रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

"वारी कोल्हापूरची" हेमंत खोले

// श्री स्वामी समर्थ //
      "हेमंत खोले "
"तळजाई ते करवीर निवासिनी"

मेकॕनिकल इंजिनियरींगच्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे काम करणारे , दररोज तळजाईच्या पठारावर हजेरी लावणारे , सूर्यनमस्कारांची अनेक आवर्तने करणारे, गुरु चरित्राची पारायणे करणारे , खगोल शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राचा खोलवर अभ्यास करणारे , कोल्हापूरच्या महालक्ष्मीची निःसीम भक्ती करणारे "हेमंत खोले " यांनी पुणे ते कोल्हापूर एकट्याने पदयात्रा करण्याचा संकल्प केला.
आई भवानीचा आशिर्वाद ,घरच्यांचा पाठिंबा , कामात मिळालेली रजा यामुळे कोणताही गाजावाजा न करता प्रस्थान केले . अर्थातच सुरुवात सर्व कार्ये निर्विघ्न पणे पार पाडणाऱ्या "गणपतीला" पहिला नमस्कार करुन झाली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता टी शर्ट , बर्म्युडा , पाठीवर सॕक , मोबाईल वगैरे माफक सामान घेऊन नवीन कात्रज बोगद्या मधून मजल दरमजल करत संध्याकाळी  शिरवळ हा पहिला टप्पा  गाठला. रात्री पायांना कसेबसे तेल मालीश करुन ताणून दिली. दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्या दिशेने प्रवास चालू केला.रस्त्याने जाताना उजव्या बाजूने चालत असल्यामुळे फक्त समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवत खंबाटकीचा बोगदा पार करुन पारगाव खंडाळ्याच्या येथे विश्रांती घेतली . कोणत्याही वारीला निघालेल्या वारकऱ्या प्रमाणे नामस्मरण किंवा स्तोत्रे म्हणत वाटचाल चालू होती. रात्री साताऱ्यात मुक्काम केला.  या वेळी पहिल्यांदा पायाला आलेले "पोके" किंवा फोडांचे दर्शन झाले. तिसऱ्या दिवशी अत्यंत निसर्ग संपन्न असा सातारा - कराड हा टप्पा  पार केला. या ठिकाणी मुक्कामाला गेल्यावर लक्षात आले की पुढच्या प्रवासात पायात  बुट घालणेच शक्य नव्हते , अशी पायांची अवस्था झाली होती.कऱ्हाड मध्ये नवीन सँडल घेतले आणि सोमवारी सकाळी कोल्हापूर कडे निघाले. सँडल नवीन  असल्यामुळे त्यांचा उपद्रव सुरु झाला. सँडलला बुटांसारखी पकड नसल्यामुळे चालण्याचा वेगही मंदावला. या थोड्याशा निराशाजनक अवस्थेत असताना रस्त्यावर एक वेडसर माणूस भर दुपारच्या उन्हात अनवाणी चालताना दिसला आणि परमेश्वराने आपल्याला सहजपणाने दिलेल्या असंख्य गोष्टींची जाणीव झाली. रात्री नऊ वाजता कोल्हापूरच्या प्रवेशद्वारा पाशी ! या येथून महालक्ष्मी मंदिरा पर्यंचे साधारणपणे १० किलोमीटरचे अंतर मुंगीच्या पावलांनी पार केले . सोमवारी रात्री बरोबर १० वाजता महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. थकलेले शरीर आणि लागलेली प्रचंड भूक यांचा पूर्णपणे विसर पडला. कोणत्याही प्रकारची गर्दी नसल्यामुळे अत्यंत मनोभावे आणि शांतपणाने " श्री महालक्ष्मीचे " दर्शन घेता आले. याच आवारात असलेल्या  "दत्त महाराजांनी" आपल्या या भक्ताला प्रसाद म्हणून "गोड शिरा " दिला. प्रचंड थकलेले शरीर , कमालीची लागलेली भूक आणि ही वारी पूर्ण करुन घेणाऱ्या महालक्ष्मीच्या आशिर्वादा मुळे लाभलेले समाधान अशा मिश्र भावनात्मक अवस्थेत प्रसाद म्हणून मिळालेला शिरा खाताना " अन्न हे पूर्णब्रह्म" या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. या रात्री कोल्हापूरात मुक्काम तावडेंच्या घरी केला . दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळीच मंदिरात हजेरी लावली . सर्व गोष्टी ठरविणाऱ्या , पार पाडणाऱ्या आणि शिवाय मनःपूर्वक "तथास्तु" अशा आशिर्वाद देणाऱ्या अशा कुलस्वामिनी चे म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन " हेमंत खोले " हे कृतार्तथेने परत कर्मभूमी कडे म्हणजेच पुण्याला नवीन उमेदीने आणि आनंदाने परत निघाले  .......🙏🙏🙏
विनायक जोशी (vp)
26 February 2017
electronchikatha.blogspot.com

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

यशाच्या दिशेने चालणारे " मैत्र "

// श्री स्वामी समर्थ //
        " मैत्र "
या  वर्षीच्या बारावीच्या परीक्षा थोड्याच दिवसांनी सुरु होणार आहेत.या निमित्ताने अठरा वर्षापूर्वी बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन मित्रांची आठवण आली.या दोघांच्या मधे साधारणपणे २६ वर्षांचे अंतर होते.दहावी पर्यंतचे शिक्षण काॕन्व्हेंट मधे घेतलेला मुलगा आणि त्याला सर्व बाबतीत मदत करायला तयार असणारा मित्र यांनी मुलाच्या बारावीची तयारी चालू केली.केमिस्ट्री या विषयासाठी उत्तम क्लास मिळाला होता.बाकीचे विषय मात्र काॕलेज,क्लास  आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून होते.दररोज चा अभ्यास दररोज अत्यंत एकाग्रता पूर्वक करायचा आणि त्या नंतर खेळायचे हे रुटीन परीक्षेच्या दिवसा पर्यंत चालू होते. रात्री अभ्यासासाठी जागणे किंवा भल्या पहाटे उठणे हे दोघांनाही आवडत नसे. या मुलाचा अभ्यास चालू असताना त्याचा मित्र त्या खोलीत पेपर वाचन किंवा त्याचे आॕफिसचे काम करत बसलेला असे. शेवटचे दोन महिने मात्र या मुलाने सोडवलेले पेपर दुसऱ्या गावातील किंवा काॕलेज मधील प्रोफेसर मंडळींना दाखवून त्यांची मते जाणून घेणे वगैरे कामे हा मित्र कामावरती सुट्टी घेऊन करत असे. घड्याळ लावून वेळेच्या आत पेपर सोडवून व्हावा या साठी दोघे मिळून चर्चा करत असत.पेपर चांगले गेले तर सांगलीच्या वालचंद काॕलेज मधे मेकॕनिकल साईड ला ॲडमिशन घ्यायची हे ठरलेले होते.परीक्षेच्या काळात मात्र एकदम रिलॕक्स शेड्यूल होते.पेपर सोडवून आल्यावर चूक काय झाली यावर फक्त दोन चार मिनीटे चर्चा .त्यानंतर अर्धा तास मित्रांच्या बरोबर गप्पा आणि त्या नंतर दोन तास दुसऱ्या दिवसाचा अभ्यास.या काळात मित्राने मात्र कामावरती सुट्टी घेतली होती.परीक्षेच्या काळात मुलाच्या आईला काळजी पासून दूर ठेवायचे काम सुध्दा हा मित्र उत्तम प्रकारे पार पाडत होता. परीक्षा झाल्यानंतर मात्र हा मुलगा दोन महीने आजोळी आजी आजोबांकडे सोलापूरला गेला. साधारणपणे जूलै महिन्यात रिझल्ट होता.रिझल्टच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वाजता बातमी आली त्या प्रमाणे हा मुलगा बोर्डात आलेला होता. संध्याकाळ पर्यंत वेगवेगळे वर्तमानपत्र वाले ,मित्राच्या आॕफिस मधील मंडळी  , शेजारील माणसे, नातेवाईक,मुलाचे असंख्य मित्र वगैरे प्रचंड वर्दळ चालू झाली. दुसऱ्या दिवशी काॕलेज मधे बोर्डात आलेल्या सर्व मुलांचे वेगवेगळ्या मंडळींच्या बरोबर फोटो सेशन झाले.मार्कशीट वरील मार्क बघितल्या वर त्याच्या मामाने कळवले त्या प्रमाणे  त्या वेळचे पुण्यातील काॕम्प्युटरचे उत्तम काॕलेज 'PICT'येथे अॕडमिशन घ्यायचे ठरले. अगदी लहानपणापासून प्रत्येक बारीकसारीक शंकांचे निरसन करणारा ,  क्रिकेट पासून ते WWF पर्यंत सर्व खेळ मुलांच्या बरोबर  खेळणारा ,काॕमन सेन्सचा असामान्य वापर करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असलेल्या  मित्राचे नाव 'सुरेश सोवनी' आहे आणि बारावीला बोर्डात आलेला त्यांचा मित्र आणि मुलगा 'केदार सोवनी 'यांची ही छोटी गोष्ट आहे. एकमेकांशी मित्रा सारखे राहून सहजपणे यश मिळवणाऱ्या एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची हि साधी सरळ गोष्ट !
विनायक जोशी (vp )
22 February 2016
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

"गण गण गणात बोते"

// श्री स्वामी समर्थ //
      " जय गजानन "
  " गण गण गणात बोते "
कोणत्याही कामाची सुरवात "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राने केली कि अत्यंत अवघड वाटणारे काम सुद्धा  निर्विघ्न पणे पार पडते याचा अनुभव माझ्या आईच्या मुळे मी असंख्य वेळेला घेतला आहे. सलग २६ वर्षे सोलापूर मध्ये आमच्या घरात
'पाडवा ते राम नवमी' असे दहा दिवस चालणारा राम नवमीचा उत्सव हा त्यांच्याच कृपेने व्यवस्थित पार पडत असे.या काळात खुपशा अनोळखी मंडळींचा घरभर वावर असे.ह्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साधारणपणे दोन महिने आधीपासून आई करत असे.अत्यंत अनपेक्षित पणे कोणीतरी सांगितले म्हणून यावे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील  पाहिजे असलेली नामवंत मंडळी अचानक येत असत.
" जय गजानन" या नामा बद्दल थोडाफार जरी अनुभव घ्यायचा असेल तर दासगणू रचित 'गजानन विजय' या पोथीचे वाचन अत्यंत श्रद्धेने करणे .
२००६ साली आई सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यत अंथरूणावर खिळली होती.साधारणपणे जानेवारी मध्ये
" रामनवमी" या उत्सवा बद्दल घरात चर्चा चालू झाली.थोड्याच दिवसात गजानन महाराजांच्या कृपेने आणि योग्य ते औषधोपचार घेतल्याने ती खडखडीत बरी होऊन सोलापूरला उत्सवाला जाण्यासाठी तयार झाली. अर्थातच "अपर्णा रामतिर्थकर "वगैरे मंडळींनी स्वतः होऊन भेटून  उत्तम अशी प्रवचने त्या वर्षी  सादर केली.
आज गजानन महाराज प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांचे श्रद्धा
पूर्वक स्मरण करून अतिशय आनंदाने आणि समाधान पूर्वक आपले काम करत रहायचे!
विनायक जोशी (vp )
18 February 2017
electronchikatha.blogspot.com

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

"कर्मयोगी " प्रभाकर फाटक

// श्री स्वामी समर्थ //
      " कर्मयोगी "
    " श्री. प्रभाकर फाटक "
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेले आणि कृष्णा व पंचगंगेच्या संगमामुळे पावन झालेले गाव म्हणजे कुरुंदवाड.या गावात दर्ग्या मध्ये शिवजयंतीला शिवचरित्रा  वरती किर्तन ठेवणारा किंवा पेशंटला औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत म्हणून नदीच्या पुरातून पोहून पलीकडे जाणारा असा एक धैर्यवान माणूस रहात होता.या अत्यंत दिलदार माणसाचा पंचक्रोशी मध्ये " राजा फाटक " म्हणून दबदबा होता.
या राजा फाटकांचा मोठा मुलगा  म्हणजे प्रभाकर फाटक.
१९४८ च्या जळीतात सर्वस्व गमावल्या नंतर हताश किंवा निराश न होता फिनीक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी अविरत आणि कल्पक कष्टाने व्यवसायाची वृध्दी केली.गेली पन्नास वर्षे सकाळच्या वेळी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंहवाडीच्या नदीत पोहणे आणि त्यानंतर दत्त महाराजांना मनोभावे नमस्कार करुन दुकाने उघडणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.या सकाळच्या कार्यक्रमात शरद उपाध्यें पासून आमिरखान पर्यंत  असंख्य लोकांशी त्यांची मुलाखत झाली आहे.कायम सकारात्मक विचार करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आहे. ट्रॕव्हल कंपनीच्या बसमधून चारधाम यात्रा असो किंवा नेपाळ अथवा वैष्णोदेवी वगैरे प्रवास कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता "एकदम बेस्ट "असे म्हणत त्यांनी पार पाडला आहे. लहान दोन भाऊ आणि चार बहिणींना कायम मोठ्या भावाला साजेसा आधार दिला आहे.अतिशय समाधानी आणि हुशार अशा सहचारिणी मुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अनेक अवघड संकल्प सिध्दीस नेलेले आहेत . आज सहस्त्रचंद्र दर्शनासाठी म्हणजेच ऐक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी हा मनाने तरुण असलेला कर्मयोगी आनंदाने तयार आहे.देश विदेशात सुध्दा असंख्य लोकांशी जनसंपर्क असलेला , नातवंडात रमणारा , आजही दिवसातले किमान नऊ तास काम करणारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ फार्मासीस्ट अशी ख्याती असलेला, स्वतः विषयी  फारच कमी बोलणाऱ्या या कर्मयोग्याच्या शतायुषा कडील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
विनायक जोशी (vp )
16 February 2017
electronchikatha.blogspot.com

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

" Class One " सीमा भावे

// श्री स्वामी समर्थ //
   " Class One "
  ' सीमा मिलिंद भावे '
पुण्यातील सदाशिव पेठेत बालपण. हुजूरपागे सारख्या सुंदर शाळेत शिक्षण आणि SP सारख्या नितांत सुंदर काॕलेज मधून फिजीक्सची पदवी  घेतली . काॕलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर एकाच दिवशी काॕसमाॕस बँक आणि सरकारी संशोधन विभागात नोकरी निमीत्त बोलावणे आले. अर्थातच संशोधन विभागात रुजू. याच कालखंडात सहकारनगर येथील पद्मदर्शन या काॕलनीतील बंगल्यात प्रस्थान.सोलापूरच्या मिलींद भावे या रसिक आणि समजूतदार मुलाशी विवाह.नोकरीच्या निमीत्ताने गेली २६ वर्षे न कंटाळता स्वतःच्या वाहनाने दररोज १६ किलोमीटर जाणे आणि तेवढेच येणे हा दिनक्रम चालू आहे. संगीत क्षेत्रात विशेष रुची असल्यामुळे गाण्याचा मनापासून रियाज करून ती विशारद झाली आहे.कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे आणि दर्जा बद्दल तडजोड न करणे हा तिचा स्थायीभाव आहे. मागच्याच आठवड्यात तिला संशोधन खात्यात लागणाऱ्या असंख्य आर्थिक गोष्टींचे अचूक प्लॕनिंग करणे आणि त्या साठी लागणारी आर्थिक बांधणी योग्य प्रमाणात केल्याबद्दल "DRDO " कडून  शाबासकी मिळाली आहे.
सीमा भावे ही गेली कित्येक वर्षे क्लास वन आॕफीसर म्हणून कार्यरत आहे . स्वावलंबी आणि ध्येयनिष्ठ असे क्लास वन आई-वडील , घरगुती किंवा बाहेरील कोणतीही कामे आनंदाने आणि जबाबदारीने करणारा क्लास वन असा मित्र - नवरा तिच्या बरोबरीने आहे , MD करणारा वेदांग आणि  त्याच्याच पावलावर पाऊल  टाकून यश मिळवत असलेली वरदा ही दोन्ही मुले आपापल्या शैक्षणिक क्षेत्रात क्लासवन असा परफाॕर्मन्स देत आहे , त्यामुळे नोकरीत किंवा घर संसारात समाधान सुध्दा उत्तम दर्जाचे म्हणजेच एकदम "क्लासवन" आहे !!
विनायक जोशी ( vp )
12/02/2017
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

"Happy Thoughts'

// श्री स्वामी समर्थ //
" Happy Thoughts "
Happy Thoughts चे साधक किंवा "खोजी " श्री.नंदकिशोर यांच्या आग्रहामुळे एक दिवसाच्या शिबीराला उपस्थिती लावायची असे आम्ही दोघांनाही ठरविले.कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न करता जे जे दिसेल ते मनमोकळे पणाने अनुभवायचे असे ठरवून गेलो.आमच्या हिंगण्यातील घरापासून साधारणपणे पाच किलोमीटर असलेल्या किरकीटवाडीच्या कमानीतून आत शिरलो.या ठिकाणी चावट पाटलांची आठवण आली. येथून पुढील पाच किलोमीटरचा प्रवास हा पूर्णपणे कच्च्या रस्त्यावरून डोंगरावर म्हणजेच नांदोशीच्या " मनन " आश्रमा पर्यंत झाला.रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी  साधक आश्रमाच्या मार्गाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आत्यंतिक उत्साहाने भर दुपारच्या उन्हात उभे होते. प्रवेशद्वारा पासून अनेक साधक सुहास्य वदनाने स्वागत करत होते.आमची प्राथमिक माहिती नोंदवून घेतल्यानंतर हाॕल मध्ये प्रवेश केला.चार हजार लोक ऐसपैस बसू शकतील अशी ती जागा होती.सर्वत्र शिस्त आणि विनम्रता यांचा उत्तम मिलाफ जाणवत होता. कार्यक्रमाची वेळ  दुपारी १ ते ४ होती. बरोबर एक वाजता अतिशय सोप्या पध्दतीने डोळे मिटून ध्यान धारणा करायला शिकवण्यात आले .या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट देवाचा ,धर्माचा ,पंथाचा प्रभाव नव्हता. फक्त आनंदाची उपासना करायची होती.या नंतर Happy Thoughts चे संस्थापक " सरश्री "यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आली. बरोबर दोन वाजता "सरश्री " स्वतः स्टेजवर आले आणि पुढील दोन तास आनंदी विचार या विषयी असंख्य दाखले किंवा उदाहरणे देऊन विचार करायला प्रवृत्त केले.या दिवशीचा विषय हा " दिल और दिमाग का तालमेल" हा होता. त्यामुळे मेंदू पासून ते हृदयापर्यंतच्या त्रिकोणाला कशा सुचना द्यायला पाहिजेत याचा उत्तम असा आविष्कार घडवला. अर्थातच आनंदाने राहण्यासाठी  ब्रेन प्रोग्रामिंग मध्ये मेंदू बरोबरीने हृदयाचा किंवा भावनांचा सहभाग कसा असावा किंवा त्याच्या मुळे होणाऱ्या सकारात्मक गोष्टी मजेशीर उदाहरणे देऊन त्यांनी  सांगितल्या .असंख्य रोगांचे मूळ असलेल्या नकारात्मक विचारांची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल मार्गदर्शन केले. सलग दोन तास पाणी सुध्दा न पिता अत्यंत आत्मविश्वासाने आणि ओघवत्या भाषेत एका वेगळ्या जगाची ओळख "सरश्रीं" यांनी करुन दिली.अतिशय उत्तम दर्जाचे असे शरीररुपी हार्डवेअर आमच्याकडे आहेच , त्या मध्ये काळानुरुप योग्य असा प्रोग्राम लिहायचा किंवा असंख्य आनंदी विचारांचे अपडेट करायला पाहिजे हा विचार करत करत नांदोशीच्या डोंगरावरुन म्हणजेच  मनन आश्रमातून हिंगण्याच्या आमच्या घराकडे म्हणजेच आनंदाश्रमा कडे समाधानाने परतलो !
विनायक जोशी ( vp )
29 january 2017
electronchikatha.blogspot.com

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

"गाडी बुला रही है"

// श्री स्वामी समर्थ //
" गाडी बुला रही है "
पुणे रेल्वे स्टेशनवर अतिशय गर्दीच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता अगदी शेवटच्या प्लॕटफाॕर्म वरती हजारो लोकांच्या साक्षीने सोलापूरला जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस मध्ये  बसलो. शंभर रुपयात आणि ४ तासात अडीचशे किलोमीटर पार करुन माहेरी पोचणार होतो. इंजिन ड्रायव्हरने अत्यंत परिचीत असा दमदार हाॕर्न वाजवून निघण्याचा इशारा केला आणि त्याला गार्डने शिट्टी वाजवून प्रत्युत्तर दिले.पहिला टप्पा दौंड या दक्षिणोत्तर जोडणाऱ्या मोठ्या जंक्शन वरती .रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बरेचसे प्रवासी येथून खाणे आणि पिण्याची सोय करुन घेतात.दौंड पार केल्यानंतर थोड्याच वेळात प्रत्येक डब्यातील लोखंडी खिडक्या लावून घेण्याचा कार्यक्रम झाला.या ठिकाणी ठराविक गावांपाशी चेन पुलींग करुन गाडी थांबवून प्रवाशांना लुटणे वगैरे प्रकार नित्यनेमाने घडतात.गाडीच्या आत मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते ,हिजडे,भिकारी आणि तिकीट चेक करणारे वगैरे मंडळी  प्रवाश्यांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये याची काळजी घेत होते.बाळे या स्टेशनला थोडा वेळ सायडींगला थांबून गाडीने  वेळेवर सोलापूर येथे प्रवेश केला. अतिशय अरुंद अशा पुलावरुन एक नंबर प्लॕटफाॕर्म वरती आलो.या ठिकाणी मात्र प्रत्येक विभागात काम करणाऱ्या मंडळींची म्हणजेच कावळे बंधू , दुलंगे,अजित ,दिलीप ,बापू यांची आठवण आली .याच प्लॕटफाॕर्म वरती BVG ग्रुपचे स्वच्छता कर्मचारी तत्परतेने काम करताना दिसले आणि या ग्रुपचे डायरेक्टर "गणेश (आनंद)लिमये या नावाप्रमाणेच अत्यंत आनंदी असलेल्या व्यक्तिमत्वाची आठवण आली.  रेल्वे प्लॕटफाॕर्म वरती , गाडीत किंवा स्टेशनच्या आवारात सुध्दा प्रचंड गर्दी होती.रेल्वे स्टेशन पासून पुढे DRM आॕफिसला मागे टाकून शांततेच्या नगरात म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला.परतीचा प्रवास मात्र कमीतकमी गर्दी असलेल्या ST बसने सोलापूर -पुणे या सुरेख रस्त्यावरून करायचा हे मनाशी नक्की केले. एक दोन दिवसात सोलापूर मधील सर्व कामे संपवून निघायची तयारी केली. घराला तीन चार कुलपे लावून बाहेर पडलो.शिवाजी रंगभुवनच्या चढावरती असलेल्या फर्स्ट चर्च मधून अत्यंत धीरगंभीर असा घंटानाद ऐकू येत होता आणि साधारणपणे दोन किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या स्टेशनवरुन इंजिनच्या हाॕर्नचा आवाज. चर्च मधील घंटा आणि रेल्वे इंजिनच्या शिट्या ऐकून  १९७२ सालच्या "दोस्त" या सिनेमाची आणि त्यातील फादरच्या आठवणीने व्याकुळ अशा "धर्मेंन्द्रची" आणि अर्थातच किशोरकुमारच्या अत्यंत लोकप्रिय अशा जुन्या गाण्याची मनातल्या मनात आंदोलने चालू झाली.
"गाडी बुला रही है 
सीटी बजा रही है
चलना ही जिंदगी है
चलती ही जा रही है "
       या गाण्याची धून गुणगुणत रेल्वे  स्टेशन कडेच आपोआप पावले वळली !!!
विनायक जोशी (vp)
4 February 2017
electronchikatha.blogspot.com