सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

वाढदिवस " सुधीरराव , रेणूका ,क्षितिज " ३१ आॕक्टोंबर

// श्री स्वामी समर्थ //
    वाढदिवस ३१ आॕक्टोंबर
  "सुधीरराव ,रेणूका,क्षितीज"
स्वतः विषयी अत्यंत कमी बोलणारे आणि शांत पणाने दीर्घकाळ उत्तम दर्जाचे काम करणारे सुधीरराव !
मुलींच्या मध्ये बोर्डाच्या परिक्षेत पहीली आलेली, पिलानी आणि मेलबर्न येथे शिकलेली,सध्या दोन लहान मुलींना सांभाळून उत्तम प्रकारे मेलबर्न येथे काम करणारी रेणूका मंदार सोवनी !!
हुशार आई वडीलांच्या पेक्षा वेगळे कार्यक्षेत्र निवडणारा, अतिशय सहजपणाने CA ची पदवी खिशात टाकणारा , कामासाठी वेगवेगळ्या देशात जाऊन आपल्या कामाचे क्षेत्र वाढवणारा असा " क्षितीज "!!!
वरील तिघांच्या मध्ये असलेले साम्य म्हणजे तिघांचेही " Outstanding Performances "!!!!
विनायक जोशी (vp )
३१ आॕक्टोंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

लक्ष्मी पूजन

// श्री स्वामी समर्थ //
    " लक्ष्मी पूजन "
अत्यंत उत्साही आणि कल्पक अशी गृहलक्ष्मी , सर्व गोष्टींची मुबलकता असलेले पुणे आणि यांच्या बरोबरच जोडीला असलेली बिस्मिल्लाह् यांची सनई , सुब्बालक्ष्मी यांची स्पष्ट उच्चारातील लक्ष्मीची स्तुती , शेकडो दिव्यांनी उजळलेली आमची लेन आणि कायम स्वागतोत्सुक अशा मंडळींच्या मुळे "मंगलधाम "मध्ये  "लक्ष्मी" देवींंचे आनंदाने आणि कायम स्वरूपाचे वास्तव्य आहे.
आता मात्र  तासभर फटाक्यांचा कडकडाट फक्त !!!
   विनायक जोशी (vp )
   ३० आॕक्टोबर २०१६
       लक्ष्मी पूजन

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

"नरकचतुर्दशी २०१६"

// श्री स्वामी समर्थ //
" नरकचतुर्दशी २०१६"
     "दिवाळी पहाट "
  अगदी भल्या पहाटे उठून नरकासुराचा वध केला.त्या नंतर ओवाळणे , देवपूजा आणि सर्व फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून बरोबर ५.३० वाजता "दिवाळी पहाट" या कार्यक्रमा साठी गेलो. कार्यक्रम चालू होण्यास बराच वेळ होता त्या मुळे तबला ,पखवाज आणि साउंड सिस्टीम अॕरेंजर यांचा वाॕर्मअप राउंड बघता आला. आनंद भाटे ,मंजूषा कुलकर्णी आणि राहूल सोलापूरकर हे मुख्य कलाकार हजर होते.साथीला मिलींद कुलकर्णी ,माउली टाकळकर,प्रशांत पांडव  वगैरे मंडळी होती.सुखद अशा थंडीत राहूल सोलापूरकर यांनी उत्तम दर्जाच्या निवेदनाने सुरवात केली.त्या नंतर आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक सुरेख गाणी सादर केली.गाण्याच्या मध्ये पेटी,तबला, पखवाज आणि टाळ यांची कमालीची अदाकारी चालू होती. रसिकांना मायबाप समजणारे कलाकार आणि कलावंताना देवाचे दूत समजणारे रसिक यामुळे कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला मात्र अत्यंत तेजस्वी असे सूर्यनारायण आपल्या असंख्य सोनेरी किरणांना हळूवार पणे घेऊन आले आणि स्वरांच्या त्या सुखद अशा मैफिलीला दिव्य स्पर्श करुन मार्गस्थ झाले.
ज्या मैफिलीची सुरवात हि योगेश्वर अशा कृष्णा पासून होते,ज्या मैफिलीत बालगंधर्व ,राधा,मीरा वगैरे मंडळी हजेरी लावतात  आणि जिची समाप्ती विठ्ठल नामाने होते त्या मैफिली  बद्दल आपण फक्त कृतार्थतेचे हात जोडायचे.
  विनायक जोशी (vp)
29 October 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

Dr.D.M.Nene ( Family Doctor)

// श्री स्वामी समर्थ //
   " फॕमिली डाॕक्टर "
     "डाॕ.द.म.नेने"
सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली माझा जन्म झाला . १० आॕगस्टला पहाटे २.३० अशी अचूक जन्मवेळ नोंदवायचे काम डाॕ.नेने यांनी केले.त्या काळात डाॕ.दिवाडकर हे आमचे फॕमिली डाॕक्टर होते. या नंतर काही वर्षांनी लष्कर भागातील राम मंदिराच्या शेजारी डाॕ.नेने यांचा दवाखाना चालू झाला . काॕलनी मधील दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबां पर्यंत सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी डाॕ.नेने यांनी लीलया पेलली. मंद स्मित , माफक बोलणे , अचूक निदान आणि अत्यंत कमी फी या चतुःसुत्री मुळे  नेने डाॕक्टरांना सर्वांच्या मनात आणि घरात आदराचे स्थान प्राप्त झाले. नेने डाॕक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धे अधिक आजार घाबरुन पळून जात असत. दररोजचे तीन डोस असे तीन दिवसांचे औषध घेऊन घरी यायचे.पहिल्या दिवसाचे तीन डोस घेई पर्यंतच आजारातून सुटका झालेली असायची.नेने डाॕक्टरांच्या आश्वासक बोलण्यामुळे ताप ,सर्दी ,खोकल्या पासून ते अगदी मणक्याचे हाड सरकलेले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची भीती वाटायची नाही.आजच्या इंटरनेटच्या युगात सुध्दा डाॕ.नेने त्या वेळी वापरत असलेल्या जंक्शन व्हायोलेट किंवा खोकल्याच्या गुलाबी औषधाची अथवा साडेतीन गोळ्यांच्या डोसची आठवण येते.सर्व आजारांना बरे करण्याची ताकद असलेल्या त्या गोळ्यांची कधीही चिकित्सा करावी वाटली नाही किंवा वाटत नाही .याचे एकमेव कारण म्हणजे डाॕ.नेने या  हजारो पेशंट बरे करणाऱ्या तपस्वी माणसाचा अनुभव समृद्ध स्पर्श त्या औषधाला लाभला होता. अनेक  प्रकारच्या डिफीशीयन्सीज दाखवणारी करोडो रुपयांची निर्विकार मशिन्स आता उपलब्ध आहेत .त्या मधून निघणारे रिपोर्टस वाचतानाच भिती वाटते. पेशंटला अजिबात न घाबरवता तपासणाऱ्या डाॕ.द.म.नेने यांची यावेळी आठवण प्रकर्षाने येते . आजही लष्कर मधील राम मंदिरात जायचा योग आला की रामपंचायनातल्या त्या मुर्ती किंवा प्रवचन देणारे गुरुजी ,तेथेच असलेले भुयार आणि याच मंदिराच्या शेजारी लाकडी फोल्डींगचा दरवाजा असलेल्या आणि पन्नास साठ पेशंटनी कायम भरलेल्या दवाखान्याची आणि असंख्य पेशंटस् बरे करणाऱ्या कर्मयोग्याची म्हणजेच "डाॕ.द.म.नेने" या आमच्या त्या वेळच्या "फॕमिली डाॕक्टर" या संस्थेची आठवण येते !!!
विनायक जोशी ( vp )
24 October 2016
electronchikatha.blogspot.com

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

"Tom & Jery " 76 complete !!!

// श्री स्वामी समर्थ //
प्रिय,
  " टाॕम आणि जेरी "
तुम्हाला दोघांना बघितले आणि जिवलग मित्र म्हणजे काय याचा साक्षात्कार झाला. भविष्याची काळजी न करणारी आणि भुतकाळात न रमणारी अशी तुमची अजरामर जोडी आहे.कायम वर्तमानात रहाणारी.
" जेरी " चे जेरीस आणणे आणि टाॕम ने त्या सर्व हरकतींना उत्साहाने तोंड देणे लाजवाब. तुमच्या कल्पना शक्ती ला मात्र  तोड नाही. तुमच्या गोष्टींमधे उपदेशाचे डोस नाहीत किंवा उगीचच करुण रसाकडे कधीही गेल्या नाहीत. या जगात आम्हाला आनंदाने जगायचे असेल तर आलटून पालटून आम्ही पण कधी "टाॕम" तर कधी "जेरी" व्हायला पाहीजे असे वाटते. एकही शब्द न बोलता सुध्दा जगातल्या सर्व वयोगटातील रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे तुम्ही राज्य करत आहात. चॕपलिन नावाच्या अशाच एका राजाने तुमच्या बरोबरीने आमच्या वर राज्य केले आहे. तुमच्या सारख्या उत्साहाने जगणाऱ्या मंडळींच्या सहवासामुळे , आषाढातल्या काळ्या  ढगांना दूर सारुन आम्ही "श्रावण मासी हर्ष मानसी " या ओळी गुणगुणत पावसाळ्याचा आनंद लूटत आहोत.!!
हेच पत्र तुमच्या आयांना दाखवा आणि दिवे लागणीला आठवणीने दृष्ट काढून घ्या !!
    विनायक जोशी (vp)
       
electronchikatha.blogspot.com

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

कलावंत

// श्री स्वामी समर्थ //
        " कलावंत "
एका छानशा टुमदार घराच्या बाहेरच्या   खोलीत वयोवृध्द असे ह.भ.प आजोबा आपल्या तेजस्वी आणि लुकलुकत्या डोळ्यांनी आपल्या नातवाची करामत बघत होते.याच खोलीत पिठाची गिरणी होती. घरामधील सहा माणसे आणि दळण न्यायला आलेले गिऱ्हाईक यांचा गलबलाट चालू होता.या सर्व आवाजांच्या पेक्षा मोठ्या आवाजात पं.भिमसेन जोशींचे " भाग्यदा लक्ष्मी धरम्मा ....हे गाणे म्हणत अत्यंत एकाग्रतेने एक हाडाचा चित्रकार कॕनव्हास वरती  चित्र काढत होता.अशा प्रकारच्या वातावरणात सर्वोत्कृष्ट काम करणारा कलाकार म्हणजे " दीपक देशपांडे " होता.

अशाच एका संध्याकाळी दीपक  बरोबर गप्पा मारत सोलापूर मधील सेवासदन शाळेत गेलो होतो . डाॕ.देगावकरांच्या नाट्य आराधना संस्थेत नाटकाच्या  नेपथ्य व्यवस्थेत दीपक मदत करत होता.आम्ही तेथे पोचलो.दीपकने  एक बाकडे आणि दोन खुर्च्या वगैरे स्टेज वरती मांडामांड केली.थोड्याच वेळात एक तरुण मुलगा आणि मुलगी तेथे आली.स्टेज वरील बाकड्यावर एकमेकांच्या कडे पाठ फिरवून संवाद म्हणू लागली. हा प्रसंग बघायला मी,दीपक आणि शाळेचा शिपाई  होता  .थोड्या वेळाने मी तेथून निघालो .तो चुणचुणीत मुलगा म्हणजे " अतुल कुलकर्णी " होता आणि मुलगी बहूतेक " जवळगेकर " .

आदर्शनगर मध्ये आमच्या समोरच्या घरातील एका मुलाला सुध्दा अशीच  नाटकात काम करायची आवड होती .स्टेटबँकेतून कामावरुन घरी आल्यावर कित्येक वर्षे  संध्याकाळी दोन ते तीन तास न चूकता नाटकांच्या तालमीसाठी तो जायचा . तो म्हणजे " गुरुराज अवधानी" !!
परमेश्वराशी सरळ अनुसंधान साधणाऱ्या कलेचा स्पर्श झालेली ही सर्व कलावंत मंडळी आहेत. पैसा ,प्रसिद्धी वगैरे अस्थिर गोष्टी त्या वेळी त्यांच्या गावी ही नव्हत्या .
विनायक जोशी (vp)
18 October 2016
electronchikatha.blogspot.com

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

विजय बढे आणि भारतीय तंत्रज्ञान

" श्री स्वामी समर्थ "
      " विजय बढे "
         "Inditech"
    "विजयी भारतीय तंत्रज्ञान"
१७ आॕक्टोंबर १९७२ साली प्रगट झालेल्या विजयने सुधाकरराव
नाईकांच्या गावातून म्हणजेच पुसद येथून इंजिनियरींग केले.विजय भटकरांच्या मार्गदर्शना खाली प्रोजेक्ट आणि नागपूरच्या रिजनल काॕलेजमधून "एम टेक" उत्तम रितीने पूर्ण .अजित बेलसरकर या मित्रा बरोबर "IIT खरगपूरचा"काही दिवसांचा सहवास .साधी राहणी , मितभाषी स्वभाव आणि मानसिक समाधान देणाऱ्या संशोधनात्मक कामाची अत्यंत आवड या मुळे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या न करता आवडत्या क्षेत्रातील  व्यवसाय चालू केला. भारतीय तंत्रज्ञाना बद्दल कमालीचा अभिमान असल्यामुळे वयाच्या २६ व्या वर्षी अक्षय्यतृतीयेला " Inditech" या कंपनीची स्थापना.
वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर सध्या जागतीक दर्जाचे "लिफ्ट कंट्रोलर्स "करण्यासाठी कायम धडपड चालू असते. सत्तर तरुण , उत्साही अशा इंजिनियर्स बरोबर नाविन्याचा शोध घेणे चालू. काळानुरुप कंपनीचे प्रायव्हेट लिमीटेड मध्ये रुपांतरण केले.
पुसद वरुन शिक्षण पुर्ण केल्यावर सिंहगड रोडवरील माणिकबागेतील एका छोट्याशा बॕचलर्स फ्लॅट मध्ये आपल्या करीयरची सुरवात करणारे पुसदचे हे सर्व तरुण इंजिनियर्स आज जगभर पुसदचा नावलौकिक वाढवत आहेत.
फिजीक्सच्या प्राध्यापकांचा मुलगा आणि विजय भटकरांचा विद्यार्थी असलेल्या विजय बढे या पुसदच्या  मुलाने आपल्या कामाच्या दर्जाने आणि Indian Technology चा वापर करुन Inditech ला एका सन्मान पूर्वक जागेवर नेऊन ठेवले आहे !!!
विनायक जोशी (vp)
17 October 2016
electronchikatha.blogspot.com
-------------------------------------------------------------------
नारायणने मांडलेले ,
       सुरेख विचार

Happy Birthday Vijay.
I have been fortunate to see many a memorable leaps of faith into ones own strengths. One of the leading being your Inditech. After tackling All the difficult phases, you are poised for next big jump. Needless to say upbringing ( parents ) and belief in your capabilities ( your highly supportive spouse ) deserve credit. Many best wishes.

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

" सीमोल्लंघन " विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
   " सीमोल्लंघन "
साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी अचानक पणे नेताजी सुभाषचंद्र स्टेडियम कलकत्ता  येथे औद्योगिक प्रदर्शनात  जायचा योग आला.अर्थातच या स्टेडियम मध्येच  चित्रित झालेल्या "याराना" या सिनेमा मधील गाण्याची आणि अंगावर असंख्य दिवे लावून नाचलेल्या अमिताभची आठवण झाली. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे प्रत्येक गोष्टी बद्दल उत्सुकता होती.बॕगेज मधील सामानाला ऐनवेळी हाताला लागलेले अतिशय लहान कुलूप लावले होते. डिजीटल मिटरच्या बॕटरीज हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम विमानात चढताना झाला. हवाई सुंदरी या कमालीच्या कष्ट करणाऱ्या मंडळींचे दर्शन झाले.पेट बांधण्यासाठी असलेली पेटी कशी बांधायची किंवा सोडायची आणि विमानाच्या आतील हवा विरळ झाल्यावर काय करायचे याची माहिती  लक्षपूर्वक ऐकली. माझ्या सुदैवाने मला विमानाच्या पंखांचे दर्शन होईल अशी सीट मिळाली. दोन वेगवेगळ्या हवाई सुंदरींकडून १५-२० गोळ्या, चाॕकलेटस् मित्रांना द्यायला म्हणून  घेतल्या . विमान उड्डाण करताना कानात दडे  बसतात वगैरे गोष्टी खिजगणतीत ही नव्हत्या .विमान नावाच्या चिमुकल्या जीवाने इंजिन्सचा गुरगुराट चालू केला. पंखांच्या आत असलेल्या असंख्य फ्लॕप्सची उघडझाप चालू झाली. अतिशय प्रखर अशा दिव्यांची उघडझाप करुन धावपट्टी कडे निघाले. थोड्याच वेळात पहाटेच्या लखलखत्या मुंबईला अलविदा करुन अथांग अशा महासागराला बगल देवून कलकत्या कडे  निघालो. थोड्या वेळाने  पंचतारांकित हाॕटेल मधून पॕक करुन आलेल्या अत्यंत  बेचव अशा  न्याहारीचा कार्यक्रम पार पडला. आनंदयात्री या सदरात मोडणारे सहप्रवासी असल्यामुळे  प्रवास झटक्यात पार पडला. मन प्रसन्न होईल असे हिरवेगार आणि समृद्ध असे गंगेचे खोरे आमच्या स्वागतासाठी सिध्द होते. अतिशय कमी वर्दळीच्या अशा कलकत्ता येथील  विमानतळावर कोणताही औपचारिकपणा नव्हता. बॕग घेण्यासाठी बेल्ट जवळ जाऊन थांबलो. पहिल्या राउंड मध्ये एक मोठी काळी कीट बॕग आली. एखाद्या सिनेमातील हिरो प्रमाणे दिसणाऱ्या मुलाने ती उचलली.तो क्रिकेट प्लेयर  सलिल अंकोला होता. थोड्याच वेळात एक छोटेसे निळे पिंप बेल्ट वरती आले .एका कुरळ्या केसांच्या आणि झब्बा घातलेल्या माणसाने ते ताब्यात घेतले.ते तबला नवाझ झाकीर हुसेन होते ....!
पहिला विमान प्रवास , गंगेच्या खोऱ्याचे विहंगम असे दृश्य  , सलिल अंकोला , झाकीर हूसेन यांचे दर्शन आणि पहिल्याच फटक्यात खिशात घालणारे " कलकत्ता " यांच्या मुळे त्या वर्षीचे सीमोल्लंघन कायमचे लक्षात राहिले !!!
विनायक जोशी ( vp )
11  October 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

"Multitasking " Sanjay Sarawate (vice precident)

// श्री स्वामी समर्थ //
     "Multitasking"
        "संजय सरवटे"
साधारणपणे तीस वर्षांपूर्वी या मुलाची आणि माझी ओळख विदर्भातील  "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. बिलासपूर हून आलेला , MSC झालेला , डाॕक्टरेट करण्यासाठी लागणारी तयारी करणारा , उत्कृष्ट चित्रे काढणारा , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , शालेय जीवनात आॕडीयो अॕंम्प्लिफायरची पूर्ण कपॕसिटी तपासण्याच्या नादात खिडकीच्या काचांना रामराम करायला लावणारा , कंपनीच्या क्वार्टर मध्ये घरगुती साहित्याचा जास्तीतजास्त वापर करुन TV बनवणारा असा हा चुणचुणीत मुलगा होता. डॕनीश , जर्मन , जॕपनीज वगैरे परदेशी तयार झालेले असंख्य कंट्रोलर्स अहोरात्र चालू स्थितीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम यांच्या विभागाला करावे लागत असे.प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक मिनीट जरी प्रोसेस बंद पडली तर लाखो रुपयाचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. याला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे . आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP , Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . अत्यंत आनंदी बायको आणि सोन्या सारखी दोन मुले ही त्याची मोठ्ठी जमेची बाजू आहे. १९९७ च्या मे महिन्यात तो सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे सर्वांनी गाणे म्हणण्याची फर्माइश केली. थोड्याच वेळात संजू आणि नारायण दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी "संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले.....सध्या पावसाळा संपला असे वाटत असतानाच अचानक पणे आकाशात नभांची गर्दी वाढू लागते आणि त्याच बरोबरीने "नभ उतरु आलं " ह्या गाण्याची प्रचीती येते. जुन्या आठवणी जागृत होतात .  अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या "संजू सरवटे "या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची आठवण येते !
विनायक जोशी ( vp )
4 october 2016
electronchikatha.blogspot.com