शनिवार, ३० एप्रिल, २०१६

Tata Tea आणि मुन्नार !

// श्री स्वामी समर्थ //
        " Tata Tea "
   केरळ मधील अतिशय सुंदर असे डोंगरावरचे गाव म्हणजेच "मुन्नार ".या गावाच्या  जवळचे चहाचे मळे टाटांनी विकत घेतले  होते. साधारणपणे १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी आणि तेथील मूळ स्थानिक लोकांच्या मधील "कानन आणि देवन " या बंधूनी डोंगर उतारावर चहाची असंख्य झाडे अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने लावलेली होती.टाटांनी हे मळे विकत घेतले त्यावेळी चहाची काही झाडे १०० वर्ष जुनी होती. मी ज्यावेळी "मुन्नार " मध्ये गेलो होतो त्यावेळी तेथे फक्त दोन हाॕटेल्स होती .ज्यांचा वापर टाटांच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी होत असे. गावामध्ये एक अत्यंत सुंंदर चर्च होते. त्या ठिकाणी धीरगंभीर अशा आवाजाची एक प्रचंड घंटा होती.दिवसभर ढगांचे पांढरे शुभ्र थवे एकामागून एक असे येऊन पूर्ण मुन्नारला भेट देऊन जात असत.इंग्रजांच्या काळातील एकमेकांच्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दूर असे अनेक बंगले आणि त्यांच्या नोकर वर्गाची घरे  अशा प्रकारच्या अनेक  वस्त्या होत्या. चहाच्या मळ्यात पाने खुडणाऱ्या बायकांच्या पाठीवर पाने गोळा करण्यासाठी टोपल्या असत आणि हातात मार्कर स्टीक.चहाची पाने कोणत्या लेव्हल पर्यंत तोडायची याची अनुभव सिध्द पध्दत होती.या चहाच्या मळ्यांच्या आसपास असंख्य उंच उंच अशा वृक्षांचे जंगल होते.या जंगलात पक्षांच्या पेक्षा हत्ती जास्त होते. या डोंगराच्या मधील दरीत पांढरी शुभ्र अशी चहाची फॕक्टरी होती.या ठिकाणी  खुडलेल्या पानांच्या पासून ते वेगवेगळ्या दर्जाची चहाची पावडर तयार करायचे अनेक  विभाग होते.या येथेच भारतातील पहिले असे चहा पावडर पाॕलिथीन बॕगे मध्ये भरायचे मशिन होते.टाटांनी या क्षेत्रात पाॕलिथीन बॕग मधील चहा ही संकल्पना घेऊन प्रवेश केला होता. त्या वेळी पर्यटकांना उपयुक्त अशा कोणत्याही सुविधा मुन्नार मध्ये नव्हत्या.
मल्याळम "तरीयादे" एवढे एकच वाक्य पाठ करुन मी  भारतातील या अत्यंत निसर्ग संपन्न डोंगराळ भागात आमच्या मशिनसाठी गेलो होतो. येथील जंगल ,चहाचे मळे,ढगांची शाळा आणि अत्यंत शांत वातावरणात माझा  " Signal Processing " या विषयाचा  अभ्यास सुरु झाला. सलग पंचवीस दिवस मी येथे होतो.इलेक्ट्रॉनिक्स मधील अतिशय मूलभूत  असे ज्ञान या गावात मिळाले आणि हे  शिक्षण देणारा गुरु म्हणजे जर्मन बनावटीचा Automatic weigher होता. ज्याचे नाव होते " Automa ".
विनायक जोशी (vp )
1 May 2016
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

"ब्रम्हचैतन्य" गोंदवलेकर महाराज

// श्री स्वामी समर्थ //
      " ब्रम्हचैतन्य "
"श्रीराम जय राम जय जय राम "
सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावाचे रहिवासी म्हणजे गोंदवलेकर महाराज.त्यांचे अध्यात्मिक गुरु तुकामाई यांनी त्यांना दिलेले नाव म्हणजे " ब्रम्हचैतन्य ". गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सोपा असा तेरा अक्षरी मंत्र सर्व सामान्यांसाठी दिला आहे. "श्रीराम जय राम जय जय राम" हा अत्यंत तेजस्वी असा तेरा अक्षरी मंत्र आहे.या मंत्राचे किंवा नामाचे महत्त्व विषद करणारी त्यांची ३६५ दिवसांची प्रवचने आहेत.नाम स्मरण हे आपण सहजपणे घेत असलेल्या श्वासा सारखे व्हावे या साठी विवीध प्रकारच्या उपाययोजना त्यांनी या प्रवचनातून सांगितल्या आहेत. आमच्या घरी सुध्दा महाराजांची ३६५ दिवसांची प्रवचने असलेले पुस्तक आहे.माझे वडील दररोज त्या दिवशीचे प्रवचन वाचत असत.पहाटे साडेतीन वाजता ब्राह्म्य मुहूर्तावर नामस्मरण करणे हा त्यांचा शेवटच्या दिवसा पर्यंत चालू राहिलेला कार्यक्रम होता. १९ सप्टेंबर २००४ या दिवशी दुपारी दोन ते तीन या वेळात अत्यंत आनंदात महाराजांनी ठरवून दिलेला तेरा अक्षरी मंत्र म्हणत होते. साधारणपणे ३.३० वाजता अंगात स्वच्छ कपडे घालून आणि कपाळाला व्यवस्थित गंध लावून ,डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या अवस्थेत कोणताही आजार नसलेल्या वडीलांनी या जगाचा निरोप घेतला घेतला !......
पंधरा दिवसांनी सहज म्हणून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनांचे पुस्तक हातात घेतले. १९ सप्टेंबर २००४ या दिवशीच्या प्रवचनात महाराजांनी सांगितलेले आहे की शेवटच्या श्वासा नंतरच्या काळात गुरु तुमच्या नामस्मरणाची काळजी घेतील !
विनायक जोशी ( vp )
28 April 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

केदार सोवनी Linux Kernel मास्टर

// श्री स्वामी समर्थ //
     "केदार सोवनी "
Linux Kernel Master
1) बारावीला बोर्डात अकरावा.
२) बॕचलर आॕफ काँम्पूटर २००३.
३) MS Bits Pilani.
4)१९ व्या वर्षी Linux OS लोड करताना माॕनिटर बंद पाडला.
5) वयाच्या २४ व्या वर्षी जगप्रसिध्द Linux journal मध्ये पहिला लेख लिहला.
6)ओॲसीस मध्ये Linux OS बद्दलचा व्हिडीयो.
7) पहिला जाॕब कॕलसाॕफ्ट कंपनीत.
8) न्युयाॕर्क युनव्हर्सिटीच्या संबंधित प्राध्यापकांच्या बरोबर आॕफ शोअरचे काम
9) Linux आणि IOT या विषयांचा  प्रचंड अनुभव
10) मार्व्हल कंपनीच्या मधून तयार केलेल्या ४० लाखांपेक्षा जास्त चालणारी माॕड्यूल्स बाजारात
11) जगप्रसिध्द Apple कंपनीच्या आधुनिक मोबाईलसाठी वायफाय विषयी सल्ला देणाऱ्या टीमचा मेंबर
12) GEEK चा रेग्युलर स्पीकर
13 ) ड्रीम्झ ग्रुपचा फाउंडर मेंबर
    वगैरे  वगैरे ........
माणूस म्हणून ग्रेट !
आज वयाची 35 वर्ष पुर्ण करणाऱ्या केदार सोवनी  यांना अशाच उत्तम दर्जाच्या नविन भराऱ्या घेण्यासाठी शुभेच्छा !!!  👍👍
  विनायक जोशी (vp )
25 April 2016
electronchikatha.blogspot.com

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

बोर्डातील भाच्चे केदार,गौरी,मंदार ,रेणूका

// श्री स्वामी समर्थ //
    " बोर्ड टाॕपर्स भाच्चे "
करवीरनिवासीनी " महालक्ष्मी " यांच्या गावात म्हणजेच कोल्हापूर  मध्ये राजारामपूरी किंवा टाकाळा येथे माझ्या बहिणीचे म्हणजेच सुरेश आणि सुरेखा सोवनी यांचे  अत्यंत शांत आणि समाधानी कुटुंब वास्तव्याला आहे.यांची दोन्ही मुले म्हणजे केदार आणि मंदार आणि दोन्ही सुना म्हणजेच गौरी आणि रेणूका या बारावीच्या परिक्षेत बोर्डा मध्ये आलेल्या आहेत.१९९८ साली सर्वात मोठा मुलगा केदार याने बोर्डात ११ वा येऊन पुढच्या सर्वांना मार्ग खुला करुन दिला.त्या नंतर उरलेल्या सर्वांनी त्याचाच कित्ता गिरवला. मंदार ४ था आला आणि सर्वात धाकटी सुन रेणूका मुलींच्या मध्ये बोर्डात पहिली आली.या चारही जणांनी पुढे तोच फाॕर्म कायम ठेवत उच्च शिक्षण पूर्ण केले. आज या सर्व गोष्टींची आठवण येण्याचे कारण म्हणजे पाच मे या दिवशी बारावीच्या मुलांची असलेली CET ची परिक्षा.या चारही जणांची अभ्यासाची पध्दत वेगवेगळी परंतू तणावपूर्ण नव्हती.
या वर्षीच्या मुलांना सहज सुचना
१) काॕमन सेन्स आणि एकाग्रतेचा वापर करावा.
२)परिक्षेच्या दिवसापर्यंत दैनंदिन कार्यक्रम तोच ठेवावा
३) आपल्याला अचूक उत्तर लिहायचे आहे ,कन्सेप्ट नाही .याचे भान ठेवणे
४)या पंधरा दिवसात थोडे  जादा प्रयत्न केले तर पुढील आयुष्य वेगळ्याच लेव्हलवर जाते.
५) अर्थात ही आयुष्यातील शेवटची परिक्षा नाही आहे याची जाणीवपूर्वक जाणीव ठेवणे.
अत्यंत सहजपणाने आनंदाने तुम्ही सर्व या परिक्षेत उत्तम यश मिळवाल याची आम्हाला खात्री आहे.
तुम्हा सर्वांना कायम मनःपूर्वक शुभेच्छा !  All The Best 👍👍
  विनायक आणि कल्याणी जोशी
  23 April 2016
electronchikatha.blogspot.com

बुधवार, २० एप्रिल, २०१६

देवांची खोली @गुरुप्रसाद

// श्री स्वामी समर्थ  //
       " देवांची खोली "
"गुरुप्रसाद "या आमच्या घरात साधारणपणे बारा बाय पंधरा फुट या आकाराची अतिशय प्रसन्न अशी ही देवांची खोली आहे.या खोलीत असंख्य देव वास्तव्याला  आहेत. तसबिरींच्या रुपात सुरवातीला  महालक्ष्मी आहेत , त्यांच्या शेजारी श्रीराम , लक्ष्मण आणि जानकी अतिशय प्रेमाने हनुमानजींकडे बघत उभे आहेत.या नंतर चिदंबर स्वामी अक्षय्य पात्र हातात घेऊन उभे आहेत. त्यांच्या जवळ कमरेवर हात ठेवून 'पांडुरंग' उभे आहेत.यांच्या शेजारी उजव्या सोंडेचे कडक सोवळे पाळणारे गणेशजी आहेत. खालच्या बाजूस शेगावचे गजानन महाराज आहेत. कडूनिंबाच्या झाडाखाली मिळालेले स्वामी समर्थ आहेत. त्यांच्या शेजारी साईबाबांच्या समाधीचा फोटो आहे. दक्षिण दिशेकडे लक्ष असलेले दक्षिणाभिमुखी 'मारुती राय' आहेत .येथेच आमची कुलदेवता म्हणजेच अंबेजोगाईची 'योगेश्वरी' देवी आहे.राघवेंद्र स्वामी सुध्दा शांतपणाने बसलेले आहेत .या सर्व फोटोंच्या पुढे सर्व मुर्ती आहेत.चिदंबर दिक्षितांच्या वंशजांनी दिलेली तेजस्वी अशी 'शंकरांची 'पिंड आहे.त्यांच्या पुढे धातूच्या गणपतींच्या दोन भरीव मूर्ती आहेत .शंख आणि घंटा आहे . बाळकृष्ण आहेत .अन्नपूर्णा अत्यंत समाधानाने बसलेल्या आहेत .छोटे छोटे टाक आहेत . चार वेगवेगळ्या प्रकारच्या पादूका आहेत .या मध्येच आमच्या प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेची चांदीची नाणी आहेत. बागेमध्ये या सर्व देवांना आवडणारी झाडे म्हणजे तुळस ,बेल,जास्वंद,तगर,कण्हेरी ,, पारीजातक , बोगनवेल किंवा दूर्वा आहेत.
यांच्या बरोबरच सिझन मध्ये येणारा चाफा आहे.जर्बेरा वगैरे फुलांनी मात्र  अजून फ्लाॕवर पाॕट सोडून देवघरात प्रवेश केला नाहीए . पुजेच्या तयारीत उदबत्तीच्या घरात सुगंधी उदबत्या आहेत ,समई लावलेली आहे.नैवेद्याचे दुध ठेवलेले आहे .देव स्वच्छ पुसण्यासाठी वस्त्रे आहेत .गंधा साठी मोठे चंदनाचे खोड आणि सहाण आहे. चतुर्थीला अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्र आहे.ही सर्व तयारी झाली कि निर्विघ्न पणे सर्व गोष्टी  पार पाडणाऱ्या गजाननाचे स्मरण करुन पूजेची सुरवात .   शेजारच्या कपाटात  संतकृपा झालेल्या दासगणू महाराजांचा फोटो आहे. त्यांनी अत्यंत रसाळभाषेत लिहलेल्या किंवा गेयता टिकवून ठेवलेल्या " गजानन विजय "या पोथीची असंख्य पारायणे आईने या खोलीत केलेली आहेत.याच ठिकाणी अथर्वशिर्षाची सहस्त्रावर्तने झाली आहेत.गणपतीच्या पाठोपाठ गौरी आल्या की त्यांच्या समोरे मंत्र जागराची अनेक आवर्तने झाली आहेत. या सर्व देवांची अत्यंत श्रध्देने पूजा वडीलांनी आणि त्यांच्या नंतर आईने केलेली आहे. आमच्या आयुष्यात घडलेल्या असंख्य चांगल्या गोष्टींचे मुळ या खोलीत म्हणजेच देवाच्या खोलीतून निघणाऱ्या स्पंदनांच्या मध्ये आहे .
विनायक जोशी ( vp )
20 April 2016
electronchikatha.blogspot.com

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

जय श्रीराम !

// श्री स्वामी समर्थ //
         " श्रीराम "
१९८८ ते २०१३ अशी २५ वर्षे आमच्या घरी रामनवमीचा उत्सव आईने अत्यंत उत्साहाने आणि कडक शिस्तीत पार पाडला. या उत्सवाच्या आयोजनाची सुरवात दोन महिने आधी म्हणजेच रथसप्तमी पासून सुरु होत असे.पाडवा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या साठी कार्यक्रम ठरविले जात. प्रत्येक वक्त्या बरोबर त्या दिवशी बोलायचा विषय , वेळ वगैरे बोलणे होई.भारुड किंवा किर्तन असेल तर तबला ,पेटी  किंवा त्यांचे साथीदार आणि त्यांची बिदागी वगैरे ठरवावे लागे.पाडव्याच्या आधी घराची आणि बागेची स्वच्छता रंगरंगोटी वगैरे गोष्टी पूर्ण कराव्या लागत आसत.साठ
लोकांना व्यवस्थित बसता येईल अशी बैठक व्यवस्था तयार ठेवावी लागे.नऊ दिवसांची  छापील कार्यक्रम पत्रिका असे.सर्व कार्यक्रम बरोबर ४ वाजता चालू होत असत आणि साधारणपणे ६.३० वाजता संपत .शेवटच्या दिवशी रामनवमी मात्र बरोबर दुपारी १२ वाजता .पाळणा ,किर्तन असा कार्यक्रम असे.या नऊ दिवसात एकदा तरी  हनुमानजी प्रवचन ऐकायला येऊन जात .राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी भंडारा .सर्वांना जेवण आणि उत्सवाची सांगता.
लहानपणी " रामचरित मानस " पासून राम दर्शनाची  सुरवात झाली .पुढे संपूर्ण रामायण वगैरे वाचले. दररोज संध्याकाळ मात्र भिमरुपी , रामरक्षा वगैरे नित्य स्तोत्रे म्हणत असू. रामरक्षा हे जबरदस्त संरक्षक कवच आहे.राम या शब्दाच्या भोवती शेकडो आठवणी आहेत. कधीतरी संध्याकाळच्या वेळी अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण अशा आवाजात वडीलांनी म्हणलेले " करुणाष्टक " ऐकू यायला लागते. सुधीर फडके यांनी गायलेले तेजस्वी अशा गीत रामायणाचे स्वर कानावर पडतात आणि या एकवचनी श्रीरामाला मनोभावे हात जोडले जातात .
विनायक जोशी ( vp )
15 April 2016
electronchikatha.blogspot.com

रविवार, १० एप्रिल, २०१६

हास्य सम्राट दिपक शंकर देशपांडे

// श्री स्वामी समर्थ //
      "हास्य सम्राट "
   "दिपक शंकर देशपांडे "
ह.भ.प. देशपांडे गुरुजींचा नातू , उत्तम प्रकारचे चित्रकला शिक्षक आणि हौशी कठपुतळीकार शंकररावांचा मुलगा , हरीभाई देवकरण शाळेचा विद्यार्थी , सोलापूर मधील नाट्यआराधना संस्थेचा सदस्य , गुरुराज अवधानी किंवा अतुल कुलकर्णी यांच्या बरोबर याच संस्थेत पडेल ते काम करणारा  कलाकार , सांगलीच्या शांतीनिकेतन काॕलेज मधील विद्यार्थी , सोलापूर मधील कला महाविद्यालयातील प्राध्यापक, लक्ष्मण राव देशपांडे यांच्या कडून प्रेरणा घेऊन शेकडो एकपात्री प्रयोग करणारा कलाकार  आणि सर्वांच्या घराघरात "झी मराठी " मुळे पोचलेला हा हास्य सम्राट आहे. हास्य सम्राट अशी लोकमान्यता मिळाल्या नंतर मात्र सुधीर गाडगीळ वगैरे मंडळींंच्या बरोबरीने अनेक परदेशी वाऱ्या त्याने केल्या आहेत. आदर्शनगर या आमच्या काॕलनीत तो ८ वीत असताना राहायला आला. त्यांचे एकत्रित कुटुंब होते.याचे वडील अतिशय उत्तम असे गणिताचे शिक्षक होते.तसेच ते उत्तम चित्रकारही होते. कठपुतळीचे खुप प्रकारचे खेळ ते करत असत. सर्व बाहुल्या ते स्वतः निरूपयोगी वस्तूंची योग्य जुळवाजुळव करून तयार करत असत. दिपक वरती या सर्व गोष्टींचा चांगलाच प्रभाव होता. अतिशय गजबजलेले घर असूनही तो त्या स्थितीतही स्थितप्रज्ञा सारखा राहून "उत्तम चित्रे " काढत असे.त्याची
  आई अत्यंत कष्टाळु आणि धार्मिक आहे. २०१४ च्या डिसेंबर मध्ये  एका लग्नाच्या निमित्ताने आमची भेट झाली त्या वेळी सहजपणाने सांगीतलेली
गोष्ट खाली सांगत आहे. सांगलीच्या शांतिनिकेतन येथे तो ATD म्हणजेच
  Art Teacher Diploma
करण्यासाठी गेला होता.वडीलांच्या वरती भार नको म्हणून शक्यतो
शिक्षण स्वकमाईतून करावे अशी त्याची कायम धडपड असायची. याच वेळी त्याने देशपांडे सरांची परवानगी घेऊन  "वऱ्हाड निघाले लंडनला" हा एकपात्री कार्यक्रम हौशी कलाकार म्हणून बसवला होता.सोलापूर मधील
  एका  मोठया माणसाने त्याला कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते .सर्व तयारी करुन तो या पहिल्या जाहीर कार्यक्रमासाठी सांंगली वरुन आला होता..सोलापूर मध्ये आल्यावर त्याला अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे कळले.या नंंतर माझ्या आईला त्याने
सविस्तर सगळी हकिकत सांंगितली.
आईने आमच्या काॕलनीमधील सर्वांना
बोलावुन आमच्या घराच्या  गच्ची वरती "दिपकचा" पहीला जाहीर असा एकपात्री कार्यक्रम आतिशय उत्साहाने आणि योग्य मोबदला देऊन पार पाडला ! या नंतर मात्र त्याने आत्मविश्वासाने कार्यक्रम करणे चालू केले.सोलापूर मधील समस्त जनतेने त्याला भरभरुन प्रेम दिले आहे.
   आमची काँलनी आणि आमचे घर त्याच्या सर्व कष्टांचे आणि यशाचे साक्षीदार आहेत. सर्व प्रकारची ऐहिक सुखे प्राप्त झाली आहेत. घरच्या मंडळींना कृतकृत्य वाटेल असे  अनेक  प्रकारचे मान -सन्मान त्याला  मिळाले आहेत. सोलापूर मधील सिध्दरामेश्वराचा आशिर्वाद लाभलेला हा जगन्मित्र आहे.अत्यंत लहान वयातच जत्रेमधील कठपुतळ्यांच्या स्टाॕल बाहेर  मोठ्या बाहुलीचा पोशाख घालून लहान मुलांना हसवायला बाहेर पडलेला हा हरहुन्नरी कलाकार आणि आमचा बालमित्र आजच्या हास्याच्या दुनियेचा " हास्य सम्राट" झाला आहे
             विनायक जोशी (vp)
                ३० मे २०१५
electronchikatha.blogspot.com

गुरुत्वाकर्षण

// श्री स्वामी समर्थ //
  " गुरुत्वाकर्षण "
१९८४ साली लहान भावाच्या काँलेज मधील प्रोजेक्ट साठी कराड इंजिनियरींग काँलेज मधे मुख्य असलेल्या सरांना भेटायला गेलो.त्यांनी झाडावरुन पडणाऱ्या पानाची Velocity मोजा असा अत्यंत विचित्र प्रोजेक्ट सांगितला . त्या वेळी Gravitational Force या गोष्टीची  पहिल्यांदा  मुलाखत झाली. त्या नंतर मात्र  बरीच वर्षे "Depth" "velocity " "gravity " वगैरे घाबरवणारे शब्द आसपास आले नव्हते . Tata Tea या चहाच्या मशीनच्या वेळी पहिल्यांदा या gravitational force ला टाळून चालणार नाही याचा प्रत्यय आला.बेसिक मशिनच्या डोक्यावरती साधारणपणे जमिनीपासून १२ फूट उंचीवरती चहा अचूक मोजायसाठी एक जर्मन वजन काटा बसवलेला होता. या वजन काट्यावरती अचूक पणे मोजलेला हा चहा येथून साधारणपणे  आठ फूट खाली पिशवीत पडायचा.हा वेगवान प्रवास पूर्णपणे Gravity च्या ताब्यात असे. या वेळी पहिल्यांदा 1/2 GT Square ने आमच्या आयुष्यात प्रवेश केला.मशिनचा वेग नियंत्रित करणाऱ्या या अदृश्य शक्ती चा संचार अनुभवला. मशिनचा वेग हा फक्त electronics किंवा mechanical गोष्टींच्या वरती अवलंबून नसून गुरुचे तत्त्व आणि गुरु बद्दलचे आकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षणा वरती सुध्दा  अवलंबून आहे ही वस्तूस्थिती लक्षात आली !!!
विनायक जोशी (vp)
8 October 2015
electronchikatha.blogspot.com

केळकर अत्तरवाले आणि FIM

// श्री स्वामी समर्थ //
  " FIM चा जन्म "
Field interfacing modules चा जन्म . आमच्या कंपनीला ठाणे येथील अत्तर बनविण्यासाठी सुप्रसिध्द असलेल्या एका कंपनीचे काम मिळाले होते. वेगवेगळ्या प्रकारची  अत्तरे तयार करायचे formulae  फक्त ठराविक मालक मंडळींच्या जवळच ठेवायचे  असल्यामुळे एक Automatic  मशीन त्यांना पाहिजे होते. साधारणपणे ७० फुट लांब असे रुळ होते. त्याच्या वरून एक SS Trolley जाणार होती.Trolley च्या वरती थोड्या उंचीवर थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळ्या केमिकल्सच्या टाक्या होत्या. त्या टाक्यां मध्ये  वेगवेगळ्या प्रमाणात केमिकल्स  होती.एखाद्या अत्तराचा फाॕर्म्युला कंट्रोलर मध्ये  भरला की त्या प्रमाणे  वेगवेगळ्या टाक्यां मधील केमिकल्स  योग्य प्रमाणात  गोळा करत ती Trolley शेवट पर्यंत जात असे.ही गोळा झालेली केमिकल्स शेवटच्या स्टेशन वरती वेगाने एकमेकांच्या मध्ये मिसळत  आणि त्या नंतर छानसे आणि अत्यंत महागडे अशा प्रकारचे अत्तर तयार होत असे. हे मशिन सुध्दा अतिशय महागडे  असल्यामुळे त्याला त्या काळातील सुप्रसिद्ध कंपनीचा PLC वापरला होता.सर्व गोष्टी असंख्य वेळा तपासल्या जात होत्या.सर्व ट्रायल्स झाल्या नंतर  mechanical फिनिशींग वगैरे कामे झाली आणि फायनल चेकींगच्या वेळी मशीन बंद पडलेले आढळले.अर्थातच PLC वाली मंडळी आली आणि input module जळाले आहे असे सांगितले .नवीन module ची किंमत साधारणपणे अठरा हजार रुपये होती. Mechanical फिनीशींग करताना welding करावे लागे .त्या वेळी  earth चुकीची जोडली गेली आणि त्या मुळे module बंद पडले होते.या नंतर मात्र  मशीन वरती काहीही घडले तरी PLC सुरक्षित रहावा म्हणून बाहेरून optical isolation चे सर्किट लावायचे आम्ही ठरवले. PLC ला येणाऱ्या  आणि जाणाऱ्या प्रत्येक signal ला field पासून वेगळे केले.या एका बदलामुळे आमची mechanical  ची मंडळी सुध्दा खुष झाली आणि पहिल्या सारखी मुक्त पणे काम करू लागली. PLC servicing हा प्रकार अतिशय कमी झाला. पुढच्या मशीन साठी या module चे बारसे झाले . त्याचे नाव होते FIM.
      विनायक जोशी (vp)
          २० जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

अमितचा घोडा

// श्री स्वामी समर्थ //
   "अमितचा घोडा "
पुण्यामधे पुलाच्या वाडी जवळ किंवा Z bridge च्या जवळ अशा दोन ठिकाणी लग्नाच्या प्रसंगी लागणारे घोडे किंवा बग्गी भाड्याने मिळते.
याच ठिकाणी कायम स्वरुपी हे घोडे मुक्कामाला  असतात.आपला अमित ८वीत असल्यापासून शाळेतून आल्या नंतर उशीरा पर्यंत या घोडयांच्या
राज्यात रममाण होत असे.अगदी लहानपणापासून त्याचा सर्व पाळीव  प्राण्यांच्या  बाबतीतील  दांडगा अभ्यास चालू असे. मधूनमधून शाळेचा अभ्यास किंवा  होमवर्क वगैरे किरकोळ गोष्टींच्याकडे त्याचे लक्ष असे. सकाळी उठून साधारणपणे खेळाडू वापरतात तशा मेडीकल बाॕलने घोडयाला मसाज करणे , एका थोड्याशा खरखरीत ब्रशने पूर्णपणे त्याला स्वच्छ  करणे,साधारणपणे एक कि.मी. घोड्यांना फिरवून आणणे, सदोदीत त्यांच्याशी बोलणे , आणि कोठेही कामाला निघताना त्यांच्या कानात कानमंत्र देऊन मग रिकीबीत
पाय टाकणे , पूर्ण गर्दी  मधून त्याला घेऊन जाणे, वरातीच्या कामावरून आल्यावर त्याला खायला घालणे वगैरे कामे अत्यंत मन लावून तो करत असे.या त्याच्या घोड्यावरील  प्रेमाचा उत्साह दहावी मध्ये  संपला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आता कोठेही लग्नाच्या मिरवणूकी मधे फटाके वाजत असून सुध्दा त्या आवाजाला न घाबरता दिमाखदारपणे नवरदेवाला घेऊन जाणारा पांढरा शुभ्र  घोडा दिसला कि आठवण येते ती अमित पाटोळेची !!
       विनायक जोशी (vp)
          ८  जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

Honda 3 G

// श्री स्वामी समर्थ //
      " होंडा ३ जी "
१९८८ साली एका जाहीर कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते १००० कायनेटीक होंडा या स्कुटर्सचे वाटप झाले.त्या मध्ये आम्ही ५ जणांनी या गाड्या घेतल्या." हमारा बजाज " ला निरोप दिला. या होंडाच्या गाडीला बॕटरी स्टार्टर होते . गियर नव्हते .उत्तम प्रकारचे एअरोडायनेमिक्स होते.छान पैकी बेल्ट वरती चालणारा ड्राइव्ह होता.महत्त्वाचे म्हणजे खणखणीत हाॕर्न होता. या नंतर मात्र सोलापूर ,कोल्हापूर ,शिर्डी,मुंबई वगैरे रेग्युलर दौरे या गाडीमुळे उत्तम प्रकारे पार पडले.इंजिनचे फायरींग किंवा हाय स्पिडला होणारे उत्तम ब्रेकिंग लाजवाब होते. तरुण रक्त असल्यामुळे शक्यतो थ्रोटल फुल ठेऊन म्हणजेच साधारणपणे ८०-८४कि.मी च्या वेगानेच कायम ही गाडी चालवली.सलग १५ वर्षे वापरुन तिला सन्मानाने निवृत्त केले.या नंतर मात्र काळानुरुप होंडा अॕक्टीव्हा घेतली. पूर्णपणे मेटल बाॕडी असलेली आणि फोर स्ट्रोक इंजिन म्हणून घेतली.चाळीशी पार केलेल्या किंवा चाळीसच्या वेगाने गाडी चालवणाऱ्यांसाठी गाडी आणि तिचे सस्पेंशन एकदम छान.याचे ब्रेक्स मात्र अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे पावसाळ्यात वेगाने चालवणे अतिशय अवघड.या गाडीने सुध्दा एक लाख किलोमीटर उत्तम अशी सेवा दिली आहे.आता याच होंडा सेरीज मधील होंडा ३ जी ही गाडी " श्री स्वामी समर्थ " प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिल २०१६या दिवशी  घेत आहे. गेली २७ वर्षे उत्तम सेवा देणाऱ्या होंडांच्या बरोबर आनंदाने पुढील मार्गक्रमण करायचे आहे. रिकाम्या रोडवरती या गाडीच्या इंजिनचा आणि एयर कटींगचा आवाज ऐकत किंवा चढावरती टायमिंग बेल्टची कमाल अनुभवत ,रात्रीच्या वेळी टेल लँप आणि इंडीकेटर्सचा सुरेख ताल जुळवत,हाॕर्नचा मोठ्या आवाजातील उदघोष करीत हा आनंदादायी प्रवास चालू ठेवायचा आहे.
विनायक जोशी ( vp )
9 एप्रिल 2016
electronchikatha.blogspot.com