळ्यांच्या प्रदर्शनाची जाहिरात लोणावळ्या जवळ वाचली आणि
पुलंनी उल्लेख केलेल्या "रघुनाथराव फडके "या महान कलाकारांने बनवलेले यांत्रिक मेणाचे पुतळे समोर दिसू लागले.
पुलंनी बऱ्याच देशात मोकळेपणानं भटकंती केली आणि अत्यंत सहजतेने आपले सर्व अनुभव लिहून ठेवले . निसर्गाची किंवा तेथील सौंदर्य यांची सहज जपणूक करणाऱ्या परदेशी लोकांच्या बद्दल अतिशय उत्तम आठवणी त्यांनी प्रवास वर्णनात केल्या आहेत.
 *नंदा प्रधान , रावसाहेब , नारायण , अंतू बर्वा , चितळे मास्तर , गौरीशंकर घोष ,शर्वरीबाबू , वसंतराव देशपांडे*...वगैरे असंख्य मंडळींच्या बद्दल हृदयस्पर्शी लेखन त्यांनी केले आहे.
 बिंदू माधव जोशी यांनी ठरविलेल्या "क्रांतीचे गोंधळी" या कार्यक्रमात अटलबिहारी बाजपेयींच्या समोर महाप्रतिभावान अशा" स्वातंत्र्यवीर सावरकरां "बद्दलचे पुलंचे भाषण
यु ट्यूब वरती बघितले  आणि कृतार्तथेने त्रिवार दंडवत घातले !

 *८ नोव्हेंबर २०१८*
 *विनायक जोशी (vp)*
   📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Best Friend Diode

// श्री स्वामी समर्थ //
   Best Friend
       *Diode*

  *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

कायम आनंदाने राहणारा आणि आपले स्वतःचे काम मनापासून करणारा विश्वसनीय मित्र.
या मित्राची आणि माझी पहिली भेट त्याच्या टिव्ही नावाच्या  मोठ्या घरात झाली. त्या वेळी तो एका व्हाॕल्व्ह नावाच्या काचेच्या घरात शांतपणे खाली मान घालून बसला होता. थोड्याच अंतरावर अतिशय शिघ्र कोपी हाय व्होल्टेज तयार करणारा EHT नावाच्या भावाजवळ तो रहात होता. कधी चुकून मर्यादा ओलांडली गेली तर हा भाऊ रागाने निळी ज्योत अंगावर टाकायचा.
मी जेथे जाईन तेथे हा  Diode आधीच  पोहचलेला असायचा . त्या मुळे नवीन ठिकाणी गेलो तरी परके वाटायचे नाही.
काही कालखंडा नंतर त्याने आपला आकार छोटासा करुन डिजीटल सर्किट्स नावाच्या नवीन जागेत  तो रहायला गेला. सुरवातीस तो 'OR ,And, वगैरे स्वरूपात पहायला मिळू लागला.
  दहिहंडी खेळात असतात तसा चौघांचा group करून Bridge  या नावाने power supply मधे त्याने केंव्हाच प्रवेश केला आहे. आपल्या एका जाडजूड capacitor मित्राला बरोबर घेउन सेकंदाला ५० वेळेला नाचणाऱ्या AC  व्होल्टेजला  दिड पटीने वाढवुन शांत अशा DC मधे जेरबंद करायचे काम तो लिलया करू लागला.
या नंतर मात्र त्याने कमाल केली , तो स्वतः भोवती लाल, निळा,पिवळा असे रंग सोडू लागला.अर्थात नवीन नावाने Led म्हणून . त्याच्या ह्या रुपाने अतिशय लोकप्रियता मिळवली. त्या नंतर रंगीत स्वरूपातील आठ जण एकत्र येऊन अर्थपूर्ण भाषेत बोलायला लागला .अर्थातच Display बनून .
याच्या नंतर सोळा सोळाच्या दोन टीम्स बनवून तो LCD म्हणून वावरू लागला.
याच वेळेला तातडीचे बोलावणे आले म्हणून तो Power Circuit  कडे गेला. याचे प्रमुख काम असायचे Coil मधील राहिलेले Magnetisum काढून टाकणे आणि Driver Transistors ना मृत्यूमूखी पडण्या पासुन वाचवणे. Mosfet मध्ये  मात्र तो आधीच आत जाऊन बसलेला असे Body Diode म्हणून .
   कंट्रोलरचा जगात मात्र  हा  Prom, EPROM, मेमरीज मध्ये लाखोंच्या संख्येने जाऊन बसला आणि स्थिरावला.
तसा तो स्वाभिमानी आहे. त्याला मर्यादे बाहेर काम दिले की रागाने काळानिळा होवून कायमचे काम बंद करतो. उलट दिशेने  येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची गर्दी वाढली कि हा दोन्ही दिशेने दरवाजा ऊघडा ठेवून Heart attack येणाऱ्या Transistors कडे  स्थितप्रज्ञपणे बघत बसतो.
मिलमनच्या पुस्तकातून पहिल्यांदा भेटलेला , प्रत्येक वेळेला ऐन मोक्याच्या वेळी मदतीला येणारा , इलेक्ट्रॉनीक्सच्या  क्षेत्रात हात धरुन आत्मविश्वासाने चालायला मदत करणारा आणि परमेश्वरा प्रमाणे चराचरात व्यापून राहिलेल्या *Diode* नावाच्या या मित्राची सुखद आठवण ...

याच्या आईने आपल्या या अत्यंत तेजस्वी अशा मुलाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून कॕथोड नावाची पांढरी रिंग त्याच्या गळ्यात घालून ठेवली आहे कायमची ...


     *विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

दादांचे संस्कार

// श्री स्वामी समर्थ //
    *दादांचे संस्कार*

   *चिकाटी , संयम आणि स्थितप्रज्ञता*

विनायक जोशी (vp)
📱9423005702

नारायण जोशी या मुलाने आपल्या वडिलांच्या कडून मिळालेल्या संस्कारांचा सुयोग्य पध्दतीने उपयोग केला आहे .त्या मुळेच तो आत्तापर्यंत उत्तम दर्जाचे काम सातत्याने करत आहे.
नारायणने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर L&T या कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून १९८४ साली रूजू झाला . या कंपनीत सिनियर इंजिनियर , मॕनेजर म्हणून काम केले .या नंतर Ultratech Cement या कंपनीत GM आणि AVP या पोझीशन्स वरती उत्तम दर्जाचे काम केले . त्या मुळे २०१० साली त्याला Unit Head या बढती बरोबरच कोलकाता येथे अत्यंत आधुनिक असा नवीन सिमेंट कारखाना उभारायची संधी कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली.  आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या या संधीचे त्याने सोने केले आणि दानकुनी येथे ५ वर्षात उत्तम चालणारा कारखाना उभा केला . या येथेच एक उत्तम असे सिध्दीविनायकांचे मंदीर बांधले ....वर्षाला हजार बाराशे कोटींची उलाढाल करणाऱ्या या नवीन  कारखान्याची सुत्रे नवीन पिढी कडे सोपवून स्थितप्रज्ञतेने तो पुढील नवीन जबाबदारी घेण्यासाठी दुर्गापूर आणि त्या नंतर रायपुरच्या एक्सपोर्ट युनीट कडे रवाना झाला अत्यंत समाधानाने आणि कृतार्थ भावनेने पुढच्या प्रगतीच्या वाटेवर ...

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
  मंगलधाम ,हिंगणेखुर्द ,
लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

प्राध्यापक सौ.मंगल जोशी साने

" श्री स्वामी समर्थ "
*प्रा.सौ.मंगल जोशी-साने*

आज १३ सप्टेंबर २०१७ या दिवशी अत्यंत यशस्वी आणि आनंदी आयुष्याची पन्नाशी मंगलने पूर्ण केली आहे. कऱ्हाड येथे भारती विद्यापीठात मनमिळावू प्राध्यापक  म्हणून अत्यंत आवडीने आणि उमेदीने कार्यरत आहे.कमालीच्या जिद्दीने आणि सहजतेने नोकरी करत करत पाच - सहा शैक्षणिक पदव्या तिने पटकावल्या आहेत. आमच्या घरातील या शेंडेफळाच्या पाठीशी आई - दादांचा प्रेमळ  आशिर्वाद आहे. संत गजानन महाराजां सारखे  त्रिकालज्ञानी गुरू तिला लाभले आहेत. आमच्या भाच्चे कंपनीची ती अत्यंत लाडकी मनमावशी आहे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे मन मनापासून जपणाऱ्या " मनला " आमच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा . 💐💐🎂🎂💐💐
*विनायक आणि कल्याणी*
9423005702
*electronchikatha.blogspot.co*

सोमवार, १९ जून, २०१७

सिध्दिविनायक मंदिर प्रतिष्ठापना ,कोलकाता दानकुनी अल्ट्राटेक सिमेंट

// श्री स्वामी समर्थ //
   " सिध्दिविनायक मंदिर "
कोलकाता येथील "अल्ट्राटेक सिमेंट दानकुनी "या कारखान्यात या युनिटचे प्रमुख नारायण जोशी यांच्या हस्ते "गणेश मंदिराची " प्रतिष्ठापना झाली. पुण्यातील शंकराचार्य मठात कार्यरत असणारे घनपाठी गुरुजी "अमित जोशी "यांच्या व्यक्तीगत मार्गदर्शना खाली होमहवन आणि प्रतिष्ठापनेचा सोहळा यथासांग पार पडला. सर्व संकल्प सिध्दिला नेणाऱ्या अशा या गजाननाच्या किंवा  सिध्दिविनायकाच्या आशिर्वादामुळेच अतिशय प्रसन्न अशा मंदिराची स्थापना झाली. श्री गणेशाची मुर्ती गुरुजींनी शास्रोक्त पध्दतीने बनवून घेतली आहे . कोट्यावधी सूर्यांचे तेज असलेल्या आणि सर्व कामे निर्विघ्नपणाने करुन घेणाऱ्या या बुध्दीच्या देवतेला मनःपूर्वक साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
विनायक आणि कल्याणी जोशी
9423005702
19 June 2017
electrochikatha.blogspot.com

शनिवार, १७ जून, २०१७

" दादा " Fathers Day

// श्री स्वामी समर्थ //
       " दादा "
   " प्रभाकर गणेश जोशी "
गणेश आणि सरस्वती जोशी या लोणावळा येथे राहणाऱ्या दांम्पत्याला २२ फेब्रुवारी १९३० या दिवशी पहिला मुलगा झाला तो म्हणजे आमचे 'दादा'.आई -वडील आणि धाकटा भाऊ पद्माकर यांच्या बरोबर अतिशय आनंदात बालपण गेले. आजोबांची सोलापूर येथे बदली झाल्यामुळे दादांचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उत्तम शिक्षक असलेल्या दर्जेदार विद्यालयात झाले.मॕट्रीकची परीक्षा उत्तम रितीने पास झाल्यानंतर दयानंद काॕलेज मधून BA पूर्ण केले. याच कालखंडात रेल्वे मध्ये नोकरी लागली आणि मंगळवेढा येथील रावसाहेब मायदेव यांच्या मुली बरोबर म्हणजेच यमु मायदेव हिच्या बरोबर विवाह बध्द झाले. अतिशय उत्तम पणाने आणि निष्ठेने कोणतेही काम करायचे या त्यांच्या सहजवृत्तीमुळे अल्पावधीतच नोकरी मध्ये प्रमोशन्स मिळत गेली. १९५९ साली म्हणजेच वयाच्या २९ व्या वर्षीच आजोबांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर येथील आदर्शनगर मध्ये स्वतंत्र घर बांधून "गुरुप्रसाद" या वास्तूत प्रवेश केला.अक्कलकोट येथील देवअण्णा जोशी यांच्या कडून वयाच्या ३५व्या वर्षी पारमार्थिक अनुग्रह मिळाल्यामुळे अतिशय समाधानी आणि संयमित आयुष्याची वाटचाल झाली.कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट कारभार न करता किंवा तत्त्वांशी अजिबात तडजोड न करता ३६ वर्षे सरकारी नोकरीत काम केले. आम्ही पाच भावंडे आणि आजी आजोबा अशा ९ जणांची कोणत्याही प्रकारची हेळसांड न करता आदर्शवत संसार केला.बालगंधर्वांपासून ते  सोलापूरच्या फैय्याज पर्यंत सर्वांची संगीत  नाटके त्यांनी आनंदाने बघितली होती , पतौडीच्या फिल्डींग पासून ते सेहवागच्या बॕटींग पर्यंत आवडणारे अनेक विषय त्यांच्या खात्यात होते , रामदास स्वामींच्या करुणाष्टका पासून ते लाॕर्ड टेनिसनच्या कवितां पर्यंत अनेक गोष्टी त्यांना मुखोद्गत  होत्या. रिटायरमेंट नंतर मात्र नातवंडांच्या बरोबरीने खेळत खेळत त्यांच्या स्वतःच्या  अत्यंत आवडत्या क्षेत्राचा म्हणजे परमार्थाचा खोलवर अभ्यास त्यांनी केला. समर्थांच्या शिवथरघळीत राहून दासबोधाचा अभ्यास केला.सखोल दासबोध किंवा गीता दर्शन यांच्या अभ्यासाने   स्वतःची पारमार्थिक उन्नती करुन घेतली. पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करणाऱ्या आणि काया - वाचा - मनाने अतिशय निर्मळ व्यवहार करणाऱ्या दादांची आठवण येत नाही असा आमचा एकही दिवस जात नाही .......!
विनायक जोशी (VP)
9423005702
electronchikatha.blogspot.com
प्रभाकर गणेश जोशी
(१९३०-२००४)
९५२ , "गुरुप्रसाद "
आदर्शनगर ,
सोलापूर
४१३००३