// श्री स्वामी समर्थ //
" परदेशी गायी "
' Holstein Friesian '
माझा मित्र अजित याच्या मुळे "गायी आणि म्हशींचे " एकत्रित राहण्याचे ठिकाण म्हणजेच " गोठा" या विषयी मुलभूत आणि आनंददायी ज्ञान प्राप्त झाले.कडबा ,पेंड ,आंबोण ,सरकी,
चरवी ,कडबा कुट्टी वगैरे शब्द संग्रह वाढला. यांच्याच गोठ्या मध्ये असंख्य मारक्या म्हशींकडे दुर्लक्ष करत आपल्या वासराला चाटत बसलेल्या एका टपोऱ्या डोळ्यांच्या गायीची प्रथम भेट झाली.त्या वेळेस ती अंगावरच्या माशा शेपटीने उडवत रवंथ करत एखाद्या तत्वज्ञा सारखी बसलेली होती. याचवेळी अजितच्या बाबांनी आधुनिक पध्दतीने दूधाचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. अजितच्या बरोबर राहिल्यामुळे या गायींच्या बद्दल जास्त खोलवर ज्ञान मिळत गेले.त्या नंतर अंगावर काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी मिरवणाऱ्या परदेशी गायी येणार म्हणून तयारी सुरू झाली. यांच्या साठी अतिशय स्वच्छ असा गोठा तयार झाला.त्यांना फक्त "पेंड' आणि दर्जेदार कडबा लागणार होता त्या मुळे कडबा कापायचे मशीन वगैरे आले.थोड्याच दिवसात पहिल्या सहा गायी आल्या. अतिशय आडदांड अशा या गायींना उतरवून घ्यायचा सोहळा काॕलनी मधील समस्त बालचमूंच्या उपस्थितीत पार पडला. पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन्ही रंगाच्या असंख्य छटा त्यांच्या अंगावर होत्या . विदेशी असल्यामुळे बहुतेक करुन प्रेमळपणा ऐवजी शिष्टाचार पूर्वक गंभिरपणाने त्या वावरत होत्या .
त्यांना दररोज आंघोळ घालावी लागे. दर महिन्याला त्यांची तपासणी चालू असे.काॕलनी मधील मैदानावर पाय मोकळे करायला महिन्यातून एकदा त्यांना न्यावे लागे.हा मात्र अलौकिक असा प्रसंग असे. या वेळी चुकून जरी आपल्या पायावर एखाद्या गायीचा पाय पडला तर चार पाच महिने लंगडी घालतच चालावे लागे. या गायी भरपूर दूध देत असल्यामुळे पायाच्या दोन मांड्या मधे चरवी ठेवून उकीडवे बसून धार काढणे हा अत्यंत दिव्य आणि दमवणारा प्रसंग असे. शेण आणि गोमूत्र यांचा अभूतपूर्व असा वास मात्र देशी गायीं सारखाच असे. साधारणपणे चाॕकलेटी रंगाची, मऊ कातडे असलेली , मालकाला आणि वासराला प्रेमळ पणे चाटणारी अशा गायी ऐवजी मख्खपणे वावरणारी आडदांड आणि भरपूर दूध देणारी हि परदेशी गाय कायमच आम्हाला परकी वाटत असे. या गायी हंबरताना सुध्दा थोडासा जबडा उघडून अनभिज्ञ अशा भाषेत त्यांच्या माहेरची आठवण काढत असत. सोलापूर सोडल्या नंतर गोठा संस्कृती फक्त आठवणींच्या कोपऱ्यात गेली आहे. गोधन ,गोशाला,गोग्रास ,गोबर गॕस,गोमूत्र वगैरे निरर्थक शब्दांची मांदियाळी मात्र जमा झाली आहे .परंतू मालकाचा स्पर्श अचूक ओळखणारी किंवा वांड अशा वासराला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून व्यवहार ज्ञान शिकवणारी , सरपटणारे एखादे जनावर गोठ्याच्या जवळ जरी आले तरी हलकल्लोळ करणारी ,खरवसाची आठवण करुन देणारी अशा त्या गायीच्या आठवणी हळूहळू अंधूक होत चालल्या आहेत !
विनायक जोशी (vp)
19 July 2015
electronchikatha.blogspot.com
बुधवार, २३ मार्च, २०१६
परदेशी गायी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा