// श्री स्वामी समर्थ //
" कन्यागत "
"वाट वळणाची जीवालागे ओढी ,
दिसते समोर नरसोबाची वाडी " या ओळींची आवर्तने करत करत नृसिंह सरस्वतींच्या वाडीला पोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील कमी पाऊस पडणारा हा प्रदेश असुन सुध्दा कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमामुळे समृद्ध आणि पावन झालेला आहे.
नृसिंह सरस्वती यांनी या अत्यंत निसर्गरम्य प्रदेशात बारा वर्षे तपश्चर्या केली आहे. हा प्रदेश म्हणजे त्यांचा अध्यात्मिक राज दरबार आहे. प्रत्येक बारा वर्षांनी "गुरुचा" कन्या राशीत होणारा प्रवेश .बरोबर याच काळात प्रगट होणारी गंगा .नरसोबाच्या वाडी मध्ये शुक्लतीर्थ येथील तीचे अस्तित्व वगैरे अनेक गोष्टी कानावर येत होत्या. शनिवारी दक्षिण द्वार होवून गेले होते.या वेळी पुराचे पाणी" दत्त महाराजांच्या" पादुकां वरुन वाहत येऊन मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडते . रविवारी दुपारी गर्दी असून सुध्दा शांतपणे दर्शन झाले. सोमवारी भल्या पहाटे उठून नदीत स्नान केले. दररोज पहाटे साडे तीन पासून रात्रीच्या शेजारती पर्यंत सर्व कार्यक्रम हे अतिशय समाधानकारक पणाने पार पडतात. कमालीची Positive vibrations या पूर्ण भागात आढळतात. दोन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे सोलापूरला जायचे ठरवले होते परंतु अचानक पणे नरसिंहवाडीला गेलो. नरसिंह वाडी येथिल पुराचे पाणी ओसरल्यामुळे सर्व गोष्टी उत्तम पणाने दत्त महाराजांनी करवून घेतल्या .
अत्यंत समाधानाने परतीच्या गाडीत बसलो . आता मात्र " आम्ही भाग्यवान आनंद निधान " या ओळींची आवर्तने चालू झालेली होती !!!!
विनायक जोशी ( vp)
16 August 2016
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६
"कन्यागत "म्हणजेच बारा वर्षांनी गुरुचा कन्या राशीत प्रवेश
रसिकाग्रणी बाळूकाका
// श्री स्वामी समर्थ //
*रसिक बाळूकाका*
कोणत्याही कलावंताचा आत्मा म्हणजे रसिक असा प्रेक्षक असतो. दैनंदिन आयुष्यात जगण्यासाठी म्हणून कलावंताना मानधनाची पाकिटे घ्यावी लागत असली तरी संतुष्ट अशा रसिकांची मिळणारी दाद ही जास्त अनमोल असते.अशाच एका अत्यंत कलासक्त असलेल्या किंवा जुन्या गाण्यांची ओळन् ओळ पाठ असलेल्या रसिक माणसाची आणि माझी गाठ पडली होती. घरामध्ये अजिबात संगीताचे वातावरण नसताना या सद्गृहस्थाला मात्र या मधील बारकावे अतिशय बारकाईने कळत .गाण्याचा लहेजा किंवा गाण्याच्या मधील ठेहराव ,गाण्यातील शब्दांचे योग्य जागी होणारे अचूक लँडींग या बाबतीत कमालीची खोल जाण त्यांना होती. कलाकारांना सुध्दा बऱ्याच वेळेला आपली कला सादर करताना समोरून तसाच उत्तम दर्जाचा प्रतिसाद मिळत गेला तर ती कलाकृती सर्वांचीच भरभरून दाद घेऊन जाते. वेडे रसिक या कॕटेगरी मध्ये बसणारा हा अत्यंत हूशार गृहस्थ व्यवहारी जगापासून फारच दूर होता.लता मंगेशकर यांनी गायलेली बहूतांश गाणी ही त्या मधिल सर्व बारकाव्यां सकट त्यांना पाठ होती.सकाळी उठल्या पासून त्याच नादात अगदी मध्यरात्र होई पर्यंत .कोणतेही जादा कष्ट न करता सहजपणे डाॕक्टर होईल अशा प्रकारची कुशाग्रता असलेला हा माणूस अभ्यास सोडून वेगवेगळ्या कार्यक्रमाना हजेरी लावत फिरत होता.त्यांचा आदर्श असलेल्या मंगेशकरांच्या " प्रभूकुंज" ला सुध्दा त्यांनी भेट दिलेली होती.मंगेशकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीची मंडळी सुध्दा या रसिक माणसाला कोठेही भेटली तरी आदराने ओळख देत असत.वेष असावा बावळा , परी अंतरी नाना कळा अशा प्रकारे राहणाऱ्या या जबरदस्त संगितप्रेमी माणसाला वेळेचे,व्यवहाराचे किंवा शिस्तबद्ध आयुष्याचे अजिबात भान नव्हते . साचेबध्द , संस्कारी वगैरे प्रकारे आयुष्य जगणाऱ्या आणि त्यालाच यशस्वी म्हणणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसांची ही "वादळे "अजिबात पर्वा करत नाहीत .ती येतात .त्यांना पाहीजे तशी विन्मुक्त पणे राहतात आणि अचानक एके दिवशी स्वर्गीय संगित ऐकण्यासाठी स्वर्गाकडे निघून जातात अगदी आमच्या बाळूकाकांच्या सारखी म्हणजेच " अनंत जगन्नाथ फाटक " या अवलिया सारखी !
विनायक जोशी (vp )
13 May 2016
electronchikatha.blogspot.com
"आभार चांगल्या विचारांचे"
// श्री स्वामी समर्थ //
"आभार"
आभार या वर्षी आज पर्यंत पडलेल्या पावसाचे आणि चांगल्या विचारांचेही !
विनायक जोशी
22 August 2016
// श्री स्वामी समर्थ //
" शक्ती चांगल्या विचारांची "
माझा मित्र विवेक याने सांगितल्याप्रमाणे दिवसातून एक मिनीट तरी शांतपणाने आणि आनंदाने स्थिर बसून पावसाचे गाणे ऐकणार आहे. भरपूर पडणारा पाऊस आणि त्या मुळे तृप्त झालेली जीवसृष्टी यांचेच विचार मनात आणायचे आणि या विचारांची आंदोलने प्रसारीत करायची .सध्या तरी या पाॕझीटीव्ह विचारांचा पाऊस सुरु करुयात. खऱ्या पावसाला सुध्दा त्या मध्ये चिंब भिजण्यासाठी यायला नक्की आवडेल !!
विनायक जोशी (vp )
15 May 2016
electronchikatha.blogspot.com
प्रेम म्हणजे प्रेम असते
// श्री स्वामी समर्थ //
" प्रेम म्हणजे प्रेम असते "
सहवासाने वृद्धींगत होते ते प्रेम .
फक्त दर्शन झाले तरी आनंद होतो ते प्रेम. काहिही न बोलता सर्व काही समजते ते म्हणजे प्रेम .चैतन्याचा साक्षात्कार होतो ते प्रेम.मोठ्ठा चष्मा घालणारी , हातात नावापूरती जपमाळ धरणारी ,जेवणाच्या मध्ये मिरचीचा खरडा खाणारी ,कायम कामात असणारी , प्रत्येक वेळेला पगार किती ते विचारणारी आणि वडीलांच्या पेक्षा जास्त झाल्यावर कमालीची आनंदी होणारी,शेकडो प्रेमळ सुरकुत्या हातावर असलेली, अशा एका अत्यंत प्रेमळ स्त्री वरती माझे प्रचंड प्रेम होते कारण ती माझी " आज्जी" होती .................!
विनायक जोशी (vp)
23 December 2015
electronchikatha.blogspot.comm
श्रीमानयोगी आठवण
// श्री स्वामी समर्थ //
" श्रीमानयोगी "
ह्या पुस्तकाची तरुणपणी खुप पारायणे केली . कंपनीला सलग ३-४ दिवस दांडी मारुन याचे पारायण करत होतो.अफजलखानाला भेटायला जाण्याचा आधीची रात्र किंवा पन्हाळा ते विशाळ गड राजांची धावपळ , पुरंदर वरती मिर्झाराजे तोफांचे गोळे डागत असताना झालेली अगतिकता वगैरे प्रसंग वाचताना अतिशय तणावपूर्ण वातावरणात वाचन घडत असे. कापुरहोळ वरुन नारायणपुरला जाताना 'पुरंदर" दिसला की राजांच्या त्या आवडत्या गडाला सलाम करायचा ! पुरंदर कडे बघताना डोळे मिटले की हळूहळू घोड्यांचा टापांचे आवाज यायला लागतात , धुळीची वादळे वाहू लागतात आणि अत्यंत वेगाने निष्ठावान मावळे आणि शिवाजीराजे गडावर माॕसाहेबांना भेटायला निघून जातात ....कायमचे !
विनायक जोशी (vp )
18 December 2015
electronchikatha.blogspot.com
मनीमाऊचे " पिल्लू "
// श्री स्वामी समर्थ //
" पिल्लू "
मागच्या आठवड्यात निर्वासित झालेली अशी एक मांजर आपल्या नुकत्याच जन्मलेल्या तीन पिल्लांना घेऊन सोसायटीच्या जिन्यात मुक्कामाला आली होती. त्याच रात्री या अनामिकेने आपल्या पिल्लांसकट आमच्या गॕलरी मध्ये मुक्काम हलवला. नुकतेच डोळे उघडलेली ती पिल्ले आपल्या आईकडे आणि भावंडांकडे डोळे भरुन पहात होती. आई थोडासा फेरफटका मारायला बाहेर गेली की ही तिन्ही भावंडे एकमेकांना बिलगून बसलेली असत.वडीलांना मात्र आसपास यायला सुध्दा बंदी होती.या तिन्ही पिल्लां मध्ये एक अतिशय चलाख होते.अनामिका आणि तिच्या पिल्लांना व्यवस्थित बसता येईल असे एक खोके गॕलरी मध्ये ठेवले .दोन दिवसांनी रात्रीच्या वेळी दोन पिल्लांना घेऊन आई निघून गेली. चलाख असे पिल्लू आमच्या येथेच राहीले . दुपार पर्यंत त्याच्या आईची वाट बघितली. त्या नंतर मात्र त्याला दूध पाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय अवलंबले. पहिल्यांदा कापसाने हळूहळू थेंब थेंब दिले . त्या नंतर कापडाच्या बोळ्याने . नंतर शाई भरायचा ड्राॕपर वगैरे सर्व गोष्टींचा अवलंब करुन बघितला. परंतु त्याचे पोट काही भरत नव्हते . शेवटी "Dispovan 5 ml" ही इंजेक्शनची सिरींज विकत आणली . अत्यंत रामबाण असा उपाय सापडला.याच्या पंपामुळे हळूहळू आणि व्यवस्थित दूध पाजणे शक्य झाले.कमालीचे बोलके डोळे असलेल्या या पिल्लाने आपल्या कोवळ्या नखांनी आमच्या हाताला घट्ट असे पकडून " Dispovan " च्या सहाय्याने दूध प्यायला सुरवात केली.पिल्लाचे पोट भरले कि गुरगुराटाची अनेक आवर्तने करत ते आनंदाने गप्पागोष्टी करु लागले ...!
विनायक जोशी ( vp )
30 August 2016
electronchikatha.blogspot.com
वडवळचे नागनाथ महाराज आणि अमावस्येची यात्रा
// श्री स्वामी समर्थ //
" आनंददायी अमावस्या "
माझ्या लहानपणी अमावस्या हा दिवस आनंददायी करायचे पूर्ण श्रेय वडवळच्या नागनाथ महाराजांना आहे. सोलापूर पासून ३०-३२ किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान . देवळाला पारंपरिक पध्दतीने बांधलेले दगडी कंपाउंड आणि आतल्या बाजूला देऊळ. गाभाऱ्यात अत्यंत सुरेख अशी शंकराची पिंड.देवळाच्या बाहेर टोपल्यांमध्ये जिवंत नाग घेऊन बसलेली मंडळी. अमावस्येला नागनाथ महाराजांची यात्रा असल्यामुळे पूर्ण वडवळ गावात उत्साहाचे वातावरण असे.आईच्या बरोबरीने अनेकदा आम्ही वडवळला गेलो आहोत . सोलापूर रोड वरती वडवळ फाट्याला उतरुन पायवाटेने शेतांच्या मधून देवळात जाताना छान वाटत असे.नागनाथ महाराजांच्या या यात्रे मुळे अमावस्या हा दिवस रहस्यमय किंवा निराशेचा न जाता आनंदाने पार पडत असे.माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुध्दा अनेक चांगली कामे अमावस्येलाच पार पडली आहेत. अनेकदा प्रवास सुध्दा याच दिवशी सुखकर झाला आहे. श्रध्दा आणि आनंद या गोष्टींची कधीही चिकित्सा न केल्यामुळे कोणतीही तिथी असली तरी आपला दिवस म्हणजे एकदम cool ..... !
विनायक जोशी ( vp )
31 August 2016
electronchikatha.blogspot.com
"जिनीयस मंदार सोवनी"
// श्री स्वामी समर्थ //
" जिनीयस "
" मंदार सुरेश सोवनी "
८ सप्टेंबर १९८४ या दिवशी कोल्हापूर मध्ये ताराबाई पार्क येथे हे चुणचुणीत बाळ जन्माला आले. इंग्रजी मधून शिक्षण घेता यावे म्हणून convent मध्ये घातले.खेळांची प्रचंड आवड . अभ्यास वगैरे किरकोळ गोष्टी शेवटच्या क्षणी . क्रिकेट मधील पहिले शतक रुबी अपार्टमेंट मधील " बोहरींच्या " मुलांच्या बरोबर खेळताना मारले.हा नववीत असताना त्याचा केदारदादा १२ वीला बोर्डात ११वा आला. त्या मुळे आता आपण अभ्यास करायाला पाहीजे असे वाटून थोडासा अभ्यास करुन हा सुध्दा बोर्डात ४ था आला. या नंतर मात्र बिट्स पिलानी येथे पुढील शिक्षण .पिलानी येथे त्याच्या बरोबरीने शिकणारी रेणूका दिक्षीत ही अत्यंत गुणी मुलगी आयुष्यातील जोडीदारीण म्हणून त्याच्या आयुष्यात आली. पहिली नोकरी पुण्यात श्री .उडपीकरांच्या "वेव्हलेट "या कंपनीत केली .त्यानंतर मात्र डिजीटल सिग्नल प्रोसेसींग मध्ये अभ्यास करण्यासाठी आणि MS करण्यासाठी मेलबर्न येथे प्रयाण. MS पूर्ण झाल्यावर तेथेच आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत आहे.सध्या Ivanhoe melbourne या अत्यंत शांत जागी बायको आणि आपल्या दोन लहान पिल्लां बरोबर रहात आहे.Yarrallen cricket club कडून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खेळत आहे.तेथील मराठी मंडळींच्या बरोबर मराठी नाटकात किंवा छोट्या सिनेमात काम करत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात सोलापूर मध्ये आपल्या आजी आणि आजोबांच्या कडे दोन महिने रहाणारे हे चलाख व्यक्तिमत्व आता " सिग्नल प्रोसेसींग " मध्ये बऱ्याच जणांना मार्गदर्शन करत आहे .अतितचा " वडा " असो किंवा कोल्हापूरची मिसळ आजही तेवढ्याच आवडीने खाणे आणि कोल्हापूरला असताना शिवाजी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मुलभूत संकल्पना समजावून सांगणे हे त्याचे आवडीचे काम. पहिलीचा होमवर्क करताना जी सहजता होती तिच MS पूर्ण करेपर्यंत कायम ठेवणाऱ्या या उमद्या आणि खिलाडूवृत्ती असलेल्या दिलदार भाच्याला म्हणजेच " मंदार सोवनी " याला आमच्या कडून अनेक शुभेच्छा !
विनायक आणि कल्याणी मामी
8 September 2016
electronchikatha.blogspot.com
"मंत्र जागर "ऋग्वेदी घनपाठी गुरुजींचा
// श्री स्वामी समर्थ //
" मंत्र जागर "
सारसबागेच्या किंवा तळ्यातल्या गणपतीच्या उजव्या बाजूला असलेल्या कांचीच्या शंकराचार्यांच्या मठातून नारायणचा मंत्र जागर करायचा का असा फोन आला . "ऋग्वेदा" मधील साधारणपणे साडेदहाहजार मंत्र किंवा लाखभर पदे मुखोदगत असलेले आठ"घनपाठी" ब्राह्मण हे मंत्र म्हणायला येणार होते.काल पहाटे पासून अत्यंत उत्साहाने आणिआनंदाने तयारी सुरु केली.कमालीची पाॕझीटीव्ह शक्ती असलेला नारायण आणि त्या नंतर थोड्याच वेळात ब्रह्मवृंद दाखल झाला. आमच्या घराच्या दरवाजावर Tuition असा फलक असल्यामुळे सुरवात "सरस्वती " च्या मंत्रांपासून झाली. त्या नंतर पंचवीस मिनीटे वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रांचा आविष्कार बघायला आणि ऐकायला मिळाला. या नंतर सर्वांची ओळख आणि "वेदां"विषयी सविस्तर माहिती सांगितली . या घनपाठी गुरुजींच्या मधील जे गेली ५० वर्षे हेच मंत्र म्हणत आहेत अशी मंडळी मात्र एखाद्या थोर शास्त्रीय गायका सारखे उत्तम रीतीने मंत्रांचे पठण करत होते. गुरुकुल पध्दतीने राहून पंधरा सोळा वर्षे अध्ययन करुन त्या नंतर परीक्षेत पास होणारे हे " घनपाठी " गुरुजी वेगळेच वाटले. आपण ज्या वास्तू मधे राहतो ती वास्तू कायम आपल्याला " तथास्तु " असा आशिर्वाद देत असते याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही सर्वांनी म्हणजेच अत्यंत आनंदी असे शेजारी , मी , नारायण आणि कल्याणी यांनी या " ऋग्वेदातील मंत्रांच्या " मधून निघणाऱ्या स्पंदनांचा अनुभव घेतला . गणपतीच्या काळात मंत्र जागर घरी करायचा ही पद्धत परत चालू झाली !!!
विनायक जोशी ( vp )
11 september 2016
electronchikatha.blogspot.com
"कडप्पा ट्रीप"
// श्री स्वामी समर्थ //
" कडप्पा "
बुधवारी दुपारी एका मिटींग साठी कडप्पा येथील झुआरी सिमेंट या कारखान्यात जायला निघालो. संदीप कुलकर्णी हा अत्यंत हुशार आणि आनंदी जोडीदार बरोबर होता. बंगलोर येथे संचारबंदी असल्यामुळे मध्यरात्री तेथे पोचायचे आणि पहाटे बंगलोर पासून २६० किलोमीटर दूर अशा कडप्पाला जायला निघायचे ठरविले होते.पुण्याच्या छोट्याशा विमानतळावर असंख्य प्रकारचे प्रवासी होते. पर्यटक या सदरात असलेली असंख्य मंडळी बंगलोर मधील परिस्थिती मुळे चिंतातूर होती.इंडिगोने त्यांच्या प्रथेनुसार वेळेवर उड्डाण केले आणि वेळेवर पोचलो. नेव्हीगेशनने सुसज्ज असलेल्या टॕक्सीजमुळे लवकरच हाॕटेल मध्ये पोचलो. उत्तम दर्जाचे रस्ते आणि रात्री सुध्दा शिस्तबद्ध रितीने चाललेली वाहने. दोन तास मुक्काम करुन पहाटे बंगलोर सोडले आणि बंगलोर हैद्राबाद हायवे वरुन प्रवास सुरु झाला.बऱ्याच मल्टीनॕशनल कंपन्यांच्या आॕफीसेसना बघत बघत बंगलोर सोडले.एका तासाने छानशा हाॕटेल मध्ये नाष्टा घेतला. स्वच्छता , पदार्थाची चव आणि हसतमुखपणाने देण्याची पद्धत लाजवाब. थोड्याच वेळात रस्याच्या कडेला सत्य साईबाबा यांच्या मठाचा उल्लेख असलेले बॕनर दिसायला लागले. अल्प दरात अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे त्यांचे दवाखाने आणि साईबाबा गेल्यानंतरचा सचिन तेंडूलकर आठवला.आन्ध्र मध्ये परवानगी घेऊन प्रवेश केला. रस्त्याच्या कडेला असलेली दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेली देवळे , टेकड्या असाव्यात असे छोटे डोंगर आणि घाट रस्ता पार करुन कडप्पा या जिल्ह्यात पोचलो. खनिज संपत्ती मुळे अत्यंत समृद्ध असलेल्या या भागात बरेचसे सिमेंटचे कारखाने आहेत.दुपारी काम आटोपल्यावर कारखान्या जवळच्या एका छोट्या गावात राहिलो. या गावातील सर्व रेस्टाॕरंट्स आणि बार एकत्र नांदत होते. दुसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस पडत असताना कडप्पा सोडले.बंगलोर विमानतळावर लवकर पोचायचे असल्यामुळे गुगलचे नेव्हीगेशन आणि जीपीएस यांचा योग्य ताळमेळ साधत वेळेच्या आधीच बंगलोर विमानतळावर पोचलो. कर्फ्यू मुळे विमानतळावर अतिशय कमी गर्दी होती. KFC पासून ते विमानाच्या स्टाफ पर्यंत सर्वांना गप्पागोष्टी करायला भरपूर वेळ होता. अत्यंत उत्तम दर्जाची तांत्रिक टीम असलेल्या Go India Go म्हणजेच Indigo च्या चिमुकल्या अशा विमानातून प्रवास वेळेवर पार पडला.सातशे ऐंशी किलोमीटर चे अंतर पार करुन संध्याकाळी सहा वाजता पुण्यात पोचलो. रिक्षावाल्यांच्या बरोबरील वाद न मिटल्यामुळे आम्ही आरक्षित केलेली गाडी विमानतळाच्या बाहेर उभी होती. रिमझिम पडणारा पाऊस ,बेशिस्त वाहने यांच्या मधून सहनशक्ती बघणारा प्रवास चालू झाला. वैताग घालवण्यासाठीचा सोपा उपाय म्हणून संदीपने किशोर कुमारचे गाणे गुणगुणायला सुरवात केली.आमच्या गाडीचा ड्रायव्हर हा किशोरकुमार यांचा परमभक्त असल्यामुळे पुढील एक तास एका मागून एक अशी किशोरची गाणी म्हणून त्याने आमच्या प्रवासाचा उत्तरार्ध संपूच नये अशा अवस्थेत आणून ठेवला.
कडप्पा या गावाच्या जवळ येईपर्यंत न दिसलेला कडाप्पा , सत्यसाईबाबा , मेगावॕट मध्ये पाॕवर घेणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स , इडली- सांबार वगैरे अतिशय हसतमुख पणाने देणारे आणि हात जोडून आदराने व आनंदाने नमस्कार करणारे वेटर्स, प्रचंड पावसात सुध्दा रस्त्यातील पाण्यातून व्यवस्थित नेणारा आमचा नरसिंह हा चालक, गुगल मॕप्स आणि त्याचे मार्गदर्शन , ढगांच्या वरुन परावर्तित होणारे ऊन , टेक आॕफ आणि लँडींगच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे येणारे इंजिनचे आवाज , कमालीच्या प्रेमाने वागणारी आणि प्रोसेस मध्ये लढावू वृत्तीने लढणारी झुआरी सिमेंट येथील माणसे आणि सर्वात शेवटी आमच्या वाटेला आलेला दिलदार असा ओला कॕबचा किशोरकुमार .......!
विनायक जोशी (vp)
25 september 2016
electronchikatha.blogspot.com
"आनंददायी गीता" डाॕ.मृणाल मायदेव
// श्री स्वामी समर्थ //
" आनंददायी गीता "
डाॕ.मृणाल मायदेव-धोंगडे
मृणाल ,
पु.ल.देशपांडे यांनी शिवाजी राजांचे आरमार आणि कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल लिहिलेले पुस्तक वाचताना तोच इतिहास आनंददायी आणि प्रेरणा दायी वाटू लागला याचे एकमेव कारण म्हणजे लिहिणारा माणूस हा आनंद यात्री होता. बरोबर हाच आनंद दररोज तुझ्या आवाजातील गीतेमधील संस्कृत आणि मराठीतून ऐकायला मिळणारा श्लोक आम्हाला देत होता. इंग्रजी मधून योग्य प्रकारे लिखीत स्वरुपातील ठेवा असे स्वरूप सुध्दा प्राप्त झाले आहे.व्हाॕटस् अॕप च्या माध्यमातून दररोज प्रसारण , गुगल मधून बॕक अप आणि रेकाॕर्डिंग वगैरे काळानुरुप गोष्टींचा उत्तम वापर विशेष कौतुकास्पद .लहानपणी दिवेलागणीच्या वेळी रामरक्षा , भिमरुपी यांच्या बरोबरीने गीतेतील १२ वा किंवा १५ वा या अध्यायांची भेट झाली होती. साधारणपणे गेली दोन वर्षे ज्या ध्येय निष्ठेने हे सुंदर काम तू केले आहेस त्या बद्दल कमालीचे कौतुक वाटते आहे. हा पूर्ण उपक्रम म्हणजे डाॕ.मृणाल मायदेव या आनंदी मुलीने सांगितलेली " आनंददायी गीता दर्शन " असा राहिला आहे.
विनायक जोशी (vp )
२९ सप्टेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६
पुनरागमनायच " गंपती बाप्पा "
// श्री स्वामी समर्थ //
" गणेश "
श्रावणातील चारही सोमवारी भोलेनाथांची मनःपूर्वक पूजा केली आणि लगेचच भाद्रपदा मध्ये त्यांची मेल आली. या वर्षी काही दिवसांसाठी गणेशजी आमच्या घरी येणार होते. अचानक गडबड उडाली.घराचा कोपरान कोपरा स्वच्छ केला. आम्ही सर्व व्यवस्था नीट केली आहे का नाही हे बघण्यासाठी हरितालिका पहिल्यांदा आल्या.गणेशाच्या आगमनाची पूर्व तयारी बघून संतुष्ट होवून परतल्या. चतुर्थीला तेजस्वी आणि देखणी अशी बाप्पांची स्वारी देवघरात स्थानापन्न झाली आणि आनंदाचा सोहळा चालू झाला.आपले छोटेसे डोळे किलकिले करुन दररोजची खिरापत न्याहाळू लागली. आमच्या मुलांनी म्हणलेल्या अथर्वशीर्षा वर समाधानाने डोलू लागली. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती आणि पूजा होवू लागली. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आणि दूर्वा , फुले ,पत्री ,हार वगैरे गोष्टी बघून बाप्पा आनंदून गेले . या बुध्दीच्या देवतेने सर्व गोष्टी यथासांग करुन घेतल्या. आपल्या शेजारी गौरींना प्रशस्त जागा करुन दिली.गणेशजींनी ऋग्वेदा तील मंत्रांचा सुध्दा आस्वाद घेतला. पाच सहा दिवस झाले आणि आई-वडीलांची आठवण काढू लागले .म्हणता म्हणता निरोप घ्यायचा दिवस उजाडला .चैतन्य मुर्ती अशा आमच्या नातीला म्हणजेच" इरा" ला बरोबरीने घेऊन उत्तरपूजा नामक निरोपाचे भाषण आणि पुनरागमनायच म्हणून पुढच्या वर्षी परत येण्याचा वायदा पक्का करुन घेतला.विठ्ठल रखुमाईच्या समोरील पुंडलिकाच्या देवळा पाशी आल्यावर मात्र आई- वडीलांना भेटण्यासाठी आतूर झालेल्या शिव- पार्वतीच्या लेकराने म्हणजेच गणपती बाप्पाने तीन वेळा मागे बघून आमचा निरोप घेतला .........पुढच्या वर्षी लवकर परत येण्याच्या बोलीवर !!!
विनायक जोशी (vp)
11 september 2016
electronchikatha.blogspot.com