गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

पुनरागमनायच " गंपती बाप्पा "

// श्री स्वामी समर्थ //
     " गणेश "
श्रावणातील चारही सोमवारी भोलेनाथांची मनःपूर्वक पूजा केली आणि लगेचच भाद्रपदा मध्ये त्यांची मेल आली. या वर्षी काही दिवसांसाठी गणेशजी आमच्या घरी येणार होते. अचानक गडबड उडाली.घराचा कोपरान कोपरा स्वच्छ केला. आम्ही सर्व व्यवस्था नीट केली आहे का नाही हे बघण्यासाठी हरितालिका पहिल्यांदा आल्या.गणेशाच्या आगमनाची पूर्व तयारी बघून संतुष्ट होवून परतल्या. चतुर्थीला तेजस्वी आणि देखणी अशी बाप्पांची स्वारी देवघरात स्थानापन्न झाली आणि आनंदाचा सोहळा चालू झाला.आपले छोटेसे डोळे किलकिले करुन दररोजची खिरापत न्याहाळू लागली. आमच्या मुलांनी म्हणलेल्या अथर्वशीर्षा वर समाधानाने डोलू लागली. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती आणि पूजा होवू लागली. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आणि दूर्वा , फुले ,पत्री ,हार वगैरे गोष्टी बघून बाप्पा आनंदून गेले . या बुध्दीच्या देवतेने सर्व गोष्टी यथासांग करुन घेतल्या. आपल्या शेजारी गौरींना प्रशस्त जागा करुन दिली.गणेशजींनी ऋग्वेदा तील मंत्रांचा सुध्दा आस्वाद घेतला. पाच सहा दिवस झाले आणि आई-वडीलांची आठवण काढू लागले .म्हणता म्हणता निरोप घ्यायचा दिवस उजाडला .चैतन्य मुर्ती अशा आमच्या नातीला म्हणजेच" इरा" ला बरोबरीने घेऊन उत्तरपूजा नामक निरोपाचे भाषण आणि पुनरागमनायच म्हणून पुढच्या वर्षी परत येण्याचा वायदा पक्का करुन घेतला.विठ्ठल रखुमाईच्या समोरील पुंडलिकाच्या देवळा पाशी आल्यावर मात्र आई- वडीलांना भेटण्यासाठी आतूर झालेल्या शिव- पार्वतीच्या लेकराने म्हणजेच गणपती बाप्पाने तीन वेळा मागे बघून आमचा निरोप घेतला .........पुढच्या वर्षी लवकर परत येण्याच्या बोलीवर !!!
विनायक जोशी (vp)
11 september 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा