गुरुवार, २८ जुलै, २०१६

बंगलोर ८६ ते ९१

// श्री स्वामी समर्थ //
   " बंगलोर १९८६ ते ९१ "
शालेय जीवनात म्हैसूर आणि बंगलोर अशा सहलीला गेलो होतो.त्यावेळी सोन्याचे सिंहासनअसलेला राजवाडा ,वृंदावन गार्डन , नॕशनल पार्क ,विश्वेश्वरैया नावाच्या पुण्याच्या माणसाचा म्युझियम किंवा त्यामधील रेल्वे इंजिनचे माॕडेल वगैरे गोष्टी बघितल्या होत्या. आमच्या कंपनीचे दक्षिण विभागाचे आॕफीस बेंगलोरला झाले आणि रघुवीर नावाच्या अत्यंत दिलदार माणसाने येथिल कारभार हातात घेतला.या माणसाच्या बरोबर बरेचसे बंगलोर मी स्कुटर वरती डबलसीट हेल्मेट घालून आणि फुलपँट घालणाऱ्या पोलीसांकडे बघत बघत पालथे घातले होते.प्रत्येक रस्ता हा " मेन " आणि क्राॕस चे लेबल घेऊन उभा असे.त्या वेळी एकमेव अशी २६ मजली इमारत बेंगलोर मध्ये  होती. कोणत्याही हाॕटेल मधे गेलो की इडली अथवा डोशा बरोबर येणाऱ्या चटणी आणि सांबाराच्या बादल्या सर्वांना तृप्त करत होत्या.इंडस्ट्रीयल झोन मधील इलेक्ट्रॉनीक इस्टेट मधे अतिशय टुमदार असे ५०० छोटे छोटे कारखाने बघायला मिळाले. रघुवीरदादा बरोबर असल्यामुळे TIFR असूदे किंवा विधानभवन सर्व  ठिकाणी मुक्त संचार करता येत असे.एकूणच बंगलोरचे हवामान , शिस्त ,रस्ते किंवा अतिशय प्रेमाने कानडी बोलणारी माणसे या मुळे कोणताही परकेपणा नव्हता.येथिल बसचा मुख्य स्टँड किंवा त्या ठिकाणी ट्रॕफिकचे नियंत्रण अॕटोमॕटीक सिग्नल्सच्या ऐवजी म्यॕन्युयली करणारे पोलीस . पर्यटकांना समजेल अशा भाषेत बोलणारी बंगलोरी माणसे बघायला मजा येत असे.राजकुमार नावाच्या सुपरस्टारचे भक्त असलेली , साधारणपणे रंगाने सावळी ,डोक्याला भरपूर तेल लावणारी , कानडी हेल वापरुन इंग्रजी बोलणारी , अतिशय किरकोळ विनोदाला सुध्दा भरघोस दाद देणारी , घरामध्ये पांढरी स्वच्छ लुंगी वापरणारी अशा माणसांचे ते बंगलोर होते. IT कंपन्या , परदेशी मालाने खचाखच भरलेले माॕल्स , पानांच्या टपऱ्या असाव्या तसे " पब " वगैरे गोष्टींचे सावट अजून पडलेले नव्हते !
आज विमानाच्या सुविधेमुळे अतिशय जवळ आलेले भपकेबाज बंगलोर  त्याच्या मूळ रुपापासून खुपच दूर गेलेले आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 January 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा