शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

"गाडी बुला रही है"

// श्री स्वामी समर्थ //
" गाडी बुला रही है "
पुणे रेल्वे स्टेशनवर अतिशय गर्दीच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता अगदी शेवटच्या प्लॕटफाॕर्म वरती हजारो लोकांच्या साक्षीने सोलापूरला जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस मध्ये  बसलो. शंभर रुपयात आणि ४ तासात अडीचशे किलोमीटर पार करुन माहेरी पोचणार होतो. इंजिन ड्रायव्हरने अत्यंत परिचीत असा दमदार हाॕर्न वाजवून निघण्याचा इशारा केला आणि त्याला गार्डने शिट्टी वाजवून प्रत्युत्तर दिले.पहिला टप्पा दौंड या दक्षिणोत्तर जोडणाऱ्या मोठ्या जंक्शन वरती .रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बरेचसे प्रवासी येथून खाणे आणि पिण्याची सोय करुन घेतात.दौंड पार केल्यानंतर थोड्याच वेळात प्रत्येक डब्यातील लोखंडी खिडक्या लावून घेण्याचा कार्यक्रम झाला.या ठिकाणी ठराविक गावांपाशी चेन पुलींग करुन गाडी थांबवून प्रवाशांना लुटणे वगैरे प्रकार नित्यनेमाने घडतात.गाडीच्या आत मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते ,हिजडे,भिकारी आणि तिकीट चेक करणारे वगैरे मंडळी  प्रवाश्यांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये याची काळजी घेत होते.बाळे या स्टेशनला थोडा वेळ सायडींगला थांबून गाडीने  वेळेवर सोलापूर येथे प्रवेश केला. अतिशय अरुंद अशा पुलावरुन एक नंबर प्लॕटफाॕर्म वरती आलो.या ठिकाणी मात्र प्रत्येक विभागात काम करणाऱ्या मंडळींची म्हणजेच कावळे बंधू , दुलंगे,अजित ,दिलीप ,बापू यांची आठवण आली .याच प्लॕटफाॕर्म वरती BVG ग्रुपचे स्वच्छता कर्मचारी तत्परतेने काम करताना दिसले आणि या ग्रुपचे डायरेक्टर "गणेश (आनंद)लिमये या नावाप्रमाणेच अत्यंत आनंदी असलेल्या व्यक्तिमत्वाची आठवण आली.  रेल्वे प्लॕटफाॕर्म वरती , गाडीत किंवा स्टेशनच्या आवारात सुध्दा प्रचंड गर्दी होती.रेल्वे स्टेशन पासून पुढे DRM आॕफिसला मागे टाकून शांततेच्या नगरात म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला.परतीचा प्रवास मात्र कमीतकमी गर्दी असलेल्या ST बसने सोलापूर -पुणे या सुरेख रस्त्यावरून करायचा हे मनाशी नक्की केले. एक दोन दिवसात सोलापूर मधील सर्व कामे संपवून निघायची तयारी केली. घराला तीन चार कुलपे लावून बाहेर पडलो.शिवाजी रंगभुवनच्या चढावरती असलेल्या फर्स्ट चर्च मधून अत्यंत धीरगंभीर असा घंटानाद ऐकू येत होता आणि साधारणपणे दोन किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या स्टेशनवरुन इंजिनच्या हाॕर्नचा आवाज. चर्च मधील घंटा आणि रेल्वे इंजिनच्या शिट्या ऐकून  १९७२ सालच्या "दोस्त" या सिनेमाची आणि त्यातील फादरच्या आठवणीने व्याकुळ अशा "धर्मेंन्द्रची" आणि अर्थातच किशोरकुमारच्या अत्यंत लोकप्रिय अशा जुन्या गाण्याची मनातल्या मनात आंदोलने चालू झाली.
"गाडी बुला रही है 
सीटी बजा रही है
चलना ही जिंदगी है
चलती ही जा रही है "
       या गाण्याची धून गुणगुणत रेल्वे  स्टेशन कडेच आपोआप पावले वळली !!!
विनायक जोशी (vp)
4 February 2017
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा