गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

"ती सध्या काय करते " विनायक जोशी

//श्री स्वामी समर्थ //

  " ती सध्या काय करते "

  प्रिय ....,

          "ती सध्या काय करते" या नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुझी प्रकर्षाने आठवण झाली.

९ आॕक्टोबर १९८३ या दिवशी मुळा मुठेचा संगम होतो त्या संगम ब्रीज जवळ आपली पहिली ओळख झाली.तुझ्या अवतीभोवती २०-२५ जणांचा घोळका होता आणि तुझ्या बरोबरीने सर्व जण अत्यंत आपुलकीने वावरत होते. पहिले सहा महिने मी अत्यंत बावरलेल्या अवस्थेत होतो त्या वेळी वेगवेगळ्या मंडळींना जाणीवपूर्वक माझ्या बरोबर ठेवून माझी कामा विषयी आवड कशी निर्माण होईल या बद्दल तुझे अखंड प्रयत्न चालू असत. हळूहळू दिवसातले १३ तास आपण एकत्र घालवू लागलो. म्हणता म्हणता दोन वर्षे कशी गेली कळली नाही आणि एके दिवशी मी तुझ्याच बरोबर रहायचा निर्णय घेतला. संशोधन आणि विकास या खात्यात मी तुझ्या आग्रहा मुळेच आलो आणि अवर्णनीय अशा आनंदी आणि समाधानी जगात मला वावरता आले.लाचारी मुक्त किंवा आत्यंतिक निर्भय पणे काम करायची ताकद तुझ्या मुळेच मला मिळाली. प्रत्येक माणसाकडे स्वतःचा असा आतला आवाज असतो किंवा आपले हात ,डोळे ,कान ,आवाज आणि मेंदू यांचा वापर करुन आपण लाॕजिकची कडी बांधू शकतो किंवा  अशा असंख्य कड्यांना एकत्र गुंफुन आपण उत्तम दर्जाचे काम करु शकतो, याचा तू करुन घेतलेला सराव मला फारच उपयोगी पडत असे .

एक  - दोन असे करत तब्बल वीस वर्षे आपण आत्यंतिक आनंदाने घालवली  .आपल्या क्षेत्रातील पंढरपूर म्हणजेच जर्मनीतील "हॕनोव्हर" या तीर्थक्षेत्राचा तू करुन दिलेला परिचय कायम लक्षात राहिला आहे.या ७००० दिवसातील एकही दिवस कंटाळवाणा गेलेला मला आठवत नाही.

माझ्या ४१ व्या वर्षी आई -वडिलांना पूर्ण  वेळ देण्यासाठी तुझा निरोप घ्यायचे  मी ठरविले . या माझ्या निर्णयाला अत्यंत प्रगल्भ पणे तु दिलेला प्रतिसाद एकदम हटके होता.

तुझ्याच मुळे असंख्य माणसां बरोबर माझा जनसंपर्क प्रचंड वाढला.तुझ्या मिडास टच मुळे किंवा परिस स्पर्शाने अनेक जणांचे उजळलेले कर्तृत्व  जवळून बघता आले.तुझी खासियत म्हणजे तुझ्या सहवासात येणारा कोणीही तुला कधीही विसरु शकत नाही. शंतनूराव किर्लोस्कर आपल्या कारखान्यात आले किंवा निळ्या डोळ्यांचा राज कपूर ने आपल्या येथे केलेले सिनेमाचे शुटिंग वगैरे असंख्य गोष्टींची आठवण येते.

कधीतरी आपल्या टीम मधील माणसे भेटतात, आपण सर्वांनी केलेल्या धमाल गोष्टींची उजळणी होते आणि एकमेकांना "ती सध्या काय करते " याची विचारपूस होते.

वारंवार माझ्या तोंडून तुझे कौतुक ऐकल्यावर माझ्या एका तरुण मित्राने मला तुझे नाव विचारले .

एका स्वच्छ पेपरवरती झोकदार अक्षरात आणि आनंदाने तुझे नाव लिहिले ........" पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स " .

विनायक जोशी (vp)

पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स १९८३ ते २००३

electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा