रविवार, २३ जून, २०१९

Family Doctor ....Dr.Nene

// श्री स्वामी समर्थ //
     *कर्मयोगी फॕमिली डाॕक्टर*
       *डाॕ.द.म.नेने*
 
    *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली माझा जन्म झाला .दहा आॕगस्टला पहाटे २.३० अशी अचूक जन्मवेळ नोंदवायचे काम डाॕ.नेने यांनी केले.त्या काळात डाॕ.दिवाडकर हे आमचे फॕमिली डाॕक्टर होते. या नंतर काही वर्षांनी लष्कर भागातील राम मंदिराच्या शेजारी डाॕ.नेने यांचा दवाखाना चालू झाला . काॕलनी मधील दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबां पर्यंत सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी डाॕ.नेने यांनी लीलया पेलली. मंद स्मित , माफक बोलणे , अचूक निदान आणि अत्यंत कमी फी या चतुःसुत्री मुळे  नेने डाॕक्टरांना सर्वांच्या मनात आणि घरात आदराचे स्थान प्राप्त झाले. नेने डाॕक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धे अधिक आजार घाबरुन पळून जात असत. दररोजचे तीन डोस असे तीन दिवसांचे औषध घेऊन घरी यायचे.पहिल्या दिवसाचे तीन डोस घेई पर्यंतच आजारातून सुटका झालेली असायची.नेने डाॕक्टरांच्या आश्वासक बोलण्यामुळे ताप ,सर्दी ,खोकल्या पासून ते अगदी मणक्याचे हाड सरकलेले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची भीती वाटायची नाही.आजच्या इंटरनेटच्या युगात सुध्दा डाॕ.नेने त्या वेळी वापरत असलेल्या जंक्शन व्हायोलेट किंवा खोकल्याच्या गुलाबी औषधाची अथवा साडेतीन गोळ्यांच्या डोसची आठवण येते.सर्व आजारांना बरे करण्याची ताकद असलेल्या त्या गोळ्यांची कधीही चिकित्सा करावी वाटली नाही किंवा वाटत नाही .याचे एकमेव कारण म्हणजे डाॕ.नेने या  हजारो पेशंट बरे करणाऱ्या तपस्वी माणसाचा अनुभव समृद्ध स्पर्श त्या औषधाला लाभला होता. अनेक  प्रकारच्या डिफीशीयन्सीज दाखवणारी करोडो रुपयांची निर्विकार मशिन्स आता उपलब्ध आहेत .त्या मधून निघणारे रिपोर्टस वाचतानाच भिती वाटते. पेशंटला अजिबात न घाबरवता तपासणाऱ्या डाॕ.द.म.नेने यांची यावेळी आठवण प्रकर्षाने येते . आजही लष्कर मधील राम मंदिरात जायचा योग आला की रामपंचायनातल्या त्या मुर्ती किंवा प्रवचन देणारे गुरुजी ,तेथेच असलेले भुयार आणि याच मंदिराच्या शेजारी लाकडी फोल्डींगचा दरवाजा असलेल्या आणि पन्नास साठ पेशंटनी कायम भरलेल्या दवाखान्याची आणि असंख्य पेशंटस् बरे करणाऱ्या कर्मयोग्याची म्हणजेच "डाॕ.द.म.नेने" या आमच्या त्या वेळच्या "फॕमिली डाॕक्टर" या संस्थेची आठवण येते !!!

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा