गुरुवार, २८ जुलै, २०१६

बंगलोर ८६ ते ९१

// श्री स्वामी समर्थ //
   " बंगलोर १९८६ ते ९१ "
शालेय जीवनात म्हैसूर आणि बंगलोर अशा सहलीला गेलो होतो.त्यावेळी सोन्याचे सिंहासनअसलेला राजवाडा ,वृंदावन गार्डन , नॕशनल पार्क ,विश्वेश्वरैया नावाच्या पुण्याच्या माणसाचा म्युझियम किंवा त्यामधील रेल्वे इंजिनचे माॕडेल वगैरे गोष्टी बघितल्या होत्या. आमच्या कंपनीचे दक्षिण विभागाचे आॕफीस बेंगलोरला झाले आणि रघुवीर नावाच्या अत्यंत दिलदार माणसाने येथिल कारभार हातात घेतला.या माणसाच्या बरोबर बरेचसे बंगलोर मी स्कुटर वरती डबलसीट हेल्मेट घालून आणि फुलपँट घालणाऱ्या पोलीसांकडे बघत बघत पालथे घातले होते.प्रत्येक रस्ता हा " मेन " आणि क्राॕस चे लेबल घेऊन उभा असे.त्या वेळी एकमेव अशी २६ मजली इमारत बेंगलोर मध्ये  होती. कोणत्याही हाॕटेल मधे गेलो की इडली अथवा डोशा बरोबर येणाऱ्या चटणी आणि सांबाराच्या बादल्या सर्वांना तृप्त करत होत्या.इंडस्ट्रीयल झोन मधील इलेक्ट्रॉनीक इस्टेट मधे अतिशय टुमदार असे ५०० छोटे छोटे कारखाने बघायला मिळाले. रघुवीरदादा बरोबर असल्यामुळे TIFR असूदे किंवा विधानभवन सर्व  ठिकाणी मुक्त संचार करता येत असे.एकूणच बंगलोरचे हवामान , शिस्त ,रस्ते किंवा अतिशय प्रेमाने कानडी बोलणारी माणसे या मुळे कोणताही परकेपणा नव्हता.येथिल बसचा मुख्य स्टँड किंवा त्या ठिकाणी ट्रॕफिकचे नियंत्रण अॕटोमॕटीक सिग्नल्सच्या ऐवजी म्यॕन्युयली करणारे पोलीस . पर्यटकांना समजेल अशा भाषेत बोलणारी बंगलोरी माणसे बघायला मजा येत असे.राजकुमार नावाच्या सुपरस्टारचे भक्त असलेली , साधारणपणे रंगाने सावळी ,डोक्याला भरपूर तेल लावणारी , कानडी हेल वापरुन इंग्रजी बोलणारी , अतिशय किरकोळ विनोदाला सुध्दा भरघोस दाद देणारी , घरामध्ये पांढरी स्वच्छ लुंगी वापरणारी अशा माणसांचे ते बंगलोर होते. IT कंपन्या , परदेशी मालाने खचाखच भरलेले माॕल्स , पानांच्या टपऱ्या असाव्या तसे " पब " वगैरे गोष्टींचे सावट अजून पडलेले नव्हते !
आज विमानाच्या सुविधेमुळे अतिशय जवळ आलेले भपकेबाज बंगलोर  त्याच्या मूळ रुपापासून खुपच दूर गेलेले आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 January 2016
electronchikatha.blogspot.com

शनिवार, ९ जुलै, २०१६

Digital Signal Processing (DSP)

// श्री स्वामी समर्थ //
              ' DSP'
" Digital Signal Processing "
सध्या इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षाला असलेली मुले " DSP " या विषयावर अतिशय आत्मविश्वासाने बोलतात . मला स्वतःला पंचवीस वर्षापूर्वी तीन वेगवेगळ्या मंडळींच्या बरोबरीने या विषयावर काम करायला मिळाले.त्या काळात "डिजीटल "या शब्दाला विश्वासाचे कोंदण नव्हते . केंकरे या खरगपूर IITच्या इंजिनियरने AC voltage वरती signals superimpose करण्यासाठी आणि परत Decode करण्यासाठी DSP या प्रकाराचा यशस्वी वापर केला होता.या सर्किटला " चिमणीचे " सर्किट असे नामकरण केले होते. या नंतर अमेरिके वरुन आलेले " मंगेश काळे " यांनी नायक्रोम साठी हाय स्पीड आॕगर कँट्रोलर तयार केला होता.या मध्ये अतिशय वेगवान अशा  DC Servo मोटारचा आॕपरेटींग प्रोफाईल DSP  वापरुन केला होता.
त्यांच्या  कंपनीचा सुरूवातीचा काळ होता. या नंतर मात्र मुंबई IIT चे फडणीस यांनी DSP वापरुन बनविलेल्या "On line check weigher" ची सर्व कामे अत्यंत जवळून बघता आली.
Industrial Signal Processing या विषयावरील भरपूर व्यावहारिक आणि वस्तूनिष्ठ अनूभव घेतल्यानंतरच या तिघांनी Digital Technique ची जोड त्याला दिली होती.
DSP हा शब्द जरी कानावर पडला तरी केंकरे , मंगेश काळे , फडणीस या  धडपडणाऱ्या त्यावेळच्या अत्यंत हुशार इंजिनियर्सच्या आठवणी जागृत होतात  !!!
विनायक जोशी ( vp )
8 July 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, ५ जुलै, २०१६

Mathematics - 3 (M3)

// श्री स्वामी समर्थ //
     " M-3 "
"Mathematics - 3 
श्रध्दा बिडकर नावाच्या अत्यंत गुणी मुलीने तिला इंजिनियरींगच्या गणितात म्हणजेच M-3 ला नव्वद मार्क्स पडले हे अतिशय आनंदाने सांगितले आणि या ऐतिहासिक विषया बद्दल जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विवेक या आमच्या मित्राने पार्ट टाईम डिग्री वाडीया काॕलेज मध्ये करायचे ठरवले .त्या वेळी  M-3 नावाचे  हे शिवधनुष्य कसे पेलायचे हा फार मोठा गहन प्रश्न निर्माण झाला होता. पासिंग पुरता बरोबर पेपर कसा लिहता येईल किंवा हा पेपर कमीतकमी कष्टात कसा सोडवता येईल वगैरे योग्य ते संशोधन करुन M-3 चा अडथळा पार केला.या नंतर थोड्या दिवसांनी राहुल भोई या आमच्या मित्राने त्याच्या काॕलेज मधील M-3 च्या फेऱ्यात अडकलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या बद्दल ज्ञान वाढवले . या नंतर मात्र  काही वर्षांनी M-3 ची लढाई लढण्यासाठी केदार सज्ज झाला. आमची जेंव्हा भेट होत असे त्या प्रत्येक वेळी M-3 हा विषय ठरलेला असे. काही दिवसांनी त्याची परीक्षा झाली. रिझल्ट लागल्यावर त्याचा फोन आला .काॕलेज मध्ये या विषयात तो दुसरा आला होता. या प्रसंगा नंतर मात्र आज संध्याकाळ पर्यंत कोणत्याही इंजिनियरला मी  M-3 म्हणजेच Mathematics -3 बद्दल उपदेश केला नाही !!!
विनायक जोशी (vp )
4 July 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, २८ जून, २०१६

रेडिओ

// श्री स्वामी समर्थ  //
     " रेडिओ "
एका छानशा आयताकृती लाकडी बाॕक्स वरती पुढील बाजूला दोन मोठ्या आकाराची गोलाकार फिरणारी दणकट बटणे.एका बटणाने स्टेशनचा काटा फिरवायचा आणि दुसऱ्याने आवाज कमी जास्त करता येत असे. स्टेशनचा काटा  कोणत्या स्टेशन वरती आहे ते कळावे म्हणून आतून एक बल्ब लावलेला असे.या रेडिओचा आवाज अत्यंत सुस्पष्ट आणि दणदणीत असायचा.रेडिओ मेकॕनिक ने कधीतरी हा रेडीओ आपल्या  समोर दुरूस्ती साठी उघडला तर मागच्या बाजूने या रेडियो मधील प्रकाशमान असलेली वेगवेगळ्या आकाराची व्हाॕल्व नावाची "प्रकाशीत झुंबरे " बघायचा योग यायचा.रेडिओ वरती सकाळी प्रभात वंदन ऐकणे आणि मॕच असेल तेंव्हा क्रिकेटची काॕमेंट्री ऐकणे आणि नंतर त्यावर चर्चा हा आयुष्यातील अविभाज्य भाग होता. गीत रामायण वगैरे कार्यक्रम आकाशवाणी वरुन प्रसारीत व्हायचे त्या काळात या रेडिओची भक्ती भावाने पूजा व्हायची आणि त्या नंतरच सुधीर फडकेंच्या सुस्पष्ट आणि मधुर आवाजातील गीत रामायण ऐकायला मिळायचे.दुपारी दीड आणि संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता प्रचंड होती. १९७० च्या दशकात सेमी कंडक्टर च्या रुपातील  छोट्याशा ट्राँझीस्टरने प्रवेश केला आणि या आपल्या मोकळ्या ढाकळ्या रेडिओची कुचंबणा चालू झाली. बॕटरी वरती वापरता येणारे ,कोठेही घेऊन फिरता येणारे असे ट्राँझीस्टर  बाजारात आले आणि या आटोपशीर रेडिओंची संख्या सुध्दा खूप वाढली. घरातील प्रत्येक वयोगटातील मेंबर्स आपल्याला आवडेल तो कार्यक्रम लहान आवाज ठेवून ऐकू लागले.याच काळात रेडिओ सिलोन वरुन "अमिन सयानींचा "हुकमी आवाज आणि "बिनाका "ही गीतमाला तरुण मंडळींच्या मधे अतिशय लोकप्रिय झाली. काळानुरुप रेडिओचा आकार छोटा होत गेला.एफ् एम स्टेशन किंवा रेडिओ जाॕकी वगैरे प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी अनपेक्षित अशी  एकामागून एक सुरेल गाणी ऐकवण्याची शक्ती फक्त आणि फक्त रेडिओ मध्येच आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 june 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, २० जून, २०१६

मिंग्लिश ( मि आणि इंग्लिश )

// श्री स्वामी समर्थ  //
     " मिंग्लीश "
     " माझे - इंग्लिश "
शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय शिकण्याची सुरुवात पाचवी मध्ये झाली. माझी आई त्या काळातील मॕट्रीक झालेली होती आणि वडील बीए .दोघांचेही इंग्रजीचे ज्ञान उत्तम होते.घरामध्ये "रेन आणि मार्टीन"चे ग्रामरचे पुस्तक होते.त्यांच्या सोबतीला तर्खडकरांची तीन भागातील व्याकरण माला . आम्हाला शाळेमध्ये इयत्ता आठवी पासून सेमी इंग्लिश होते.या सर्व गोष्टी सहजतेने झाल्या . अकरावी आणि बारावीला मात्र भाषेकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ नसताना" हायर इंग्लिश "नावाचा अवघड प्रकार वाट्याला आला. याच कालखंडात आपल्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ५० ते ६० इंग्रजी सिनेमे बघितले. त्या नंतर मात्र "नायक्रोम" नावाच्या विद्यापीठात नोकरी लागल्यावर  इंग्रजी भाषेचा वापर नगण्य झाला. या ठिकाणी जपानी  आणि जर्मन तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव होता कि इंग्लिशचा पूर्ण विसर पडला. फर्ग्युसन काॕलेज रोड वरती असलेल्या ब्रिटिश लायब्ररीत जाणे सुध्दा संपुष्टात आले. नोकरीची हि वीस वर्षे मी अत्यंत खोल अशी वैचारिक बैठक असलेल्या आणि अत्यंत हुशार अशा मराठी मंडळींच्या मध्ये  घालवली. या वीस वर्षात मी  "डियर सर , थॕक्स ,  साॕरी ,रीगार्डस "वगैरे प्रकारच्या औपचारिक पणापासून आणि या प्रकारच्या मंडळींच्या पासून शेकडो योजने लांब होतो . या कालखंडात बऱ्याच "बाप" मंडळींच्या बरोबरीने काम करता आले. कोणत्याही संकल्पना समजून घेताना मराठी या मातृभाषेमुळे सोपे गेले ,  परंतु त्या मुळेच  " इंग्लिश " नावाच्या या विदेशी मावशी पासून म्हणजेच इंग्लिश पासून मात्र दूर राहीलो ....!  आमच्या क्लास मध्ये कल्याणी मुलांना  " डॕफोडील्स " ही कविता उत्तम पणे शिकवतेच आणि त्या नंतर मात्र लगेचच अभ्यासक्रमात नसलेली परंतू आपलीशी वाटणारी " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...!एका पाठोपाठ येणाऱ्या आनंदाच्या या "सरी वर सरी "मुलांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि सपक गोऱ्या अशा विदेशी मावशीच्या मागे उभी असलेली अत्यंत तेजस्वी अशी
" माय " मराठी दिसू लागते !!!
विनायक जोशी ( vp )
२०/०६/२०१६
electronchikatha.blogspot.com

शुक्रवार, १७ जून, २०१६

" मायकेल ग्रोझांबिक ते मायकेल शुमाकर

// श्री स्वामी समर्थ //
   " मायकेल्सच्या जगात "
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर
" मायकेल " नावाच्या असामान्य व्यक्तींचा आविष्कार बघायला मिळाला. अगदी पहिल्यांदा व्यंकटेश माडगूळकरांच्या " सिंहांच्या देशात " या अनुवादीत पुस्तकातून मायकेल ग्रोझांबीक नावाच्या जर्मन मायकेलची भेट झाली. प्राण्यांच्या भवितव्यासाठी लढणारा हा मायकेल कायमचा मनात घर करुन राहीला. या नंतर आपल्या शरीरावर असंख्य शस्त्रक्रिया करुन घेऊन गोरा झालेला परंतु  विचित्र दिसणारा आणि ब्रेक डान्स वगैरे प्रकारात माईल स्टोन ठरलेल्या स्टेप्सचा बादशहा म्हणजेच " मायकेल जॕक्सन " या अमेरिकन मायकेलचा दणदणाट बघता आला. या नंतर मात्र बास्केट बाॕल हा खेळ ज्याच्या मुळे प्रेक्षणीय  वाटू लागला अशा
" मायकेल जाॕर्डन "या अमेरिकन  परफेक्शनिस्टची कमांड बघायला मिळाली. या नंतरचा नंबर म्हणजे  फाॕर्म्युला वनचा सातवेळेचा विजेता म्हणजेच " मायकेल शुमाकर" ने बरीच वर्षे अधिराज्य गाजवले. आदल्या दिवशी पोल पोझीशनसाठी होणारी रेस आणि दुसऱ्या दिवशीची गाड्यांची रेस बघणे हा कमालीचा थरारक किंवा श्वास रोखून धरायला लावणारा प्रसंग  असे . अत्यंत जलदगती ने कराव्या लागणाऱ्या कौशल्य पूर्ण हालचाली आणि एखादी छोटीशी चूक म्हणजे गंभीर दुखापत किंवा मृत्यू हे माहित असूनही हसतमुखाने आणि धाडसाने तोंड देणारा हा जर्मन मायकेल मात्र कायमचा हीरो राहीला. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या या सर्व मायकेल्सनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने कायम लक्षात राहतील असे असंख्य अनमोल क्षण दिले. मायकेल ग्रोझांबीक सोडून इतर तिघांचा परफाॕर्मन्स याच देही याच डोळा बघता आला .आयुष्य समृद्ध करणाऱ्या "मायकेल पर्वाच्या "
  या काही मोजक्या आठवणी !!!
विनायक जोशी ( vp)
17 June 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, १४ जून, २०१६

अपघातांची बेटे

" श्री स्वामी समर्थ "
       " अपघातांची बेटे "
पुण्यातील  प्रचंड अशा प्रदूषणाला कमी करणारा पाऊस अजूनही सुरू झाला नाही.आज पासून शाळांची सुरवात असल्यामुळे असंख्य वाहनांची वेळेत पोचण्यासाठीची गडबड चालू होणार आहे. पुण्याचा म्हणून आब राखून असलेला भुरभुरणारा पाऊस अधूनमधून पडत आहे.या शहरा मध्ये प्रत्येक पंधरा किलोमीटर वरती या पावसाचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो.या सर्व गडबडीत सर्वांनी प्रत्येक चौकात पसरलेल्या तेलकट आणि निसरड्या भागाकडे लक्ष ठेवले पाहीजे. आपण दररोज ज्या रस्यावरुन प्रवास करतो त्या रस्त्याचे बारीक बारीक पावसामुळे आॕइलच्या  ट्रॕक मध्ये रुपांतर होते.कितीही चांगली गाडी किंवा ब्रेक असले तरी प्रत्येक चौकात बारीक पावसामुळे तयार होणाऱ्या या धोक्यांची नोंद ठेवून सिग्नल्सच्या दोन्ही बाजूस शंभर फुटां पर्यंत अतिशय हळूहळू गाडी चालवणे. गेली दोन वर्षे रस्त्यावर ओला कचरा आणि त्यांच्या पिशव्या  फेकलेल्या आढळतात.या आॕइल व वंगण किंवा ओला कचरा पडलेल्या रस्त्यांवरून पडल्यामुळे बरीच मंडळी दरवर्षी जायबंदी होत आहेत.कोणत्याही प्रकारे गर्दी नसलेल्या रस्यांवर नेहमीच्या सवयीने वेगाने जाणाऱ्यांचे अपघात जास्त होत आहेत. अतिशय सुंदर अशा भुरभुर पडणाऱ्या पावसाळ्यात  सर्वांनी प्रत्येक चौकात किंवा सिग्नल्सच्या ठिकाणी सावधानता बाळगून ही मानव निर्मित अपघाताची बेटे पार करायची आहेत. हे दिव्य पूर्ण वर्षात फक्त ८ते१० दिवस पार पाडावे लागते.असंख्य झाडांना  नव संजीवनी देणारा किंवा पूर्ण शहराचे प्रदूषण कमी करणारा अशा ह्या नितांत सुंदर अशा पावसाचे आपण आनंदाने आणि सुरक्षितता पाळून स्वागत करु या !!
विनायक जोशी (vp )
15 June 2016
electronchikatha.blogspot.com