// श्री स्वामी समर्थ //
" जगज्जेते भारतीय "
२७ डिसेंबर २०१६ या दिवशी पुण्यातील १८२ जणांनी थायलंड मधील कोह तावो येथे समुद्राच्या तळाशी " पाण्याच्या खाली जगातील सर्वात मोठ्ठी मानवी साखळी तयार केली "आणि १७३ इटालियन मंडळींनी केलेले रेकाॕर्ड संपुष्टात आणले. भारताच्या शिरपेचात जगज्जेते पदाचा मानाचा तुरा खोवला.
CEF INDIA चे अध्यक्ष आणि अत्यंत तेजस्वी विचारवंत डाॕ.मनिष गुप्ता यांनी "पाण्याच्या खाली जगातील सर्वात मोठी मानवी साखळी भारतीय लोकांनी तयार करावी " हा विचार जून २०१६ मध्ये सर्वांच्या समोर मांडला आणि या मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सप्टेंबर मध्ये या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय विजय बढे आणि त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा निरंजन यांनी घेतला.
पाण्याच्या खाली साधारणपणे एक तास रहावे लागणार असल्यामुळे येरवडा येथे स्कुबा डायव्हिंग या विषयावरील प्राथमिक ट्रेनिंग झाले.
पुण्याहून सलग छत्तीस तास प्रवास करुन देशप्रेमाने भारलेली आणि कोणत्याही परिस्थितीत ही मानवी साखळी तयार करायचीच या निश्चयाने प्रेरित २०३ जणांची टीम थायलंडला पोचली. या ठिकाणी प्रत्येक ८ जणांना १ असे मार्गदर्शक नेमलेले होते.त्यांनी पाण्याच्या खालील जगाबद्दल सर्वांना माहिती दिली.हे सर्व मार्गदर्शक या इव्हेंटच्या वेळी आपआपल्या टीमच्या मागे उपस्थित राहणार होते.
२६ डिसेंबर या दिवशी सर्व जण सराव करण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचे कीट परिधान करुन समुद्रात उतरले या वेळी मात्र समुद्राच्या तळाशी असलेले वातावरण किंवा तेथील कमी दृश्यमानता असलेल्या जागी बऱ्याच मंडळींचा आत्मविश्वास डळमळीत झाला. सर्वांच्या मध्ये योग्य असा ताळमेळ न साधता आल्यामूळे अपेक्षित रिझल्ट न मिळता सर्वजण बाहेर आले. २०३ मधील एकाही जणाने चूक केली तर सर्वांनी मिळून केलेल्या कष्टांवरती पाणी पडणार याची वस्तूनिष्ठ जाणीव होवून प्रत्येक जण गंभीर झाला होता.त्या रात्री डाॕ.मनिष यांनी सरावाच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होवू नये या विषयी सुस्पष्ट असे मार्गदर्शन केले.याचवेळी २०३ जणांच्या टीममधील २१ जणांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
२७ डिसेंबर २०१६ या दिवशी सर्वजण म्हणजेच १८२ जणांची ध्येयप्रेरीत भारतीय टीम समुद्राच्या किनाऱ्यापाशी पोचली. गिनीज बुक आॕफ रेकाॕर्डसची मंडळी सुध्दा तेथे उपस्थित होती. "गणपती बाप्पा मोरया "किंवा "जय शिवाजी जय भवानी "वगैरे घोषणा झाल्या. "भारत माता की जय " या मंत्राचा उदघोष आणि त्या नंतर सामुदायिक रीत्या राष्ट्रगीत म्हणण्यात आले . या नंतर सर्व जण एंट्री पाॕईंट कडे रवाना झाले. या ठिकाणा पासूनच रेकाॕर्डिंग चालू झाले. त्या दिवशीच्या प्लॕन प्रमाणे ठरलेल्या ठिकाणाच्या ५० मीटर अलिकडेच समुद्राच्या तळाशी साखळी तयार केली.या नंतर एकमेकांचे हात न सोडता रांगत पुढील प्रवास केला.या ठिकाणी एक लांब दोरी बांधली होती.प्रत्येकाने गुडघ्या वरती बसून एका हाताने दोरी धरायची आणि दुसरा हात शेजारील व्यक्तीच्या दोरी पकडलेल्या हातावर ठेवायचा या प्रमाणे साखळी तयार करायचा प्रयत्न चालू झाला. विजयच्या आठ जणांची टीम चुकून एकत्र गोळा झाली होती त्यामुळे सिलेंडर एकमेकांना आपटत होते.त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांना एकमेकांच्या पासून दूर व्यवस्थित लाईन मध्ये उभे केले. या सर्व प्रसंगांचे ड्रोन कॕमेरातून निरीक्षण चालू होते. पाण्याच्या आत शिरुन साधारणपणे २०-२५ मिनिटे झाली होती.विजयच्या दोन्ही बाजूना पोहायला न येणाऱ्या परंतु अत्यंत जिद्दी अशा दोन धैर्यवान महिला होत्या.सर्व जण कोणत्याही परिस्थितीत ध्येयापासून दूर जायचेच नाही अथवा जिंकू किंवा मरु या तयारीनेच पाण्यात उतरले होते.काही वेळाने सर्वांना तयार राहण्याची सूचना मिळाली.थोड्याच वेळात व्यावसायिक कॕमेरामन समुद्राच्या तळापाशी आले. या वेळी साखळी मध्ये उभे असलेल्या प्रत्येक माणसाच्या दोन्हीही हातांच्या पोझिशन्स् आणि छातीवर लावलेला बिल्ला यांचे ओळीने शुटींग सुरु झाले . स्कुबा डायव्हिंग या प्रकारात श्वास घेणे आणि सोडणे दोन्हीही तोंडाने करावे लागते.या वेळी मात्र सर्वांनी मन शांत ठेवायचा सराव वापरात आणला. प्रत्येक मिनीट हा वर्षाच्या कालावधी सारखा मोठा वाटत होता.समुद्राच्या तळाशी तयार केलेल्या या मानवी साखळीचे दोनदा अत्यंत तपशीलवार शुटींग करण्यात आले.बरोबर ७ मिनिटांनी टास्क संपल्याची सूचना मिळाली.सर्व जण तरंगत समुद्राच्या पृष्ठभागावर आले.गिनीज बुकच्या मंडळींचे रेकाॕर्डींग चेक होईपर्यंत म्हणजेच साधारणपणे तासभर त्यांना समुद्राच्या आतच थांबावे लागले. बरोबर सव्वा तासाने रिझल्ट कळाला. पुण्यातून गेलेल्या १८२ शिलेदारांनी समुद्राच्या तळाशी मानवी साखळी तयार करुन भारताच्या नावाने विश्वविक्रम नोंदविला होता. या नंतर मात्र जबरदस्त घोषणाबाजी आणि जल्लोषात सर्व मंडळी किनाऱ्यावर आली.
थोड्या वेळाने सर्वांनी गांधी टोप्या वगैरे भारतीय पोषाख धारण करुन राष्ट्रध्वजाला अभिवादन करुन अत्यंत स्फूर्तीदायक असे राष्ट्रगीत म्हणायला सुरवात केली.थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर "भारत माता की जय" या जयघोषाच्या एकामागून एक अशा लाटा वाहू लागल्या. देशप्रेमाने भारलेल्या या घोषणांच्या सुनामीपुढे भरतीचा समुद्र सुध्दा स्तब्ध होवून बघत राहिला .
विजय बढे या जिगरबाज वडिलांनी आपल्या दहावीत शिकणाऱ्या निरंजनला या धाडसी उपक्रमात बरोबरीने घेतले आणि अर्थातच जगज्जेते पदानंतर दोघांनी मिळून राष्ट्रगीत म्हणायचा असामान्य आणि अविस्मरणीय अनुभव घेतला!!!
विनायक जोशी (vp)
23 January 2017
electronchikatha.blogspot.com