// श्री स्वामी समर्थ //
" कात्रजचा घाट "
लहानपणी पश्चिम महाराष्ट्रातून येताना पहिल्यांदा या कात्रजच्या घाटाचे विलोभनीय दर्शन घडले . अत्यंत उत्सुकतेने घाटा मधील काळ्या कभिन्न कातळांच्या जवळ बाराबंदी घातलेले मावळे दिसतात का हे शोधता शोधता पुणे आले.
शनिवार वाडा बघितला .त्या नंतर लाल महाल.अमावस्येच्या नीरव शांततेत आणि लाख सैनिकांच्या गराड्यात बसलेल्या शाहीस्तेखाना वरती अचानक हल्ला चढवून त्याची बोटे तोडणारे महाराज दिसले.या हल्यानंतर थोड्याच वेळात कात्रजच्या घाटातून शिंगाला पलीते लावलेले असंख्य बैल पळताना दिसू लागले. खानाचे सर्व सैनिक कात्रजच्या दिशेने गेले आणि औरंगजेबाच्या मामाला अद्दल घडवून महाराज कात्रजच्या विरूद्ध दिशेने सुखरुप निघून गेले.या वेळेला कात्रजच्या या घाटाने आपल्या या राजाला उत्तम सलामी दिली. १९७० च्या दशकात याच घाटात एका सिनेमाचे चित्रीकरण चालू होते.या सिनेमात हिरोचे काम करणाऱ्या कलाकाराचे लागोपाठ सहा अपयशी सिनेमे येऊन गेले होते.अत्यंत सुशिक्षित कुटुंबातील ह्या मुलाला बसच्या आतमध्ये नाचत गाणे म्हणायचे होते. घोगऱ्या आवाजाचा आणि उंच व कृश असलेला हा मुलगा याच कात्रजच्या घाटात नाचण्याचा प्रयत्न करत होता. युनिट मधील मंडळी आणि येथील निसर्ग त्याला प्रोत्साहन देत होते .बऱ्याच रीटेक्स नंतर कात्रजच्या बोगद्यातील या गाण्याचे चित्रीकरण पार पडले.सिनेमा सुद्धा बऱ्यापैकी चालला.कात्रजच्या या घाटाने या तरुण नायकाला स्फूर्ती दिली.या सिनेमाचे नाव होते "बाँम्बे टू गोवा "आणि हीरो होता "अमिताभ"
कात्रजच्या या बोगद्याकडे सांगायला बरेच आहे ,फक्त ऐकायला येणारे कान पाहिजेत आणि थोडासा निवांतपणा !!!
विनायक जोशी
३१ मे २०१६
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, ३१ मे, २०१६
कात्रजचा घाट
गुरुवार, २६ मे, २०१६
India 2016
// श्री स्वामी समर्थ //
" INDIA 2016 "
" Start Up "
स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या पिढी मध्ये जन्माला आलेले आणि स्वतंत्र विचारधारा असलेले पंतप्रधान आपल्याला मिळाले आहेत .त्यांनी सर्व तरुण मंडळींना " स्टार्ट अप " ची साद घातली आहे. Information Technology च्या जगात तरुण मंडळीनी कोणत्यातरी कंपनीची झूल पाठीवर घेऊन नंदीबैला सारखे काम करु नये हे यातून अभिप्रेत आहे. फक्त ८ ते १० माणसांनी बरोबर येऊन ज्या क्षेत्रात आपले शिक्षण झाले आहे त्या विषयी सर्व प्रकारच्या सर्व्हिस देऊन सर्वोत्कर्ष करुन घ्यायचा.या साठी ठराविक शहरांमध्येच येण्याची जरुरी पडणार नाही.अशा छोटया छोट्या आणि संख्येने खूप कंपन्या स्थापन झाल्यास उत्तम दर्जाचे वेगवान सर्व्ह्रर्स् वगैरे गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील. जगातील नावाजलेल्या कोणत्याही कंपन्यानी भारतात कोणत्याही प्रकारे संशोधन आणि विकास केन्द्र स्थापन केलेले नाही. भारत हा फक्त बाॕडी शाॕपींग करणारा किंवा code maintenance करणारा , वेळी अवेळी कामाला सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या इंजिनियर्स तरुणांचा आहे या वस्तुस्थिती पासून दूर जायची संधी सर्व तरुणांना या स्टार्ट अप मुळे उपलब्ध झालेली आहे. इंग्रजीची किंवा परदेशी कंपन्यांची हुजरेगिरी न करता आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन अत्यंत आक्रमक पणे सुरुवात करायची आहे. INDIA या शब्दाचा एकमेव अर्थ "Independent Nation Declared In August " असा आहे हे आपल्या सामर्थ्याने पूर्ण जगाला दाखवून द्यायचे आहे.
विनायक जोशी (vp)
26 January 2016
electronchikatha.blogspot.com
रविवार, १५ मे, २०१६
येरे येरे पावसा !!
// श्री स्वामी समर्थ //
" शक्ती चांगल्या विचारांची "
माझा मित्र विवेक याने सांगितल्याप्रमाणे दिवसातून एक मिनीट तरी शांतपणाने आणि आनंदाने स्थिर बसून पावसाचे गाणे ऐकणार आहे. भरपूर पडणारा पाऊस आणि त्या मुळे तृप्त झालेली जीवसृष्टी यांचेच विचार मनात आणायचे आणि या विचारांची आंदोलने प्रसारीत करायची .सध्या तरी या पाॕझिटीव्ह विचारांचा पाऊस सुरु करुयात. खऱ्या पावसाला सुध्दा त्या मध्ये चिंब भिजण्यासाठी यायला नक्की आवडेल !!
विनायक जोशी (vp )
15 May 2016
electronchikatha.blogspot.com
शनिवार, १४ मे, २०१६
वैशाख
// श्री स्वामी समर्थ //
" वैशाख "
सोलापूर ही माझी जन्मभूमी असल्यामुळे उन्हाळा या विषयावरील प्रॕक्टिकल शिक्षण लहानपणीच झाले होते.भर उन्हात अनवाणी पायाने हिंडणे किंवा दुपारी १२ च्या उन्हात चांदण्यात फिरायला बाहेर पडावे तसे हिंडणे. कडूनिंबाच्या सावलीत बसून गप्पागोष्टी करणे वगैरे नित्यक्रम होता.उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईची वारी असायची .त्यामुळे रत्नागिरीच्या हापूस आंब्यांच्या बरोबरच उकाडा आणि घामाच्या धारा यांचा अनुभव मिळायचा.पुण्यात आल्यावर मात्र उन्हाळा अगदी मेंगळट वाटू लागला . पुढे कामा निमित्ताने विदर्भातील उन्हाळा किंवा तेथील डेझर्ट कुलर यांचा अनुभव घेतला.कुलरच्या पाण्यात मुक्कामाला येणारे साप हा आवारपूर स्पेशल उन्हाळा असे.या नंतर माउंट अबूला वळसा घालून पालनपूर या गावचा उन्हाळा .तेथेच नॕशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या डेअरी मध्ये तयार होणारे अमुल बटर आणि अतिउष्णते मुळे रस्त्याच्या कडेला गलितगात्र होऊन पडलेले मोर भेटले.या नंतर डायरेक्ट मनाली. या येथे बाजपेयींचे उन्हाळ्यातील विश्रामधाम आणि उन्हाळ्याच्या मुळे वितळलेल्या बर्फाच्या मधून जाणाऱ्या रस्त्याने जाऊन रोहतांग पास बघता आले. तेथून दक्षिणेकडील खास उन्हाळा .नंदी हिल्सवरती अवाढव्य अशा नंदीच्या पायापाशी बसून अनुभवला. तुतिकोरीन या अत्यंत रुक्ष प्रदेशातील चटके अनुभवले. त्रिचूर वगैरे गावातील मेणचट उन्हाळ्याची झलक अनुभवता आली. तिरुपती येथील गदगदणारा उकाडा अनुभवावा लागला.आंध्र प्रदेशा मधील जंगलातील म्हणजेच मिरियलगौडा, कलवाकुरती,अचलपेठ येथील नक्षलग्रस्त भागातील भयभीत करणारा उन्हाळा बघितला. या सर्व प्रकारात वैशाखा मध्ये पेटणारे वणवे बघता आले.हे सर्व मनमोकळेपणाने जसे आहे तसे बघता आले . एयर कंडीशन गाड्या ,हाॕटेल्स ,त्रासदायक असे मोबाईल फोन,टुरिस्टचे लोंढे यांच्या अनुपस्थितीमुळे ही सर्व ठिकाणे कायमची लक्षात राहिली . सिमेंटच्या जंगलात बसून वाढलेल्या उन्हाळ्याची चर्चा करताना एखादी गार झुळूक यावी तशी मागील उन्हाळ्यांच्या जाग्या झालेल्या काही आठवणींची ही सुखद झुळूक !
विनायक जोशी (vp )
14 May 2016
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, १० मे, २०१६
लिफ्टचे अंतरंग
// श्री स्वामी समर्थ //
" लिफ्टचे अंतरंग "
आपल्याला तळमजल्यापासून सर्वात उंच अशा शेवटच्या मजल्या पर्यंत वेगवान पद्धतीने नेणारा मेकॕनिझम म्हणजेच "लिफ्ट ".या मध्ये ज्या खोलीत उभे राहून आपण प्रवास करतो त्याला Car म्हणतात .या Car मध्ये असंख्य बटणे असलेले एक पॕनल असते त्याला COP किंवा कार आॕपरेटींग पॕनल म्हणतात .या मध्ये आपल्याला ज्या मजल्यावर जायचे आहे त्याची बटणे असतात.याच बरोबर मॕन्यूयली दरवाजा उघडणे किंवा बंद करणे अथवा लाईट आणि पंखा चालू बंद करण्यासाठी लागणारी बटणे सुध्दा असतात.या खोलीतूनच वाॕचमनशी संपर्क साधण्यासाठी इंटरकाॕमची सुध्दा सोय असते.याच कार मध्ये लिफ्टच्या आॕपरेशन विषयी सतत अपडेट करणारी आॕडीयो सिस्टीम असते.या मधून असंख्य उपयुक्त सुचना मिळत असतात.उदाहरणार्थ लिफ्टचा दरवाजा ऊघडा आहे किंवा पाॕवर फेल झाली आहे तरी थोड्याच वेळात आपण सुरक्षित ठिकाणी जात आहोत वगैरे सुचना मिळतात.या खोलीला काउंटर बॕलन्सिंग करण्यासाठी लोड किंवा वजने लावलेली असतात.या खोलीच्या आत मर्यादेबाहेर लोकांनी गर्दी केली तर ओव्हरलोडींग चेक करण्यासाठीची व्यवस्था असते . या खोलीला असलेला दरवाजा म्हणजेच कार गेट आणि त्या बरोबरच बाहेरील बाजूस असलेले लँडींग गेट व्यवस्थित बंद झाले आहे हे कायम तपासले जात असते.लिफ्ट कार प्रत्येक मजल्यावर ज्या ठीकाणी थांबते त्याला " लँडींग " स्टेशन असे म्हणतात .या प्रत्येक स्टेशनवरती लिफ्ट कारला काॕल देण्यासाठी एक बटण असते आणि लिफ्ट कोणत्या मजल्यावर आहे ते दर्शविणारा डीस्प्ले याला LOP किंवा लँडींग आॕपरेटींग पॕनल असे म्हणतात . या लिफ्टच्या कारला वेगाने नेणे , सावकाश पणे योग्य त्या ठीकाणी थांबवणे या साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असते. लिफ्ट तळमजल्यावर पोचली किंवा सर्वात वरच्या मजल्यावर गेली कि त्या नंतर मात्र मर्यादेच्या बाहेर तीने जाऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रणाली कार्यरत होते. लिफ्टच्या साठी लागणारी मोटार , ब्रेक किंवा लिफ्टच्या मूलभूत आॕपरेशनला लागणारी प्रणाली असलेले कंट्रोल पॕनल अशा सर्व गोष्टी एकत्रित ठेवायसाठी एक लिफ्टरुम असते. लिफ्ट मधून प्रवास करणाऱ्या मंडळींची सुरक्षितता याला सर्वात जास्त महत्त्व असते. लिफ्ट नावाच्या या इलेक्ट्रो मेकॕनिकल मशिनला अतिशय सुंदर आणि सुरक्षित पणे चालविण्याचे काम मेकॕनिकल आणि इलेक्ट्रॉनीक्स सिस्टीम नावाचे हे दोन मित्र एकमेकांच्या सहाय्याने पार पाडत असतात.लिफ्टच्या कार बरोबरच लँडींग गेटचा दरवाजा सुध्दा बंद झाला की अत्यंत आनंदाने आणि धक्के विरहीत प्रवास चालू होतो. हाय राईज किंवा अतिशय उंच इमारतीच्या आत शिरताना कधीतरी दिवार मधील अमिताभच्या संवादाची आठवण येते किंवा आर्मर आॕफ गाॕड मधील जॕकी चॕनची अत्यंत उंच अशा डोंगराच्या कड्या वरुन मारलेल्या उडीची आठवण येते.मजा वाटते. सध्याच्या काळातील स्पर्श विरहीत आॕपरेटींग पॕनल नावाचे आधुनिक तंत्रज्ञान मनाला मात्र स्पर्श करुन जाते. थोड्याच वेळात शून्या कडून उंची कडे म्हणजेच प्रगतीच्या दिशेने वेगवान प्रवास चालू होतो !
विनायक जोशी (vp)
10 may 2016
electronchikatha.blogspot.com
रविवार, ८ मे, २०१६
सेरेनगेट्टीचा मायकेल
// श्री स्वामी समर्थ //
" आदर्श मायकेल "
" मायकेल ग्रोझांबीक "
१९८९ साली अनपेक्षित पणे व्यंकटेश माडगूळकरांचे "सिंहांच्या देशात "हे अनुवाद केलेले पुस्तक वाचले. सेरेनगेट्टी अभयारण्यातील प्राण्यांना त्या काळात म्हणजेच १९५९ मध्ये सुध्दा जागा कमी पडत होती आणि हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन सर्व जगाला कळेल अशी डाॕक्यूमेंटरी फिल्म तयार करणाऱ्या एका धाडसी ,कल्पक,हुशार अशा जर्मन मुलाची आणि त्याच्या जिगरबाज कुटुंबातील सर्व लोकांची ही गोष्ट आहे. आपल्या लहान मुलाला आणि तरुण बायकोला निरोप देऊन सेरेनगेट्टी मध्ये प्राण्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वडिलांच्या बरोबरीने काम करणाऱ्या "मायकेल" ची ही गोष्ट आहे. चालत्या मोटारीतून प्राण्यांच्या गळ्यात फास टाकणे , त्या काळाशी सुसंगत अशा ओळखीच्या मोठ्या काॕलर त्यांच्या गळ्यात घालणे , डार्ट योग्य जागी आणि योग्य प्रमाणात मारुन त्यांना बेशुद्ध करणे ,अतिशय कमी उंचीवरुन विमान नेऊन प्राण्यांची संख्या मोजणे ,वेगवेगळ्या सिझन मध्ये चाऱ्यासाठी किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे करावा लागणारा त्यांचा प्रवास हा कॕमेऱ्यात कैद करणे,त्या साठी जंगलातच मुक्काम ठोकून नेटाने काम करणे वगैरे गोष्टी मायकेल ने अतिशय उत्तम रितीने केलेल्या होत्या.या कामाच्या साठी विमानाला लागणारे इंधन अतिशय काटकसरीने वापरावे लागे.कॕमेरामन किंवा वैमानिक या दोन्ही भुमिका या बापलेकांना आलटून पालटून कराव्या लागत. प्राण्यांच्या स्थलांतरामुळे त्यांना कमी पडणारी जागा या विषयावरील ती छोटी फिल्म तयार करण्यासाठी लागणारे शुटिंग त्यांनी पुर्ण केले होते.त्या तीन वर्षात या जंगलाने त्यांना दिलेल्या असंख्य अनुभवांची उजळणी करत शेवटची रात्र पार पडते.दुसऱ्या दिवशी सकाळीच ते जर्मनीला परतण्याचे ठरवितात. मायकेल दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठतो.सुर्योदयाच्या वेळेचा जंगलातील शेवटचा शाॕट विमानातून घेण्यासाठी बाहेर पडतो . विमानाला अपघात होवून मायकेल या जगाचा निरोप घेतो.........! या जिद्दी मायकेलचे वडील आपल्या मुलाने तयार केलेली ही फिल्म १९५९ साली रिलीज करतात !!
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा ध्यास आपण कसा ठेवला पाहिजे याचा पहिला धडा या "मायकेल " मुळे कायम लक्षात राहीला आहे.
नॕशनल जिओग्राफीक चॕनल वरती सेरेनगेट्टीच्या जंगलाचा उल्लेख येतो.असंख्य प्राणी एका जागेवरून दुसरीकडे निघालेले दिसतात.थोड्याच वेळात सुर्यास्त होतो.त्या रंगाच्या उधळणीमध्ये मंद स्मित करत आणि कौतुकाने प्राण्यांच्या कडे बघणारा
" मायकेल " एकच घोषवाक्य म्हणताना दिसतो
" सेरेनगेट्टी शॕल नाॕट डाय " " ................! वाचनाची आवड असून सुध्दा ह्या मायकेलची भेट झाल्यानंतर सहा महिने मी कोणतेही पुस्तक वाचले नव्हते !!
विनायक जोशी ( vp)
8 May 2016
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, ३ मे, २०१६
भारतीय रेल्वे
// श्री स्वामी समर्थ //
" भारतीय रेल्वे "
जेम्स वॕट नावाच्या माणसाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावून समस्त मानव जातीला गतिमानतेच्या दिशेने चालायला भाग पाडले.मोठा असा भोंगा वाजवून असंख्य ठिकाणाहून वाफ सोडत निघालेले रेल्वे इंजिन जवळून बघणे हा फार थरारक कार्यक्रम असायचा. अप ,डाऊन ,स्लो ,फास्ट ,मेल ,
एक्सप्रेस वगैरे शब्दसंपदा रेल्वे मुळे वाढली. रेल्वे मध्ये पत्रांची वाहतूक करणारा वेगळा डबा असायचा. प्लॕटफार्म ,वेटिंग रुम, रिझर्व्हेशन , टू टायर ,थ्री टायर ,फर्स्ट क्लास ,एसी ,टीसी,जंक्शन,पॕसेंजर ,
सुपरफास्ट पासून ते राजधानी, दुरांतो,गरीबरथ वगैरे फार मोठी व्हरायटी रेल्वे मध्ये आहे.अत्यंत स्वस्त दरात आणि कोणताही भेदभाव न करता येणारा प्रवास हेच रेल्वेचे ब्रीद आहे.अतिशय उत्तम रितीने आणि अत्यंत वेगाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात रेल्वेने कायम आघाडी ठेवली आहे.कोकण रेल्वे पासून काश्मिर मधील वेगवेगळ्या भूभागात रेल्वेच्या इंजिनियर्सने बिनतोड कामगिरी केली आहे.कोट्यावधी लोकांना कंम्पुटर च्या सहाय्याने सर्व सुविधा अतिशय पाॕवरफुल सर्व्हरच्या माध्यमातून देणारी भारतीय रेल्वे या सरकारी सेवेने आत्मविश्वास आणि विश्वसनीयतेचा मापदंड रोवला आहे.
करोडो लोकांना माफक दरात इच्छित स्थळी नेणारी रेल्वे म्हणजे लाजवाब आहे. प्रत्येक स्टेशन वरती पाॕवरफुल अशी कंट्रोल रुम आणि सिग्नलची सुविधा असते.या निमीत्ताने या राष्ट्रीय संपत्तीचा आपण नीट सांभाळ केला पाहीजे !
स्टेशन वरती रेल्वेच्या गार्डच्या डब्यातील गार्ड आणि स्टेशन वरील सिग्नलमन यांचे कम्युनिकेशन पाहणे फारच आनंददायी असते. बुलेट ट्रेन या विषयी मला फारसे ज्ञान नाही परंतु अत्यंत वेगाने जाणाऱ्या आणि ५० डबे असलेल्या मालगाडीच्या शेवटच्या म्हणजे गार्डच्या डब्यात बसायचा थरार एकदा अनुभवाच किंवा दोन विरुध्द दिशेने जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेंचे एखाद्या स्टेशनवर होणारे अत्यंत वेगवान क्राॕसीग आणि त्या वेळी प्लॕटफार्म वरती उडणारी धूळीची वादळे हि भारतीय रेल्वेच्या शक्तीचे प्रदर्शन असते !!!
विनायक जोशी ( vp )
3 May 2016
electronchikatha.blogspot.com
सोमवार, २ मे, २०१६
तळजाईचे वारकरी
// श्री स्वामी समर्थ //
" तळजाईचे वारकरी "
प्रत्येक वारकऱ्याला जसे विठू माऊलीच्या दर्शनाची आस असते तशी आम्हाला दोघांनाही या डोंगराची ओढ आहे. आम्ही बरीच वर्षे येथे जात असलो तरी या डोंगराच्या बाबतीतले अधिकारी नाही आहोत.घरापासून पहाटेच्या वेळी निघालो की साधारणपणे दहा मिनीटात बेबी कॕनाॕल आणि मेन कॕनाॕल यांच्या मधून असंख्य पक्षांचे आवाज ऐकत मातीच्या रस्त्यावरून प्रवासाला सुरवात.बरोबर १ किलोमीटर अंतर पार केले की मोठा श्वास घेऊन डोंगरावर चढायला सुरवात.पाचच मिनीटात छातीतून येणारे लोहाराच्या भात्यासारखे श्वासांचे पडसाद ऐकत मार्ग क्रमण करत रहायचे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असे दोन डोम आहेत.या मातीच्या रस्त्याच्या कडेने असंख्य फुलांची झाडे आहेत.निवडूंग आहेत.बांबूची मोठी झाडे आहेत.कोरफड आहे.या पुढे एकावेळी एकच माणूस जाईल अशी चिंचोळी पायवाट आहे.तेथून पुढे गेल्यावर मात्र थोडी सपाटी आणि चढण असा जंगलातील लपाछपीचा खेळ आहे. डोंगराच्या वरती तळजाई भ्रमण मंडळ वगैरे रेग्युलर मंडळींचा राबता आहे. प्रत्येक अर्ध्या किलोमीटर वरती सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आहेत.त्या मधील पाणी घेऊन बरेच जण आसपासच्या झाडांना पाणी घालत असतात.तळजाई देवळाच्या एक किलोमीटर अलीकडूनच परतीचा जंगलातील प्रवास चालू.थोड्याच वेळात विसाव्याच्या ठराविक दगडावर शांतपणे बसायचे. बरोबर दृष्टी समोरे सिंहगडाचे दोन टाॕवर दिसतात.समोर वाहत्या नदीसारखा दिसणारा कॕनाॕल.त्या वरुन जाणारे छोटे छोटे पूल आहेत.मोरांचे आवाज ऐकायचे.मुंगसांची निर्भय पणे चाललेली धावपळ बघत घराच्या कडे परतायचे. तळजाईचे वारकरी होण्यासाठी काही अघोषीत प्रोटोकाॕल आम्ही पाळले आहेत.
पायात उत्तम दर्जाचे बूट घालायचे.
घरगूती अथवा कामाच्या गप्पा मारायच्या नाहीत. मोबाईल जवळ बाळगायचा नाही . जंगलातील दररोज बदलणारे जग पहायचे. दाट झाडीतील वेगवेगळे नैसर्गिक आवाज टिपायचे. साधारणपणे सत्तरी पार केलेल्या तरुणांचा उत्साह आणि सातत्य बघत डोंगर चढायचा .शून्य प्रदूषण असलेल्या या मार्गावरती कोलेस्ट्रोल ,बीपी ,डाएट वगैरे गोष्टींची अजिबात चर्चा न करता फक्त आनंदाने आणि आनंदाची अशी तळजाई यात्रा करत रहायचे.!
विनायक आणि कल्याणी (vp)
2 May 2016
electronchikatha.blogspot.com