रविवार, १३ मार्च, २०१६

Singing Relay Board गाणारे रीले बोर्ड

// श्री स्वामी समर्थ //
   " गाणारे रीले बोर्ड "
बरोबर १२ वर्षापूर्वी हेमंत'कडे गेलो होतो , त्यावेळी त्याच्या टेबलावर PLC ला लागणारा आठ चॕनलचा रीले बोर्ड होता. या रीले बोर्डला आपादमस्तक न्याहाळल्यानंतर थोड्याच वेळात या रिलेंची आणि माझी दोस्ती झाली. या बोर्ड वरती एका ओळीत "रीले " च्या  रुपात आठ मुलभुत अशा स्वरांनी ठाण मांडले होते. सा ,रे,ग ,म,प,ध,नी, आणि वरचा 'सा' असे आठ जण उत्साहाने बसलेले होते.या प्रत्येकाच्या जवळ फक्त गातानाच लागणारे हिरवे दिवे होते. कोणीही आपल्या मनाने बेसूर गाऊ नये म्हणून प्रत्येका जवळ भालदार चोपदारा सारखे 'फ्री व्हीलींग 'डायोड ना नेमलेले होते. प्रत्येक स्वराच्या  बरोबर "रीले काॕन्टेक्ट" च्या रुपातील दोन  जोडप्यांना परवानगी असल्यामुळे सोळा प्रेक्षक आपापल्या मुलांची गाण्यातील तयारी ऐकायला आले होते.  आठ जणांचा समूह असल्यामुळे साधारणपणे सर्वांनी मिळून  जास्तीत जास्त २५६ हरकती घ्यायला परवानगी होती. सर्व तयारी झाल्यावरती हाॕल मधील "पाॕवर" नावाचा प्रखर दिवा लागला. थोड्याच वेळात "लाॕजीकल कमांड " नावाचा संगीत संयोजक तेथे दाखल झाला. आता सर्वांचे लक्ष संयोजक देत असलेल्या "कमांड" कडे होते. थोड्याच वेळात अतिशय सुंदर आणि तालात असे समुहगान चालू झाले . काही जण स्वतंत्र पणे दिर्घकाळ चालणाऱ्या  हरकती , मुरके वगैरे  घेऊन आपली तयारी दाखवत होते . हा अतिशय उत्तम चाललेला सोहळा "काॕन्टॕक्ट" च्या रुपातील प्रेक्षकांना माना डोलवायला भाग पाडत होता . या आरोह आणि अवरोहात १२ वर्षे कशी गेली ते कळलेच नाही. विशेष म्हणजे या सर्व "रीले" नावाच्या मंडळींचा हा संगीत महोत्सव कायम चालू असतो.
आपल्या कडे फक्त ऐकायला येणारे "कान" पाहीजेत आणि उत्तम "दृष्टी " !!
        विनायक जोशी (VP)
     25 July 2015
electronchikatha.blogspot.com
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा