// श्री स्वामी समर्थ //
" आदर्श मायकेल "
" मायकेल ग्रोझांबीक "
१९८९ साली अनपेक्षित पणे व्यंकटेश माडगूळकरांचे "सिंहांच्या देशात "हे अनुवाद केलेले पुस्तक वाचले. सेरेनगेट्टी अभयारण्यातील प्राण्यांना त्या काळात म्हणजेच १९५९ मध्ये सुध्दा जागा कमी पडत होती आणि हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन सर्व जगाला कळेल अशी डाॕक्यूमेंटरी फिल्म तयार करणाऱ्या एका धाडसी ,कल्पक,हुशार अशा जर्मन मुलाची आणि त्याच्या जिगरबाज कुटुंबातील सर्व लोकांची ही गोष्ट आहे. आपल्या लहान मुलाला आणि तरुण बायकोला निरोप देऊन सेरेनगेट्टी मध्ये प्राण्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वडिलांच्या बरोबरीने काम करणाऱ्या "मायकेल" ची ही गोष्ट आहे. चालत्या मोटारीतून प्राण्यांच्या गळ्यात फास टाकणे , त्या काळाशी सुसंगत अशा ओळखीच्या मोठ्या काॕलर त्यांच्या गळ्यात घालणे , डार्ट योग्य जागी आणि योग्य प्रमाणात मारुन त्यांना बेशुद्ध करणे ,अतिशय कमी उंचीवरुन विमान नेऊन प्राण्यांची संख्या मोजणे ,वेगवेगळ्या सिझन मध्ये चाऱ्यासाठी किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे करावा लागणारा त्यांचा प्रवास हा कॕमेऱ्यात कैद करणे,त्या साठी जंगलातच मुक्काम ठोकून नेटाने काम करणे वगैरे गोष्टी मायकेल ने अतिशय उत्तम रितीने केलेल्या होत्या.या कामाच्या साठी विमानाला लागणारे इंधन अतिशय काटकसरीने वापरावे लागे.कॕमेरामन किंवा वैमानिक या दोन्ही भुमिका या बापलेकांना आलटून पालटून कराव्या लागत. प्राण्यांच्या स्थलांतरामुळे त्यांना कमी पडणारी जागा या विषयावरील ती छोटी फिल्म तयार करण्यासाठी लागणारे शुटिंग त्यांनी पुर्ण केले होते.त्या तीन वर्षात या जंगलाने त्यांना दिलेल्या असंख्य अनुभवांची उजळणी करत शेवटची रात्र पार पडते.दुसऱ्या दिवशी सकाळीच ते जर्मनीला परतण्याचे ठरवितात. मायकेल दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठतो.सुर्योदयाच्या वेळेचा जंगलातील शेवटचा शाॕट विमानातून घेण्यासाठी बाहेर पडतो . विमानाला अपघात होवून मायकेल या जगाचा निरोप घेतो.........! या जिद्दी मायकेलचे वडील आपल्या मुलाने तयार केलेली ही फिल्म १९५९ साली रिलीज करतात !!
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा ध्यास आपण कसा ठेवला पाहिजे याचा पहिला धडा या "मायकेल " मुळे कायम लक्षात राहीला आहे.
नॕशनल जिओग्राफीक चॕनल वरती सेरेनगेट्टीच्या जंगलाचा उल्लेख येतो.असंख्य प्राणी एका जागेवरून दुसरीकडे निघालेले दिसतात.थोड्याच वेळात सुर्यास्त होतो.त्या रंगाच्या उधळणीमध्ये मंद स्मित करत आणि कौतुकाने प्राण्यांच्या कडे बघणारा
" मायकेल " एकच घोषवाक्य म्हणताना दिसतो
" सेरेनगेट्टी शॕल नाॕट डाय " " ................! वाचनाची आवड असून सुध्दा ह्या मायकेलची भेट झाल्यानंतर सहा महिने मी कोणतेही पुस्तक वाचले नव्हते !!
विनायक जोशी ( vp)
8 May 2016
electronchikatha.blogspot.com
रविवार, ८ मे, २०१६
सेरेनगेट्टीचा मायकेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा