रविवार, २३ जून, २०१९

IIT Kharagpur ... केंकरे सर

// श्री स्वामी समर्थ //
        *केंकरे सर*
   *IIT Kharagpur*

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

 सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा *Inner Engineering* बद्दलचा व्हिडीयो यू ट्यूब वरती बघितला आणि पहिली आठवण आली ती केंकरे सरांची. साधारणपणे सहा फूट उंची आणि त्याला अनुसरून उत्तम तब्येत. आमच्या कंपनीतील ते पहिले IIT. त्या काळात  शेतकऱ्यांना दुधाच्या ॲटोमॕटीक मशीन्सची आणि पिशव्यांची उपयुक्तता पटवून देतानाची एक व्हिडीयो कॕसेट कंपनीने काढली होती त्या मध्ये त्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले. कोणीही पाहूणे आले की त्यांना नवीन कामांची माहिती देणे वगैरे कामे त्यांना करावी लागत. त्या काळी मायक्रो प्रोसेसर युगाची नुकतीच सुरवात झाली होती. प्रोसेसर वापरुन पॕकेजींग मशीनचे कंट्रोलर करायचे ठरले.  यावेळी त्यांच्या  हाताखाली माझी नेमणूक झाली. अप्पा बळवंत चौकातून मोठ्ठा फळा आणून आमचा क्लास चालू झाला. अर्थातच  या क्लास मध्ये  ७१ चे युध्द किंवा  त्या मुळे  खरगपुर IIT मध्ये  असलेले black out किंवा त्या काळातील तीन  मजली computation मशीन्स वगैरे विषयाचे ज्ञान सुध्दा मिळत होते. आमच्या दोघांची वेव्हलेंग्थ जमायचे एक कारण म्हणजे अतिशय किरकोळ किंवा फालतू गोष्ट असेल तरीही भरपूर हसणे. नवीन डिझाईन मधील  कोणत्याही गोष्टी बद्दल अतिशय खोल विचार करणे ...वगैरे. या विषयांची आवड त्यांच्याच मुळे वाढली . एखाद्या वेगाने चालू- बंद होणाऱ्या  LED कडे बघून साधारणतः मिली सेकंदां मध्ये  On time सांगणे, एखाद्या गोष्टीला हात लावून अंदाजे त्याचे तापमान सांगणे , Solenoids च्या आवाजावरुन मशीनच्या तब्येती बद्दलचे आडाखे बांधणे  वगैरे गोष्टी त्यांच्या मुळेच शिकता आल्या . थोडक्यात माझ्या  आयुष्यात मशीन्स सुध्दा बोलतात या पर्वाची सुरवात त्या काळात झाली . फ्लो चार्ट काढणे , हँड कोडींग करणे ,वेगवेगळ्या नाॕपची जागा ठेवणे  वगैरे कष्टदायक आणि कंटाळवाण्या गोष्टी ते चिकाटीने करत असत. अत्यंत आनंदाने गडगडाटी हसणाऱ्या आणि अत्यंत परफेक्ट काम करणाऱ्या या माणसामुळे" IIT खरगपुर" ही दिलदार आणि उमद्या मंडळींची संस्था आहे असा कायमचा ठसा उमटला ! आजही नवीन डिझाईन्स  करताना बरीच आकडेमोड करुन एखाद्या कांपोनंटची अव्यवहार्य किंवा अवास्तव अशी व्हॕल्यू येते त्या वेळी केंकरे सरांची आणि त्यांच्या मनमोकळ्या हसण्याची आठवण येते !!!!

*विनायक जोशी (vp )*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा