मंगळवार, १ मार्च, २०१६

बालपण देगा देवा !

// श्री स्वामी समर्थ //
      " बालपण देगा देवा "
लहानपणी थोडेफार वाचन केले त्याचे पूर्ण श्रेय मी सोलापूर मधील प्रखर उन्हाळ्याला देईन . जागृत अवस्थेत मित्रांच्या बरोबर अखंड खेळणे किंवा गप्पा यांना कमालीचे महत्त्व होते. उन्हाळ्यात मात्र दुपारच्या वेळी घराबाहेर पडायला बंदी  असे त्या वेळी हाताला लागेल ते पुस्तक वाचायचे. रणजित देसाईंच्या "स्वामी " पासून सुरवात झाली त्या नंतर 'श्रीमानयोगी' आणि 'मृत्यूंजय' वाचून झाले.शालेय जीवनात या पुस्तकांची पारायणे झाली होती. संभाजीं राजांना पकडून नेले तेंव्हा महाराजांची झालेली तगमग असो किंवा शूर असून सुद्धा संधी न मिळणारा 'कर्ण 'मनाच्या कोपऱ्यात कायम मुक्कामाला राहीला. वाचन करणारा माणूस एकटाच हसताना दिसला कि त्याच्या हातात अत्रे किंवा पुल आहेत याची खात्री असे.चिमणराव आणि गुंड्या भाऊ असेच भेटून गेले. गाँर्की ची "आई " मात्र कधीच स्मरणात राहिली नाही. याच काळात  श्री रामचरित मानस किंवा रामायण आणि  महाभारताने सुद्धा हजेरी लावली होती .दहावीच्या परीक्षेनंतर मात्र विवेकानंदांची चारशे पत्रे हे पुस्तक वाचून काढले.जिभकाटे यांचे प्राणायामा बद्दलचे विचार वाचले. आमचे लहानपण आनंदी जाण्यात असंख्य मित्र , घराच्या आवारात असलेली प्रचंड झाडे , टेलिफोन आणि टीव्ही यांची अनुपस्थिती , घरच्यांनी दिलेले स्वातंत्र्य , काँलनी मध्ये असलेली हिरवीगार मोठी खेळाची मैदाने आणि वाचनाची आवड यांचा फार मोठा वाटा आहे .!
विनायक जोशी (vp)
16 october 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा