// श्री स्वामी समर्थ //
" स्वानंदी "
"निशा मायदेव"
सोलापूर मधील अत्यंत आनंदी अशा फडके दाम्पत्याची ही मुलगी .हरिभाई देवकरण प्रशालेतील नारायणची वर्ग मैत्रीण,स्वतंत्र आणि स्पष्ट विचारधारा असलेली , एका अत्यंत हुशार आणि सुसंस्कृत मुलाची आई , अभयची "मितवा " म्हणजेच मित्र ,तत्त्वज्ञ आणि वाटाड्याची भूमिका उत्तमपणे पार पाडणारी.
LIC मध्ये अत्यंत आनंदाने नोकरी करणारी. सहवासातील प्रत्येकाचा
" जिंदगी के साथ भी " या टॕग लाईन ला अनुरुप असा आयुष्यभरासाठी आनंदाचा विमा उतरवणारी . साहित्याची आवड असलेली,रसरशीत पणे आयुष्य जगणाऱ्या या मुलीच्या पन्नासाव्या वाढदिवसा निमित्त आज देव सुध्दा "देव दिवाळी" साजरी करणार आहेत !!!
विनायक जोशी (vp)
३० नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६
स्वानंदी - निशा मायदेव
सुरेख - सुनित
// श्री स्वामी समर्थ //
" सुरेख - सुनित "
२९ नोव्हेंबर १९५७ या दिवशी सोलापूर येथे जन्म . कुंभ रास असल्यामुळे समजशक्ती उत्तम . आपल्या मोठ्या बहिणीची काळजी करणे आणि लहान भावंडांची काळजी घेणे हा तिचा शालेय जीवनातील कार्यक्रम होता.लहानपणा पासून अभ्यासा बरोबरच संगीताची सुध्दा उत्तम समज. आमच्या घरात 'संवादीनी' या वाद्या बरोबरीने थोडाफार संवाद साधायचा प्रयत्न तिने केला होता. अगदी लहान वयातच म्हणजे काॕलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच तिला सातारा येथे " पोस्टा"मध्ये नोकरी मिळाली.ही नोकरी करत करत BCom चे शिक्षण पूर्ण केले.सोलापूर येथे GPO मध्ये बदली झाल्यानंतर कला क्षेत्रात प्रवेश . सारस्वत क्लब येथे बसविलेले " वाहतो हि दुर्वांची जुडी " या नाटकात उत्तम अभिनय करत असे.सांगली येथील यशवंतनगर भागात राहणाऱ्या व कॕनरा बँकेत नोकरी करणाऱ्या आणि अत्यंत जबरदस्त काॕमनसेन्स असलेल्या सुरेश सोवनी यांच्या बरोबर लग्न झाले आणि सुनित ची 'सुरेखा सुरेश सोवनी' झाली.या नंतर तिला युनियन बँकेत कोल्हापूर येथे नोकरी मिळाली. कोल्हापूर मधील गंगावेस येथून अत्यंत आनंदी आणि समाधानी संसाराची सुरुवात.१९८१ आणि १९८४ या काळात' केदार आणि मंदार' या दोन अत्यंत चलाख मुलांचा जन्म झाला. या दोन मुलांनी आपल्या वेगवेगळ्या करामतींनी तिला कायम व्यस्त ठेवले.ताराबाई पार्क येथे स्वतःच्या घरात प्रवेश केला आणि प्रगतीच्या दिशेने प्रवास चालू झाला.नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातील कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे.आईच्या संस्कारात मुले वाढावीत म्हणून प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सोलापूरला म्हणजेच मुलांच्या आजोळी ठेवत असे. दोन्ही मुलांच्या काॕलेज जीवनात किंवा पुढील आयुष्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर सुध्दा अत्यंत साधेपणाने किंवा समाधानाने रहायचे संस्कार या जोडीने उत्तम प्रकारे केलेले आहेत.योग्य वयात सर्व गोष्टी झाल्यामुळे आज "नातीं " बरोबर व्यस्त असा दिनक्रम चालू आहे. सोलापूर मधील आदर्शनगर येथे राहणारी , हरीभाई देवकरण शाळेत शिकलेली ,नाटकात काम करणारी ,भावगीत गाणारी ,पोस्टात आणि त्या नंतर बँकेत काम करणारी,आपल्या आनंदी जोडीदाराला उत्तम साथ देणारी , कायम नविन गोष्टी शिकण्याची आवड असलेली , घरातील वृद्ध माणसांची आस्थेने देखभाल करणारी ....वगैरे असंख्य गोष्टी अत्यंत समजूतदारपणे करणाऱ्या आमच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच
" सुनीत जोशी " किंवा " सौ.सुरेखा सुरेश सोवनी " हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी (vp )
२९ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
रविवार, २० नोव्हेंबर, २०१६
Mi Band
// श्री स्वामी समर्थ //
" Mi Band "
थोड्या थोड्या वेळाने १/४ कप चहा किंवा सकाळ संध्याकाळ चालणे किंवा कंपनीतील मुलांच्या बरोबरीने काम करणे हि तीन व्यसने मी अत्यंत आवडीने जोपासली आहेत. चालताना मात्र काही विशिष्ट टप्पे पार करायचे आणि वेळेत घरी परतायचे हा कार्यक्रम चालू असे.स्मार्ट फोन आल्यानंतर मात्र आपण किती अंतर किती वेळात चाललो वगैरे डेटा जमा होऊ लागला परंतु त्यासाठी मोबाइल जवळ ठेवणे सक्तीचे झाले. या नंतर चिनी बनावटीचा "Mi Band" हा पट्टा विकत घेतला.या अंदाजे १० ग्रॅमच्या मनगटात बांधायच्या पट्ट्याने दिवसातील कमीतकमी ३ तास मोबाइल पासून मला दूर राहण्यास मदत केली. सुरवातीला नव्याची नवलाई म्हणून हा पट्टा दिवसातील २२ तास वापरून बघितला .या मध्ये चालण्या बरोबरच दिवसभरात निवांत कधी होतो आणि धावपळ कधी याची नोंद मिळू लागली.अगदी रात्री शांत झोप किती वेळ लागली ते सुध्दा . Mi च्या या बँडला ब्लू टुथची व्यवस्था आहे त्या मधून Mi चे अॕप किंवा Google Fit वगैरे आपापल्या पद्धतीने माहीती घेऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. सुरवातीला नवीन छंद म्हणून घेतलेल्या या बँडने पावसाळ्यात मात्र छान साथ दिली. दिवसभरात कमीतकमी किती चालायचे हे ध्येय एकदा या बँडला सांगितले आणि दिवसभरात आपण ते ध्येय पार पाडले कि अत्यंत आनंदाने हा सुध्दा व्हायब्रेट होऊन आणि दिव्यांची उघडझाप करुन आपल्या आनंदात सहभागी होतो. Mi Band पेक्षा अत्यंत आधुनिक पध्दतीने चालणारी असंख्य घड्याळे सध्या बाजारात उपलब्ध आहेत परंतु अतिशय माफक दरात हा त्याच्या क्षमतेत आहे तेवढे काम उत्तमपणे पार पाडत आहे.
अत्यंत प्रायमरी अवस्थेतील माझ्या कडील हे पिल्लू म्हणजेच "Mi Band" सध्यातरी एकदम छान प्रकारे कार्यरत आहे .!!!
विनायक जोशी (vp )
१९ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६
अर्थ क्रांतीकारक "अनिल बोकील"
// श्री स्वामी समर्थ //
" अर्थक्रांती "
" अनिल बोकील "
अनिल बोकील यांनी मराठीतून अतिशय उत्तमपणे माझ्या सारख्या सामान्य माणसाला सुध्दा कळेल अशा पध्दतीने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करायची कारणे किंवा सध्याच्या भारतीय अर्थकारणा विषयी समजावून सांगितलेल्या काही गोष्टी...
१) ५०० किंवा १००० रुपयाच्या नोटेचा उत्पादन खर्च अंदाजे ३ रूपये.
२) चलनातील चालू असणाऱ्या नोटेचा आणि सोन्याचा साठा यांचा काहीही संबंध नाही
३) नविन २००० रुपयांची नोट हा तात्पूरता उपाय
४) १०० रुपयांच्या वरच्या नोटा व्यवहारात राहणार नाहीत.
५) जास्तीत जास्त व्यवहार हे बँकेतून आणि पेपर लेस पध्दतीने करण्याचा मानस.
६)बँकेतून होणाऱ्या व्यवहारा वरती टॕक्स आणि त्या मुळे सरकारला डायरेक्ट उत्पन्न .
७) या पुढे जास्तीत जास्त व्यवहार हे नेट बँकिग किंवा कार्डच्या सहाय्याने होणार.
८) पाकिस्तानने काश्मिर मध्ये खोटे चलन वापरून भारतीय सैनिकां विरूद्ध दंगली घडवल्या त्या अतिरेकी कारवायांना आता चाप .
९) माजी पंतप्रधान हे अर्थतज्ञ होते परंतु संसदेत बहुमत नसल्यामुळे त्यांना हे काम शक्य झाले नाही.
१०) पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सलग ९० मिनीटे " अर्थ क्रांती " विषयी ऐकून घेतले.
११) कोणतेही चलन हे व्यवहाराचे फक्त माध्यम असावे .
१२) चलन सर्क्युलेशन मध्ये पाहिजे
१३) पोत्यात अडकलेल्या लक्ष्मीला मोकळा श्वास घेता येणार .
१४) काळा पैसा दोन प्रकारचा. टॕक्स बुडवणाऱ्या मंडळींकडील किंवा गुन्हेगारी व्यवहारातून तयार होणारा वगैरे ....!
विनायक जोशी (vp)
१५ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६
Mr.Perfectionist - M.V.Kulkarni
// श्री स्वामी समर्थ //
"Mr.Perfectionist"
" M.V.Kulkarni "
अजय पारगे यांच्या "डिजीटल आर्ट "या भारत आणि सिंगापूर स्थित कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका बासष्ट वर्षाच्या तरुणाला कंपनी मध्ये उत्तम जबाबदारीची कामे केल्याबद्दल बक्षिस मिळाले.
कोल्हापूरला जाताना वारणेच्या सानिध्यात आणि विठ्ठलाचे कृपाछत्र लाभलेल्या ठिकाणी म्हणजेच घुणकी येथील हे मुळचे कुलकर्णी . वडिल सैनिकी पेशात असल्यामुळे पुण्यात वानवडी येथे रहात.दोन भाऊ आणि एक बहिण यांच्या बरोबर अत्यंत आनंदी बालपण व्यतित केले.शालेय शिक्षण कराड आणि पुणे येथे झाले . काॕलेजचे शिक्षण गरवारे काॕलेज आॕफ काॕमर्स मध्ये झाले.
त्या नंतर खाजगी क्षेत्रात म्हणजेच सिनेमा ,औषधे किंवा साखर कारखान्यात लागणारी मशिनरी तयार करायच्या कारखान्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामाचा प्रचंड अनुभव घेतला.
प्रत्येक काम मनापासून करणे , काॕमनसेन्सचा सुयोग्य वापर, आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची कायम तयारी आणि आनंदी स्वभाव या चतुःसूत्री मुळे सर्व कामे सहजपणाने पार पडतात. साहित्य ,संगीत ,कला,वाचन या मध्ये सुध्दा उच्च प्रतीची अभिरुची त्यांनी जोपासली आहे.
साधारणपणे रिटायरमेंट नंतर आराम करू वगैरे संकल्पना राबवण्या ऐवजी Digital Art या Virtual Reality किंवा आभासी सत्याचा आविष्कार घडविणाऱ्या कंपनीमध्ये सळसळत्या आणि उत्साहाने काम करणाऱ्या तरूण पिढी बरोबर अत्यंत आनंदाने सध्या कार्यरत आहेत.
कोणत्याही कामाची जबाबदारी आनंदाने घेणे .योग्य प्रकारे नियोजन करणे आणि वक्तशीर पणे वेळेत सर्व अकांउंटची महत्त्वाची कामे पार पाडणे या मध्ये त्यांची हातोटी आहे.
Digitalart India Pvt Limited या कंपनीच्या virtual Reality या तत्वप्रणालीचा सुयोग्य वापर करुन कंपनीचे "अॕडमिन आणि अकांउंटस् " या खात्यांचा पाया बळकट करण्याचे अत्यंत महत्वाचे काम M.V.Kulkarni किंवा मदन कुलकर्णी या नावाचे परफेक्शनिस्ट उत्तम पणाने करत आहेत.
विनायक जोशी (vp )
११ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६
नवोन्मेषी " लक्ष्मी "
// श्री स्वामी समर्थ //
" नवोन्मेषी लक्ष्मी "
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराघरातून झालेल्या पूजेनंतर काळानुरूप स्वतः मध्ये बदल करायचा निर्णय "लक्ष्मी" ने घेतला.
अतिशय सुस्पष्टपणाने आणि आश्वासक शांतपणाने भारताच्या पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आपण का बंद करत आहोत या विषयी निवेदन केले .उद्देश अथवा हेतू स्वच्छ होता.याच बरोबर थोडीशी गैरसोय सोडल्यास जनतेचे एका पैशाचेही नुकसान होणार नाही याची ग्वाही होती.
जन-धन योजना, केवायसी किंवा काळा पैसा जाहीर करण्यासाठी व्यवस्थित संधी समस्त नागरिकांना दिली होती.
भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना कंटाळलेल्या जनतेने अत्यंत उत्साहाने नविन बदलाचे स्वागत केले.
बँके मध्ये काम करणाऱ्या असंख्य अधिकारी मंडळींनी किंवा या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी अतिशय आश्वासक आणि सकारात्मक लेख लिहून संभ्रमापासून लोकांना दूर ठेवले.
वैद्यकीय व्यवसाया सारख्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या असंख्य संस्थांनी या काळात मानवतेचा मूलमंत्र जपला आहे.
सोशल मिडीयाने अतिशय उत्तम जबाबदारी या काळात निभावली आहे. आपले पैसे कसे व्यवस्थित राहणार आहेत किंवा बदलून मिळतील वगैरे व्यवस्थित मार्गदर्शन वेगवान रितीने आणि सुलभतेने "व्हाॕटस्अॕप" सारख्या माध्यमातून झाले आहे.
एकशे वीस कोटी जनतेला हळूहळू "पेपरलेस करन्सी" कडे घेऊन जाण्याची हि तयारी आहे . प्रगतीच्या दिशेने निघालेल्या या नविन स्वरुपातील "लक्ष्मी " चे आपण सर्वांनी अत्यंत आनंदाने स्वागत करायचे आहे !!!
विनायक जोशी (vp)
१० आॕक्टोंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६
"पु.ल.देशपांडे "नावाचा संस्कार !!!
// श्री स्वामी समर्थ //
" पुल " नावाचा संस्कार "
१९७१ साली सोलापूर मध्ये आमच्या घरात जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या समोर काकाने " वाऱ्यावरची वरात " हा पुलंचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आणि माझ्या वरती पहिला आनंददायी आणि विलक्षण असा "पुल" संस्कार झाला. पुढील आयुष्यात त्यांनी लिहिलेली ओळन् ओळ " सखाराम गटणे " स्टाईल ने वाचून काढली.
नोकरी मध्ये असताना कलकत्ता येथे जाण्याचा योग आला त्या वेळी पुलंच्या लेखातून भेटलेल्या शांतिनिकेतन , रविंन्द्रनाथ टागोर,शर्वरीबाबू ,गौरीशंकर घोष ,रामकिंकरदा वगैरे जग प्रसिद्ध व्यक्तींचे कलकत्ता नजरेसमोर होते.
लेह-लडाख चा विषय निघाला की १९६७ साली लडाख मधील वातावरणात लढणारे आपले सैनिक , त्या काळातील असुविधा ,सरकारी गलथान कारभार किंवा ग.दि.माडगूळकरांना त्या भूमीवरती स्फुरलेले शौर्य गीत या सर्वांचा उल्लेख असलेला "शूरा मी वंदिले "हा लेख आठवतो.
असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या माणसाने स्वाभिमानी आयुष्याबरोबर,
संगीत,चित्रकला,शिल्पकला,नाटक,
सिनेमा ,भाषाशास्त्र ,कविता वाचन या पासून ते वेगवेगळ्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या कडे निकोप आणि निरोगी पणाने बघायची दृष्टी दिली.
परवा मुंबई वरुन येताना "मेणाच्या पुतळ्यांच्या प्रदर्शनाची जाहिरात लोणावळ्या जवळ वाचली आणि
पुलंनी उल्लेख केलेल्या "रघुनाथराव फडके "या महान कलाकारांने बनवलेले यांत्रिक मेणाचे पुतळे समोर दिसू लागले.
पुलंनी बऱ्याच देशात मोकळेपणानं भटकंती केली आणि अत्यंत सहजतेने आपले सर्व अनुभव लिहून काढले.निसर्गाची किंवा तेथील सौंदर्य यांची सहज जपणूक करणाऱ्या परदेशी लोकांच्या बद्दल अतिशय उत्तम आठवणी त्यांनी प्रवास वर्णनात केल्या आहेत.
"सौंदर्य " हे ओरबाडण्यासाठी किंवा उपभोग्य वस्तू नसून ती अनुभवण्याची गोष्ट आहे हा सुध्दा "पुलं"च्याच संस्काराचा एक भाग आहे !!
"क्रांतीचे गोंधळी" या कार्यक्रमात अटलबिहारी बाजपेयींच्या समोर महाप्रतिभावान अशा स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दलचे पुलंचे भाषण ऐकले आणि फक्त शांत बसलो नेहमी प्रमाणेच !!!
विनायक जोशी (vp)
८ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६
सोनचाफा " मनाली जोशी "
// श्री स्वामी समर्थ //
" सोनचाफा "
"मनाली नारायण जोशी "
४ नोव्हेंबर १९९७ या दिवशी अहमदाबाद येथे RBI मध्ये अधिकारी असलेल्या आजोबांच्या घरी जन्म. तीन आठवड्यांची असतानाच पहिला विमान प्रवास करून पुण्याला आली. मी आणि कल्याणी दोघेही तिला पुण्यातल्या घरी आणण्यासाठी गेलो होतो. पुण्यातील थंडी किंवा विमान प्रवासात तिने दाखवलेली सहजता लक्षात राहणारी होती. तिचे बालपण आवारपूर येथे गेले आणि त्या नंतरचे शिक्षण जाफराबाद मध्ये मोर आणि मुंगसांच्या सानिध्यात.वडिलांच्या नोकरी मधील बदल्यांमुळे तिला लहानपणापासूनच पटकन नविन वातावरणात जुळवून घ्यायची सवय लागली. हायस्कूलचे शिक्षण मात्र तीला CBSE -ICSE-CBSE असे पार पाडावे लागले. दहावीला अतिशय छान मार्क्स मिळाल्यावर तिने काॕमर्सला जायचा निर्णय घेतला. पुढील दोन वर्षे अजून चांगला अभ्यास केला आणि सिम्बाॕयसिस इंटरनॅशनल ची पूर्व परीक्षा सुध्दा उत्तम रितीने पास झाली.सध्या ती मॕनेजमेंट आणि लाॕ असा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पुण्यातील सिम्बाॕयसिस इंटरनॅशनल मध्ये शिकत आहे. तिचा विनम्र स्वभाव , अभ्यासू वृत्ती , स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आणि अत्यंत आनंदी स्वभाव या मुळे "मनाली नारायण जोशी" या मुलीची आणि आमची जेंव्हा भेट होते त्या वेळी मला आणि कल्याणीला दोघांनाही अत्यंत सुंदर आणि सुवासिक अशा "सोनचाफ्याची" आठवण येते !!!
विनायक आणि कल्याणी काकू
४ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६
कल्पक नेतृत्व " नारायण जोशी "
// श्री स्वामी समर्थ //
" कल्पक नेतृत्व "
" नारायण प्रभाकर जोशी "
३ नोव्हेंबर १९६५ या दिवशी" कुंभ" राशीला बरोबर घेऊन जन्माला आला. प्राथमिक शिक्षण सिध्दरामेश्वरांच्या कृपाछत्राखाली म्हणजेच " सिध्देश्वर " शाळेत झाले .नूमवि शाळेचा अनुभव न घेता हायस्कूल शिक्षणासाठी "हरिभाई देवकरण " मध्ये प्रवेश. १९८१ च्या बॕचचा आणि दहावी " बी" तुकडीत शिकणाऱ्या या मुलाने शाळेत पहिला नंबर पटकावला . याच वर्षी पानगल हायस्कूलला हाॕकी मध्ये फायनलला पराभूत केले.या मॕच मुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कर्णधारपदाची जबाबदारी घेऊन पूर्वेतिहास बदलू शकतो याची स्पष्ट जाणीव झाली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पुढील बोळातील ट्रेनिंग सेंटर मध्ये १० वी झाल्यावर त्याने "IQ" टेस्ट दिली. Power Of Imagination चांगली आहे .इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करीयर करावे असा निकाल मिळाला , म्हणून पुण्यात E&TC या शाखेत प्रवेश घेतला.१९८४ साली काॕलेजचे शिक्षण चालू असतानाच " L&T "या कंपनीत नोकरी मिळाली. या नंतर मात्र लहान वयातच GM झाला. U21 चे MBA केले.या नंतर AVP , Unit Head वगैरे प्रगतीच्या दिशेने प्रवास चालूच आहे.
अतिशय संवेदनशील आणि निःस्पृह माणूस , उत्तम बासरी वाजवणारा , रागदारीचा अभ्यास असलेला ,कायम पाॕझिटिव्ह विचार करणारा ,नवनवीन जबाबदाऱ्या अत्यंत विचारपूर्वक आणि सर्वांना बरोबर घेऊन पार पाडणारा , मानाची खुर्ची किंवा त्या अनुषंगाने झालेल्या ओळखींचा वैयक्तिक जीवनात कधीही गैरवापर न करणारा........वगैरे वगैरे !
१९८१ साली "IQ" टेस्ट मध्ये कल्पना शक्ती चांगली आहे असा कागदोपत्री निर्णय मिळाल्यावर आम्ही दोघांनी कल्पनाशक्ती ला प्रचंड ताण देऊन पुण्यातील सुप्रसिद्ध "अमृततुल्य " चहा जवळ कोठे मिळेल ते शोधले.
हे चहारूपी अमृत घेतल्यानंतर
पेशव्यांच्या गणपतीचे म्हणजेच तळ्यातल्या किंवा सारसबागेतील गणपतीचे आशिर्वाद घेऊन" नारायण जोशी "यांनी आयुष्यातील नवीन आनंदी पर्वाची सुरवात केली.!
विनायक जोशी (vp )
3 November 2016
electronchikatha.blogspot.com