गुरुवार, २ एप्रिल, २०२०

Happy Thoughts ....आनंदी विचार

// श्री स्वामी समर्थ //
     *Happy Thoughts*

      *आनंदी विचार*

  *विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237

Happy Thoughts चे साधक किंवा "खोजी " श्री.नंदकिशोर यांच्या आग्रहामुळे एक दिवसाच्या शिबीराला उपस्थिती लावायची असे आम्ही दोघांनीही ठरविले.कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न करता किंवा पूर्वग्रह न बाळगता जे जे दिसेल ते मनमोकळे पणाने अनुभवायचे असे ठरवून गेलो.आमच्या हिंगण्यातील घरापासून साधारणपणे पाच किलोमीटर असलेल्या किरकीटवाडीच्या कमानीतून आत शिरलो.या ठिकाणी चावट पाटलांची आठवण आली. येथून पुढील पाच किलोमीटरचा प्रवास हा पूर्णपणे कच्च्या रस्त्यावरून डोंगरावर म्हणजेच नांदोशीच्या " मनन " आश्रमा पर्यंत झाला.रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी  साधक आश्रमाच्या मार्गाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय  उत्साहाने भर दुपारच्या उन्हात उभे होते. प्रवेशद्वारा पासून अनेक साधक सुहास्य वदनाने स्वागत करत होते.आमची प्राथमिक माहिती नोंदवून घेतल्यानंतर हाॕल मध्ये प्रवेश केला.चार हजार लोक ऐसपैस बसू शकतील अशी ती जागा होती.सर्वत्र शिस्त आणि विनम्रता यांचा उत्तम मिलाफ जाणवत होता. कार्यक्रमाची वेळ  दुपारी १ ते ४ होती. बरोबर एक वाजता अतिशय सोप्या पध्दतीने डोळे मिटून ध्यान धारणा करायला शिकवण्यात आले .या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट देवाचा ,धर्माचा ,पंथाचा प्रभाव नव्हता. फक्त आनंदाने  आनंदाची उपासना करायची होती.या नंतर Happy Thoughts चे संस्थापक *सरश्री* यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आली. बरोबर दोन वाजता "सरश्री " स्वतः स्टेजवर आले आणि पुढील दोन तास आनंदी विचार या विषयी असंख्य दाखले किंवा उदाहरणे देऊन विचार करायला प्रवृत्त केले.या दिवशीचा विषय हा " दिल और दिमाग का तालमेल" हा होता. त्यामुळे मेंदू पासून ते हृदयापर्यंतच्या त्रिकोणाला कशा सुचना द्यायला पाहिजेत याचा उत्तम असा आविष्कार अनुभवता आला. अर्थातच आनंदाने राहण्यासाठी  ब्रेन प्रोग्रामिंग मध्ये मेंदूच्या  बरोबरीने हृदयाचा किंवा भावनांचा सहभाग कसा असावा किंवा त्याच्या मुळे होणाऱ्या सकारात्मक गोष्टी मजेशीर उदाहरणे देऊन त्यांनी  सांगितल्या .असंख्य रोगांचे मूळ असलेल्या नकारात्मक विचारांची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल मार्गदर्शन केले. सलग दोन तास पाणी सुध्दा न पिता अत्यंत आत्मविश्वासाने आणि ओघवत्या भाषेत एका वेगळ्या जगाची ओळख "सरश्रीं" यांनी करुन दिली.अतिशय उत्तम दर्जाचे असे शरीररुपी हार्डवेअर आमच्याकडे आहेच , त्या मध्ये काळानुरुप योग्य असा प्रोग्राम  लिहायचा किंवा असंख्य आनंदी विचारांचे अपडेट करायला पाहिजे हा विचार करत करत नांदोशीच्या डोंगरावरुन म्हणजेच  मनन आश्रमातून हिंगण्याच्या आमच्या घराकडे म्हणजेच मंगलधाम या आमच्या आनंदाश्रमा कडे समाधानाने परत आलो !

*विनायक आणि कल्याणी जोशी ( vp )*
 💬9423005702
  📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा