// श्री स्वामी समर्थ //
"हेमंत खोले "
"तळजाई ते करवीर निवासिनी"
मेकॕनिकल इंजिनियरींगच्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे काम करणारे , दररोज तळजाईच्या पठारावर हजेरी लावणारे , सूर्यनमस्कारांची अनेक आवर्तने करणारे, गुरु चरित्राची पारायणे करणारे , खगोल शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राचा खोलवर अभ्यास करणारे , कोल्हापूरच्या महालक्ष्मीची निःसीम भक्ती करणारे "हेमंत खोले " यांनी पुणे ते कोल्हापूर एकट्याने पदयात्रा करण्याचा संकल्प केला.
आई भवानीचा आशिर्वाद ,घरच्यांचा पाठिंबा , कामात मिळालेली रजा यामुळे कोणताही गाजावाजा न करता प्रस्थान केले . अर्थातच सुरुवात सर्व कार्ये निर्विघ्न पणे पार पाडणाऱ्या "गणपतीला" पहिला नमस्कार करुन झाली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता टी शर्ट , बर्म्युडा , पाठीवर सॕक , मोबाईल वगैरे माफक सामान घेऊन नवीन कात्रज बोगद्या मधून मजल दरमजल करत संध्याकाळी शिरवळ हा पहिला टप्पा गाठला. रात्री पायांना कसेबसे तेल मालीश करुन ताणून दिली. दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्या दिशेने प्रवास चालू केला.रस्त्याने जाताना उजव्या बाजूने चालत असल्यामुळे फक्त समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवत खंबाटकीचा बोगदा पार करुन पारगाव खंडाळ्याच्या येथे विश्रांती घेतली . कोणत्याही वारीला निघालेल्या वारकऱ्या प्रमाणे नामस्मरण किंवा स्तोत्रे म्हणत वाटचाल चालू होती. रात्री साताऱ्यात मुक्काम केला. या वेळी पहिल्यांदा पायाला आलेले "पोके" किंवा फोडांचे दर्शन झाले. तिसऱ्या दिवशी अत्यंत निसर्ग संपन्न असा सातारा - कराड हा टप्पा पार केला. या ठिकाणी मुक्कामाला गेल्यावर लक्षात आले की पुढच्या प्रवासात पायात बुट घालणेच शक्य नव्हते , अशी पायांची अवस्था झाली होती.कऱ्हाड मध्ये नवीन सँडल घेतले आणि सोमवारी सकाळी कोल्हापूर कडे निघाले. सँडल नवीन असल्यामुळे त्यांचा उपद्रव सुरु झाला. सँडलला बुटांसारखी पकड नसल्यामुळे चालण्याचा वेगही मंदावला. या थोड्याशा निराशाजनक अवस्थेत असताना रस्त्यावर एक वेडसर माणूस भर दुपारच्या उन्हात अनवाणी चालताना दिसला आणि परमेश्वराने आपल्याला सहजपणाने दिलेल्या असंख्य गोष्टींची जाणीव झाली. रात्री नऊ वाजता कोल्हापूरच्या प्रवेशद्वारा पाशी ! या येथून महालक्ष्मी मंदिरा पर्यंचे साधारणपणे १० किलोमीटरचे अंतर मुंगीच्या पावलांनी पार केले . सोमवारी रात्री बरोबर १० वाजता महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. थकलेले शरीर आणि लागलेली प्रचंड भूक यांचा पूर्णपणे विसर पडला. कोणत्याही प्रकारची गर्दी नसल्यामुळे अत्यंत मनोभावे आणि शांतपणाने " श्री महालक्ष्मीचे " दर्शन घेता आले. याच आवारात असलेल्या "दत्त महाराजांनी" आपल्या या भक्ताला प्रसाद म्हणून "गोड शिरा " दिला. प्रचंड थकलेले शरीर , कमालीची लागलेली भूक आणि ही वारी पूर्ण करुन घेणाऱ्या महालक्ष्मीच्या आशिर्वादा मुळे लाभलेले समाधान अशा मिश्र भावनात्मक अवस्थेत प्रसाद म्हणून मिळालेला शिरा खाताना " अन्न हे पूर्णब्रह्म" या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. या रात्री कोल्हापूरात मुक्काम तावडेंच्या घरी केला . दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळीच मंदिरात हजेरी लावली . सर्व गोष्टी ठरविणाऱ्या , पार पाडणाऱ्या आणि शिवाय मनःपूर्वक "तथास्तु" अशा आशिर्वाद देणाऱ्या अशा कुलस्वामिनी चे म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन " हेमंत खोले " हे कृतार्तथेने परत कर्मभूमी कडे म्हणजेच पुण्याला नवीन उमेदीने आणि आनंदाने परत निघाले .......🙏🙏🙏
विनायक जोशी (vp)
26 February 2017
electronchikatha.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा