// श्री स्वामी समर्थ //
" Sine Wave "
पहिल्यांदा मला या अत्यंत तेजस्वी अशा 'पणजी' बाईंचे दर्शन झाले त्या वेळेला त्या Resistor , Inductor आणि Capacitor या तीन भिन्न स्वभावांच्या आपल्या सहकार्यांबरोबर नवीन कामा बद्दल चर्चा करत होत्या . Sine या नावातच एक प्रकारचे संगीत असल्यामुळे एक प्रकारच्या सुरेल अशा Harmony चा अनुभव यांच्या दर्शनात मिळत असे. प्रत्येक वीस मिली सेकंदात एक पूर्ण आलाप घ्यायची असामान्य ताकद यांच्यात आहे. सुरवात सावकाश करत Rms नावाच्या पठारावर थोडासा विसावा, तेथूनच Peak नावाचे सुळके पहायचे आणि हळूहळू उतरायला सुरवात. परत Zero Crossing ला आल्या वरती घरच्यांना सांगून खोल दरीत उतरायला सुरवात. या इथे परत वरच्या प्रमाणेच ठहराव आणि खोलीचा अंदाज घेऊन परत Zero crossing या मुक्कामाला यायचे. एका सेकंदात पन्नास वेळा न कंटाळता हा कार्यक्रम चालू.या वेळी सहकारी म्हणून कधीकधी कोणतेही काम सांगितले तरी संतापाने गरम होणारा Resistor असे,नाहीतर व्यवस्थित ऐकून न घेता काम सुरु करणारा Capacitor असे , किंवा कायम बदलाला कंटाळणारा Inductor असे. चौघेजण मिळून एकत्र आले कि मात्र अतिशय आनंदाने काम करताना दिसतात. जेंव्हा ऐखादे अवजड काम येते त्या वेळी मात्र न लाजता ही Sine Wave थ्री फेजच्या रुपातील आपल्या लाल ,पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या तीन बहीणींना बोलावते. या तिघी अत्यंत आनंदाने आपल्या कणखर आणि दणकट अशा 'Earth 'नावाच्या साथीदाराला बरोबर घेऊनच येतात आणि सिंगल फेज बहिणीच्या घराचा आसमंत तेजाने उजळून टाकतात !
विनायक जोशी ( vp )
1 September 2015
electronchikatha.blogspot.com
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६
तेजस्वी "SineWave"
टाटांची "नॕनो"
// श्री स्वामी समर्थ //
' टाटांची नॕनो '
अमेरिकेला जाताना जमशेटजी टाटांची आणि स्वामी विवेकानंदांची
बोटी वरच्या प्रवासात भेट झाली होती.भारतातील गरीबी दूर होण्यासाठी जपान प्रमाणेच भारतात औद्योगिक क्रांती व्हायला हवी अशी चर्चा या दोघांच्या मधे झाली. ही दोन दृष्ट्या महान व्यक्तींची भेट होती. टाटांच्या पुढच्या पिढीतील लिडर
रतन टाटांनी सर्व सामान्य लोकांना परवडेल अशी चार चाकी गाडी काढायचे स्वप्न सत्यात उतरवायचे ठरविले .त्याचे फळ म्हणून काही मर्यादां सकट पहिली 'नॕनो' हि गाडी बाजारात आली.
या गाडीत एक फार मोठा दोष होता ती म्हणजे हि गाडी सामान्य लोकांच्या साठी होती.
भारतात मोटार ही माणसाची 'प्रतिष्ठा ' मोजायचा मापदंड आहे. रस्त्यावरील वाहतूकीचे कोणतेही नियम न पाळणे, लेन सिस्टीम किंवा सिग्नल वगैरे गोष्टीना अजिबात न जुमानता वाहन चालवणे हे आमच्या वरील संस्कार आहेत.
पुण्यात आज बहुसंख्य लोकांकडे गाडी हि उपयुक्त म्हणून नव्हे तर फक्त प्रदर्शनासाठी दरवाज्याच्या बाहेर उभी आहे.
आपल्या देशातील मानसिक आणि रस्त्यावरील प्रदूषण कमी करायचे असेल तर गाडीतून कपॕसिटी पेक्षा एकही सिट कमी असेल तर त्या गाडीला गर्दीच्या वेळी किंवा गर्दी असलेल्या रस्त्यावर बंदी घालणे हे जरुरीचे आहे.
माझी टाटांना विनंती आहे की 'नॕनो'चा सर्व मेकॕनिझम जसाच्या तसा एखाद्या "सेदान' सेरीज गाडी मध्ये घालून आणि किंमत वाढवून दिली तर भारतात हि गाडी भरपूर चालेल. आम्हाला काळानुरुप धावणारा आणि व्यवहार्य घोडा नको आहे आम्हाला काडीचाही उपयोग नसलेला "पांढरा हत्ती " हवा आहे फक्त प्रतिष्ठा दाखवण्यासाठी !
विनायक जोशी (vp )
22 February 2016
electronchikatha.blogspot.com
रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६
ओमर शेरीफ
// श्री स्वामी समर्थ //
" ओमर शेरीफ "
माझ्या लहानपणी "राजू केमकर " आणि "अविनाश जेऊरकर " नावाचे दोन मित्र अतिशय उत्तम रीतीने सर्व प्रकारचे आवाज वगैरे काढून पूर्ण सिनेमा सर्व बालचमूंच्या समोर ऊभा करत.सोलापूर मधे कडकडीत ऊन असताना कडूनिंबाच्या झाडाखाली १५-१६ श्रध्दावान श्रोते अतिशय एकाग्रतेने सिनेमाचे श्रवण करत असत. या सिनेमात 'ग्रेगरी पेक', ओमर शरीफ , चार्ल्स ब्रान्सन ,वगैरे एकमेकांशी मराठी बोलणारी मंडळी काम करत होती. त्या वेळी सोलापूर मध्ये सर्वात उंच इमारत ६ मजली होती. त्या मुळे १०५ मजली बिल्डिंग आणि तिला लागणारी आग' ही "Towering Inferno" या सिनेमाची कथा श्रवण करणे आठ दहा दिवस चालत असे.
असाच एक थरारक सिनेमा म्हणजे
" Mackenna's gold" . या मध्ये काम करणारे "ग्रेगरी पेक" आणि "ओमर शरीफ "यांचे सर्व संवाद आम्हाला पाठ असत. खास करून घोडे आणि त्यांच्या करामती. सुमारे ३५ -४० वर्षापूर्वी आमच्या आयुष्यात आलेला "ओमर शेरीफ " परवा १० जूलै ला गेला. आता ओमर शेरीफ नाही , लिंबाच्या झाडाखाली सावली मध्ये उकीडवे बसून तासन तास गोष्ट ऐकणारे बालचमू नाहीत .नाही म्हणायला हिरवागार कडूनिंब मात्र गतस्मृतींची उजळणी करत शांतपणे ऊभा आहे .
विनायक जोशी (vp)
२७ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६
आनंदाचे तरंग अर्थातच हसणे !
// श्री स्वामी समर्थ //
" हसणे "
आयुष्याची सुरवात आणि शेवट रडणे या विधीने करणाऱ्या माणसाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही दैवी देणगी आहे. माझ्या सुदैवाने मला हा वारसा आईच्या कडून मिळाला. अत्यंत मोकळेपणानं साध्या साध्या गोष्टीतील आनंद हुडकून त्यावर हसणारे मित्र मिळाले.कोणत्याही कलेत निपुणता मिळविण्यासाठी लागते ती म्हणजे बारकाईनं निरीक्षण करायची शक्ती आणि अत्यंत बळकट अशी स्मरणशक्ती . टायमिंगचा खोलवर अभ्यास .स्वतः वरती होणारे विनोद सहन करायचा खिलाडूपणा हवा. समोरच्या माणसाला नाउमेद करण्यासाठी याचा वापर कधीही करु नये. आपल्या आजूबाजूला विनोदाची कारंजी उडवणारे सहकारी असतील तर ते मागच्या जन्मीचे पुण्य आहे असे समजावे. अत्यंत एकाग्रतेने काम करण्यासाठी "हसणे" हे फार मोठे टाॕनिक आहे. फक्त ठराविक उच्च अभिरुचीच्या विनोदांनाच हसायला पाहिजे असा कोणताही निश्चय करु नये. गडगडाटी हसायला येणारी भाग्यवान मंडळी अत्यंत निरोगी असतात.या गडगडाटा चे सहावे Harmonics हे रडणे असते. त्या मुळे हसणे आणि रडणे एकत्र झाल्याने आरोग्य छान राहते. सर्व जगाची एकच बोलीभाषा असलेल्या "हसणे " या आनंदाने रहायला प्रवृत्त करणाऱ्या विधीला मनापासून धन्यवाद !!
विनायक जोशी (vp)
11 August 2015
electronchikatha.blogspot.com
गायछाप जर्दाचे !!!
// श्री स्वामी समर्थ //
' गायछाप जर्दा "
हा आरोग्याला घातक असा तंबाखूचा प्रकार आहे.
माझ्या आयुष्यात Computer , Google अथवा TV यांचा शिरकाव झालेला नव्हता त्या काळात 'गायछाप' खाणारे बरेच सिद्ध पुरुष माझ्या आयुष्यात आले. पुस्तकांच्या पलिकडे खूप मोठे जग आहे याचा साक्षात्कार झाला. पुण्यात रहायचे असल्यामुळे या तंबाखूने पुण्यासाठी 'गायछाप'हे सात्त्विक नाव धारण केले आहे. साधारणपणे प्रत्येक ५० कि.मी वरती हीचे नाव बदलत गेले आहे. शक्यतो शारीरिक कष्टाची कामे किंवा मेकँनिकल Machines वरती कोणाशीही न बोलता अथवा एकाग्रता पूर्वक कामे करताना कोणी दिसले की स्वारींनी 'गायछाप'चा 'बार' लावला आहे असे समजावे. अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच या समाधी अवस्थेतून त्यांना बाहेर काढावे.
सर्वधर्म समभाव वाढवणारी आणि सर्व आर्थिक गटातील लोकांना एकाच आनंदी स्तरावर ठेवणारी अशी हिची किमया आहे.
मी स्वतः हिचा परीचय करुन घेतला नाही परंतु हिचे उपासक असलेले आणि अतिशय उत्तम काम करणारे माझे खुप मित्र आहेत.
' गायछापचा' चा वापर 'साधन' म्हणून जे ' साधक ' करतात त्यांचे अपेक्षित ' साध्य 'आणि उत्तम आरोग्य त्यांना परमेश्वराने दिले पाहीजे हिच इच्छा !!
विनायक जोशी (vp)
२० जून २०१५
electronchikatha.blogspot.com
श्रीमंतांची वसाहत ५३४ नारायण पेठ पुणे !
// श्री स्वामी समर्थ //
"श्रीमंतांची वसाहत "
५३४, नारायण पेठ, पुणे.
गोगटे प्रशालेला लागून प्रत्येकी ५*५ फुटांच्या दुकानांची ही वसाहत आहे. या लोकांना उजव्या सोंडेच्या "मोदी" गणपतीचा आशीर्वाद आहे. लक्ष्मी रोडपासून फक्त तिनशे फुटावर हि वसाहत आहे. या वसाहतीची सुरवात "हिंदबाबा " या दत्ताच्यादेवळा
पासून ,नंतर रसाचे दुकान, गनबोटे फरसाण, पाच टेलरची दुकाने, तीन मोटार रीवांइडींगची दुकाने ,एक मोबाईलचे आणि एक चहावाला. येथिल बहुतेक दुकानदाराना अखंड वाहने शेजारुन जात असलेल्या रस्त्यावर काम करावे लागते . वाहनांचा धूर, रस्त्यावरून उडणारी धुळ, हाॕर्न चे आवाज वगैरे किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून अत्यंत एकाग्रता पूर्ण सर्व जण काम करत असतात . पानवाला सोडून इतर सगळ्याचे average दररोजचे उत्पन्न ६००ते ७०० रूपये आहे. या पेक्षा जास्त पैसे मिळाल्यास सगळेजण मिळून एखादी छोटी पार्टी करतात. लक्ष्मी रोड जवळ असून सुध्दा लक्ष्मीचा मर्यादित आशिर्वाद आहे.
ही वसाहत मन मोकळ्या आणि दिलदार लोकांची आहे. सर्वांच्या मुलांना परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. गेल्या ३० वर्षात मी कोणालाही कधीही रडगाणे गाताना बघीतले नाही.एकदा तुम्ही त्यांचे झालात की तुमच्या सर्व सुख दुःखात हे न सांगता तुमच्या बरोबर आहेत.
माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी या आनंदी वसाहतीत विसाव्याला थोड्या वेळासाठी का होइना घेऊन येतो.
या वसाहतीवर खुप मोठ्या झाडांची सावली आहे. ईथे नैसर्गिक गारवा आहे. तुम्हाला कधी माणसांपासून वेगळे करणाऱ्या Air conditioner नावाच्या हतबल करणाऱ्या यंत्राचा कंटाळा आला तर इथे नक्की या माणूसकीचा गारवा उपभोगायला.!!
विनायक जोशी (vp)
२१ मे २०१५
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६
जिनियस केशव आलूर
// श्री स्वामी समर्थ //
" जिनीयस केशव "
"Interview तीन शब्दांचा "
पुण्याच्या सहकारनगर जवळ संतनगर मध्ये खळदकर बंगल्यात आमचे R & D unit होते. सध्याच्या Treasure park च्या इथे एक मोठी विहीर आणि रिकामे मैदान होते. R&D मधे काम करण्यासाठी आम्हाला एक Software Engineer घ्यायचा होता. बरेच candidates येत होते . या मधे एक साधारणतः सावळा आणि विरळ केस असलेला आणि अतिशय साधे कपडे घातलेला candidate सुध्दा आला होता . चेहऱ्यावर फक्त सौम्य हसू .
त्याला नाव काय हा प्रश्न विचारला आणि उत्तर आले "केशव आलूर". गावाचे नाव धारवाड. तो सिलेक्ट झाला पुढचा एकही प्रश्न न विचारता .
"आलूर "हे धारवाड मधील अतिशय हूशार म्हणून नावाजलेले घराणे होते. पहिली पासून Degree पर्यत सर्व परीक्षेत पहिले येणारे असा त्यांचा लौकिक होता . त्या काळात त्यांची स्पर्धा फक्त "आलूर" मंडळींशी होत असे. आम्हाला हिरा मिळाला होता,
तो जाॕईन झाला आणि अर्थातच नवनवीन कामांचा फडशा पाडायला लागला . कधीकधी कामात अडथळा आला कि आम्ही विहिरीच्या जवळ निवांत गप्पा मारत बसत असू . या अवांतर गप्पा म्हणजे R&Dच्या मंडळींना चांगलाच बदल असतो.
एकदा मी बंगलोरला गेलो असताना TIFR मधे जाऊन त्याच्या साठी "floating point calculations in assembly " हे पुस्तक घेऊन आलो होतो.
साधारणपणे दोन वर्षांनी त्याला एका मोठ्या कंपनीचा काॕल आला. तेथून तो Honeywell आबुधाबी ला गेला. गेली १५ वर्षे तो तेथेच आहे. दोन वर्षापूर्वी अचानक पत्ता हुडकत रात्री ११ वाजता घरी आला. मुलाला IIT entrance class साठी इथे घालायचे म्हणून तो पुण्याला आला होता.
अर्थातच यावेळी अतिशय आनंदी अशा कालखंडाच्या आठवणी निघाल्या भरपूर हसलो.
आता कधी सीमाभागाचा विषय निघाला की म्हणावेसे वाटते बेळगावचा जसा "कुंदा" , निपाणीची "तंबाखू " तसेच धारवाडचे पेढे नव्हेत तर फक्त "आलूरच"
विनायक जोशी
10 June 2015
electronchikatha.blogspot.com