मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

"पु.ल.देशपांडे "नावाचा संस्कार !!!

// श्री स्वामी समर्थ //
  " पुल " नावाचा संस्कार "
१९७१ साली सोलापूर मध्ये आमच्या घरात जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या समोर काकाने " वाऱ्यावरची वरात " हा पुलंचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आणि माझ्या वरती पहिला आनंददायी आणि विलक्षण असा "पुल" संस्कार झाला. पुढील आयुष्यात त्यांनी लिहिलेली ओळन् ओळ " सखाराम गटणे " स्टाईल ने वाचून काढली.
नोकरी मध्ये असताना कलकत्ता येथे जाण्याचा योग आला त्या वेळी पुलंच्या लेखातून भेटलेल्या शांतिनिकेतन , रविंन्द्रनाथ टागोर,शर्वरीबाबू ,गौरीशंकर घोष ,रामकिंकरदा वगैरे जग प्रसिद्ध व्यक्तींचे कलकत्ता नजरेसमोर होते.
लेह-लडाख चा विषय निघाला की १९६७ साली लडाख मधील वातावरणात  लढणारे आपले सैनिक , त्या काळातील असुविधा ,सरकारी गलथान कारभार  किंवा ग.दि.माडगूळकरांना त्या भूमीवरती स्फुरलेले शौर्य गीत या सर्वांचा उल्लेख असलेला "शूरा मी वंदिले "हा लेख आठवतो.
असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या माणसाने स्वाभिमानी आयुष्याबरोबर,
संगीत,चित्रकला,शिल्पकला,नाटक,
सिनेमा ,भाषाशास्त्र ,कविता वाचन या पासून ते वेगवेगळ्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या कडे  निकोप आणि निरोगी पणाने बघायची दृष्टी दिली.
परवा मुंबई वरुन येताना "मेणाच्या पुतळ्यांच्या प्रदर्शनाची जाहिरात लोणावळ्या जवळ वाचली आणि
पुलंनी उल्लेख केलेल्या "रघुनाथराव फडके "या महान कलाकारांने बनवलेले यांत्रिक मेणाचे पुतळे समोर दिसू लागले.
पुलंनी बऱ्याच देशात मोकळेपणानं भटकंती केली आणि अत्यंत सहजतेने आपले सर्व अनुभव लिहून काढले.निसर्गाची किंवा तेथील सौंदर्य यांची सहज जपणूक करणाऱ्या परदेशी लोकांच्या बद्दल अतिशय उत्तम आठवणी त्यांनी प्रवास वर्णनात केल्या आहेत.
"सौंदर्य " हे ओरबाडण्यासाठी किंवा उपभोग्य वस्तू नसून ती अनुभवण्याची गोष्ट आहे हा सुध्दा "पुलं"च्याच संस्काराचा एक भाग आहे !!
"क्रांतीचे गोंधळी" या कार्यक्रमात अटलबिहारी बाजपेयींच्या समोर महाप्रतिभावान अशा स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दलचे पुलंचे भाषण ऐकले आणि फक्त शांत बसलो नेहमी प्रमाणेच !!!
विनायक जोशी (vp)
८ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा