शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

श्रीमंतांची वसाहत ५३४ नारायण पेठ पुणे !

// श्री स्वामी समर्थ //
   "श्रीमंतांची वसाहत "
    ५३४, नारायण पेठ, पुणे.
गोगटे प्रशालेला लागून प्रत्येकी ५*५ फुटांच्या  दुकानांची ही वसाहत आहे. या लोकांना उजव्या सोंडेच्या "मोदी" गणपतीचा आशीर्वाद आहे. लक्ष्मी रोडपासून फक्त तिनशे फुटावर हि वसाहत आहे. या वसाहतीची सुरवात "हिंदबाबा " या दत्ताच्यादेवळा
पासून ,नंतर रसाचे दुकान, गनबोटे फरसाण, पाच टेलरची दुकाने, तीन मोटार रीवांइडींगची दुकाने ,एक मोबाईलचे आणि एक चहावाला. येथिल बहुतेक दुकानदाराना अखंड वाहने शेजारुन जात असलेल्या रस्त्यावर काम करावे लागते . वाहनांचा धूर, रस्त्यावरून उडणारी धुळ, हाॕर्न चे आवाज वगैरे किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून अत्यंत एकाग्रता पूर्ण सर्व जण काम करत असतात . पानवाला सोडून इतर सगळ्याचे average दररोजचे उत्पन्न ६००ते ७०० रूपये आहे. या पेक्षा जास्त पैसे मिळाल्यास सगळेजण मिळून एखादी छोटी  पार्टी करतात. लक्ष्मी रोड जवळ असून सुध्दा लक्ष्मीचा मर्यादित आशिर्वाद आहे.
ही वसाहत मन मोकळ्या  आणि दिलदार लोकांची आहे. सर्वांच्या मुलांना परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. गेल्या ३० वर्षात  मी कोणालाही कधीही रडगाणे गाताना  बघीतले नाही.एकदा तुम्ही त्यांचे झालात की तुमच्या  सर्व सुख दुःखात हे न सांगता तुमच्या बरोबर आहेत.
माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी या आनंदी वसाहतीत विसाव्याला थोड्या वेळासाठी का होइना घेऊन येतो.
या वसाहतीवर खुप मोठ्या झाडांची सावली आहे. ईथे नैसर्गिक गारवा आहे. तुम्हाला कधी माणसांपासून वेगळे करणाऱ्या Air conditioner नावाच्या हतबल करणाऱ्या यंत्राचा कंटाळा आला तर इथे नक्की या माणूसकीचा गारवा उपभोगायला.!!
       विनायक जोशी (vp)
              २१ मे २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा