सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

" सीमोल्लंघन " विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
   " सीमोल्लंघन "
साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी अचानक पणे नेताजी सुभाषचंद्र स्टेडियम कलकत्ता  येथे औद्योगिक प्रदर्शनात  जायचा योग आला.अर्थातच या स्टेडियम मध्येच  चित्रित झालेल्या "याराना" या सिनेमा मधील गाण्याची आणि अंगावर असंख्य दिवे लावून नाचलेल्या अमिताभची आठवण झाली. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे प्रत्येक गोष्टी बद्दल उत्सुकता होती.बॕगेज मधील सामानाला ऐनवेळी हाताला लागलेले अतिशय लहान कुलूप लावले होते. डिजीटल मिटरच्या बॕटरीज हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम विमानात चढताना झाला. हवाई सुंदरी या कमालीच्या कष्ट करणाऱ्या मंडळींचे दर्शन झाले.पेट बांधण्यासाठी असलेली पेटी कशी बांधायची किंवा सोडायची आणि विमानाच्या आतील हवा विरळ झाल्यावर काय करायचे याची माहिती  लक्षपूर्वक ऐकली. माझ्या सुदैवाने मला विमानाच्या पंखांचे दर्शन होईल अशी सीट मिळाली. दोन वेगवेगळ्या हवाई सुंदरींकडून १५-२० गोळ्या, चाॕकलेटस् मित्रांना द्यायला म्हणून  घेतल्या . विमान उड्डाण करताना कानात दडे  बसतात वगैरे गोष्टी खिजगणतीत ही नव्हत्या .विमान नावाच्या चिमुकल्या जीवाने इंजिन्सचा गुरगुराट चालू केला. पंखांच्या आत असलेल्या असंख्य फ्लॕप्सची उघडझाप चालू झाली. अतिशय प्रखर अशा दिव्यांची उघडझाप करुन धावपट्टी कडे निघाले. थोड्याच वेळात पहाटेच्या लखलखत्या मुंबईला अलविदा करुन अथांग अशा महासागराला बगल देवून कलकत्या कडे  निघालो. थोड्या वेळाने  पंचतारांकित हाॕटेल मधून पॕक करुन आलेल्या अत्यंत  बेचव अशा  न्याहारीचा कार्यक्रम पार पडला. आनंदयात्री या सदरात मोडणारे सहप्रवासी असल्यामुळे  प्रवास झटक्यात पार पडला. मन प्रसन्न होईल असे हिरवेगार आणि समृद्ध असे गंगेचे खोरे आमच्या स्वागतासाठी सिध्द होते. अतिशय कमी वर्दळीच्या अशा कलकत्ता येथील  विमानतळावर कोणताही औपचारिकपणा नव्हता. बॕग घेण्यासाठी बेल्ट जवळ जाऊन थांबलो. पहिल्या राउंड मध्ये एक मोठी काळी कीट बॕग आली. एखाद्या सिनेमातील हिरो प्रमाणे दिसणाऱ्या मुलाने ती उचलली.तो क्रिकेट प्लेयर  सलिल अंकोला होता. थोड्याच वेळात एक छोटेसे निळे पिंप बेल्ट वरती आले .एका कुरळ्या केसांच्या आणि झब्बा घातलेल्या माणसाने ते ताब्यात घेतले.ते तबला नवाझ झाकीर हुसेन होते ....!
पहिला विमान प्रवास , गंगेच्या खोऱ्याचे विहंगम असे दृश्य  , सलिल अंकोला , झाकीर हूसेन यांचे दर्शन आणि पहिल्याच फटक्यात खिशात घालणारे " कलकत्ता " यांच्या मुळे त्या वर्षीचे सीमोल्लंघन कायमचे लक्षात राहिले !!!
विनायक जोशी ( vp )
11  October 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा