शनिवार, १४ मे, २०१६

वैशाख

// श्री स्वामी समर्थ //
         " वैशाख "
सोलापूर ही माझी जन्मभूमी असल्यामुळे उन्हाळा या विषयावरील प्रॕक्टिकल शिक्षण लहानपणीच झाले होते.भर उन्हात अनवाणी पायाने हिंडणे किंवा दुपारी १२ च्या उन्हात चांदण्यात फिरायला बाहेर पडावे तसे हिंडणे. कडूनिंबाच्या सावलीत बसून गप्पागोष्टी करणे वगैरे नित्यक्रम होता.उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईची वारी असायची .त्यामुळे रत्नागिरीच्या हापूस आंब्यांच्या बरोबरच उकाडा आणि घामाच्या धारा यांचा अनुभव मिळायचा.पुण्यात आल्यावर मात्र उन्हाळा अगदी मेंगळट वाटू लागला . पुढे कामा निमित्ताने विदर्भातील उन्हाळा किंवा तेथील डेझर्ट कुलर यांचा अनुभव घेतला.कुलरच्या पाण्यात मुक्कामाला येणारे साप हा आवारपूर स्पेशल उन्हाळा असे.या नंतर माउंट अबूला वळसा घालून पालनपूर या गावचा उन्हाळा .तेथेच नॕशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या डेअरी मध्ये तयार होणारे अमुल बटर आणि अतिउष्णते मुळे रस्त्याच्या कडेला गलितगात्र होऊन पडलेले मोर भेटले.या नंतर डायरेक्ट मनाली. या येथे बाजपेयींचे उन्हाळ्यातील विश्रामधाम आणि उन्हाळ्याच्या मुळे वितळलेल्या बर्फाच्या मधून जाणाऱ्या रस्त्याने जाऊन रोहतांग पास बघता आले. तेथून दक्षिणेकडील खास उन्हाळा .नंदी हिल्सवरती अवाढव्य अशा नंदीच्या पायापाशी बसून अनुभवला. तुतिकोरीन या अत्यंत रुक्ष प्रदेशातील चटके अनुभवले. त्रिचूर वगैरे गावातील मेणचट उन्हाळ्याची झलक अनुभवता आली. तिरुपती येथील गदगदणारा उकाडा अनुभवावा लागला.आंध्र प्रदेशा मधील जंगलातील म्हणजेच मिरियलगौडा, कलवाकुरती,अचलपेठ येथील नक्षलग्रस्त भागातील भयभीत करणारा उन्हाळा बघितला. या सर्व प्रकारात वैशाखा मध्ये पेटणारे वणवे बघता आले.हे सर्व मनमोकळेपणाने जसे आहे तसे बघता आले . एयर कंडीशन गाड्या ,हाॕटेल्स ,त्रासदायक असे मोबाईल फोन,टुरिस्टचे लोंढे यांच्या अनुपस्थितीमुळे ही सर्व ठिकाणे कायमची लक्षात राहिली . सिमेंटच्या जंगलात बसून वाढलेल्या उन्हाळ्याची चर्चा करताना एखादी गार झुळूक यावी तशी मागील उन्हाळ्यांच्या जाग्या झालेल्या काही आठवणींची ही सुखद झुळूक !
विनायक जोशी (vp )
14 May 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा