रविवार, १० एप्रिल, २०१६

हास्य सम्राट दिपक शंकर देशपांडे

// श्री स्वामी समर्थ //
      "हास्य सम्राट "
   "दिपक शंकर देशपांडे "
ह.भ.प. देशपांडे गुरुजींचा नातू , उत्तम प्रकारचे चित्रकला शिक्षक आणि हौशी कठपुतळीकार शंकररावांचा मुलगा , हरीभाई देवकरण शाळेचा विद्यार्थी , सोलापूर मधील नाट्यआराधना संस्थेचा सदस्य , गुरुराज अवधानी किंवा अतुल कुलकर्णी यांच्या बरोबर याच संस्थेत पडेल ते काम करणारा  कलाकार , सांगलीच्या शांतीनिकेतन काॕलेज मधील विद्यार्थी , सोलापूर मधील कला महाविद्यालयातील प्राध्यापक, लक्ष्मण राव देशपांडे यांच्या कडून प्रेरणा घेऊन शेकडो एकपात्री प्रयोग करणारा कलाकार  आणि सर्वांच्या घराघरात "झी मराठी " मुळे पोचलेला हा हास्य सम्राट आहे. हास्य सम्राट अशी लोकमान्यता मिळाल्या नंतर मात्र सुधीर गाडगीळ वगैरे मंडळींंच्या बरोबरीने अनेक परदेशी वाऱ्या त्याने केल्या आहेत. आदर्शनगर या आमच्या काॕलनीत तो ८ वीत असताना राहायला आला. त्यांचे एकत्रित कुटुंब होते.याचे वडील अतिशय उत्तम असे गणिताचे शिक्षक होते.तसेच ते उत्तम चित्रकारही होते. कठपुतळीचे खुप प्रकारचे खेळ ते करत असत. सर्व बाहुल्या ते स्वतः निरूपयोगी वस्तूंची योग्य जुळवाजुळव करून तयार करत असत. दिपक वरती या सर्व गोष्टींचा चांगलाच प्रभाव होता. अतिशय गजबजलेले घर असूनही तो त्या स्थितीतही स्थितप्रज्ञा सारखा राहून "उत्तम चित्रे " काढत असे.त्याची
  आई अत्यंत कष्टाळु आणि धार्मिक आहे. २०१४ च्या डिसेंबर मध्ये  एका लग्नाच्या निमित्ताने आमची भेट झाली त्या वेळी सहजपणाने सांगीतलेली
गोष्ट खाली सांगत आहे. सांगलीच्या शांतिनिकेतन येथे तो ATD म्हणजेच
  Art Teacher Diploma
करण्यासाठी गेला होता.वडीलांच्या वरती भार नको म्हणून शक्यतो
शिक्षण स्वकमाईतून करावे अशी त्याची कायम धडपड असायची. याच वेळी त्याने देशपांडे सरांची परवानगी घेऊन  "वऱ्हाड निघाले लंडनला" हा एकपात्री कार्यक्रम हौशी कलाकार म्हणून बसवला होता.सोलापूर मधील
  एका  मोठया माणसाने त्याला कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते .सर्व तयारी करुन तो या पहिल्या जाहीर कार्यक्रमासाठी सांंगली वरुन आला होता..सोलापूर मध्ये आल्यावर त्याला अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे कळले.या नंंतर माझ्या आईला त्याने
सविस्तर सगळी हकिकत सांंगितली.
आईने आमच्या काॕलनीमधील सर्वांना
बोलावुन आमच्या घराच्या  गच्ची वरती "दिपकचा" पहीला जाहीर असा एकपात्री कार्यक्रम आतिशय उत्साहाने आणि योग्य मोबदला देऊन पार पाडला ! या नंतर मात्र त्याने आत्मविश्वासाने कार्यक्रम करणे चालू केले.सोलापूर मधील समस्त जनतेने त्याला भरभरुन प्रेम दिले आहे.
   आमची काँलनी आणि आमचे घर त्याच्या सर्व कष्टांचे आणि यशाचे साक्षीदार आहेत. सर्व प्रकारची ऐहिक सुखे प्राप्त झाली आहेत. घरच्या मंडळींना कृतकृत्य वाटेल असे  अनेक  प्रकारचे मान -सन्मान त्याला  मिळाले आहेत. सोलापूर मधील सिध्दरामेश्वराचा आशिर्वाद लाभलेला हा जगन्मित्र आहे.अत्यंत लहान वयातच जत्रेमधील कठपुतळ्यांच्या स्टाॕल बाहेर  मोठ्या बाहुलीचा पोशाख घालून लहान मुलांना हसवायला बाहेर पडलेला हा हरहुन्नरी कलाकार आणि आमचा बालमित्र आजच्या हास्याच्या दुनियेचा " हास्य सम्राट" झाला आहे
             विनायक जोशी (vp)
                ३० मे २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा