शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

Way To Heaven " सुंदर सोलापूर "

// श्री स्वामी समर्थ //
       "सुंदर सोलापूर"
अतिशय कमी सामान आणि कमालीच्या असंख्य सुंदर आठवणींचे गाठोडे घेऊन माहेरी म्हणजेच सोलापूरला जायला निघालो.लाल गाडीतून प्रवास असल्यामुळे प्रवास उत्तम होणार याची खात्री होती.गाडीच्या खिडक्यांचे आवाज , इंजिनचा आवाज ,पाट्याचे आवाज ,आपत्कालीन स्थितीत बाहेर पडायला उपयोगी अशा दरवाज्याचा आवाज ,समोरील बाजूस गावाचे नाव लिहलेले असते त्या बोर्डाच्या पत्र्याचा आवाज अशा वेगवेगळ्या नादस्वरांचा आनंद घेत प्रवास  सुरु झाला.
कॕम्प मध्ये मेन आणि ईस्ट स्ट्रीटला झोकदार हुलकावणी देऊन पुलगेट कडे दुर्लक्ष करुन गाडी निघाली. थोड्याच वेळात सकाळच्या सत्रात सराव करणारे घोडे रेसकोर्स वरती दिसू लागले.या नंतर वानवडी,फातिमा नगर वगैरे करत आणि किर्लोस्करांच्या कारखान्याचे किंवा गीटस् गुलाबजाम या कंपनीचे दर्शन घेत हडपसर गाठले. या नंतर मात्र १५ नंबर आकाशवाणी केंद्र किंवा मांजरी स्टड फार्म येथील घोड्यांची गडबड बघत निघालो.पूर्वीची राजकपूरची बाग किंवा सध्याचे MIT चे गुरुकुल आणि HP च्या अवाढव्य टाक्या बघत लोणी येथे प्रवेश केला. येथून पुढे प्रयागधाम किंवा उरळीचे निसर्गोपचार केंद्र यांना मागे टाकून थेऊरच्या फाट्या वरुनच पेशव्यांच्या गणेशाला वंदन केले.थोड्याच वेळात वेगवेगळ्या केमिकल्स च्या वासाने पाटस- कुरकुंभ कारखान्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला याची जाणीव झाली. कुरकुंभच्या फिरंगाई देवीचे स्मरण करत आणि हेमंत शितोळेंच्या शेताच्या कडे बघत बघतच भिगवणला पोचलो.या नंतर मात्र बॕक वाॕटरचा प्रचंड जलसाठा आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे  थवे दिसू लागले.पळसदेव येथील पाण्याच्या खाली जाणाऱ्या देवळाची स्थिती पहात इंदापूरला पोचलो.येथून पुढे बरोबर दहा किलोमीटर वरती अवाढव्य असे उजनी धरण आणि छोटासा जलविद्युत प्रकल्प यांना मागे टाकून टेंभूर्णीला पोचलो.या ठिकाणाहून भारताच्या उत्तरेला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे लांब आकाराच्या ट्रेलर्सची वर्दळ चालू झाली.उजनी धरणापासून रस्त्याच्या डाव्या हाताला सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी आणि सुमारे शे- सव्वाशे किलोमीटर लांब असलेली पाण्याची पाईप लाईन आपल्या बरोबरीने धावताना दिसते.मोडनिंब आणि मोहोळ यांना मागे टाकून वडवळच्या नागनाथ महाराजांना नमस्कार करुन बाळ्याच्या खंडोबा पाशी पोचलो.थोड्याच वेळात सोलापूरच्या प्रवेश द्वारावर स्वागता साठी सिध्द असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि हूरहूर संपून आपल्या गावात प्रवेश केला. शिवाजी पुतळा ,भागवत टाॕकीज ,प्रभात टाॕकीज वरुन डफरीनला वळसा घातला.नुकतीच वयाची शंभरी पार करत असलेल्या  आणि कमालीची सुंदर दगडी इमारत असलेल्या हरीभाई देवकरण या शि.प्र.मंडळींच्या प्रशालेला मानाचा मुजरा केला . शिवाजी रंगभुवन येथून पुढे सोलापूर मधील पहिल्या सोसायटीत म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला."गुरुप्रसाद "च्या बरोबर समोर रिक्षा थांबली. म्हातारे झालेले परंतू अत्यंत कणखर असे दोन औदुंबर , हिरवागार कडुनिंब, पानगळती झालेला बेल , थंडीने गारठलेला अशोक , लाल फळे अंगावर पांघरुन बसलेला बदाम , मोहरलेली आंब्याची झाडे ,स्वतःच्या भाराने वाकलेली करंजी आणि असंख्य पक्षी स्वागतोत्सुक होते. कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे आवाज येत नसलेल्या या अत्यंत शांत अशा वातावरणात एखाद्या ध्यान मंदिरा सारखे प्रसन्न वाटत होते. नारळाच्या झावळ्यां पासून बनविलेला घरगुती खराटा हातात घेतला आणि घरासमोरचे अंगण स्वच्छ झाडून काढले.सुर्यास्ताची वेळ होती. घरट्यात परतलेल्या पक्ष्यांची  धावपळ चालू होती. पन्नास शंभर फूट उंच पसरलेल्या औदुंबराच्या फांद्यातून असंख्य आठवणींची इंद्रधनुष्यी किरणे आवेगाने माझ्या अंगावर झेपावत होती.
विनायक जोशी (vp)
८ जानेवारी २०१७
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा