मंगळवार, २८ जून, २०१६

रेडिओ

// श्री स्वामी समर्थ  //
     " रेडिओ "
एका छानशा आयताकृती लाकडी बाॕक्स वरती पुढील बाजूला दोन मोठ्या आकाराची गोलाकार फिरणारी दणकट बटणे.एका बटणाने स्टेशनचा काटा फिरवायचा आणि दुसऱ्याने आवाज कमी जास्त करता येत असे. स्टेशनचा काटा  कोणत्या स्टेशन वरती आहे ते कळावे म्हणून आतून एक बल्ब लावलेला असे.या रेडिओचा आवाज अत्यंत सुस्पष्ट आणि दणदणीत असायचा.रेडिओ मेकॕनिक ने कधीतरी हा रेडीओ आपल्या  समोर दुरूस्ती साठी उघडला तर मागच्या बाजूने या रेडियो मधील प्रकाशमान असलेली वेगवेगळ्या आकाराची व्हाॕल्व नावाची "प्रकाशीत झुंबरे " बघायचा योग यायचा.रेडिओ वरती सकाळी प्रभात वंदन ऐकणे आणि मॕच असेल तेंव्हा क्रिकेटची काॕमेंट्री ऐकणे आणि नंतर त्यावर चर्चा हा आयुष्यातील अविभाज्य भाग होता. गीत रामायण वगैरे कार्यक्रम आकाशवाणी वरुन प्रसारीत व्हायचे त्या काळात या रेडिओची भक्ती भावाने पूजा व्हायची आणि त्या नंतरच सुधीर फडकेंच्या सुस्पष्ट आणि मधुर आवाजातील गीत रामायण ऐकायला मिळायचे.दुपारी दीड आणि संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता प्रचंड होती. १९७० च्या दशकात सेमी कंडक्टर च्या रुपातील  छोट्याशा ट्राँझीस्टरने प्रवेश केला आणि या आपल्या मोकळ्या ढाकळ्या रेडिओची कुचंबणा चालू झाली. बॕटरी वरती वापरता येणारे ,कोठेही घेऊन फिरता येणारे असे ट्राँझीस्टर  बाजारात आले आणि या आटोपशीर रेडिओंची संख्या सुध्दा खूप वाढली. घरातील प्रत्येक वयोगटातील मेंबर्स आपल्याला आवडेल तो कार्यक्रम लहान आवाज ठेवून ऐकू लागले.याच काळात रेडिओ सिलोन वरुन "अमिन सयानींचा "हुकमी आवाज आणि "बिनाका "ही गीतमाला तरुण मंडळींच्या मधे अतिशय लोकप्रिय झाली. काळानुरुप रेडिओचा आकार छोटा होत गेला.एफ् एम स्टेशन किंवा रेडिओ जाॕकी वगैरे प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी अनपेक्षित अशी  एकामागून एक सुरेल गाणी ऐकवण्याची शक्ती फक्त आणि फक्त रेडिओ मध्येच आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 june 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा