शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

"नरकचतुर्दशी २०१६"

// श्री स्वामी समर्थ //
" नरकचतुर्दशी २०१६"
     "दिवाळी पहाट "
  अगदी भल्या पहाटे उठून नरकासुराचा वध केला.त्या नंतर ओवाळणे , देवपूजा आणि सर्व फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून बरोबर ५.३० वाजता "दिवाळी पहाट" या कार्यक्रमा साठी गेलो. कार्यक्रम चालू होण्यास बराच वेळ होता त्या मुळे तबला ,पखवाज आणि साउंड सिस्टीम अॕरेंजर यांचा वाॕर्मअप राउंड बघता आला. आनंद भाटे ,मंजूषा कुलकर्णी आणि राहूल सोलापूरकर हे मुख्य कलाकार हजर होते.साथीला मिलींद कुलकर्णी ,माउली टाकळकर,प्रशांत पांडव  वगैरे मंडळी होती.सुखद अशा थंडीत राहूल सोलापूरकर यांनी उत्तम दर्जाच्या निवेदनाने सुरवात केली.त्या नंतर आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक सुरेख गाणी सादर केली.गाण्याच्या मध्ये पेटी,तबला, पखवाज आणि टाळ यांची कमालीची अदाकारी चालू होती. रसिकांना मायबाप समजणारे कलाकार आणि कलावंताना देवाचे दूत समजणारे रसिक यामुळे कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला मात्र अत्यंत तेजस्वी असे सूर्यनारायण आपल्या असंख्य सोनेरी किरणांना हळूवार पणे घेऊन आले आणि स्वरांच्या त्या सुखद अशा मैफिलीला दिव्य स्पर्श करुन मार्गस्थ झाले.
ज्या मैफिलीची सुरवात हि योगेश्वर अशा कृष्णा पासून होते,ज्या मैफिलीत बालगंधर्व ,राधा,मीरा वगैरे मंडळी हजेरी लावतात  आणि जिची समाप्ती विठ्ठल नामाने होते त्या मैफिली  बद्दल आपण फक्त कृतार्थतेचे हात जोडायचे.
  विनायक जोशी (vp)
29 October 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा