शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

रसिकाग्रणी बाळूकाका

// श्री स्वामी समर्थ //
  *रसिक बाळूकाका*
कोणत्याही कलावंताचा आत्मा म्हणजे रसिक असा प्रेक्षक असतो. दैनंदिन आयुष्यात जगण्यासाठी म्हणून कलावंताना मानधनाची पाकिटे घ्यावी लागत असली तरी संतुष्ट अशा रसिकांची मिळणारी दाद ही जास्त अनमोल असते.अशाच एका अत्यंत कलासक्त असलेल्या किंवा जुन्या गाण्यांची ओळन् ओळ पाठ असलेल्या रसिक माणसाची आणि माझी गाठ पडली होती. घरामध्ये अजिबात संगीताचे वातावरण नसताना या सद्गृहस्थाला मात्र या मधील बारकावे अतिशय बारकाईने कळत .गाण्याचा लहेजा  किंवा गाण्याच्या  मधील ठेहराव ,गाण्यातील शब्दांचे योग्य जागी होणारे अचूक लँडींग या बाबतीत कमालीची खोल जाण त्यांना होती. कलाकारांना सुध्दा बऱ्याच वेळेला आपली कला सादर करताना समोरून तसाच उत्तम दर्जाचा प्रतिसाद मिळत गेला तर ती कलाकृती सर्वांचीच भरभरून दाद घेऊन जाते. वेडे रसिक या कॕटेगरी मध्ये बसणारा हा अत्यंत हूशार गृहस्थ व्यवहारी जगापासून फारच दूर होता.लता मंगेशकर यांनी गायलेली बहूतांश गाणी ही त्या मधिल सर्व बारकाव्यां सकट त्यांना पाठ होती.सकाळी उठल्या पासून त्याच नादात अगदी मध्यरात्र होई पर्यंत .कोणतेही जादा कष्ट न करता सहजपणे डाॕक्टर होईल अशा प्रकारची कुशाग्रता असलेला हा माणूस अभ्यास सोडून वेगवेगळ्या कार्यक्रमाना हजेरी लावत फिरत होता.त्यांचा आदर्श असलेल्या मंगेशकरांच्या " प्रभूकुंज" ला सुध्दा त्यांनी भेट दिलेली होती.मंगेशकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीची मंडळी सुध्दा या रसिक माणसाला कोठेही भेटली तरी आदराने ओळख देत असत.वेष असावा बावळा , परी अंतरी नाना कळा अशा प्रकारे राहणाऱ्या  या जबरदस्त संगितप्रेमी माणसाला वेळेचे,व्यवहाराचे किंवा शिस्तबद्ध आयुष्याचे अजिबात भान नव्हते .  साचेबध्द , संस्कारी वगैरे प्रकारे आयुष्य जगणाऱ्या आणि त्यालाच यशस्वी म्हणणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसांची ही "वादळे "अजिबात पर्वा करत नाहीत .ती येतात .त्यांना पाहीजे तशी विन्मुक्त पणे राहतात आणि अचानक एके दिवशी  स्वर्गीय संगित ऐकण्यासाठी स्वर्गाकडे निघून जातात अगदी  आमच्या बाळूकाकांच्या सारखी म्हणजेच " अनंत जगन्नाथ फाटक "  या अवलिया सारखी !
विनायक जोशी (vp )
13 May 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा