// श्री स्वामी समर्थ //
" कडप्पा "
बुधवारी दुपारी एका मिटींग साठी कडप्पा येथील झुआरी सिमेंट या कारखान्यात जायला निघालो. संदीप कुलकर्णी हा अत्यंत हुशार आणि आनंदी जोडीदार बरोबर होता. बंगलोर येथे संचारबंदी असल्यामुळे मध्यरात्री तेथे पोचायचे आणि पहाटे बंगलोर पासून २६० किलोमीटर दूर अशा कडप्पाला जायला निघायचे ठरविले होते.पुण्याच्या छोट्याशा विमानतळावर असंख्य प्रकारचे प्रवासी होते. पर्यटक या सदरात असलेली असंख्य मंडळी बंगलोर मधील परिस्थिती मुळे चिंतातूर होती.इंडिगोने त्यांच्या प्रथेनुसार वेळेवर उड्डाण केले आणि वेळेवर पोचलो. नेव्हीगेशनने सुसज्ज असलेल्या टॕक्सीजमुळे लवकरच हाॕटेल मध्ये पोचलो. उत्तम दर्जाचे रस्ते आणि रात्री सुध्दा शिस्तबद्ध रितीने चाललेली वाहने. दोन तास मुक्काम करुन पहाटे बंगलोर सोडले आणि बंगलोर हैद्राबाद हायवे वरुन प्रवास सुरु झाला.बऱ्याच मल्टीनॕशनल कंपन्यांच्या आॕफीसेसना बघत बघत बंगलोर सोडले.एका तासाने छानशा हाॕटेल मध्ये नाष्टा घेतला. स्वच्छता , पदार्थाची चव आणि हसतमुखपणाने देण्याची पद्धत लाजवाब. थोड्याच वेळात रस्याच्या कडेला सत्य साईबाबा यांच्या मठाचा उल्लेख असलेले बॕनर दिसायला लागले. अल्प दरात अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे त्यांचे दवाखाने आणि साईबाबा गेल्यानंतरचा सचिन तेंडूलकर आठवला.आन्ध्र मध्ये परवानगी घेऊन प्रवेश केला. रस्त्याच्या कडेला असलेली दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेली देवळे , टेकड्या असाव्यात असे छोटे डोंगर आणि घाट रस्ता पार करुन कडप्पा या जिल्ह्यात पोचलो. खनिज संपत्ती मुळे अत्यंत समृद्ध असलेल्या या भागात बरेचसे सिमेंटचे कारखाने आहेत.दुपारी काम आटोपल्यावर कारखान्या जवळच्या एका छोट्या गावात राहिलो. या गावातील सर्व रेस्टाॕरंट्स आणि बार एकत्र नांदत होते. दुसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस पडत असताना कडप्पा सोडले.बंगलोर विमानतळावर लवकर पोचायचे असल्यामुळे गुगलचे नेव्हीगेशन आणि जीपीएस यांचा योग्य ताळमेळ साधत वेळेच्या आधीच बंगलोर विमानतळावर पोचलो. कर्फ्यू मुळे विमानतळावर अतिशय कमी गर्दी होती. KFC पासून ते विमानाच्या स्टाफ पर्यंत सर्वांना गप्पागोष्टी करायला भरपूर वेळ होता. अत्यंत उत्तम दर्जाची तांत्रिक टीम असलेल्या Go India Go म्हणजेच Indigo च्या चिमुकल्या अशा विमानातून प्रवास वेळेवर पार पडला.सातशे ऐंशी किलोमीटर चे अंतर पार करुन संध्याकाळी सहा वाजता पुण्यात पोचलो. रिक्षावाल्यांच्या बरोबरील वाद न मिटल्यामुळे आम्ही आरक्षित केलेली गाडी विमानतळाच्या बाहेर उभी होती. रिमझिम पडणारा पाऊस ,बेशिस्त वाहने यांच्या मधून सहनशक्ती बघणारा प्रवास चालू झाला. वैताग घालवण्यासाठीचा सोपा उपाय म्हणून संदीपने किशोर कुमारचे गाणे गुणगुणायला सुरवात केली.आमच्या गाडीचा ड्रायव्हर हा किशोरकुमार यांचा परमभक्त असल्यामुळे पुढील एक तास एका मागून एक अशी किशोरची गाणी म्हणून त्याने आमच्या प्रवासाचा उत्तरार्ध संपूच नये अशा अवस्थेत आणून ठेवला.
कडप्पा या गावाच्या जवळ येईपर्यंत न दिसलेला कडाप्पा , सत्यसाईबाबा , मेगावॕट मध्ये पाॕवर घेणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स , इडली- सांबार वगैरे अतिशय हसतमुख पणाने देणारे आणि हात जोडून आदराने व आनंदाने नमस्कार करणारे वेटर्स, प्रचंड पावसात सुध्दा रस्त्यातील पाण्यातून व्यवस्थित नेणारा आमचा नरसिंह हा चालक, गुगल मॕप्स आणि त्याचे मार्गदर्शन , ढगांच्या वरुन परावर्तित होणारे ऊन , टेक आॕफ आणि लँडींगच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे येणारे इंजिनचे आवाज , कमालीच्या प्रेमाने वागणारी आणि प्रोसेस मध्ये लढावू वृत्तीने लढणारी झुआरी सिमेंट येथील माणसे आणि सर्वात शेवटी आमच्या वाटेला आलेला दिलदार असा ओला कॕबचा किशोरकुमार .......!
विनायक जोशी (vp)
25 september 2016
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६
"कडप्पा ट्रीप"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा