मंगळवार, ३१ मे, २०१६

कात्रजचा घाट

// श्री स्वामी समर्थ //
        " कात्रजचा घाट "
लहानपणी पश्चिम महाराष्ट्रातून येताना पहिल्यांदा या कात्रजच्या घाटाचे विलोभनीय दर्शन घडले . अत्यंत उत्सुकतेने घाटा मधील काळ्या कभिन्न कातळांच्या जवळ बाराबंदी घातलेले मावळे दिसतात का हे शोधता शोधता पुणे आले.
शनिवार वाडा बघितला .त्या नंतर लाल महाल.अमावस्येच्या नीरव शांततेत आणि लाख सैनिकांच्या गराड्यात बसलेल्या शाहीस्तेखाना वरती अचानक हल्ला चढवून त्याची बोटे तोडणारे महाराज दिसले.या हल्यानंतर थोड्याच वेळात कात्रजच्या घाटातून शिंगाला पलीते लावलेले असंख्य बैल पळताना दिसू लागले. खानाचे सर्व सैनिक कात्रजच्या दिशेने गेले आणि औरंगजेबाच्या मामाला अद्दल घडवून महाराज कात्रजच्या विरूद्ध दिशेने  सुखरुप निघून गेले.या वेळेला कात्रजच्या या घाटाने आपल्या या राजाला उत्तम सलामी दिली. १९७० च्या दशकात याच घाटात एका सिनेमाचे चित्रीकरण चालू होते.या सिनेमात हिरोचे काम करणाऱ्या कलाकाराचे लागोपाठ सहा अपयशी सिनेमे येऊन गेले होते.अत्यंत सुशिक्षित कुटुंबातील ह्या मुलाला बसच्या आतमध्ये नाचत गाणे म्हणायचे होते. घोगऱ्या आवाजाचा आणि उंच व कृश असलेला हा मुलगा याच कात्रजच्या घाटात नाचण्याचा प्रयत्न करत होता. युनिट मधील मंडळी आणि येथील निसर्ग त्याला प्रोत्साहन देत होते .बऱ्याच रीटेक्स नंतर कात्रजच्या बोगद्यातील या गाण्याचे चित्रीकरण पार पडले.सिनेमा सुद्धा बऱ्यापैकी चालला.कात्रजच्या या घाटाने या तरुण नायकाला स्फूर्ती दिली.या सिनेमाचे नाव होते "बाँम्बे टू गोवा "आणि हीरो होता "अमिताभ"
कात्रजच्या या बोगद्याकडे सांगायला बरेच आहे ,फक्त ऐकायला येणारे कान पाहिजेत  आणि थोडासा निवांतपणा  !!!
  विनायक जोशी
३१ मे २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा