सोमवार, १८ एप्रिल, २०१६

जय श्रीराम !

// श्री स्वामी समर्थ //
         " श्रीराम "
१९८८ ते २०१३ अशी २५ वर्षे आमच्या घरी रामनवमीचा उत्सव आईने अत्यंत उत्साहाने आणि कडक शिस्तीत पार पाडला. या उत्सवाच्या आयोजनाची सुरवात दोन महिने आधी म्हणजेच रथसप्तमी पासून सुरु होत असे.पाडवा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या साठी कार्यक्रम ठरविले जात. प्रत्येक वक्त्या बरोबर त्या दिवशी बोलायचा विषय , वेळ वगैरे बोलणे होई.भारुड किंवा किर्तन असेल तर तबला ,पेटी  किंवा त्यांचे साथीदार आणि त्यांची बिदागी वगैरे ठरवावे लागे.पाडव्याच्या आधी घराची आणि बागेची स्वच्छता रंगरंगोटी वगैरे गोष्टी पूर्ण कराव्या लागत आसत.साठ
लोकांना व्यवस्थित बसता येईल अशी बैठक व्यवस्था तयार ठेवावी लागे.नऊ दिवसांची  छापील कार्यक्रम पत्रिका असे.सर्व कार्यक्रम बरोबर ४ वाजता चालू होत असत आणि साधारणपणे ६.३० वाजता संपत .शेवटच्या दिवशी रामनवमी मात्र बरोबर दुपारी १२ वाजता .पाळणा ,किर्तन असा कार्यक्रम असे.या नऊ दिवसात एकदा तरी  हनुमानजी प्रवचन ऐकायला येऊन जात .राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी भंडारा .सर्वांना जेवण आणि उत्सवाची सांगता.
लहानपणी " रामचरित मानस " पासून राम दर्शनाची  सुरवात झाली .पुढे संपूर्ण रामायण वगैरे वाचले. दररोज संध्याकाळ मात्र भिमरुपी , रामरक्षा वगैरे नित्य स्तोत्रे म्हणत असू. रामरक्षा हे जबरदस्त संरक्षक कवच आहे.राम या शब्दाच्या भोवती शेकडो आठवणी आहेत. कधीतरी संध्याकाळच्या वेळी अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण अशा आवाजात वडीलांनी म्हणलेले " करुणाष्टक " ऐकू यायला लागते. सुधीर फडके यांनी गायलेले तेजस्वी अशा गीत रामायणाचे स्वर कानावर पडतात आणि या एकवचनी श्रीरामाला मनोभावे हात जोडले जातात .
विनायक जोशी ( vp )
15 April 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा