बुधवार, २० एप्रिल, २०१६

देवांची खोली @गुरुप्रसाद

// श्री स्वामी समर्थ  //
       " देवांची खोली "
"गुरुप्रसाद "या आमच्या घरात साधारणपणे बारा बाय पंधरा फुट या आकाराची अतिशय प्रसन्न अशी ही देवांची खोली आहे.या खोलीत असंख्य देव वास्तव्याला  आहेत. तसबिरींच्या रुपात सुरवातीला  महालक्ष्मी आहेत , त्यांच्या शेजारी श्रीराम , लक्ष्मण आणि जानकी अतिशय प्रेमाने हनुमानजींकडे बघत उभे आहेत.या नंतर चिदंबर स्वामी अक्षय्य पात्र हातात घेऊन उभे आहेत. त्यांच्या जवळ कमरेवर हात ठेवून 'पांडुरंग' उभे आहेत.यांच्या शेजारी उजव्या सोंडेचे कडक सोवळे पाळणारे गणेशजी आहेत. खालच्या बाजूस शेगावचे गजानन महाराज आहेत. कडूनिंबाच्या झाडाखाली मिळालेले स्वामी समर्थ आहेत. त्यांच्या शेजारी साईबाबांच्या समाधीचा फोटो आहे. दक्षिण दिशेकडे लक्ष असलेले दक्षिणाभिमुखी 'मारुती राय' आहेत .येथेच आमची कुलदेवता म्हणजेच अंबेजोगाईची 'योगेश्वरी' देवी आहे.राघवेंद्र स्वामी सुध्दा शांतपणाने बसलेले आहेत .या सर्व फोटोंच्या पुढे सर्व मुर्ती आहेत.चिदंबर दिक्षितांच्या वंशजांनी दिलेली तेजस्वी अशी 'शंकरांची 'पिंड आहे.त्यांच्या पुढे धातूच्या गणपतींच्या दोन भरीव मूर्ती आहेत .शंख आणि घंटा आहे . बाळकृष्ण आहेत .अन्नपूर्णा अत्यंत समाधानाने बसलेल्या आहेत .छोटे छोटे टाक आहेत . चार वेगवेगळ्या प्रकारच्या पादूका आहेत .या मध्येच आमच्या प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेची चांदीची नाणी आहेत. बागेमध्ये या सर्व देवांना आवडणारी झाडे म्हणजे तुळस ,बेल,जास्वंद,तगर,कण्हेरी ,, पारीजातक , बोगनवेल किंवा दूर्वा आहेत.
यांच्या बरोबरच सिझन मध्ये येणारा चाफा आहे.जर्बेरा वगैरे फुलांनी मात्र  अजून फ्लाॕवर पाॕट सोडून देवघरात प्रवेश केला नाहीए . पुजेच्या तयारीत उदबत्तीच्या घरात सुगंधी उदबत्या आहेत ,समई लावलेली आहे.नैवेद्याचे दुध ठेवलेले आहे .देव स्वच्छ पुसण्यासाठी वस्त्रे आहेत .गंधा साठी मोठे चंदनाचे खोड आणि सहाण आहे. चतुर्थीला अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्र आहे.ही सर्व तयारी झाली कि निर्विघ्न पणे सर्व गोष्टी  पार पाडणाऱ्या गजाननाचे स्मरण करुन पूजेची सुरवात .   शेजारच्या कपाटात  संतकृपा झालेल्या दासगणू महाराजांचा फोटो आहे. त्यांनी अत्यंत रसाळभाषेत लिहलेल्या किंवा गेयता टिकवून ठेवलेल्या " गजानन विजय "या पोथीची असंख्य पारायणे आईने या खोलीत केलेली आहेत.याच ठिकाणी अथर्वशिर्षाची सहस्त्रावर्तने झाली आहेत.गणपतीच्या पाठोपाठ गौरी आल्या की त्यांच्या समोरे मंत्र जागराची अनेक आवर्तने झाली आहेत. या सर्व देवांची अत्यंत श्रध्देने पूजा वडीलांनी आणि त्यांच्या नंतर आईने केलेली आहे. आमच्या आयुष्यात घडलेल्या असंख्य चांगल्या गोष्टींचे मुळ या खोलीत म्हणजेच देवाच्या खोलीतून निघणाऱ्या स्पंदनांच्या मध्ये आहे .
विनायक जोशी ( vp )
20 April 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा