रविवार, १० एप्रिल, २०१६

भिक्षा

// श्री स्वामी समर्थ //
          " भिक्षा "
समर्थ रामदास स्वामींनी भिक्षेला अमरवेलाची उपमा दिली आहे. समाजासाठी कायम काम करणाऱ्या "महंतांना" दररोज नविन पाच घरी भिक्षा मागायचा सल्ला समर्थांनी दिला आहे.यामुळे दुष्काळ जरी पडला तरी पोट भरण्यासाठी या भिक्षेचा उपयोग होईल असे त्यांना वाटत असे.
भिक्षा या शब्दामुळे भिक्षुक मंडळींची आठवण आली.योग्य त्या आघातांचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे म्हणणारे , या स्तोत्रांच्या आवर्तनातून घरामध्ये तेजाची स्पंदने निर्माण करणारे,यजमानांचे हित चिंतणारे वगैरे बरीच कामे या भिक्षुक मंडळींच्या कडे असत.
या भिक्षेचा आणि मुंजीचा सुध्दा असाच संबंध आहे.लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली चैतन्य मूर्ती वयाच्या ८ व्या वर्षी मात्र "बटुच्या " रुपात गुरुगृही पुढील ज्ञान संपादन करण्यासाठी जायला तयार होते तो हा क्षण ! मुंज या विधी मध्ये या बटूच्या कानात त्याचे गुरु एक मंत्र सांगतात .हा मंत्र म्हणजे त्यापुढील काळात एकमेकांशी कायम स्वरुपी बांधलेली गाठ असते.या पुढे हे दोघेही Paired Device सारखे कोणतेही प्रोटोकाॕल न वापरता एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण करु शकतात. पंचा नेसलेला ,डोक्याचा घेरा केलेला,हातात दंड धरलेला तो बटू पुढील मार्ग क्रमण करण्यासाठी तयार होतो.या नंतर आयुष्यात पहिल्यांदा अत्यंत स्पष्ट आवाजात तो " ऊँ भवति भिक्षां देही " असा उच्चार करुन भिक्षा मागतो. .............
अर्थात हे सर्व मुंज नावाची "इव्हेंट" नव्हती त्या काळातील आहे !
भिक्षा , भिक्षेकरी , माधुकरी , भिक्षुक, भिक्षावळ हे शब्द कानावर पडले की जुन्या आठवणी जागृत होतात !
विनायक जोशी (vp )
10 April 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा