सोमवार, २ मे, २०१६

तळजाईचे वारकरी

// श्री स्वामी समर्थ //
  " तळजाईचे वारकरी "
प्रत्येक वारकऱ्याला जसे विठू माऊलीच्या दर्शनाची आस असते तशी आम्हाला दोघांनाही या डोंगराची ओढ आहे. आम्ही बरीच वर्षे येथे जात असलो तरी या डोंगराच्या बाबतीतले अधिकारी नाही आहोत.घरापासून पहाटेच्या वेळी निघालो की साधारणपणे दहा मिनीटात बेबी कॕनाॕल आणि मेन कॕनाॕल यांच्या मधून असंख्य पक्षांचे आवाज ऐकत मातीच्या रस्त्यावरून प्रवासाला सुरवात.बरोबर १ किलोमीटर अंतर पार केले की मोठा श्वास घेऊन डोंगरावर चढायला सुरवात.पाचच मिनीटात छातीतून येणारे लोहाराच्या भात्यासारखे श्वासांचे पडसाद ऐकत मार्ग क्रमण करत रहायचे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असे दोन डोम आहेत.या मातीच्या रस्त्याच्या कडेने असंख्य फुलांची झाडे आहेत.निवडूंग आहेत.बांबूची मोठी झाडे आहेत.कोरफड आहे.या पुढे एकावेळी एकच माणूस जाईल अशी चिंचोळी पायवाट आहे.तेथून पुढे गेल्यावर मात्र थोडी सपाटी आणि चढण असा जंगलातील लपाछपीचा खेळ आहे. डोंगराच्या वरती तळजाई भ्रमण मंडळ वगैरे रेग्युलर मंडळींचा राबता आहे. प्रत्येक अर्ध्या किलोमीटर  वरती सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आहेत.त्या मधील पाणी घेऊन बरेच जण आसपासच्या झाडांना पाणी घालत असतात.तळजाई देवळाच्या एक किलोमीटर अलीकडूनच परतीचा जंगलातील प्रवास चालू.थोड्याच वेळात विसाव्याच्या ठराविक दगडावर शांतपणे बसायचे. बरोबर दृष्टी समोरे सिंहगडाचे दोन टाॕवर दिसतात.समोर वाहत्या नदीसारखा दिसणारा कॕनाॕल.त्या वरुन जाणारे छोटे छोटे पूल आहेत.मोरांचे आवाज ऐकायचे.मुंगसांची निर्भय पणे चाललेली धावपळ बघत घराच्या कडे परतायचे. तळजाईचे वारकरी होण्यासाठी काही अघोषीत प्रोटोकाॕल आम्ही पाळले आहेत.
पायात उत्तम दर्जाचे बूट घालायचे.
घरगूती अथवा कामाच्या गप्पा मारायच्या नाहीत. मोबाईल जवळ बाळगायचा नाही . जंगलातील दररोज बदलणारे जग पहायचे. दाट झाडीतील वेगवेगळे नैसर्गिक आवाज टिपायचे. साधारणपणे सत्तरी पार केलेल्या तरुणांचा उत्साह आणि सातत्य बघत डोंगर चढायचा .शून्य प्रदूषण असलेल्या या मार्गावरती कोलेस्ट्रोल ,बीपी ,डाएट वगैरे गोष्टींची अजिबात चर्चा न करता फक्त आनंदाने आणि आनंदाची अशी तळजाई यात्रा करत रहायचे.!
विनायक आणि कल्याणी (vp)
2 May 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा