मंगळवार, १७ मार्च, २०२०

इब्राहिम .....रघूनाथ फाटक

*रघूनाथ फाटक*
इब्राहिम :

सिएरा लिओन च्या वास्तव्यात माझ्या गाडीसाठी मी ड्रायव्हर पाहत होतो. रोज एक दोन जण ऑफिसवर यायचे पण माझ्या इम्पोर्टर ला विश्वासु माणुस हवा होता. एका संध्याकाळी मला आमच्या इम्पोर्टर "उमरने" त्याच्या केबिन मध्ये बोलवले आणि कोपऱ्यात उभा असलेल्या इब्राहिम कडे बोट करून सांगितले हा तुझा ड्राइव्हर..

मी आफ्रिकन लोकांना जवळजवळ दहा वर्षे पाहतोय. मला श्रीलंकन आणि तामिळ ह्यातील पण फरक जसा बघितल्यावर पटकन कळतो, तसाच टानंझानिन, केनियन, मोरक्कन, लिबिअन,घानन, क्रिओ किंवा नायजेरियन प्रत्येकाचे एक वेगळा धागा असतो तो समजला की त्याचा देश ओळखता येतो. पण मी जेव्हा पहिल्यांदा इब्राहिमला पाहिले त्यावेळी तो मला रोखून पाहत होता. त्याच्या डोळ्यातील "श्वापदभाव" मला धोक्याची सुचना देत होते...!

मी पहिल्यांदा आफ्रिकन माणसाला बघून टरकलो होतो. सहा सहा फुटी आणि प्रचंड आफ्रिकन सुद्धा मला कधी त्रास दायक कधीच वाटले नाहीत पण इब्राहिम प्रकरण निराळे होते...! सय्यद बडा पण असाच दिसत असेल असं पण वाटलं...!

"हॅलो मिस्टर रघु"  खोल विहिरीत डबा पडल्यावर येणाऱ्या इको सारखा त्याचा आवाज मला आणखीन अस्वस्थ् करत होता. आम्ही शेखहॅन्ड केला.

 मला पाहून "ह्याची खिमा रोटी काय मस्त लागेल" असा सुद्धा विचार इब्राहिम ला  नक्की आला असेल...!

इब्राहिम हा मेंडे कबिल्याचा होता. आफ्रिकेत लोक त्यांच्या त्यांच्या कबिल्यावरून ओळखले जातात.क्रीओ लोक शिक्षणासाठी, फुला लोक व्यापारासाठी, टेमने, मेंडे लोकांची नोकरीसाठी ख्याती होती...!

पगार ठरला, वेळ ठरली आणि साहेब रोज गादीवर कामावर यायला लागले...!

सकाळी सकाळी आमच्या बंगल्याच्या बाहेर एका दगडावर हा ऊन खायला बसायचा...!

अंगमेहनतीने शरीराला प्रचंड पिळ आलेला. एका दमात बोकड मारून खाण्याची आणि पचवायची ताकत होती...!

ह्याला फक्त प्रेमाने जिंकता येईल आणि तेवढा एकच मार्ग शिल्लक होता..! रोज सकाळी त्याला न्ह्यायरी ला पैसे दिले की स्वारी खुष...! भारतातून परत येताना त्याच्यासाठी खुप टीशर्ट आणले, त्याच्या बायकोसाठी एक कुर्ता दिला. त्याला दिलेला मेहंदी कलरचा टी शर्ट त्याला खूपच आवडला.

मला तो "यु इंडियन बॉसी" म्हणायचा...!

पैसे साठवून टॅक्सी घ्यायची त्याची इच्छा होती.
उपेक्षा आणि अपयश हा, ह्या मातीला जडलेला विकार आहे. त्या सतत नशिबी आल्या की एक कोडगेपणा निर्माण होतो जो आफ्रिकन लोकांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो...!
जिथे आपण काम करतो तिथे चोरी करणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे मग खायच्या वस्तु, कपडे,  डिझेल, मोबाईल, पैसे काहीही चोरायचे..!

एका दिवाळीत त्याला भारतीय मिठाई आणि इतर पदार्थ न देता, मक्याचे एक पोते आणि भरड तांदळाचे एक पोते भेट म्हणून दिले सोबत भरपुर कपडे दिले...!

अनपेक्षित मिळालेल्या प्रेमाने इब्राहिम एकदम बदलला. हा बदल थोड्याच दिवसांसाठी होता. पण तो बदलला...!

एक दिवस त्याला म्हणालो काय करणार पुढे...?

नजर हरवली त्याची ह्या प्रश्नावर. गॉड नोज...!

ज्याच्या पाठीशी काहीतरी आहे त्याला पुढे काय हा प्रश्न पडतो..! उद्याच्या जेवणाला काय असेल हे ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी हा फारच अवघड प्रश्न होता...!

पुढं त्याने माझे काम सोडले. अडीअडचणीच्या वेळी तो पैसे मागायला यायचा..! मी पण त्याला मदत करायचो...! मी आफ्रिकेतून येताना तो मला बोटीवर सोडायला आला.. बॉसी "आय विल मिस यु" म्हणून घळाघळा रडला...!

बोटीने नांगर उचलला मी किनारा सोडून विमानतळाकडे निघालो आणि हात हलवणारा इब्राहिम दिसेनासा होईस्तो पर्यंत मी त्याच्याकडे पाहत राहलो...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा