रविवार, २३ जून, २०१९

मायकेल शुमाकर शहेनशहाची फेरारी

// श्री स्वामी समर्थ //
  *मायकेल शुमाकर*
  *शहेनशहाची फेरारी*

*विनायक जोशी(vp)*
 📱9423005702

 किर्लोस्कर आॕईल इंजिन्स या कंपनीत डिझाईन आणि डेव्हलपमेंट विभागात काम केलेल्या एका अत्यंत आनंदी आणि अधिकारी व्यक्तीने अॕटोमोबाईल या क्षेत्रातील अनेक बारीकसारीक गोष्टींची जवळून ओळख करुन दिली . राॕयल एनफिल्ड या गाडीला असणाऱ्या स्टार्टर ने आमचा या क्षेत्रात श्रीगणेशा झाला . त्यानंतर मात्र पिधमपूर येथील हिंदुस्थान मोटर्स या कंपनीच्या लान्सर गाडीचा गियर बाॕक्स किंवा टाटांच्या इंडिकाचा गियर बाॕक्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंजिन टेस्टिंगला लागणारी मशीन्स , आॕईल सिल्स पासून ते दोन्ही चाकांचा समन्वय साधणाऱ्या मेकॕनिझम्स बरोबरीने अत्यंत आनंदी आणि उत्कंठा वर्धक प्रवास घडला. एकूणच वेगवान असा एयर कटींगचा आवाज , इंजिन्सचा आवाज , फायरिंगचा आवाज वगैरे परिचयाचे झाले . या सर्व बॕकग्राऊंड वरती फाॕर्म्युला वनच्या ट्रॕक वरती पोल पोझीशन साठी सज्ज झालेल्या वीरपुरुषाचे म्हणजेच मायकेल शुमाकरचे पहिले दर्शन झाले. रेसिंग ट्रॕक वरती अत्यंत सहजतेने  चाललेल्या मायकेल शुमाकरच्या फेरारीच्या थरारक करामती बघण्यात पुढील पाच - सहा वर्षे कशी गेली ते कळालेच नाही. कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि वेगवेगळ्या देशात अतिशय सहजतेने तेथील सर्किट्स वरती हुकुमत गाजवणारा हा अनभिषिक्त राजा हजारो महामृत्युंजय यज्ञाचे पुण्य घेऊन आल्या सारखा वावरत होता. कोणतीही रेस संपल्यावर हसतमुख पणाने प्रेक्षकांना अभिवादन करणारा मायकेल शुमाकर हा कायम स्मरणात राहिला. फेरारी या कंपनीने "मायकल शुमाकर " नावाची कवचकुंडले उतरवल्यावर मात्र फाॕर्म्युला वनपासून हळूहळू दुरावलो. आता पावसाच्या सिझन मध्ये एखादी यामाह गाडी वेगाने जवळून गेली की जुन्या आठवणी जागृत होतात . रेसिंग ट्रॕक वरती धोधो पाऊस पडत असताना सुध्दा ठिणग्यांची आतषबाजी करत दिमाखात येणारी फेरारी आणि तिच्या बरोबर असलेला शहेनशहा मायकेल शुमाकर हे दोघेही सुखरुपपणाने विजयी व्हावेत म्हणून ती थरारक रेस पूर्ण होईपर्यंत एकाच जागी अस्वस्थपणाने बसून रहायचे दिवस संपुष्टात आले....!

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा