गुरुवार, ३ मार्च, २०१६

Resettable Fuse

// श्री स्वामी समर्थ //
" Resettable Fuse"
पांढरे शुभ्र सिरॕमिकचे कपडे घालून बसलेले आणि जाड वायर मुळे ताठ कणा असलेले पणजोबा , वेगवेगळ्या प्रकारच्या धातुच्या पट्यांचा किटकँट असा आवाज करत बसलेले आजोबा , चकचकीत अशा काचेच्या घरात राहणारे  बाबा यांच्या कडून नविन काहीतरी शिकायला म्हणून हा बसलेला आढळला.याच्या बरोबर थोडीशी ओळख झाल्यावर त्याचे अंतरंग बघायला मिळाले. षटकोनी अशा पाॕलीमर वरती कार्बनच्या छोट्या डाँटचा एक ठिपका अशा असंख्य पाँलीमर युक्त  डाॕटची शिस्तबद्ध रांगोळी म्हणजे' रिसेटेबल फ्युज'. एकमेकांना खेटून गप्पा मारणारे कार्बन डाॕट येणाऱ्या जाणाऱ्यांना कमीतकमी विरोध होईल याची काळजी घेतात.मर्यादा ओलांडून जास्त करंट वाहू लागला तर मात्र हे षटकोनी पाॕलीमर रागाने गरम होऊन वाकड्या तिकड्या आकारात आकांड तांडव करत अनिच्छेने एकमेकांच्या पासून दूर जातात. या मुळे कार्बन डाॕट एकमेकांच्या पासून दूरावतात आणि त्या मुळे करंटचा प्रवाह अत्यंत कमी होतो .अशा प्रकारे थोडावेळ गेला कि रागाने लाल झालेले पाॕलीमर शांत थंड होतात आणि आपापल्या कार्बन डाॕटना मदतीला घेऊन परत सुबक रांगोळी काढतात.थोड्या वेळासाठी एकमेकांच्या पासून दूर गेलेले कार्बन डाॕट परत एकदा एकमेकांना बिलगून गुजगोष्टी चालू करतात .पहिल्या सारखाच  झुळुझुळु असा करंट वहात असलेला दिसायला लागतो. समोरच्याने मर्यादा ओलांडली तर रागाने गरम होऊन  तात्पुरते काम थांबवणारा आणि शांत झाल्यावर परत काम सुरु करणारा असा हा " Resettable Fuse "आहे!
विनायक जोशी (vp )
3 March 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा