शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

अलौकिक " मित्र फाउंडेशन "

// श्री स्वामी समर्थ //
    " अलौकिक मित्र फाउंडेशन "
   पंडित भिमसेन जोशी यांच्या बरोबरीने साधारणपणे वीस वर्षे "सवाई गंधर्व महोत्सव" आयोजनात महत्त्वाचा सहभाग असणारे सुप्रसिद्ध डाॕ.गोखले आणि त्यांचे चिरंजीव डाॕ.धनंजय गोखले यांची संस्था म्हणजे "मित्र फाउंडेशन ".
दिनांक २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पंडित शिवकुमार शर्मा ,कैवल्यकुमार गुरव ,शुजात खान आणि कौशिकी चक्रवर्ती अशा दिग्गजांचा कार्यक्रम पंडित फार्म्स या ठिकाणी संध्याकाळी  ६ ते १० या वेळात होता. अत्यंत स्वच्छ आणि प्रशस्त बैठक व्यवस्था होती.उत्तम दर्जाची ध्वनी व्यवस्था होती. कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच साउंड सिस्टीम अॕरेंजर बरोबरीने कलाकारांचा सराव चालू होता.कार्यक्रमाची सुरुवात डाॕ.गोखले आणि पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांनी दीप प्रज्वलन करुन केली.या नंतर मात्र पंडित शिवकुमार शर्मा  यांनी अवर्णनीय अशा प्रकारे संतूरवादन केले.सलग सव्वा तास वादन केल्यानंतर दोन मिनीटांचा ब्रेक आणि त्या नंतर साथीदारांच्या बरोबरीने दुसऱ्या रागाच्या तयारीसाठी १० मिनीटे ट्युनिंग. हि १२ मिनीटे चाललेली तयारी पाच हजार रसिक कोणत्याही प्रकारची चुळबुळ न करता अनुभवत होते .ऐंशी वर्षांच्या या कलाकाराने आपल्या वादनाने आणि विनम्र भाषेने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. यांच्या नंतर  कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण वातावरण भारावून टाकले .अत्यंत बारीकसारीक गोष्टी अचूक पणे टिपून मनमोकळेपणाने दाद देणारा रसिक प्रेक्षक असल्यामुळे कलावंत मंडळी सुध्दा वेगवेगळ्या हरकती सादर करत होते.अर्थातच वेळेचे बंधन असल्यामुळे भैरवीने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.दुसऱ्या दिवशी शुजात खान यांचे सतार वादन आणि दोन तबल्यावरील साथीदारांना त्यांनी दिलेली स्पेस अत्यंत लक्षणीय होती .शुजात खान यांच्या अत्यंत वेगवान आणि एकदम हळूवार अशा प्रकारच्या वादनाने संपूर्ण सभागृहात निःशब्द अशी शांतता होती.या  कार्यक्रमाचा उत्तरार्ध " कौशिकी चक्रवर्ती " यांच्या गायनाने झाला.पंडित ह्दयनाथ मंगेशकरांच्या समोर पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करत असल्यामुळे कौशिकी यांनी सर्वोत्तम ते सादर केले . कार्यक्रमात  लोकांच्या आग्रहास्तव " सुंदर ते ध्यान " हे ह्दयनाथांनी संगीतबद्ध केलेले भजन त्यांच्याच परवानगीने सादर केले. या दोन दिवसात रघुनंदन पणशीकर किंवा विभावरी आपटे , राघवेंन्द्र जोशी वगैरे या क्षेत्रातील मंडळी सुध्दा रसिकांच्या रोल मध्ये दिसली.
पंडित फार्म येथील प्रशस्त पार्किंग व्यवस्था , स्वच्छ टाॕयलेटस् , उत्तम दर्जाची आसन व्यवस्था , अत्यंत उत्तम अशी ध्वनी व्यवस्था , या कार्यक्रमात उपस्थित दर्दी रसिक व अनपेक्षित पणे दर्शन झालेले पंडित ह्दयनाथ मंगेशकर आणि तंतूवाद्य किंवा व्होकल काॕर्डसचा वापर हुकूमीपणे वापरणारे विनम्र कलाकार यांच्या मुळे  कमालीचे समाधान मिळाले. पंडित शिवकुमार शर्मा किंवा शुजात खान यांच्या वादना नंतर या असामान्य कलावंतांचे आपण पुलंच्या "रावसाहेबांसारखे कौतुक" करु शकत नाही याची परत एकदा जाणीव झाली.
अत्यंत निरपेक्षपणे या ठिकाणी गेलो होतो आणि कमालीच्या समाधानाने व तृप्त होऊन परतलो.
विनायक जोशी (vp )
2 december 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा