शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

मनीमाऊचे " पिल्लू "

// श्री स्वामी समर्थ //
        " पिल्लू "
  मागच्या आठवड्यात निर्वासित झालेली अशी एक मांजर आपल्या नुकत्याच जन्मलेल्या तीन पिल्लांना घेऊन सोसायटीच्या जिन्यात मुक्कामाला आली होती. त्याच रात्री या अनामिकेने आपल्या पिल्लांसकट आमच्या गॕलरी मध्ये मुक्काम हलवला. नुकतेच डोळे उघडलेली ती पिल्ले आपल्या आईकडे आणि भावंडांकडे डोळे भरुन पहात होती. आई थोडासा फेरफटका मारायला बाहेर गेली की ही तिन्ही भावंडे एकमेकांना बिलगून बसलेली असत.वडीलांना मात्र आसपास यायला सुध्दा बंदी होती.या तिन्ही  पिल्लां मध्ये एक अतिशय चलाख होते.अनामिका आणि तिच्या पिल्लांना व्यवस्थित बसता येईल असे एक खोके गॕलरी मध्ये ठेवले .दोन दिवसांनी रात्रीच्या वेळी दोन पिल्लांना घेऊन आई निघून गेली. चलाख असे पिल्लू आमच्या येथेच राहीले . दुपार पर्यंत त्याच्या आईची वाट बघितली. त्या नंतर मात्र त्याला दूध पाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय अवलंबले. पहिल्यांदा कापसाने हळूहळू थेंब थेंब दिले . त्या नंतर कापडाच्या बोळ्याने . नंतर शाई भरायचा ड्राॕपर वगैरे सर्व गोष्टींचा अवलंब करुन बघितला. परंतु त्याचे पोट काही भरत नव्हते . शेवटी "Dispovan 5 ml" ही इंजेक्शनची सिरींज विकत आणली . अत्यंत रामबाण असा उपाय सापडला.याच्या पंपामुळे हळूहळू आणि व्यवस्थित दूध पाजणे शक्य झाले.कमालीचे बोलके डोळे असलेल्या या पिल्लाने आपल्या कोवळ्या नखांनी आमच्या हाताला घट्ट असे पकडून " Dispovan " च्या सहाय्याने दूध प्यायला सुरवात केली.पिल्लाचे पोट भरले कि गुरगुराटाची अनेक आवर्तने करत ते आनंदाने गप्पागोष्टी करु लागले ...!
विनायक जोशी ( vp )
30 August 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा