सोमवार, २० जून, २०१६

मिंग्लिश ( मि आणि इंग्लिश )

// श्री स्वामी समर्थ  //
     " मिंग्लीश "
     " माझे - इंग्लिश "
शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय शिकण्याची सुरुवात पाचवी मध्ये झाली. माझी आई त्या काळातील मॕट्रीक झालेली होती आणि वडील बीए .दोघांचेही इंग्रजीचे ज्ञान उत्तम होते.घरामध्ये "रेन आणि मार्टीन"चे ग्रामरचे पुस्तक होते.त्यांच्या सोबतीला तर्खडकरांची तीन भागातील व्याकरण माला . आम्हाला शाळेमध्ये इयत्ता आठवी पासून सेमी इंग्लिश होते.या सर्व गोष्टी सहजतेने झाल्या . अकरावी आणि बारावीला मात्र भाषेकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ नसताना" हायर इंग्लिश "नावाचा अवघड प्रकार वाट्याला आला. याच कालखंडात आपल्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ५० ते ६० इंग्रजी सिनेमे बघितले. त्या नंतर मात्र "नायक्रोम" नावाच्या विद्यापीठात नोकरी लागल्यावर  इंग्रजी भाषेचा वापर नगण्य झाला. या ठिकाणी जपानी  आणि जर्मन तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव होता कि इंग्लिशचा पूर्ण विसर पडला. फर्ग्युसन काॕलेज रोड वरती असलेल्या ब्रिटिश लायब्ररीत जाणे सुध्दा संपुष्टात आले. नोकरीची हि वीस वर्षे मी अत्यंत खोल अशी वैचारिक बैठक असलेल्या आणि अत्यंत हुशार अशा मराठी मंडळींच्या मध्ये  घालवली. या वीस वर्षात मी  "डियर सर , थॕक्स ,  साॕरी ,रीगार्डस "वगैरे प्रकारच्या औपचारिक पणापासून आणि या प्रकारच्या मंडळींच्या पासून शेकडो योजने लांब होतो . या कालखंडात बऱ्याच "बाप" मंडळींच्या बरोबरीने काम करता आले. कोणत्याही संकल्पना समजून घेताना मराठी या मातृभाषेमुळे सोपे गेले ,  परंतु त्या मुळेच  " इंग्लिश " नावाच्या या विदेशी मावशी पासून म्हणजेच इंग्लिश पासून मात्र दूर राहीलो ....!  आमच्या क्लास मध्ये कल्याणी मुलांना  " डॕफोडील्स " ही कविता उत्तम पणे शिकवतेच आणि त्या नंतर मात्र लगेचच अभ्यासक्रमात नसलेली परंतू आपलीशी वाटणारी " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...!एका पाठोपाठ येणाऱ्या आनंदाच्या या "सरी वर सरी "मुलांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि सपक गोऱ्या अशा विदेशी मावशीच्या मागे उभी असलेली अत्यंत तेजस्वी अशी
" माय " मराठी दिसू लागते !!!
विनायक जोशी ( vp )
२०/०६/२०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा